Saturday, 26 July 2025

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळतील-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई. ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न.



दौलतनगरदि.26:- ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राज्यातील महायुतीचे शासन प्रयत्नशील असून सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या चांगल्या योजना राबविण्याचे काम आपण पालकमंत्री म्हणून केले. त्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील  9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या योजनेमध्ये समाविष्ठ करत या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामांसाठी निधीची तरतूद करुन या कामांना प्राथमिकता दिली. सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून शिक्षण,आरोग्य व पाणी पुरवठा या तीन गोष्टींना प्राधान्य दिलं. त्याचाच एक भाग म्हणून आज तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळा होत असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळतील असा विश्वास पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

           तळमावले,ता.पाटण येथे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत मंजूर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेतील 01 कोटी 25 लक्ष निधीतून पुर्णत्वाकडे गेलेल्या तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा सुविधांचे लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी  बोलत होते.यावेळी  डॉ. दिलीपराव चव्हाण,संजय देसाई,पंजाबराव देसाई,विलास गोडांबे,धनाजी गुजार,अनिल शिंदे,नेताजी मोरे, मधुकर पाटील, सचिन यादव, नेताजी मोरे,सरपंच सुरज यादव,कविता कचरे,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद,कार्यकारी अभियंता अमर नलवडे,गटविकास अधिकारी सरिता पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कांबळे,उपअभियंता मयुर पवार, शाखा अभियंता संदिप पाटील यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

               यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून पाटण तालुक्यात नाही तर संपूर्ण जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेत गत पंचवार्षिकमध्ये या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांसाठी  सातारा जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये भरीव निधीची तरतूद करत या कामांना सुरुवातही झाली.ही योजना राबविताना बारकाईने कामांचे नियोजन केले. आता टप्प्या टप्प्याने या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.याच योजनेच्या धर्तीवर प्राथमिक शाळा शहरातील शाळांप्रमाणे करण्याचे उद्देशाने आदर्श शाळा ही संकल्पना राबविण्यात येत आहे.जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व विस्तारणासाठी  मंजूर झालेल्या 1 कोटी 25 लक्ष निधीतून तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे दर्जेदार असे काम पूर्णत्वास गेले असून आज या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्‍न होऊन सर्व सामान्य रुग्णांच्या सेवेत कार्यरत होते असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, सर्व सामान्य रुग्णांसाठी चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हा वार्षिक आराखडयातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामासाठी भरीव निधीची तरतूदही करत असल्याने ही कामे मार्गी लागत आहे.सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून राबविलेली ही योजना प्रत्यक्ष साकारत आहे याचे नक्कीच समाधान असून या तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सेवाभावी वृत्तीने प्रामाणिकपणे या विभागातील गोर-गरीब रुग्णांची सेवा करावी, जेणे करुन या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाची हेळसांड होणार नाही आणि ज्या उद्देशाने ही योजना सुरु केली ती योजना यशस्वी झाल्याचे समाधान वाटेल असे सांगत आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता राखण्याची दक्षता घेण्याची सूचना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना केल्या. विभागातील पदाधिकाऱ्यांनीही आरोग्य केंद्रामध्ये येऊन स्वच्छतेची पाहणी करावी.तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे निवासस्थानांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगत दर्जेदार काम झालेल्या या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राव्दारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा या विभागातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

चौकट: ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतील पहिले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले.

सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाई यांनी संपूर्ण सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही योजना राबवली.आज जिल्हयामध्ये सर्वत्र 50 च्या दरम्यान स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे सुरु असून पाटण तालुक्यामध्ये तळमावलेसह हेळवाक,मरळी,सोनवडे,मोरगिरी,चाफळ,केरळ,मुरुड व तारळे या नऊ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्यावत सोयी सुविधा पुरविण्याची  कामे सुरु असून तळमावले व हेळवाक या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे पूर्णत्वाकडे गेली असून पालकमंत्री म्हणून जिल्हास्तरावर राबविलेल्या या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनेत पालकमंत्री ना.शंभराज देसाई यांचे संकल्पनेतील पहिले तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र होऊन त्याचा ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते लोकार्पण होऊन सर्व सामान्य रुग्णांच्या सेवेत रुजू  झाले.

No comments:

Post a Comment