Saturday 14 May 2022

छोकरी सोबत मिळाली नोकरी..! लेंढोरीच्या जगन्नाथला स्वतःच्या लग्नातच मिळाली नोकरीची ऑर्डर..! पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील नवरदेवाला मंत्रीपुत्र यशराज देसाई यांनी दिला सुखद धक्का.






दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांनी नुकतीच एका लग्न सोहळ्यास शुभेच्छा भेट दिली. मात्र या भेटी दरम्यान देसाई यांनी नवरदेवाला चक्क नोकरीची ऑर्डरच भेट म्हणून दिल्याची सुखद घटना पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम भागातील लेंढोरी या छोट्याशा गावात घडली. दरम्यान मंत्री पुत्रांच्या या अनोख्या  भेटी मुळे नवरदेवाला छोकरी बरोबर नोकरी ही मिळाल्याची खुमासदार चर्चा सध्या पाटण तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.

             कोयना विभागातील दुर्गम भागात पाटण पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर लेंढोरी हे छोटेसे गाव असून या गावांतील झोरे कुटुंबातील  जगन्नाथ झोरे या युवकाने काही दिवसांपूर्वी  शिवदौलत सहकारी बँकेच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. वास्तविक शिवदौलत बँक बँकिंग क्षेत्रातील अग्रेसर आणि  सातारा जिल्हयातील नावाजलेली मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँके मध्ये नोकरी करण्यासाठी  विशेषतः शहर व परिसरातील उमेदवारांची मोठी मागणी असते.शिवदौलत सहकारी बँकेमध्ये विविध पदांच्या नोकर भरतीकरीता यशराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखती घेतल्या होत्या.या मुलाखती दरम्यान जगन्नाथ झोरे याने मुलाखत झाल्यानंतर यशराज देसाई यांना आपल्या लग्नाची लग्न पत्रिका देऊन लग्न सोहळयास अगत्याने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. युवा नेते यशराज देसाई यांनी कोयना विभागातील लेंढोरी येथील जगन्नाथ झोरेची या युवकाची काम करण्याची प्रामाणिक जिद्द आणि उमेद आणि उच्चशिक्षितपणा यांची दखल घेऊन याबाबत गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचेशी चर्चा करुन त्याला शिवदौलत बँकेमध्ये  क्लार्क या  जागेसाठी  त्याची निवड केली. आज जगन्नाथ झोरे याचे विनंतीवरुन लग्न सोहळयाला उपस्थित राहत त्याला पुढील वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्याच, या शुभेच्छांसह त्याला शिवदौलत बँकेतील क्लार्क या पदावरील नोकरी बाबतचे नियुक्ती पत्र थेट त्याच्याच लग्न सोहळ्यात जाऊन ही अनोखी भेट दिली. या घटनेमुळे यशराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारांचा खऱ्या अर्थाने वसा जपला असून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दिल्याचे दिसून आले.          

       वास्तविक थेट मंत्री पुत्र यांनीच  प्रत्यक्ष येऊन अशी कायमच्या नोकरीचे पत्र देणे असे उदाहरण  आज  राज्यात अत्यंत दुर्मिळ असताना मंत्री शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई  यांनी मात्र हे दुर्मिळ उदाहरण सत्यात उतरवून दाखविले त्यामुळे  दुर्गम भागातील एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कायमचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान उपस्थितांच्या डोळ्यातील आनंदाश्रू वरून स्पष्ट झाले.

चौकट :- शनिवारी  लेंढोरी येथील जगन्नाथ झोरे यांचा कोकिसरे येथील कविता वरक नावाच्या मुलीबरोबर लग्न सोहळा होता.या लग्न सोहळयास यशराज देसाई यांनी नेहमीप्रमाणे नियोजित भेट दिली. या प्रसंगी जनगन्नाथ झोरे व कविता वरक या नवदाम्पत्यांच्या हातावर नोकरीचे थेट अपॉइंटमेंट लेटरच दिल्याने दोन्हीही कुटुंबियांसह उपस्थित आनंदाने भारावल्याचे दिसून आले.

चौकट:- आणि क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.

शनिवारी मतदार संघातील विविध लग्न सोहळयांना भेटी देण्याचा व्यस्त कार्यक्रम असतानाही जगन्नाथ झोरे याच्या विवाह सोहळयास भेट दिल्यानंतर विवाह स्थळापासून काही अंतरावर मुले ही क्रिकेट खेळत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. मुलांना क्रिकेट खेळताना पाहून यशराज देसाई यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.ते तडक क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे गेले, त्यांचे सोबत क्रिकेट खेळून त्यांनी आनंद लुटला. 

No comments:

Post a Comment