Tuesday 30 April 2019

पाटणला आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण संपन्न. आमदार शंभूराज देसाईंनी जनतेला दिल्या महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा.



         
दौलतनगर दि.२८:- देशातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख असून विकासाच्या केंद्रीकरणातून महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात आज आघाडीवर आहे. दि. ०१ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस असून आज महाराष्ट्र राज्य निर्मितीचा ५९ वा वर्धापनदिन मोठया उत्साहात संपुर्ण महाराष्ट्र राज्यात संपन्न होत आहे. ज्या १०५ हुतात्मांमुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या १०५ हुतात्मांना विनम्र अभिवादन करुन महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्यात आणला त्यामध्ये पाटण तालुक्याचे सुपुत्र स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई हे त्यामध्ये अग्रभागी होते. १०५ हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणाऱ्यां या सर्वांच्या स्मृतींना उजाळा देणे,त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे महाराष्ट्र राज्यातील जनतेचे,नागरिकांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
                       महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त दि.०१ मे रोजीचे ध्वजारोहण पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पार पडले यावेळी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रंसगी पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे यांच्यासह स्वातंत्रसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक, पाटण मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुकास्तरीय सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                   महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,ज्या १०५ हुताम्यांच्या योगदानामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य असून पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी प्रथमत: पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने या १०५ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. गेली ५९ वर्षे राज्य शासन महाराष्ट्र राज्यातील जनतेकरीता लोककल्याण योजना राबवित आहे.आपले महाराष्ट्र राज्य देशातील प्रगतीशील राज्य व्हावे,राज्यातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात याकरीता राज्य शासनाकडून कसोसीने प्रयत्न सुरु असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी गेली चार वर्षे चांगले योगदान देवून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.आज आपले महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रामध्ये प्रगतीची विविध शिखरे पादाक्रांत करीत आहे. याचा अभिमान वाटतो.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर प्रयत्नातून राज्याच्या विविध भागामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत.शासनाच्या विविध योजना सामान्य घटकांपर्यंत पोहचविण्याकरीता शासनामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत. आपल्या मतदारसंघांचा आमदार  या नात्याने राज्याच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्याकरीता मी गेली चार वर्षे कसोशीने प्रयत्न केला असून हा प्रयत्न भविष्यातही असाच सुरु राहणार आहे. सामान्या घटकांचा विकास करणे ही आपली जबाबदारी असून विकासाचे उदीष्ठ पुर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे यामध्ये तालुकास्तरीय सर्व जनतेने, शासकीय अधिकारी यांनी मोठे योगदान दिले आहे ते पुढेही दयावे असे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी आवाहन करीत पाटण मतदारसंघातील तमाम जनतेला त्यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित स्वातंत्रसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक यांचे आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.



Tuesday 23 April 2019

दौलतनगरच्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची दशकपुर्ती उत्साहात साजरी. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण






         
               महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीनदिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात दशकपुर्ती साजरी करण्यात आली.पारायण सोहळयाच्या शेवठच्या दिवशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा ३६ वा पुण्यस्मरण सोहळा मोठया उत्साहात पार पडला.पुण्यतिथीदिवशी तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येवून कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयावर आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुतळयावर पुष्पवृष्टी करुन पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.
             दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या भव्य प्रांगणात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त गत नऊ वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे दहावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये ३७७ महिला तसेच ३६७ पुरुषांसह ७४४ वाचक सहभागी झाले होते.तसेच तालुक्या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये आमदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब,रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई,यशराज देसाई, ईश्वरी देसाई,जयराज देसाई,आदित्यराज देसाई,प्रकाश देसाई यांचा विशेष सहभाग होता.तर ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज, ह.भ.प.अनिल पाटील महाराज, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.
          तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री.ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री.विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मेघडंबरी येथून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. दरम्यान या पारायण सोहळयामध्ये सलग १० वर्षे वाचक म्हणून सहभागी झालेल्या एकूण ३० भाविकांचा व वाचक महिलांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला. पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत नऊ वर्षापासून ह.भ.प.पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज,ह.भ.प.अनिल पाटील महाराज,ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सर्वांचे आभार आमदार शंभूराज देसाईंनी मानले.या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
चौकट- रिंगणसोहळ्याने भाविक भक्त भारावले.
         लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. पंढरपुरच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणीही रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो याचे नेतृत्व स्वत: आमदार शंभूराज देसाई करतात. यंदाच्या रिंगण सोहळ्यास भाविक भक्तांची मोठी गर्दी होती. हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

Saturday 20 April 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यात प्रतिपंढरीचे रुप. दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ.



               महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्यातील जनतेचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे भव्य प्रांगणात मागील नऊ वर्षाप्रमाणे यंदा दहाव्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये भव्य प्रमाणांत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ शनिवार दि.२० एप्रिल,२०१९ रोजी हजारो भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह.भ.प.जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन तसेच उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आला.
             दौलतनगर ता.पाटण येथे सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून गत नऊ वर्षात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची प्रतिवर्षीची पुण्यतिथी हि दि. २० ते २३ एप्रिल अशी तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भव्य मंडपात सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये ३७७ महिला तसेच ३६७ पुरुषांसह ७४४ वाचक सहभागी झाले आहेत.
               महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार,प्रवनचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी वाचकांनी पारायण सोहळयास चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रतिवर्षावर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.पुंडलिक महाराज कापसे, आळंदीकर हे उपस्थित असून शनिवार दि. २० एप्रिल २०१९ रोजी हभप सचिन महाराज कदम,आळंदी यांचे प्रवचन,हभप संजय महाराज कावळे,आळंदी यांचे किर्तन,रविवार दि. २१ एप्रिल, २०१९ रोजी हभप दादा महाराज तुळसणकर यांचे प्रवचन तर हभप महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल,२०१९ रोजी हभप मधुकर महाराज दिक्षीत,मसूर यांचे प्रवचन तर हभप ॲङ जयवंत महाराज बोधले, पंढरपूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा.आमदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप वेदांतचार्य श्रीकृष्णानंद शास्त्रीजी,गोकूळ शिरगाव,वृंदावनधाम करवीर कोल्हापूर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह, दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.
                 या पारायण सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचाराने या तालुक्यात आपण कार्य करीत आहोत. त्यांनी व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेला आदर्श पुढे नेण्याकरीता आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मशताब्दी निमित्त सुरु झालेला हा पारायण सोहळा अखंडीत गेली ९ वर्षे सुरु आहे.या पारायणाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रत्येक वर्षी लोकनेतेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन होत आहे.प्रतिवर्षी या पारायण सोहळयास पाटण तालुक्यासह इतर तालुक्यातील भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो हे पाहून आपल्या हातून चांगले काम पारायणाच्या निमित्ताने होत आहे म्हणून मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो,लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी निश्चय केलेप्रमाणे लोकनेते साहेबांच्या कर्मभूमित त्यांचे कार्य नव्या पिढीला समजावे याकरीता आपण शासनाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक उभारले आहे.या शताब्दी स्मारकाचे उदघाटन नुकतेच जानेवारी महिन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांचे हस्ते संपन्न झाले असून हे शताब्दी स्मारक संगळयांना पाहणेकरीता खुले करण्यात आले आहे.वर्षातून एकदा आपण सर्व भाविक मंडळी पारायणाच्या निमित्ताने येथे येता.वाचनातून आपल्याला लोकनेते साहेब यांचे कार्य ज्ञात होत आहेच परंतू लोकनेते साहेबांचे प्रत्यक्ष कार्य या शताब्दी स्मारकांच्या माध्यमातून उलघडत असून पारायणातून थोडासा वेळ काढून येथे आलेल्या व येणाऱ्या भाविकांनी या शताब्दी स्मारकाची नक्की पहाणी करावी असे सांगून त्यांनी पारायण सोहळयामध्ये काही त्रुटी आढळल्यास भाविकांनी नक्की सांगाव्यात त्यात सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,ह.भ.प. पुंडलिक महाराज कापसे आळंदीकर,ह.भ.प.अनिल महाराज पापर्डेकर,ह.भ.प.जगन्नाथ महाराज ठोंबरे व कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य,विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व लोकनेते प्रेमी जनतेची मोठया प्रमाणांत उपस्थिती होती. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी यंदाच्या दहाव्या वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उपस्थित असणाऱ्या वाचकांचे शाब्दिक स्वागत केले व या पारायण सोहळयास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ही मानले.


Thursday 18 April 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ पाचव्या गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेने केले लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन.




