Wednesday, 3 June 2020

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात पाटण तालुक्यात शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.


           
दौलतनगर दि.03 :- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची एकूण संख्या 61 झाली असल्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन महिने कसलाही कोरोनाचा संसर्ग पाटण तालुक्यात नसताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून काही व्यक्ती तालुक्यात आल्यानंतर काही दिवसांमध्ये पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने तसेच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात आली असल्याने बाजारपेठांच्या ठिकाणी वाढती गर्दी व कोरोना संसर्गाच्या काळात धोका आणि काळजी दोन्ही वाढले असल्याने आता खऱ्या अर्थाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याकरीता पाटण तालुक्यातील शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या.
              पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तहसिल कार्यालय पाटण या ठिकाणी तातडीची बैठक घेतली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसिलदार थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,सपोनि तृप्ती सोनावणे, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
                      याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये बाहेरगांवाहून आलेल्यांनी घरात राहणेच तालुक्याच्या आणि गावांच्या हिताचे होणार आहे हे मी वारंवार आवाहन बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना करीत आहे.कोरोनाचा धोका दिवसेदिवस वाढत आहे.गेली दोन महिने पाटण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नव्हता पंरतू आता तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 झाली असून कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसात पाटण तालुक्यातील नवसरी,जांभेकरवाडी,तामिणे या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता जे लोक बाहेरगांवाहून तालुक्यात आले आहेत ज्या गांवात बाहेरगांवाहून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी पोलीस आणि महसूल विभागाने गावभेटी देवून हे लोक घरातच कसे राहतील यावर प्रशासनाने जादा लक्ष दयावे जेणेकरुन कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवडयामध्ये पावसाचे आगमन होणार असल्याने पुरवठा विभागाने दोन महिन्याचे धान्य वाटपाचे नियोजन करावे व आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक तो औषधांची उपलब्धता करावी,अशा सुचना केल्या. तसेच नव्याने आढळूल आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या गावांत पोलीस यंत्रणेकडून आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यात याव्यात. परंतू आता कुठलाही निष्काळजीपणा करु नका. सध्या शासनाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी शिथीलता दिली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करुन शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे सांगून ते म्हणाले नवसरी, जांभेकरवाडी व तामिणे या गांवात आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या आहेत अशांची यादी तयार करुन तात्काळ त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या करुन घ्या त्यांचे नमुने तपासणीकरीता सादर करा अशा सुचना ना.शंभूराज देसाईंनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
चौकट: मंत्री ना.शंभूराज देसाईंची नवसरी गावांस अधिकाऱ्यांना घेवून भेट.
            पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 61 गेली असून अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे पाटण तालुक्यात काळजीचे सावट निर्माण झाले आहे. नुकतेच तालुक्यातील नवसरी,जांभेकरवाडी व तामिणे या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले होते. दरम्यान नवसरी येथे कोरोना बाधित चार रुग्ण सापडल्याने नामदार शंभूराज देसाई यांनी काल शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवून नवसरी या गांवासही भेट देवून पहाणी केली. नवसरी गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून कोण-कोणत्या उपाय योजना राबविल्या गेल्या आहेत याचा आढावा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना घेतला. तसेच गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावातील ग्रामस्थांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन करीत त्यांनी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत असेही सांगितले.


No comments:

Post a Comment