मुंबई (8 जून 2023) : महाराष्ट्राचे पोलादी
पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात संसदीय आणि लोकशाही मूल्यांची
रुजवण केली. शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, पायाभूत विकास आदी क्षेत्रांत लोकनेते बाळासाहेब
देसाई यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून
पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेशजी
बैस यांनी केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन
बुधवारी, ७ जून रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते संपन्न
झाले. त्यावेळी ते बोलत होते.
लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा धांडोळा घेणाऱ्या 'दौलत' या चरित्रग्रंथाचे लेखन-संपादन
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले असून बुधवारी मुंबईतील राजभवन येथे या चरित्रग्रंथाचा
प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल
रमेशजी बैस यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन या
चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री
मा. ना. शंभूराज देसाई यांचे अभिनंदन केले. तसेच या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून लोकनेते
बाळासाहेब देसाई यांचा समृद्ध वारसा शब्दबद्ध झाला असून पुढील ५० वर्षे हा ग्रंथ लोकनेत्यांच्या
अलौकिक कार्याचा आदर्श जनमानसापर्यंत पोहोचवत राहील, अशी भावना राज्यपाल रमेशजी बैस
यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी
राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी
नार्वेकर, पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभातजी लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत 'दौलत' या
चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा
पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी हा चरित्रग्रंथ प्रत्यक्षात आणण्यामागील
भूमिका मांडली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत यावेळी
मा. ना. शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतलेल्या क्रांतिकारी
निर्णयांचा आढावा घेतला. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे
धोरण, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया व शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
उभारणे, कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना असे अनेक निर्णय लोकनेते बाळासाहेब
देसाई यांनी घेतले. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी जनसेवेचा समृद्ध वारसा
निर्माण केला. त्यांच्या या जीवनकार्याची माहिती देणारा 'दौलत' हा चरित्रग्रंथ आज प्रकाशित
होऊन सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध झाला, याचा आनंद आणि समाधान असल्याची भावना यावेळी
मा. ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी
विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर यांनीदेखील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
जीवनकार्य यापुढेही काम करताना प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन केले. तसेच 'दौलत'
या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून त्यांचा प्रेरणादायी वारसा लोकांपुढे आणल्याबद्दल राहुलजी
नार्वेकर यांनी मा. ना. शंभूराज देसाई यांचे अभिनंदन केले. यावेळी चरित्रग्रंथाचे लेखक
व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपली भूमिका मांडली. कोयना धरणाची निर्मिती असो
वा कोयना भूकंपानंतरचे पुनर्वसन कार्य असो, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी झोकून देऊन
काम करताना पाहिल्याचा अनुभव मधुकर भावे यांनी यावेळी कथन केला.
यावेळी
उपस्थित मान्यवरांचा सत्कार मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई
आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांच्या
हस्ते करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष मा. नरहरीजी झिरवाळ,
ग्रामविकास मंत्री मा. गिरीशजी महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबरावजी
पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री मा. दादाजी भुसे, आमदार मा. रणजितसिंह मोहिते-पाटील,
मा. विश्वजित कदम, मा. निरंजनजी डावखरे, मा. प्रकाशजी सुर्वे, मा. गीताताई जैन, मा.
बालाजी कल्याणकर, मा. लताताई सोनावणे, मा. ज्ञानराज चौगुले, माजी आमदार मा. विजय शिवतारे,
मा. शरदभाऊ सोनावणे, मा. संजय डी. वाय. पाटील यांच्यासह देसाई परिवारातील सर्व सदस्य,
तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment