Monday, 4 August 2025

मंत्री शंभूराज देसाईंनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट 'मेघदूत' निवासस्थान देण्यास सहकार्य केल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

*मुंबई (सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५) :* राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे रविवारी 'मेघदूत' या मुंबईतील नव्या शासकीय निवासस्थानी वास्तव्याला गेल्यानंतर सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या वास्तव्यामुळे 'मेघदूत' निवासस्थानाशी देसाई कुटुंबाच्या असलेल्या जुन्या ऋणानुबंधांशी पुन्हा एकदा जोडून घेण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.  

रविवारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे मुंबईतील 'मेघदूत' या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेले. या निवासस्थानाशी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत. याचे कारण मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचे दीर्घकाळ वास्तव्य या निवासस्थानात होते. त्यामुळे देसाई कुटुंब १९६० च्या दशकात या निवासस्थानी वास्तव्याला होते. येथेच मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांचा विवाहानंतर विधिवत गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला होता. तसेच त्यांच्या पोटी मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्मही याच निवासस्थानी देसाई कुटुंबिय वास्तव्याला असताना झाला होता. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणीची सुरुवातीचे काही वर्षे याच निवासस्थानी खेळण्या-बागडण्यात गेली. त्यामुळे या निवासस्थानाबद्दल देसाई कुटुंबियांच्या भावविश्वात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. आता हेच निवासस्थान मंत्री शंभूराज देसाई यांनाही मिळाल्यामुळे 'मेघदूत'मध्ये ५५ वर्षांनंतर देसाई कुटुंबियांचे पुनर्आगमन झाले आहे. त्यात या निवासस्थानी याआधी गेली काही वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वास्तव्याला होता. त्यांनी हे निवासस्थान सोडल्यानंतर ते मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमूल्य सहकार्य असल्याची भावना शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच याबद्दल आभाराचे पत्र देऊन मंत्री देसाई आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी त्यांचा मुख्यमंत्र्यांशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या योगदानाबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल मनमोकळा संवाद झाला. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, अस्मितादेवी देसाई व जयराज देसाई उपस्थित होते.

No comments:

Post a Comment