Friday 20 May 2022

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेमुळे शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६3 वी पुण्यतिथी व शिष्यवृत्ती वितरण असा संयुक्त कार्यक्रम संपन्न.

 



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुली शिक्षणापासून वंचित राहून नये म्हणून सन २०१२ पासून पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाला आपला हातभार लागावा याकरीता स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु केली. ही शिष्यवृत्ती योजना एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना प्रेरणादायी ठरत आहे. पाटण मतदारसंघातील एकूण १४६ गरजू मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला आहे.कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना गरजू मुलींकरीता एक आधार म्हणून काम करीत असून या शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन नामदार शंभूराज देसाईंनी असल्याचे प्रतिपादन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ६3 व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात केले.

 महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६3 वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजीत कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमास सहा.पोलीस अधिक्षक मा.आंचल दलाल, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,ॲङडी.पी.जाधव,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,शिवदौलत बँक चेअरमन संजय देशमुख, मा.चेअरमन मिलींद पाटील,शशिकांत निकम,पांडूरंग नलवडे,भरत साळूंखे,अभिजित पाटील,पांडूरंग शिरवाडकर,विजय शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यासंह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य,संचालक,शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी व पालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे आर्शिवाद आपल्या पाठीशी आहेत. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाकरीता एक शिष्यवृत्ती योजना सुरु करावी आणि या शिष्यवृत्ती योजनेचे वितरण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यस्मरण कार्यक्रमात करावे अशी कल्पना सन २०१२ मध्ये मांडली. स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आपण ही शिष्यवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला. कै.सौ.ताईसाहेब यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अडचणीच्या काळात मोलाची साथ केली. हलाकीच्या परिस्थितीत कष्टातून दिवस काढून मुलांना घडविण्याचे त्यांनी कार्य केले. आज त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवणे गरजेचे असून बिकट परिस्थितीमध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपण आपल कर्तृत्व सिध्द करु शकत नाही. त्यामुळे समाजातील गरीब कुटुंबातील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने या गरीब कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहून नये हा या शिष्यवृत्ती देण्या मागचा उद्देश आहे. आतापर्यंत मतदारसंघातील १४६ गरजू मुंलीना आपण ही शिष्यवृत्ती दिली आहे.या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे.गत दोन वर्षामध्ये कोविडचा संसर्ग असल्याने शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम झाला नाही. आज आपण या शिष्यवृत्तीचे वितरणाबरोबर विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप करत आहे.तालुक्यामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देत असून शैक्षणिक सुविधांचा चांगला लाभ घेणे गरजेचे आहे.त्यामुळे मुलींनीही या चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे.त्यामुळे या कै.सौ.ताईसाहेब यांचे शिष्यवृत्तीचे माध्यमातून भविष्यामध्ये चांगले शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल म्हणाल्या की, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील गरीब मुलींसाठी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना सुरु केल्याचा मनस्वी आनंद असून या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून चांगले शिक्षण घेऊन मुलींनी स्वावलंबी झाल्या पाहिजेत.आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या पाहिजेत. या शिष्यवृत्तीमुळे मुलींसाठी एक प्रेरणा मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून हेच यशाच पहिल पाऊल आहे.त्यामुळे ध्येय निश्चित केले तर यश मिळते हे लक्षात ठेऊन तालुक्यातील मुलींना या शिष्यवृत्तीचा फायदा होईल.तसेच भविष्यात मुली स्वावलंबी झाल्याने पाटण तालुक्याचा नावलौकीक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक चेअरमन अशोकराव पाटील तर आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment