लोकनेते स्व. बाळासाहेब
देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्याचे काम
शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांनी हयातभर केले. शिवाजीराव देसाई यांचे कार्य समजून
घेण्यासाठी पाटण मतदारसंघातील डोंगर कपारीत राहणाऱ्या गोरगरिब वयोवृध्द नागरिकांची
भेट घ्या तसेच त्यांनी अविरत कष्टाने फुलविलेल्या मरळीच्या माळावर या म्हणजे
तुम्हाला शिवाजीराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा अंदाज येईल, असे आव्हान शिवसेना
जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी केले
आहे. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने खा. संजय राऊत यांनी
केलेल्या बेताल व अर्थहीन वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.
स्व.शिवाजीराव देसाई
यांच्यावर आपल्या वडिलांचा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा
प्रचंड प्रभाव होता.मुंबईमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्येच व्यवसायास
सुरूवात केली. व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले असतानाच लोकनेते बाळासाहेब देसाई
यांनी शिवाजीराव देसाई यांना पाटण मतदारसंघाची जबाबदारी देऊन तेथील गोरगरिब जनतेची
सेवा करण्यास सांगितले. आपल्या पिताश्रींचा आदेश शिरसावंद्य मानून शिवाजीराव देसाई
यांनी आपल्या व्यवसायाचा त्याग करून पाटणच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी
आनंदाने स्वीकारली. पाटणमध्ये आल्यावर त्यांनी पाटण तालुक्यातील लोकांच्या हाती काम
मिळावे, शेतमालाला हमीभाव मिळावा, ऊसासारखे शेतात पीक घेवून त्यांच्या हाती पैसा
यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवाजीराव देसाई यांनी मरळीच्या माळरानावर जिथं
कुसळ उगवत नाहीत अशा ठिकाणी साखर कारखाना काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व ‘केल्याने होत आहे रे.. आधि
केलेची पाहिजे ...’ हा दूर दृष्टीकोन ठेवून त्यांनी लोकांच्या घरी जावून
शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करून १९७१-७२ साली पाटण तालुक्यात पहिला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना
उभारला व अल्पावधीतच तो साखर कारखाना कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा केला.
पाटण तालुका दुर्गम,
डोंगराळ म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरिब कुटुंबातील मुलांना
शिक्षण घेता यावे व त्यांचे मागासलेपण दूर व्हावे म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई
यांनी कोयना शिक्षण संस्थेची स्थापना केली परंतु त्यामध्ये राजकारण येताच
शिवाजीराव देसाई यांनी सोनवडे या ठिकाणी १९८३ साली मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून हजारो
विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाची गंगा मोरणा शिक्षण संस्थेच्या रूपाने पाटण
तालुक्यात सुरू केल्यानंतर स्व.शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्यातील मुलांना
व्यवसायिक शिक्षण मिळावे तसेच दर्जेदार कारागीर निर्माण व्हावेत यासाठी मरळीच्या
माळरानावर दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना १९८६ साली केली. आज मोरणा शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला असून हजारो मुलांचे
भवितव्य या ठिकाणी घडत आहे. अवघे ४२ वर्षांचे
आयुष्य लाभलेल्या शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्याचा कायापालट करीत तालुक्याला
प्रगतीपथावर नेण्याचे काम केले.
स्व.शिवाजीराव
देसाई यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी मरळीच्या माळावर या व
स्वतःच्या डोळ्याने शिवाजीराव देसाई यांचे कार्यकर्तृत्व पहा असे आवाहन जयवंराव
शेलार यांनी पत्रकाव्दारे करत फक्त मुंबईत बसून आपल्या नेत्याला खुश करण्याचा
केविलवाणा प्रयत्न बंद करा नाहीतर पाटणची जनता तेथे येऊन तुमच्या बुडाला आग
लावल्याशिवाय शांत बसणार नाही, हे मात्र नक्की ! असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment