Sunday, 2 August 2020

वाढलेल्या टेस्टमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढलेली दिसत आहे, जनतेने घाबरु नये. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन.

        

            दौलतनगर दि. 02:-  दि.01 ऑगस्टपासून सातारा जिल्हा अनलॉक करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या टेस्ट घेण्याचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत देखील वाढ होवू लागली आहे.परंतू कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्यामुळे जनतेने घाबरण्याचे कारण नाही. जनतेने घाबरुन न जाता आता जिल्हा अनलॉक झाला आहे म्हणून बाहेर फिरत बसण्यापेक्षा कामानिमित्तच घराच्या बाहेर पडा व स्वत:ची काळजी घ्या असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

        काल पाटण जि.सातारा येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजाराच्या उपाययोजना व अनलॉक काळात प्रशासनाने घ्यावयाची काळजी यांसदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,डॉ.सुधीर धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये,पाटण प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,सहा.गटविकास अधिकारी विजय विभूते,पाटण नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी रघूनाथ पाटील,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीस अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

         प्रारंभी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेतला.यामध्ये काही त्रुटी आढळल्या त्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी सुचना केल्या.पाटण तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये काही त्रुटी होत्या त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सुचना देत संस्थात्मक विलगीकरण कक्षांची वाढ करावयाची असल्यास आवश्यक सोईसुविधांनी युक्त अशा ठिकाणी हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करावे. हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करताना त्यांना वेळेवर जेवण त्यांची राहण्याची सोय होते का नाही याची महसूल तसेच आरोग्य प्रशासनाने तपासणी करावी. संस्थात्मक विलगीकरण कक्षांच्या बाहेर अद्यावत अशा रुग्णवाहिका तैनात करण्यात याव्यात.पाटण सारख्या शहरात खाजगी डॉक्टरांच्या हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होतील याची सोय करावी लागली तर ती करावी.

          आज दि.01 ऑगस्टपासून जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गर्दीत वाढ होणार आहे. प्रशासनाने याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनलॉकच्या काळात प्रशासनावर आता जादाचा भार पडणार असला तरी समन्वयाने कुठेही वाद विवाद होणार नाही याची दक्षता विशेषत: आमचे पोलीस विभागाने घ्यावी. अनलॉकमुळे कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होणार असल्याने आपण सतर्क राहिलो तर जनताही सतर्क राहील. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात असे त्यांनी बैठकीत सांगितले.

          दरम्यान सातारा जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन करताना त्यांनी अनलॉकमुळे कामाव्यतिरिक्त कुणीही घराच्या बाहेर पडू नये, स्वत:च स्वत:ची आणि आपल्या कुटुंबांची काळजी घ्या. कोरोना टेस्ट वाढविण्यात आल्याने आपल्याला कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.परंतू यातून बरे होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे त्यामुळे कुणीही घाबरुन जावू नका, सातारा जिल्हयातील सर्व प्रशासन आपली काळजी घेणेकरीताच गेली चार महिने कशोशीने प्रयत्न करीत आहे.सातारा जिल्हयातील जनतेनेही आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हयातील असो वा तालुकास्तरावरील सर्व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.

         दरम्यान अनलॉकच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्हयात कोणकोणत्या उपाययोजना महसूल, पोलीस व आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह  व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बैठकीत दिली. उपस्थितांचे स्वागत प्रातांधिकारी श्रीरंग तांबे व आभार तहसिलदार समीर यादव यांनी मानले.

 


Friday, 31 July 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई रात्री “पावणे एक” लाही अलर्ट. रात्री “पावणे एक” वा. वृत्तवाहिनीने केला संपर्क. गृहराज्यमंत्र्यांच्या सतर्कतेचे दर्शन.


