Thursday 28 December 2023

पाटण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजनेअंतर्गत मिळणार 19 कोटी 70 लाखाचा निधी. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश.




दौलतनगर दि.28: पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या.त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाने पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. त्यानुसार अमृत 2.0 या योजनेअंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली असून लवकरच पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाकरीता प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर नगर विकास विभागाकडे दाखल केला असून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या नळ योजनेच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी मिळण्याची विनंती ना.शंभूराज देसाई करणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली असून पाटण नगरपंचायतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

                 पाटण नगरपंचायती  अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत होती. ऐन पावसाळयामध्ये पाटण शहारामध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ पाटण वासियांवर आली होती. दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे पाटण येथील स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत होते.त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण नगरपंचायती अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होण्याकरीताचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाटण शहारांतर्गत नव्याने कार्यान्वित करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे सर्व्हेक्षण करुन रक्कम रुपये 21 कोटी 44 लाख 57 हजार रुपयांचा सुधारित आराखडा तयार करुन संबंधित विभागाकडे दाखलही करण्यात आला. दाखल प्रस्तावावर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  संबंधित विभागाचे मुख्य अभियंता यांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार राज्य उच्चाधिकार सुकाणू समितीने शिफारस केल्यानुसार पाटण नगरपंचायतीचे नविन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 19 कोटी 70 लक्ष रुपये तत्वत: मंजूर केले असून या  नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाची विभागीय आणि मंडळ स्तरावर तपासणीही करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विभाग आणि मंडळ कार्यालय पुणे यांनी तांत्रिक मंजूरीसाठी सादर आणि शिफारस केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाटण नगरपंचायतीने सादर केलेल्या पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा येाजनेच्या अंदाजपत्रकाच्या  19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेला  सुधारित तांत्रिक मान्यता दिली असल्याचे सांगत पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाकडील पाटण नगरपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेकरीता नगरविकास विभागाकडे दाखल प्रस्तावाबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे तातडीने मान्यता मिळण्यासाठी विनंती केलेली असून पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच शासनस्तरावर मान्यता मिळणार असल्याने पाटण नगरपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment