Saturday, 3 October 2026

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व 11 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते बुधवार दि.07 ऑक्टोंबर रोजी 53 वा गळीत हंगामाचा शुभारंभ- व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे.

 


दौलतनगर दि.03:- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२6-२7 मधील 53 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम बुधवार दि.07 ऑक्टोंबर,२०२6 रोजी दुपारी 01.00 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री. शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. स्मितादेवी देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ १1 सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

           पत्रकात म्हंटले आहे की, चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ सभासद श्री.विश्वासराव बापूराव जानुगडे जानुगडेवाडी, श्री.संभाजी अंतू कदम पवारवाडी, श्री. विनायक आण्णा जामदार नावडी,श्री.हिंदूराव दगडू जाधव मारुलहवेली, श्री. शंकर गोविंद पानस्कर बहुले, श्री. शिवाजी शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, श्री.बाबूराव रामचंद्र देसाई ऊरुल, श्री. बाळासाहेब किसन कवठेकर कवठेकरवाडी, श्री. चंद्रकांत विष्णू खामकर आवर्डे, श्री.आनंदराव दगडू जाधव चोपडी व श्री. गणपतराव बंडू पाटील काळोली या १1 ज्येष्ठ सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. 07 ऑक्टोंबर, २०२6 रोजी दुपारी 01.00 वा. संपन्न होणारअसून या गळीत हंगाम शुभारंभाचे निमित्ताने कारखान्याचे संचालक श्री.रामचंद्र बाबासो पाटील व  त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वत्सला रामचंद्र पाटील यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटीपत्रकात केले आहे.

Tuesday, 29 September 2026

पाटणसह पाच तालुक्यांच्या दुष्काळी समावेशासाठी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा पाठपुरावा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी; मुख्य सचिवांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश



*मुंबई, दि. २९ :* सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.


राज्यात दुष्काळ जाहीर करताना सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर आदी तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पाटणसह वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश झालेला नाही. दरम्यान, या तालुक्यांमध्येही पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतीपिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे.

पाटण तालुक्यातील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे देसाई यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तालुक्यात एकूण १४ महसूल मंडळे असून त्यापैकी नऊ महसूल मंडळांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित पाच महसूल मंडळांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पाटणप्रमाणेच वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव तालुक्यांमध्येही पावसाच्या खंडामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता पावसाच्या खंडाचा पिकांवर झालेला प्रत्यक्ष परिणाम लक्षात घेऊन दुष्काळी निकषांनुसार या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळावा, यासाठी देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही बाब मांडली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने या मागणीवर शासनस्तरावर पुढील कार्यवाहीला वेग येण्याची अपेक्षा आहे. 

सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांबाबतही दुष्काळी निकषांच्या आधारे निर्णय होण्याची प्रक्रिया आता महत्त्वाची ठरणार आहे.

Wednesday, 9 September 2026

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी दौलतनगर येथे 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा.



 

दौलतनगर दि.10 :दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री         मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.12 सप्टेंबर,2026 रोजी दु.01.00वा. संपन्न होणार आहे. “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर, ता.पाटण या ठिकाणी पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) व सर्व संचालक मंडळ हे 56व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहणार आहेत. तरी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

 

Friday, 14 August 2026

माजी सैनिकांसाठी अद्ययावत संकुल उभारण्याच्या एकात्मिक विकास प्रकल्पाला गती – मंत्री शंभूराज देसाई


मुंबई, दि. २९ : मा.राज्यपाल महोदयांच्या निर्देशानुसार सातारा आणि पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागांचा एकात्मिक विकास प्रकल्प गतिमान करण्यात येणार असून, या ठिकाणी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अद्ययावत संकुल उभारण्यात येणार आहे.


 सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या संकुलाच्या माध्यमातून वीरपत्नी तसेच माजी सैनिकांच्या पत्नींनी स्थापन केलेल्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.


हा उपक्रम माजी सैनिकांच्या कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणारा राज्यातील पहिलाच एकात्मिक विकास प्रकल्प साकारला जाणार आहे, असे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज सातारा व पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाकडील जागेच्या एकत्रित विकासासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.


या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.), माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संतोष कुमार (भा.प्र.से.), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश गटणे (भा.प्र.से.), उपसचिव श्री. विजय पोवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे माजी सैनिक कल्याण (पुणे विभाग) संचालक, सातारा जिल्हाधिकारी, सोलापूर निवासी जिल्हाधिकारी, पंढरपूर देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व सोलापूर जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले.


यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी पंढरपूर येथे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवास, प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रशासकीय सेवा तसेच अन्य आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सर्व सोयी-सुविधांनी युक्त अद्ययावत संकुल उभारण्याच्या प्रस्तावाबाबत सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.


सातारा व पंढरपूर येथील संबंधित जागांची सद्यस्थिती, जागांची तपासणी, उपलब्ध पायाभूत सुविधांचा आढावा तसेच दोन्ही विभागांच्या जागांच्या एकात्मिक विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली.


मा. राज्यपाल महोदय यांचे निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या विकास प्रकल्पामध्ये पर्यटन विकासाबरोबरच माजी सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, विभागांमधील प्रभावी समन्वय आणि वेळबद्ध कार्यवाही सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


हा प्रकल्प राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी नवे मानदंड प्रस्थापित करणारा ठरेल, असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला.

Wednesday, 15 July 2026

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 


दौलतनगरदि.15:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्येचांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2026-27 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.

                दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2026-27 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी अशोकराव पाटील, पांडूरंग नलवडे, सुरज चव्हाण,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,अधिक देसाई पदाधिकारी, कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

               यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा) पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे. सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचवणे हे लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2025-26 चे गळीत हंगामामध्ये 195602 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.59% साखर उताऱ्याने 2,26,700 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिल मधील रोलरचे आज पूजन होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे कारखाना गळीत हंगामात यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम करावे. आपला हा कारखाना सभादांचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊसदर देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, ऊस तोडणी मजूर, कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्नातून येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबध्द काम करावे. तसेच आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला गळीतास देऊन येणार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.