महाराष्ट्राचे पोलादी
पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यातील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन
घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेची भव्य
मिरवणूक पाटण तालुक्यात गुरुवारी मोठया उत्साहात पार पडली.लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या
संकल्पनेतून गत चार वर्षापासून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ
व गौरव यात्रेचे हे पाचवे वर्ष असून चित्ररथ व गौरव यात्रेला तालुक्यातील हजारों
जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला.मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या
जनतेने रथामधील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादुकांचे दर्शन घेवून त्यांच्या
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सकाळी ०९.३० वाजता सुरु झालेली ही चित्ररथ व
गौरवयात्रा सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत संपुर्ण तालुकाभर सुरु होती.आमदार शंभूराज
देसाई या गौरवयात्रेला स्वत: हजर असल्याने हा भव्य सोहळा अत्यंत शांततेत पार पडला.
लोकनेते बाळासाहेब देसाई
यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे
आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य श्री ग्रंथराज पारायण सोहळा
आयोजित केला जातो.यावर्षीही २३ एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६
व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त शनिवार दि.२० पासून २३ एप्रिल पर्यंत कारखाना
कार्यस्थळावर तीन दिवसीय श्री ग्रंथराज पारायण सोहळा संपन्न होत आहे. गत चार वर्षापासून
आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या अगोदर लोकनेते
बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन
देणेकरीता त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारे चित्ररथांची गौरवयात्रा व
गौरवयात्रेच्या पुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यात
येत असून तालुक्यातील तब्बल ३३ गावांतून हे चित्ररथ व गौरवयात्रा मार्गक्रमण करते.
यावेळी या गावांच्या आसपासची गावे व वाडयावस्त्यांतील लोकनेतेप्रेमी जनता मोठया
संख्येने उपस्थित असते.गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई
यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत आमदार
शंभूराज देसाई यांच्या हस्ते या सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांचे
चिरंजीव यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज
देसाई,आदित्यराज देसाई,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन
अशोकराव पाटील यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील
विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य हे अभिवादन
करणेकरीता दौलतनगर येथे उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब देसाई
चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी,फटाक्यांची
आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.तालुक्यातील दौलतनगर
कारखाना,गव्हाणवाडी,चोपदारवाडी,सुर्यवंशीवाडी,पापर्डे,मारुलहवेलीफाटा,गारवडे,बहुलेफाटा,सोनाईचीवाडी,वेताळवाडी,निसरे,निसरेफाटा,आबदारवाडी,मल्हारपेठच्या
सर्व वाडया,नारळवाडी,येराडवाडी,नाडे नवारस्ता,आडूळ गावठाण,आडूळपेठ,लुगडेवाडी
फाटा,येरफळे, म्हावशी,पाटण,नेरळे,माणगाव,पेठशिवापूर,कुसरुंड,शिंदेवाडी,सुळेवाडी
मार्गे पुन्हा दौलतनगर असा या पालखी सोहळयाचा मार्ग होता.एकूण ३३ गावातून
मार्गक्रमण करणाऱ्या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन
लोकनेत्यांच्या पालखी सोहळयाचे महिला वर्गाकडून पूजन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत
करण्यात आले.या सोहळयाच्या मार्गक्रमणावर भगवे झेंडे लावण्याबरोबर प्रत्येक
गावामध्ये रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग
व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर
कामगार संघटना,शिवदौलत सहकारी बँक, स्व. शिवाजीराव देसाई पॉलिटेक्निक
कॉलेज,श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर अँड सिनिअर कॉलेज,दौलत औद्योगिक प्रशिक्षण
संस्था व मोरणा शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांनी तसेच जिल्हा परिषद व पंचायत
समिती सदस्यांनी लोकनेते यांच्या जीवनावरील विविध विषयांना स्पर्श करणारे आकर्षक
चित्ररथ साकारले होते.सुमारे ११ आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले
होते.तर हजारो कार्यकर्ते लोकनेत्यांच्या नावाने जयजयकार करत सोहळयात सामील झाले
होते.यामुळे पालखी सोहळयातील संपुर्ण वातावरण लोकनेतेमय झाले होते. स्वत: आमदार शंभूराज
देसाई नेतृत्व करीत असलेली ही अनोखी मिरवणूक तब्बल सात तास भर उन्हात अत्यंत
उत्साहात संपन्न झाली.सहभागी चित्ररथामध्ये लोकनेत्यांनी साकारलेल्या वास्तू
सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.याचवेळी आमदार देसाई यांचे ठिकठिकाणी महिलांकडून
औक्षणही करण्यात येत होते.या अनोख्या सोहळयात प्रत्येक ठिकाणी उत्साही संस्था
कार्यकर्त्यांकडून मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना सरबत,पोहे,चहा,केळी अशा
अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.संपुर्ण मिरवणूकीत आमदार शंभूराज देसाईंच्या गाडीचे
सारथ्य त्यांचे चिरंजीव यशराज देसाईंनी केले. दौलतनगर याठिकाणी लोकनेते बाळासाहेब
देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या पारायण सोहळयाच्या कालावधीत संपुर्ण
पाटण तालुका खऱ्या अर्थाने लोकनेतेमय होतो. हेच वातावरण याठिकाणी २३ एप्रिलपर्यंत
पहावयास मिळते गौरवयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे आमदार शंभूराज देसाई यांनी
आभार मानले.
No comments:
Post a Comment