दौलतनगर दि.24:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि.दौलतनगर यांचेकडून चालू गळीत हंगाम
सन 2024-25 करीता गळीतास येणाऱ्या ऊसास पहिली उचल म्हणून प्रति मे.टन रु. 2700/- याप्रमाणे
रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणेत येणार असल्याची माहिती कारखान्याचे
व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग समुहाचे
मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री नामदार मा.श्री.शंभूराज देसाई
व चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा)
यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने नियोजन केले आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा सन 2024-25 चा गळीत
हंगाम दि. 15 नोव्हेंबर 2024 पासून नियमित सुरु झालेला आहे. आज अखेर कारखान्याने
84225 मे.टन ऊसाचे गळीत केले असून आज अखेर 11.33%
सरासरी साखर उतारा मिळालेला आहे. चालू गळीत हंगामामध्ये साखरेचे दर हे
जवळपास रु. 3300 /- ते 3400/- प्रति क्विंटलचे आसपास असून साखरेच्या दराचे
प्रमाणात आपणांस बँकेकडून उचल मिळत असते. गतवर्षी कारखान्याने रु 2500/- प्र.मे.टन
याप्रमाणे पहिली उचल अदा केलेली होती. चालू वर्षी बँकेकडून उत्पादित होणाऱ्या
साखरेवर मिळणारी प्रति क्विंटल उचल व गळीत हंगामामध्ये अनुषंगिक खर्च पाहता आपले
कारखान्याने गळीतास येणाऱ्या ऊसास पहिली उचल म्हणून रु. 2700/- प्र.मे.टन
याप्रमाणे देणेचे नियोजन केले असून एफ.आर.पी.प्रमाणे होणारी उर्वरित रक्कम निधीची
उपलब्धता होताच अदा केली जाईल, त्यामुळे
चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या उद्देशाने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस
उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस हा लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य
करावे, असे आवाहन शेवटी प्रसिध्दी पत्रकांत नमूद केले आहे.