दौलतनगर दि.27 :- केंद्र व राज्य
शासनाकडून पश्चिम घाटामध्ये साकारलेल्या सहयाद्री व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठानच्या
सन 2020-21 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना
पर्यटन आराखडयाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे
गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
सहयाद्री व्याघ्र संवर्धन
प्रतिष्ठानच्या सन 2020-21 चे सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये पाटण
विधानसभा मतदारसंघातील कोयना पर्यटन आराखडयासंदर्भात गृहराज्यमंत्री नामदार
शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेना सातारा
जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्थित कराडचे
उपसंचालक एम.एन.मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजिव) सुरेश साळूंखे, वनक्षेत्रपाल
(वन्यजिव) कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,सहयाद्री व्याघ्र प्रकल्प हा केंद्र व राज्य
शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून वनविभागामध्ये
वाघाचे संवर्धन करण्याचा महत्त्वाचा हेतु असल्याने राज्य शासनाकडून यासाठी
सर्वोत्परी प्रयत्न करुन प्रतिवर्षी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सहयाद्री
व्याघ्र प्रकल्पातील जास्तीत जास्त विकास कामे करण्यात यावीत असे निर्देश असल्याने
सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये विविध विकास कामे करताना संबंधित लोकप्रतिनिधींना
विचारात घेऊनच हि विकास कामे करण्यात येऊन सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन
प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या आराखडयात पाटण मतदारसंघातील पर्यटन
आराखडयाचा समावेश करुन जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी, अशी मागणी सहयाद्री
व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सातारा जिल्हाधिकारी
कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरंसव्दारे पार पडलेल्या बैठकी दरम्यान महाराष्ट्र
राज्याचे वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेकडे केली होती. त्यानुसार सहयाद्री
व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटन वाढीकरीता आवश्यक असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील
पर्यटन आराखडयाचा सहयाद्री व्याघ्र नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या आराखडयात
प्राधान्याने समावेश करावा अशा सुचना वनमंत्री नामदार संजय राठोड यांनी
अधिकाऱ्यांना केल्या होत्या. सदर बैठकीमध्ये दिलेल्या सुचनांनुसार सन 2020-21 च्या
अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये स्थानिक लोकांचे विकासासाठी पर्यटनास व उपजिविका
निर्मितीस चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांचा समावेश करुन सुधारित
अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणेत आले आहे.यामध्ये ओझर्डे येथील निसर्गरम्य तीन
धारी धबधबा परिसर सुशोभिकरणामध्ये प्रवेशव्दाराजवळ फरसबंदी, चेंजींग रुम व टॉयलेट,पाणी
व विद्युत व्यवस्था,700 मीटर वाटेचे मजबुतीकरण,धबधब्याजवळ पर्यटकांना उभे
राहणेसाठी ओठा मजबुतीकरण व रेलिंग तसेच परिसरात देखरेख व नियंत्रणसाठी मजूर
नेमणे,कोंडावळे रामघळ येथील धबधबा परिसरात 300 मीटर पायवाटेचे मजबुतीकरण,पायवाटेवर
रेलींग,पर्यटक तपासणी नाका व स्वागत कमान बसविणे, गाढवराई धबधबा परिसरात निसर्गवाट
बळकटीकरण,माहिती फलक लावणे,घाटमाथा ते हुंबरळी वॉकींग ट्रेक बळकटीकरणामध्ये निसर्ग
पायवाटेचे मजबुतीकरण,जंगली जयगड येथील वॉकींग ट्रेक बळकटीकरण करणे, केमसे नाका
(घाटामाथा) रासाटी संरक्षण कुटी केमसे नाका ट्रेक रुट निसर्ग पाऊलवाट बळकटीकरण
करणे अशा एकूण 01 कोटी 50 लक्ष रुपयांच्या कोयना पर्यटन आराखडयाचा समावेश करण्यात
आला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन
प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकांमध्ये पाटण
मतदारसंघातील कोयना पर्यटन आराखडयाचा समावेश करण्यात आला असल्याने सहयाद्री
व्याघ्र प्रकल्पाला राज्यातून येणाऱ्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकरीता
जागो-जागी वॉकिंग ट्रॅकची निर्मिती व पर्यटनाचे पॉईंट विकसित करुन पर्यटन वाढीला चालना
देण्यासाठी फायदा होणार असल्याचे शेवटी त्यांनी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.