Wednesday 8 May 2019

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देवू नये.आमदार शंभूराज देसाईंची मुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री यांचेकडे लेखी मागणी.


                            
        
              

दौलतनगर दि.०८:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज तारखेला गतवर्षीच्या तुलनेत 10 टीएमसी इतके पाणी कमी असून या पार्श्वभुमिवर तसेच यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरु होण्याकरीता एक ते सव्वा महिना अवकाश असल्याने उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरणार का नाही याबाबत सर्वांनाच साशंकता वाटत असून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरीता उपलब्ध पाण्याची पाणीटंचाई काळात गरज असल्याने पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देवू नये अशी आग्रही मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना लेखी पत्राव्दारे केली आहे.
                        मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज तारखेला एकूण 34.89 टीएमसी इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.यातील 17.64 टीएमसी इतके पाणी हे वीजनिर्मितीकरीता राखीव असून उर्वरीत 17.00 टीएमसी मधील अंदाजे 6.00 टीएमसी पाणीसाठा हा मृत साठा असून केवळ 10.00 टीएमसी पाणीसाठा हा उपयुक्त आहे, गतवर्षीचे तुलनेत हा पाणीसाठा अंदाजे 10.00 टीएमसी ने कमी असून कोयना धरणातील सध्याच्या उपलब्ध पाणीसाठयाची ही परिस्थिती आहे. कर्नाटक राज्याच्या मागणीनुसार त्यांना यावर्षीच्या हंगामामध्ये आवश्यक असणारे पाणी यापुर्वीच देण्यात आले आहे.यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरु होण्याकरीता एक ते सव्वा महिना अवकाश असल्याने उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरणार का नाही याबाबत सर्वांनाच साशंकता वाटत आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी पाटण तालुक्यातही यंदाच्या वर्षी पाणी टंचाईंने तीव्र स्वरुप धारण केले आहे.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागाकरीता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तर नदीकाठी वसलेल्या गांवाना कोयना नदीतूनच पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.तसेच शेतीसाठीही तालुक्यातील शेतकरी हे कोयना नदीतूनच उपसा करीत असल्याने कोयना धरणातील पाण्याची पाटण तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना प्राधान्यांने गरज भासत आहे.दरम्यान धरणामध्ये 10.00 टीएमसी एवढेच पाणी शिल्लक असल्याने उपलब्ध असणारा पाणी साठा राखून ठेवणे याकरीता पाटबंधारे विभागाला कसरत करावी लागत आहे.एैन टंचाईच्या काळात शेतीसाठी वापरात येणाऱ्या पाण्यावर तसेच पिण्याच्या पाण्यावर निर्बंध आल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या चांगल्या आलेल्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होवू शकते व पिण्याच्या पाण्याकरीता नागरिकांना मोठया प्रमाणात वणवण करावी लागेल. या सर्व बांबीचा गांभीर्याने विचार करुन कर्नाटक राज्याला कोयना धरणातून यापुर्वी सोडण्यात आलेल्या पाण्याव्यतिरिक्त जादाचे वाढीव पाणी न सोडणेबाबत आपणांकडून संबधितांना आदेश करावेत अशी आग्रही विनंती आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना लेखी पत्रामध्ये केली आहे.

No comments:

Post a Comment