                        महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यातील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात गुरुवारी मोठया उत्साहात पार पडली.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून गत चार वर्षापासून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेचे हे पाचवे वर्ष असून चित्ररथ व गौरव यात्रेला तालुक्यातील हजारों जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला.मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेने रथामधील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादुकांचे दर्शन घेवून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सकाळी ०९.३० वाजता सुरु झालेली ही चित्ररथ व गौरवयात्रा सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत संपुर्ण तालुकाभर सुरु होती.आमदार शंभूराज देसाई या गौरवयात्रेला स्वत: हजर असल्याने हा भव्य सोहळा अत्यंत शांततेत पार पडला.
                        लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य श्री ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला जातो.यावर्षीही २३ एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त शनिवार दि.२० पासून २३ एप्रिल पर्यंत कारखाना कार्यस्थळावर तीन दिवसीय श्री ग्रंथराज पारायण सोहळा संपन्न होत आहे. गत चार वर्षापासून आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या अगोदर लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देणेकरीता त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारे चित्ररथांची गौरवयात्रा व गौरवयात्रेच्या पुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यात येत असून तालुक्यातील तब्बल ३३ गावांतून हे चित्ररथ व गौरवयात्रा मार्गक्रमण करते. यावेळी या गावांच्या आसपासची गावे व वाडयावस्त्यांतील लोकनेतेप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित असते.गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते या सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांचे चिरंजीव यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज देसाई,आदित्यराज देसाई,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य हे अभिवादन करणेकरीता दौलतनगर येथे उपस्थित होते.
                        लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी,फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.तालुक्यातील दौलतनगर कारखाना,गव्हाणवाडी,चोपदारवाडी,सुर्यवंशीवाडी,पापर्डे,मारुलहवेलीफाटा,गारवडे,बहुलेफाटा,सोनाईचीवाडी,वेताळवाडी,निसरे,निसरेफाटा,आबदारवाडी,मल्हारपेठच्या सर्व वाडया,नारळवाडी,येराडवाडी,नाडे नवारस्ता,आडूळ गावठाण,आडूळपेठ,लुगडेवाडी फाटा,येरफळे, म्हावशी,पाटण,नेरळे,माणगाव,पेठशिवापूर,कुसरुंड,शिंदेवाडी,सुळेवाडी मार्गे पुन्हा दौलतनगर असा या पालखी सोहळयाचा मार्ग होता.एकूण ३३ गावातून मार्गक्रमण करणाऱ्या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी सोहळयाचे महिला वर्गाकडून पूजन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले.या सोहळयाच्या मार्गक्रमणावर भगवे झेंडे लावण्याबरोबर प्रत्येक गावामध्ये रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर कामगार संघटना,शिवदौलत सहकारी बँक, स्व. शिवाजीराव देसाई पॉलिटेक्निक कॉलेज,श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर अँड सिनिअर कॉलेज,दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मोरणा शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांनी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी लोकनेते यांच्या जीवनावरील विविध विषयांना स्पर्श करणारे आकर्षक चित्ररथ साकारले होते.सुमारे ११ आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते.तर हजारो कार्यकर्ते लोकनेत्यांच्या नावाने जयजयकार करत सोहळयात सामील झाले होते.यामुळे पालखी सोहळयातील संपुर्ण वातावरण लोकनेतेमय झाले होते. स्वत: आमदार शंभूराज देसाई नेतृत्व करीत असलेली ही अनोखी मिरवणूक तब्बल सात तास भर उन्हात अत्यंत उत्साहात संपन्न झाली.सहभागी चित्ररथामध्ये लोकनेत्यांनी साकारलेल्या वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.याचवेळी आमदार देसाई यांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येत होते.या अनोख्या सोहळयात प्रत्येक ठिकाणी उत्साही संस्था कार्यकर्त्यांकडून मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना सरबत,पोहे,चहा,केळी अशा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.संपुर्ण मिरवणूकीत आमदार शंभूराज देसाईंच्या गाडीचे सारथ्य त्यांचे चिरंजीव यशराज देसाईंनी केले. दौलतनगर याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या पारायण सोहळयाच्या कालावधीत संपुर्ण पाटण तालुका खऱ्या अर्थाने लोकनेतेमय होतो. हेच वातावरण याठिकाणी २३ एप्रिलपर्यंत पहावयास मिळते गौरवयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे आमदार शंभूराज देसाई यांनी आभार मानले.