Thursday 23 May 2019

बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणेकरीता १ कोटी ०५ लाख निधी मंजुर. पाटण विधानसभा मतदारसंघात ७ गांवात (नाविण्यपुर्ण) योजनेअंतर्गत नाविण्यपुर्ण उपक्रम. आमदार शंभूराज देसाई.



दौलतनगर दि.23:- पाटण विधानसभा मतदारसंघात अनेक गांवामध्ये असणाऱ्या बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार नसलेने येथील बौध्द समाजातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे हा उपक्रम हाती घ्यावा अशी मागणी जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे व जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांचेकडे केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील ७ गावातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे या कामांकरीता एकूण १ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी काढला असल्याची माहिती पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी दिली असून पाटण मतदारसंघात हा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु झाल्याचा आनंद वाटत असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हंटले आहे.
                         आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या लघू समितीचा सदस्य या नात्याने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार करताना नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत नाविन्यपुर्ण अशा उपक्रमांना आवश्यक तो निधी राखीव ठेवावा अशी शिफारस मी समितीपुढे केली होती. त्यानुसार सदरचा आराखडा तयार करताना पाटण विधानसभा मतदारसंघात डोंगराळ आणि दुर्गम भागात वसलेल्या विविध गांवातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने बौध्द वस्त्यांमध्ये नागरिकांना आवश्यक असणारे बौध्दविहार व या समाजातील मुलामुंलीच्या अभ्यासाकरीता अभ्यासिका बांधणे हा उपक्रम हाती घेण्याचे मी ठरविले त्यानुसार  बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे या कामांचे अंदाजपत्रक सार्वजनीक बांधकाम विभाग यांचेकडून तयार करुन घेवून पाटण मतदारसंघातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे हा उपक्रम नाविन्यपुर्ण असून जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे व जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांचेकडे केली होती. माझे मागणीनुसार जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ७ गांवातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणेच्या कामांना मंजुरी दिले असल्याचे आदेश पारित केले असून या कामांकरीता एकूण १ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे आदेशात म्हंटले आहे. मंजुर केलेल्या बौध्दविहार व अभ्यासिका बांधणेच्या कामांमध्ये  मौजे मारुल तर्फ पाटण-15.00 लाख, येराड-15.00 लाख, शिरळ-15.00 लाख, बहुले -15.00 लाख, आटोली- 15.00 लाख, मरळी-14.98 लाख, साईकडे-14.99 लाख  असा एकूण १ कोटी ४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून लवकरच निविदा प्रसिध्द होवून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
चौकट:-  धनगर समाज वस्त्यांच्या रस्ते बांधणेकरीता ५० लाख रुपयांचे प्रस्ताव शासनाने मागविले.
              वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत सन २०१८-१९ मध्ये पाटण मतदारसंघातील धनगरसमाज वस्त्यांमधील रस्ते करणेकरीता ५० लाखांचा निधी मंजुर करण्याची मागणी शासनाकडे केली होती.यामध्ये मरड धनगरवाडा १ धनगरवस्ती गवळीसमाज गावपोहोच रस्ता,मरडफाटा ते मिसाळवाडी धनगरसमाज वस्ती,रामेल ते गवळीवस्ती धनगरसमाज, सडादाढोली धनगरसमाज पोहोच रस्ता व कसणी ते धनगरवाडा गावपोहोच रस्ता करणेकरीता प्रत्येकी १० लाख रुपयेप्रमाणे ५० लाख रुपये या कामांना मंजुर करावेत अशी मागणी होती मागणीनुसार प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना शासनाकडून संबधितांना आल्या आहेत.

Monday 20 May 2019

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेचा मतदारसंघातील १४६ गरजू मुलींना लाभ. आमदार शंभूराज देसाई. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६० वी पुण्यतिथी साजरी.



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींचे शिक्षण त्यांच्या कुटुंबातील गरीबीमुळे थांबू नये ही भावना मनी बाळगून सन २०१२ पासून पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाला आपला हातभार लागावा याकरीता स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना ही एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना प्रेरणादायी ठरत आहे. गत आठ वर्षात पाटण मतदारसंघातील एकूण १४६ गरजू मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला असुन आतापर्यंत आपण स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २२ लाख ३० हजार रुपये हे शिष्यवृत्ती योजनेकरीता दिले आहेत.कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना गरजू मुलींकरीता एक आधार म्हणून काम करीत आहे याचा मला फार आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी असल्याचे प्रतिपादन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ६० व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात केले.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६० वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजीत कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमास सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँक चेअरमन मिलींद पाटील, या प्रमुख पदाधिकाऱ्यासंह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे खुप खुप आर्शिवाद आपल्या पाठीशी आहेत. म्हणूनच आमदार म्हणून त्यांच्या नावाने आपण नवनवीन कल्पना राबवून पाटण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अगदी तळमळीने काम करीत आहेत. माझ्या आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाकरीता एक शिष्यवृत्ती योजना सुरु करावी आणि या शिष्यवृत्ती योजनेचे वितरण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यस्मरण कार्यक्रमात करावे अशी कल्पना सन २०१२ मध्ये मी मांडली प्रतिवर्षी मुलींच्या शिक्षणाकरीता ५००० रुपये आपण दयावेत अशी भावना मनी बाळगली.याकरीता फंड कशातून उभा करायचा असा विषय जेव्हा समोर आला तेव्हा माझे चेअरमन पदाची १० वर्षे पुर्ण झालेनंतर दशकपुर्तीच्या कार्यक्रमातून शिल्लक राहिलेली रक्कम आपण  स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवली व या रक्कमेच्या व्याजातून ही शिष्यवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत मतदारसंघातील १४६ गरजू मुंलीना आपण ही शिष्यवृत्ती दिली आहे.या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे. याकरीता कोयना परीसर साखर कामगार संघटना आणि शिवदौलत बँकेचे सर्व कामगार हे प्रत्येकी १ लाख व २५ हजार रुपयांची मदत प्रतिवर्षी करीत आहेत. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतुन गरीब कुंटुबांतील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी आपण हा धाडसी निर्णय घेतला आहे. गतवर्षीपासून आपण या शिष्यवृत्ती योजनेत ५०० रुपयांनी वाढ करुन ५५०० रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देत आहोत.आज गरीब कुटुंबातील मुलींना केवळ त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्याकरीता म्हणून नव्हे तर सर्वसामान्य महिला किती सक्षम असू शकते याचे दर्शन ग्रामीण भागातील मुलींना घडविण्याकरीताचा आपला हा प्रयत्न आहे. मला कौतुक एका गोष्टीचे नेहमी वाटते, दोन वर्षापुर्वी असेच मतदारसंघातील एका मुलींस आपण शिष्यवृत्ती योजना सुरु केली होती तीन वर्षे त्या मुलींने त्याचा लाभ घेतला कालांतराने तिच्या घरची परिस्थिती सुधारल्यानंतर तिने आमच्या संस्थेच्या प्राचार्यांना येवून सांगितले सर, माझा भाऊ आता नोकरीला लागला आहे त्यामुळे माझे घरची परिस्थिती आता चांगली आहे मला सुरु असलेली शिष्यवृत्ती आपण दुसऱ्या कोणत्याही गरजू मुलींस सुरु करावी असेही चांगले संस्कार या शिष्यवृत्ती योजनेतून आपण देवू शकलो हे कौतुकास्पद आहे. असे सांगून ते म्हणाले, शासनाच्या वतीने आपण आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारक पुर्ण केले आहे या स्मारकामध्ये गरीब कुटुंबातील मुलामुलींना ई-लर्निंगचे शिक्षण मिळावे याकरीता सर्व सोयीनीयुक्त अभ्यासिकाही आपण सुरु केली आहे.ग्रामीण भागातील मुलांमुलींना खरोखरच चांगला उपयोग होणार असून शिष्यवृत्तीधारक मुलींनीही या अभ्यासिकेचा वापर करुन घ्यावा. असे आवाहन त्यांनी करुन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांना ६० व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन केले.
प्रारंभी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे कार्य जवळून पाहिलेले सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड, यांचा मानाची शाल,श्रीफळ व लोकनायक ग्रंथ देवून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दादासाहेब सुतार,कराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पाटण मतदारसंघातील यंदाच्या वर्षीच्या २२ मुलींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.उपस्थितांचे आभार माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील यांनी मानले.
चौकट:- कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुतळयास प्रथमत: अभिवादन.
मरळी हायस्कुलच्या प्रांगणात कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुतळयास त्यांचे ६० व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाई, रविराज देसाई यांनी प्रथमत: पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मरळी गावांतील विविध संस्थांचे पदाधिकारी व कै.सौ.वत्सलादेवी देसाई हायस्कूल,मरळीचे सर्व शिक्षक वर्ग यांनीही अभिवादन केले.

Saturday 18 May 2019

दि.२० मे रोजी दौलतनगरला कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६० वा पुण्यतिथी कार्यक्रम. पुण्यतिथीनिमित्त मुलींना शिष्यवृत्तीचे वितरण.




दौलतनगर दि.1८:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६० वा पुण्यतिथी कार्यक्रम रविवार दि. २० मे, २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर, ता. पाटण येथे आयोजीत करण्यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि. २० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो. आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यंदाचे हे दहावे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील १२४ मुलींना प्रत्येकी ५००० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या ६० व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त यंदाच्या वर्षी नव्याने २२ मुलींना व मागील ५६ मुली असे एकूण ७८ मुलींना प्रत्येकी ५५०० रुपयेप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय गरजांच्या साहित्याचे वितरणही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने करण्यात येते. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे यंदाच्या वर्षीच्या पुण्यस्मरण कार्यक्रम रविवार दि. २० मे २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकांत करण्यात आले आहे.

Thursday 16 May 2019

टंचाई निवारण्याकरीता पाटण तालुक्यात ३१ नपापु योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना 90.96 लाखांचा निधी मंजुर टंचाई आराखडयातील कामांना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश.आमदार शंभूराज देसाईंचा पाठपुरावा यशस्वी.


                  
                           


दौलतनगर दि.16:-पाटण विधानसभा मतदारसंघात टंचाईच्या पार्श्वभूमिवर टंचाई निवारण्याकरीता जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे सादर केलेल्या टंचाई आराखडयातील एकूण ३१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे व १५ विंधन विहीरी (बोअर) मारण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.12 मे,2019 रोजी दिले आहेत. या कामांकरीता सुमारे 90 लाख 96 हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांचेकडून देण्यात आले आहेत.पाटण तालुक्यातील टंचाई परिस्थिती निवारण्याकरीता मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याचा पाठपुरावा यशस्वी झाला असून ३१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे व १५ विंधन विहीरी (बोअर) मारण्याची कामे लवकरात लवकर सुरु करावीत असे आदेश जिल्हाधिकारी,सातारा व आमदार शंभूराज देसाईंनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
                     सातारा जिल्हयामध्ये पिण्याच्या पाण्याची उद्भवलेली तीव्र टंचाई निवारणार्थ शासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेणेत आल्या असून यामध्ये टंचाई काळात नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे, आवश्यक  त्याठिकाणी विंधन विहीरी (बोअर) मारणे, विहीरी खोल करुन पेयजल स्त्रोत बळकटीकरण करणे या कामांचा त्यामध्ये समावेश आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात नादुरुस्त झालेल्या ३१ नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीरी (बोअर) तसेच विहीरी खोल करुन पेयजल स्त्रोत बळकटीकरण करणे या कामांचा आराखडा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली प्रातांधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तयार करुन जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मान्यतेकरीता पाठविला होता.लोकसभा निवडणूकीची आचारंसहिता असले कारणाने या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झाले नव्हते, परंतू शासनाने टंचाईची परिस्थिती पहाता पाणी टंचाईसंदर्भात लोकसभेची आचारसंहिता शिथील करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर पाणी टंचाई आराखडयांना मंजुरी देणे तसेच मुलभूत गरजांची कामे सुरु करणे याकरीता शिथीलता देण्यात आलेनंतर आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी, सातारा श्रीमती श्वेता सिंगल यांची भेट घेवून पाणी टंचाई आराखडयातील कामांना मंजुरी देण्याचे आदेश दयावेत अशी आग्रही मागणी केल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील नादुरुस्त झालेल्या ३१ नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे तसेच आवश्यक  त्या 15 ठिकाणी विंधन विहीरी (बोअर) मारणे या कामांना मंजुरी दिली असल्याचे आदेश दिले आहेत.यामध्ये विशेष दुरुस्ती  नळ पाणी पुरवठा योजनांची कामांमध्ये मेंढेघर कोंढावळे  04.39 लाख, मेंढेघर कदमवाडी 03.72 लाख, रिसवड नाव 02.03 लाख, कुसरुंड पवारवस्ती 02.05 लाख, सलतेवाडी बिबी 02.55 लाख, ठोमसे 02.99 लाख, कामरगाव 02.26 लाख,पाठवडे बाटेवाडी 04.43 लाख,पाठवडे बौध्दवस्ती 02.62 लाख, झाकडे बौध्दवस्ती 0.48 हजार, ढोकावळे नाव 02.07 लाख, आंब्रुळे  01.69 लाख, पाचगणी 02.39 लाख, गुरेघर 04.93 लाख, वायचळवाडी 03.75 लाख,चाळकेवाडी 0.63 हजार, जळव 01.83 लाख,मस्करवाडी 01.71 लाख, धनावडेवाडी निगडे 01.21 लाख, करपेवाडी काळगाव 07.82 लाख, सुपुगडेवाडी 2.30 लाख,भरुगडेवाडी मंद्रुळकोळे 1.89 लाख,चाफेर मुस्लिमवस्ती 1.64 लाख, शिंदेवाडी 8.51 लाख,गणेवाडी ठोमसे 4.66 लाख, शिद्रुकवाडी धावडे 0.70 हजार तर विहिर खोल करणे, गाळ काढणे व आडवी बोअर घेणे अंतर्गत सोनवडे 01.97 लाख, मुठ्ठलवाडी 01.66 लाख, बोडकेवाडी 0.97 हजार, बहुले 01.06 लाख, चाहुरवाडी नाणेगाव 01.48 लाख या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.तर विंधन विहिर डेरवण,कुंभारगाव माटेकरवाडी,मालोशी पाडेकरवाडी,मोरगिरी,सळवे कदमवस्ती,सळवे सदुवर्पेवाडी, तामिणे गावठाण,तामिणे बौध्दवस्ती,तामिणे जि.प.शाळा,काळगाव लोटलेवाडी,काठी टेक,वाघजाईवाडी, विहे धुमाळवस्ती, तळीये पश्चिम सुतारवाडी,पाणेरी यमकरवस्ती या गांवाचा समावेश आहे.पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन सदरच्या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात येऊन लवकरच सदरची कामे हाती घेण्यात यावीत असे जिल्हाधिकारी, सातारा व आमदार शंभूराज देसाईंकडून संबधितांना सुचित करण्यात आले असून अजुनही पाटण मतदारसंघात ८ ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व १७ गांवामध्ये विंधन विहीरी (बोअर) मारणेकरीता मंजुरी मिळणे गरजेचे असून दुसऱ्या टप्प्यात याही कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे सादर करण्यात आला असून यासही लवकरच मंजुरीचे आदेश प्राप्त होतील असे आमदार शंभूराज देसाईंकडून सांगण्यात आले आहे.
चौकट:- धरणाच्या पाण्यांचे योग्य नियोजन केल्याने टंचाईची दाहकता कमी- आमदार देसाई.
            पाटण तालुक्यातील कोयना, मोरणा, तारळी, उत्तरमांड, वांग मराठवाडी व महिंद या धरणातील पाणीसाठयाचे योग्य नियोजन केल्यामुळेच तालुक्यातील जनतेला पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची टंचाई काळातही योग्य सोय होवू शकली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच तालुक्यात टंचाईची दाहकता कमी प्रमाणात जाणवली असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

Wednesday 8 May 2019

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देवू नये.आमदार शंभूराज देसाईंची मुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री यांचेकडे लेखी मागणी.


                            
        
              

दौलतनगर दि.०८:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज तारखेला गतवर्षीच्या तुलनेत 10 टीएमसी इतके पाणी कमी असून या पार्श्वभुमिवर तसेच यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरु होण्याकरीता एक ते सव्वा महिना अवकाश असल्याने उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरणार का नाही याबाबत सर्वांनाच साशंकता वाटत असून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरीता उपलब्ध पाण्याची पाणीटंचाई काळात गरज असल्याने पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देवू नये अशी आग्रही मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना लेखी पत्राव्दारे केली आहे.
                        मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज तारखेला एकूण 34.89 टीएमसी इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.यातील 17.64 टीएमसी इतके पाणी हे वीजनिर्मितीकरीता राखीव असून उर्वरीत 17.00 टीएमसी मधील अंदाजे 6.00 टीएमसी पाणीसाठा हा मृत साठा असून केवळ 10.00 टीएमसी पाणीसाठा हा उपयुक्त आहे, गतवर्षीचे तुलनेत हा पाणीसाठा अंदाजे 10.00 टीएमसी ने कमी असून कोयना धरणातील सध्याच्या उपलब्ध पाणीसाठयाची ही परिस्थिती आहे. कर्नाटक राज्याच्या मागणीनुसार त्यांना यावर्षीच्या हंगामामध्ये आवश्यक असणारे पाणी यापुर्वीच देण्यात आले आहे.यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरु होण्याकरीता एक ते सव्वा महिना अवकाश असल्याने उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरणार का नाही याबाबत सर्वांनाच साशंकता वाटत आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी पाटण तालुक्यातही यंदाच्या वर्षी पाणी टंचाईंने तीव्र स्वरुप धारण केले आहे.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागाकरीता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तर नदीकाठी वसलेल्या गांवाना कोयना नदीतूनच पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.तसेच शेतीसाठीही तालुक्यातील शेतकरी हे कोयना नदीतूनच उपसा करीत असल्याने कोयना धरणातील पाण्याची पाटण तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना प्राधान्यांने गरज भासत आहे.दरम्यान धरणामध्ये 10.00 टीएमसी एवढेच पाणी शिल्लक असल्याने उपलब्ध असणारा पाणी साठा राखून ठेवणे याकरीता पाटबंधारे विभागाला कसरत करावी लागत आहे.एैन टंचाईच्या काळात शेतीसाठी वापरात येणाऱ्या पाण्यावर तसेच पिण्याच्या पाण्यावर निर्बंध आल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या चांगल्या आलेल्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होवू शकते व पिण्याच्या पाण्याकरीता नागरिकांना मोठया प्रमाणात वणवण करावी लागेल. या सर्व बांबीचा गांभीर्याने विचार करुन कर्नाटक राज्याला कोयना धरणातून यापुर्वी सोडण्यात आलेल्या पाण्याव्यतिरिक्त जादाचे वाढीव पाणी न सोडणेबाबत आपणांकडून संबधितांना आदेश करावेत अशी आग्रही विनंती आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना लेखी पत्रामध्ये केली आहे.

आचारसंहिता शिथील होताच पाटणच्या आमदारांनी सुरु केला कामांचा आढावा. पाणीटंचाईची बैठक घेवून तात्काळ उपाययोजना करण्याच्या केल्या सुचना.



दौलतनगर दि.०८:- लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता असलेमुळे अनेक मुलभूत गरजा असणारी विविध विकासकामे मोठया प्रमाणात प्रलंबीत राहिली होती.यामध्ये महत्वाचे पाणी टंचाईच्या काळात करावयाच्या उपाययोजना प्रलंबीत राहिल्यामुळे डोंगरी व दुर्गम अशा पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील गांवाना पाणी टंचाई भासत होती.विकासकामांमध्ये कायम तत्पर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी  लोकसभेची आचारसंहिता शिथील होताच प्राधान्याने मतदारसंघातील पाणी टंचाईचा तहसिल कार्यालय पाटण येथे आढावा घेवून पाणी टंचाईसंदर्भात आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात अशा सक्त सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
                         आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय येथे पाटण तालुक्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात आढावा व करावयाच्या उपाययोजना संदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रंसगी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,नायब तहसिलदार लोंढे,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, उपअभियंता गरुड,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आरळेकर,पाणी पुरवठा विभागाचे सर्व शाखा अभियंता, विस्तार अधिकारी यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
                       प्रांरभी आमदार शंभूराज देसाईंनी माहे डिसेंबर मध्ये करण्यात आलेल्या पाणी टंचाई आराखडयातून किती कामे मंजुर झाली व लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे किती कामे मंजुर होणे प्रलंबीत राहिली आहेत याची सविस्तर माहिती पाणी पुरवठा अधिकारी यांचेकडून घेतली. यामध्ये पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील वाडयांना टंचाई काळात टँकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे परंतू डोंगरपठारावरील गावामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची तसेच नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करुन देण्याची मोठया प्रमाणात मागणी आहे.माहे जुन पर्यंतच पाणी टंचाई आराखडा आपण माहे डिसेंबरमध्येच तयार करुन दिला असून त्यातील बहूतांशी कामे मंजुरही झाली आहेत उर्वरीत पुरवणी आराखडयातील कामांना आचारसंहिता असल्याने मंजुरी मिळाली नाही.आचारसंहिता आता शिथील झाली असून पुरवणी आराखडयातील कामांना तात्काळ मंजुरी घेवून पाणी टंचाईच्या आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असून टंचाई आराखडयातील किती कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आले आहेत व किती प्रस्ताव सादर करणे बाकीचे आहेत त्याची माहिती गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा उपअभियंता यांनी तात्काळ दयावी. पाणी टंचाईच्या संदर्भात दोनच दिवसापुर्वी मी जिल्हाधिकारी, सातारा यांची भेट घेतली असून पाणी टंचाईचे प्रस्ताव सादर होताच त्यास मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले आहे. पाणी टंचाईमुक्तीकरीता लागणारा निधी आणण्यास मी कुठेही कमी पडणार नाही परंतू पाणी टंचाईच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी अजिबात हयगय करु नये अशा सूचनाही आमदार शंभूराज देसाई यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
                दरम्यान आचारसंहितेपुर्वी ६ गांवामध्ये विंधन विहीरी काढण्याचे काम पुर्ण झाले आहे तर ९ कामांना मंजुरी देण्यात आली आहे ३ विंधन विहीरीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तात्पुरुती नळ पाणी पुरवठा योजना १ काम पुर्ण, १ मंजुर व दोन कामांचे प्रस्ताव सादर, नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीमध्ये १ सुरु ३ प्रगतीपथावर व १९ कामांना मंजुरी मिळणे आवश्यक‍ आहे तसेच विहीर खोलीकरण करणेमध्ये ४ कामांना मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचा गोषवारा आमदार शंभूराज देसाईंनी संबधित अधिकारी यांचेकडून घेवून येत्या दोनच दिवसात मंजुर करावयाची कामे घेवून जिल्हाधिकारी, सातारा यांची पुन्हा भेट घेवून या कामांना मंजुरी घेण्यात येईल असे आमदार देसाईंनी सांगून कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून कोयना धरणातील सध्याच्या पाणीसाठयासंदर्भात सविस्तर माहिती घेवून सध्या कोयना धरणात पाणीसाठा कमी आहे. नदीच्या दोन्ही बाजुच्या गांवाना पावसाळा येण्यापुर्वी शेतीकरीता दोन टप्प्यात पाणी देण्याची गरज आहे तर पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरु राहणेकरीता नदीमध्ये पाणी असणे गरजेचे आहे.धरणातील पाणी बाहेर जाण्यापुर्वी आपल्या मतदारसंघातील वस्तूस्थिती शासनाकडे सादर करावी व पहिले प्राधान्य सातारा जिल्हयाला दयावे असेही त्यांनी यावेळी सांगून कोयना धरणातील सध्याची पाणी परिस्थिती पहाता कोयनेचे पाणी राज्याबाहेर देवू नये अशी मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचेकडे करणार असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले. तसेच महिंद धरणातील पाणी जानुगडेवाडी, मंद्रुळकोळेपर्यंत येत नाही सोडलेले पाणी या गांवापर्यंत येईल अशीही तरतूद करावी अशा सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
चौकट:- आचारसंहिता शिथील झालीय कामाला लागा- आमदार देसाई.
आचारसंहिता होती तरी तालुक्यातील पाणी टंचाईसंदर्भात माझा संबधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा होता.त्यामुळे बहूतांशी गांवाच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आता आचारसंहिता शिथील झालीय उर्वरीत राहिलेल्या कामांना गती देण्याकरीता पाणी टंचाई झाली की बांधकाम विभागाचाही आढावा घेणार असून आता कामाला लागा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी मतदारसंघातील अधिकाऱ्यांना दिल्या.