           दौलतनगर दि. ३१:- वेळ रात्री १२ वाजून ४५ मिनींटे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा फोन खणखणला न्यूज १८ लोकमत मधून वृत्तनिवेदक बोलतोय,बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्ते प्रकरणी पाटणा (बिहार) चे पोलीस सिव्हील ड्रेसमध्ये रिक्षामधून मुंबईत फिरत आहेत,महाराष्ट्र गृह विभागाची भूमिका काय? गृहराज्यमंत्री म्हणून आपली प्रतिक्रिया हवी आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केवळ घडयाळाकडे पाहिले रात्री १२ वाजून ४५ मिनींटे झाली होती आणि फोनवरुनच याविषयासंदर्भात त्यांनी न्यूज १८ लोकमतच्या वृत्तनिवेदकास प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. वृत्तनिवेदकांचे म्हणणे आणि गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची त्यावरची प्रतिक्रिया सलग ०५ मिनींटे सुरु होती. वेळेचे भान न ठेवता समोर आलेला कोणताही विषय गृहराज्यमंत्री हाताळत असल्याने त्यांचा हा अलर्टपणा व सतर्कता पुन्हा एकदा त्यांच्या रात्रीच्या वृत्तवाहिनीवरील प्रतिक्रियेमुळे अधोरेखित झाल्याचे दिसून आले.

            म्हणतात ना, राज्याचे मंत्री होणे आणि मिळालेले मंत्रीपद सांभाळणे म्हणावे एवढे सोपे नाही त्यातच गृहखात्याचे राज्यमंत्री. गृहखात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून या व्यक्तींना कायमच किती सतर्क,अलर्ट आणि अद्यावत माहितीनिशी (अपडेट) राहावे लागते हे त्यांचे त्यांनाच माहिती. सध्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे किती सतर्क,अलर्ट आणि अद्यावत माहितीनिशी (अपडेट) आहेत हे त्यांनी गत सहा महिन्यात महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले आहे.ना.शंभूराज देसाईंची मंत्री म्हणून ही पहिलीच टर्म असली तरी त्यांचा प्रशासनातील अनुभव चांगला आणि दांडगा आहे.कितीही गंभीर प्रश्न चुटकीदिशी सोडविण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे.त्यांचे आजोबा स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची महाराष्ट्र राज्याचे करारी गृहमंत्री म्हणून ओळख होती व आजही ती कायम आहे. लोकनेते यांचे सर्व गुण ना.शंभूराज देसाईंच्या मध्ये असून ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री असले तरी महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये त्यांनी त्यांच्या मागील सहा महिन्यांच्या राज्यमंत्रीपदाच्या कार्यातून गृहराज्यमंत्री म्हणून एक वेगळाच ठसा राज्यामध्ये उमटविला आहे. राज्यातील राजकारण्यांच्या आणि जनतेच्या नजरेतही त्यांचे गृहराज्यमंत्री म्हणून कार्यतत्परतेने सुरु असलेले काम दिसू लागले असून गृहराज्यमंत्री म्हंटले की महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडी तात्काळ ना.शंभूराज देसाईंचेच नाव येवू लागले आहे. ही अतिशोक्ती नाही तर वस्तूस्थिती बनली आहे.

                राज्यामध्ये प्रतिरोज वेगवेगळया गंभीर स्वरुपाच्या घटना घडत असतात त्यातच गृहखात्याशी निगडीत असणाऱ्या घटनांची संख्या मोठी असल्यामुळे गृहराज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंना २४ तास अलर्ट आणि अपडेट रहावे लागते. कधी कोणता विषय समोर येईल,त्यावर कोणता निर्णय घेवून अंमलबजावणी करावी लागेल या सर्वांवर लक्ष ठेवून रहावे लागते. यामध्ये दिवस आहे का रात्र हे पहाता येत नाही. शासनाकडून राज्याचे मुख्यमंत्री तसेच वरीष्ठ मंत्री यांनी एखादया गंभीर घटनेबाबत गृहराज्यमंत्री म्हणून माहिती विचारल्यास त्या घटनेसंदर्भात अपडेट राहून गृहविभागामार्फत कोणती भूमिका शासनाच्या वतीने घेतली आहे याबाबत इत्तंभूत माहिती ठेवून अद्यावत रहावे लागत असते तसेच वृत्तवाहिन्यांकडूनही विचारणा केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यासंदर्भातील शासनाची आणि गृहविभागाची भूमिका स्पष्ट करावी लागते. ही भूमिका गृहराज्यमंत्री म्हणून ना. शंभूराज देसाई चोख बजावित आहेत.

               महाराष्ट्र गृह विभागातील पोलीस यंत्रणेला आपलासा वाटणारा गृहराज्यमंत्री  म्हणून ना.देसाईंची ओळख राज्यामध्ये निर्माण झाली आहे.अभ्यासू आणि अपटेड असणारे मंत्री म्हणूनही प्रसारमाध्यमांचे तसेच वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.राज्यात गृहविभागाशी कुठे घटना घडली की प्रसारमाध्यमांच्या नजरा ना.शंभूराज देसाईंना शोधत असतात आणि ना.शंभूराज देसाईही कायम अलर्ट आणि सतर्क असल्यामुळे प्रसारमाध्यमांना न डावलता ते प्रसारमाध्यमांशी निसंकोचपणे वार्तालाप करतात. काल रात्रीची न्यूज १८ लोकमत वरील वार्तांकनाची घटनाही गंभीर असल्याने त्यांनी वेळकाळ न पहाता आलेल्या फोनवरुन बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्तेप्रकरणातील महाराष्ट्र गृह विभागाची भूमिका काय आहे हे स्पष्ट केले. भान ठेवून योजना आखणारे आणि बेभान होवून त्या अंमलात आणणारे एक मंत्री म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यातील जनतेच्या आणि राज्यकर्त्यांच्या नजरेत आपली प्रतिमा निर्माण केली आहे.


Thursday, 30 July 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलातील यशस्वी निकालाची परंपरा कायम. यशस्वी विद्यार्थ्यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले अभिनंदन.


दौलतनगर दि. 30:- दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल धावडे व न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या चार विद्यालयांचा इयत्ता दहावीचा सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील निकाल नुकताच जाहिर झाला आहे. शैक्षणिक संकुलातील विद्यालयांनी आपली निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली असून वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल,दौलतनगरचा 100 टक्के,शिवाजीराव देसाई विद्यालय,सोनवडे विद्यालयाचा 96.87 टक्के,न्यू इंग्लिश स्कूल,धावडे विद्यालयाचा 96.07  व न्यू इंग्लिश स्कूल,नाटोशी विद्यालयांचा 91.66 टक्के निकाला लागला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संकुलाचे प्रमुख राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे.

                महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक समुहातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर,शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,न्यू इंग्लिश स्कूल,धावडे व न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विद्यालयांमध्ये सुसज्ज इमारतींसह उच्चशिक्षित शिक्षक वर्ग असून या विद्यालयांमध्ये  विभागातील विद्यार्थी-विद्यार्थीनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेत. तसेच या विद्यालयांमध्ये  शिक्षणांचा दर्जा चांगला राखला असल्याने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूलचा 100 टक्के निकाल लागला असून निकालात इंग्लिश मिडीयम स्कूलने बाजी मारली आहे.शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे विद्यालयाचा 96.87 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल धावडे विद्यालयाचा 96.07 व न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी विद्यालयाचा 91.66 टक्के निकाला लागला आहे. वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील कु. श्वेता भाकरे हिला 88.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, शिवाजीराव देसाई विद्यालयात प्रथम क्रमांकाने कु.अश्विनी संजय वर्पे हि उत्तीर्ण झाली असून तिला 92.40 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल धावडे विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक राहुल जाधव याला 93 टक्के तर न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक कु.लक्ष्मी डांगळ हिला 81.80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे विशेष लक्ष तसेच उच्चशिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन असल्यामुळेच आम्ही हे यश संपादन करु शकलो असल्याच्या प्रतिक्रिया प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

                लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलातील वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,न्यू इंग्लिश स्कूल,धावडे व न्यू इंग्लिश स्कूल,नाटोशी या विद्यालयां मधील यशस्वी तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, विविध संस्थांचे  पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

        


Wednesday, 29 July 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्यात युवानेते यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.



दौलतनगर दि. 29:-  गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा महाराष्ट्रामध्ये सध्या ऊसाचे प्रमाण जास्त असून साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही अनिश्चित असून सध्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे अनेक कारखान्यांकडे मोठया प्रमाणांत साखेरेचे साठे पडून आहेत.आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील असा कारखाना आहे जो अडचणीच्या काळातही महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगामध्ये तग धरुन आहे.कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम यापुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला असून इतर कारखान्यांच्या बरोबरीने आपले देसाई कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची ९० टक्के रक्कम अदा केली आहे.उर्वरीत एफआरपीची रक्कमही लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त  ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवून नियोजनबध्द काम करुन सन 2020-21 चा गळीत हंगामही प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा,असे आवाहन युवानेते यशराज देसाई यांनी केले.

             दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2020-21 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन युवानेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी रोलरचे पूजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजाची पदाधिकारी यांचेसोबत पाहणी केली.योवळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण,संचालक आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे,बबनराव भिसे,विकास गिरी गोसावी,शशिकांत निकम,सोमनाथ खामकर,वसंत कदम,गजानन जाधव,व्यंकट पाटील, शंकर शेजवळ,सौ. दिपाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

             याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 चे गळीत हंगामात 02 लाख 02 हजार 414 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 12.10 % सरासरी साखर उताऱ्याने 02 लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.मागील सन 2019-20 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन एफआरपीनुसार 2330 प्रमाणे ९० टक्के ऊसबिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकरी,सभासद यांचे बँक खाती आत्तापर्यंत अदा केले आहेत.उर्वरीत राहिलेली एफआरपीची रक्कम लवकरच ऊस उत्पादक शेतकरी,सभासद यांचे बँक खाती जमा करण्यात येणार आहे.आतापर्यंत मागील गळीत हंगामातील ४७ कोटी १६ लाख रक्कम अदा करण्यात आली असून  केंद्र शासना कडून आपले कारखान्यास 08 कोटी 75 लाख तर राज्य शासनाकडून 02 कोटी 10 लाख असे एकूण १० कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मिळणेबाकी असून सदरचे अनुदान मिळविणेकरीता गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे व्यवस्थापन प्रयत्नशिल आहे.केवळ ६ कोटी ६३ लाख रुपयांची रक्कम शेतकरी, ऊस उत्पादकांना देणे बाकी आहे.

               यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यातील गळीत हंगाम पुर्व कामे प्रगतीपथावर असून प्रतिवर्षाप्रमाणे सन 2020-21 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्याचा मनोदय आमचा आहे त्याला यश मिळेल असे सांगून ते म्हणाले,साखर उद्योग अडचणीत असताना देखील आपला देसाई सह.साखर कारखाना चांगल्या प्रकारे सुरु आहे.कारखान्याची क्षमता कमी असूनही तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या ऊसाला इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करीत आलो आहोत. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता चांगली राहणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे आज सातत्याने कोसळणाऱ्या साखर दरामुळे तसेच कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील यावर मात करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.व्यवस्थापनाने ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे कारखान्यातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द काम करावे.कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस आपल्या कारखान्याला देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलताना केले.यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.


Tuesday, 28 July 2020

मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते शताब्दी स्मारकात स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाचा युवानेते यशराज देसाई यांचे हस्ते शुभारंभ. वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघात वृक्षारोपण,गरीब कुटुंबाना वस्तू व विद्यार्थ्यांना शालेय वहयांचे वाटप.



     

     दौलतनगर दि. २८:-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व  शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे दि.27 रोजीचे वाढदिवसानिमित्त गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण मतदारसंघात दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करणाऱ्या एकूण 60 विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण झालेले बीड जिल्हयातील अंबेजोगाई गावचे चंद्रशेखर घोडके यांचे ऑनलाईन मार्गदर्शनाचा ऑनलाईन शुभारंभ युवानेते यशराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
           कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी दि.27 रोजीचा त्यांचा वाढदिवस सोशल डिस्टटींग पाळत विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणसारख्या ग्रामीण,डोंगरी मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर स्पर्धा परीक्षांचाही पुर्वतयारी करण्याकरीता अद्यावत डिजीटल संगणकीकृत अभ्यासिकेचा उपयोग व्हावा यादृष्टीने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे 60 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेतील मिनी ऑडीटीरियममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे 60 विद्यार्थ्यांना विविध एमपीएससी, युपीएससी परीक्षा पास झालेल्यांचे मार्गदर्शनाचा नुकतेच आयपीएस उत्तीर्ण झालेले बीड जिल्हयातील अंबेजोगाई गावचे चंद्रशेखर घोडके यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे शुभारंभ पाटणचे युवानेते यशराज देसाई यांचे हस्ते करण्यात आला.तसेच लॉकडाऊन काळात गर्दी न करता समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा करावा असे आदेश असल्याने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण तालुक्यातील येराड,मुळगाव,आडूळ,पाडळोशी,काळोली व तामकडे येथील सुमारे 500 गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा देण्याच्या हेतूतून आवश्यक ते संसारपयोगी साहित्य व धान्य वाटप, मतदारसंघातील मोरणा,चाफळ व तारळे  विभागातील 2000 शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप तर मरळी,पापर्डे,सोनवडे या ठिकाणी ५००० वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने याचा प्रारंभ ३०० वृक्षारोपण करण्यात आले असून विविध उपक्रमांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा ६० वा वाढदिवस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण मतदारसंघात संपन्न झाला.
चौकट:- स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन कल्पना अतिशय उत्कृष्ट. मुख्यमंत्री ना.ठाकरे.
             लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करणाऱ्या एकूण 60 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करण्याकरीता ऑनलाईन मार्गदर्शन आयोजीत करण्याची कल्पना अतिशय उत्कृष्ट असून या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री ना.देसाईंचे कौतुक केले आहे. याचा शुभारंभ माझे वाढदिवसानिमित्त झाला ही बाबही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.




मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हयातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे हस्ते 448 ऑनलाईन शाखांचे उद्घाटन संपन्न. राज्यातील पहिला उपक्रम सातारा जिल्हयात.



              दौलतनगर दि. 28:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व  शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे दि.27 रोजीच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हयातील शिवसेनेचे राज्यमंत्री,आमदार संपर्कप्रमुख,जिल्हाप्रमुख तसेच जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक यांनी जिल्हयामध्ये पक्षसंघटना वाढविण्याच्या दृष्टीने वाढदिवसाची एक अनोखी भेट पक्षप्रमुखांना दिली आहे. जिल्हयामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील,आमदार महेश शिंदे व जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल ४४८ नवीन शांखाचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ संपन्न झाला. राज्यातील हा पहिला उपक्रम असून सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यातील शिवसैनिकांनी सोशल डिस्टटींगचे पालन करीत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
              सातारा येथील शिवदौलत शाखेतून सातारा जिल्हयातील ४४८ नवीन शाखांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे,संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,यशवंत घाडगे,चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात झुम ॲपव्दारे सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
            कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी दि.27 रोजीचा त्यांचा वाढदिवस सोशल डिस्टटींग पाळणेकरीता ऑनलाईन विविध शिबीरे तसेच लॉकडाऊन काळात गर्दी न करता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करावा असे आदेश दिले असल्याने सातारा जिल्हयातील राज्याचे गृहराज्‍यमंत्री ना.शंभूराज देसाई,शिवसेना पक्षाचे जिल्हयातील संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे 60 व्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हयातील विविध तालुक्यांमध्ये शिवसेनेची पक्षसंघटना वाढविण्यासाठी गावनिहाय शाखा सुरु करुन त्यांचे ऑनलाईन उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला होता.त्यादृष्टीने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील,आमदार महेश शिंदे, जिल्हयातील सर्व जिल्हाप्रमुख यांनी झुम ॲपव्दारे जिल्हयातील सर्व उपजिल्हाप्रमुख,पदाधिकारी व शिवसैनिक यांचेशी संपर्क साधला व तालुकानिहाय शिवसेनेच्या शाखांचे उदघाटन केले. सातारा जिल्हयात शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकूण ४४८ नवीन शिवसेना शाखांचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले आहे. प्रारंभी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील,आमदार महेश शिंदे, जिल्हयातील सर्व जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख,पदाधिकारी व शिवसैनिक  यांनी  मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे 60 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देवून उध्दवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.
चौकट: मुख्यमंत्र्याकडून या उपक्रमाचे कौतुक.
          मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांना 60 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दुरध्वनी केलेनंतर सातारा जिल्हयात पक्षवाढविण्याच्या दृष्टीने ४४८ शाखांचे ऑनलाईन उदघाटन केले असल्याचे निदर्शनास आणून दिलेनंतर मुख्यमंत्री यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन शिवसैनिकांना धन्यवाद दिले.

Sunday, 26 July 2020

सर्व पक्षीय बैठकीत पाटण तालुक्यात एक गाव एक गणपती बसविण्याचा एकमुखाने निर्णय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई.


        
            दौलतनगर दि. 26:- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करीत पाटण तालुक्यामध्ये “एक गाव एक गणपती” बसवून गणेशोत्सव काळातील खर्चाला फाटा देत गणेशोत्सवाचा खर्च कोरोना संकटाचा सामना करण्याकरीता करावा असा एकमुखाने निर्णय आज पाटण याठिकाणी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. या सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाटण मतदारसंघाचे आमदार, राज्याचे गृहराज्यमंत्री  नामदार शंभूराज देसाई उपस्थित होते.
         कोरोना मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा राज्यातील ग्रामीण भागात “एक गाव एक गणपती” बसवून राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने साजरा करावा असे आवाहन राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे. त्याची सुरुवात त्यांचे पाटण मतदारसंघातून होण्याकरीता त्यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आप-आपले मनोगते व्यक्त केली.
             यावेळी बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करताना राज्याचे गृहराज्यमंत्री  व पाटण मतदारसंघाचे आमदार ना.शंभूराज देसाई यांनी मांडलेली संकल्पना उत्कृष्ट असून कोरोना संकटकाळात गणेशोत्सवाच्या सणामध्ये राज्यातील तसेच पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. याकरीता “एक गाव एक गणपती” हि संकल्पना सर्व गावांनी राबवावी असे आवाहन आम्ही सर्वजण करीत आहोत यासंदर्भात जनजागृती करण्याकरीता आम्ही सर्वजण तयार आहोत. कोरोना काळात राज्याच्या विविध भागांत जाऊन गृहराज्यमंत्री हे तेथील प्रशासनाला सतर्क करीत राज्यातील विविध भागातील जनतेची मंत्री म्हणून ते काळजी घेत आहेत.तसेच पाटण मतदारसंघातील जनतेवरही त्यांचे विशेष लक्ष असल्याने गत चार महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाटण मतदारसंघात रोखण्याकरीता त्यांचे कसोशिने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येणारा गणेशोत्सव हा पाटण तालुक्यात “एक गाव एक गणपतीने” साजरा व्हावा याला आमचा सर्वांचा पाठींबा तसेच सहमती असून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये यासंदर्भात प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्वजण जागृती करु अशा प्रतिक्रिया सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या.
             यावेळी मार्गदर्शन करताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्याकरीता जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय आपण सर्वजण करीत आहोत. गेली चार महिने आपण या संकटाचा सर्वजणच सामना करीत आहोत.होऊ घातलेला सार्वजनिक गणेशोत्सव कशा पध्दतीने साजरा करायचा याच्या मार्गदर्शक सुचना राज्यशासनाने यापुर्वीच प्रसिध्द केल्या आहेत. गर्दीत जाणे टाळणे हा एकमेव कोरोना रोखण्याचा उपाय असल्याने यंदाचा गणेशोत्सव हा विना गर्दीचा होण्या करीता “एक गाव एक गणपती” हि संकल्पना राबविणेचे आवाहन मी गृहराज्यमंत्री या नात्याने राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला केले आहे. त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघातून करावी अशी विनंती मी सर्वपक्षीयांचे संमतीने व सहकार्याने पाटण मतदारसंघातील जनतेला करीत आहे. “एक गाव एक गणपती” यामुळे आपले स्व:ताचे व कुटुंबियांचे कोरोना साथीचे रोगापासून रक्षण होईल असा मला विश्वास आहे. असे यावेळी ते बोलताना म्हणाले.
          याप्रसंगी बैठकीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हिंदुराव पाटील,भारतीय जनता पक्षाचे फत्तेसिंह पाटणकर, शिवसेना पक्षाचे जयवंतराव शेलार,महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचे गोरख नारकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया पक्षाचे प्राणलाल माने,बहुजन समाजवादी पक्षाचे शिवाजी कांबळे,पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,उंब्रज सपोनि अजय गोरड,ढेबेवाडी सपोनि उत्तम भजनावळे,कोयना सपोनि एम.एस. भावीकट्टी,मल्हारपेठ पीएसआय अजित पाटील,पोलीस संघटनेचे सुभाष कदम,तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. सी. के.यादव,डॉ. रघुनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट:- गणेशोत्वाच्या खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपावी.
        सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोना संसर्गाचे काळात “एक गाव एक गणपती” मुळे गणेशोत्वाच्या खर्चाला फाटा देत कोरोनाचा सामना करण्याकरीता कोरोना बाधित गावांमध्ये मास्क,सॅनिटायझर,रोग प्रतिबंधक गोळया, गोर-गरीब कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूचे वाटप तसेच आरोग्य विषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील गणेश मंडळांना केले आहे.