मुंबई (सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५) :पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांचा 'मेघदूत' या नव्या शासकीय निवासस्थानी रविवारी गृहप्रवेश झाला. त्यानंतर सोमवारपासून त्यांनी या नव्या निवासस्थानावरून कामकाजास धडाक्यात सुरुवात केली. सोमवारी पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मेघदूत निवासस्थानी बैठका घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.
'मेघदूत' या मुंबईतील नव्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने कामकाजास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी पर्यटन विभागांतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या पर्यटन सुरक्षा दलाबाबत मेघदूत निवासस्थानी आढावा बैठक घेतली. यावेळी पहिल्या टप्प्यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते गिरगाव चौपाटी या पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन तसेच पर्यटन स्थळ म्हणून आवश्यक सुरक्षा खबरदारी घेण्यासाठी पर्यटन सुरक्षा दल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. तसेच माजी सैनिक कल्याण विभागांतर्गत 'मेस्को'च्या कामकाजाबाबतही त्यांनी यावेळी बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात खासगी कंपन्यांकडून देण्यात येणारा 'सीएसआर' निधी माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यास साहाय्यक ठरू शकतो. त्यामुळे सीएसआर निधी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाहीसाठी केंद्र शासनास विभागाने प्रस्ताव पत्र पाठवावे, अशी सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. याप्रसंगी पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment