Thursday 31 October 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन ऑक्टोंबर २०१९ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. प्रमाणपत्र हाती घेताच आमदार शंभूराज देसाईंनी घेतला होता नुकसानीचा आढावा. नुकसानग्रस्तांसाठी तहसिल कार्यालयात आमदार देसाईंनी घेतली तातडीची बैठक.






दौलतनगर दि.३१:- ऑक्टोंबर,२०१९ मध्ये राज्यातील इतर जिल्हयाबरोबर सातारा जिल्हयातील पाटण मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठया संख्येने नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणेकरीता पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे दि.२५ ऑक्टोंबर रोजीच २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत निवडून आलेले प्रमाणपत्र हाती घेतल्यानंतर आग्रही मागणी केली होती. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन  मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोंबर, २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीसंदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले असून यासंदर्भातील आदेश शासनाच्या महसूल व  वन विभागाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दि.२९ ऑक्टोंबर, २०१९ रोजी पारित करण्यात आले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                      मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशावरुन शासनाच्या महसूल व  वन विभागाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दि.२९ ऑक्टोंबर, २०१९ रोजी ऑक्टोंबर, २०१९ मधील अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याकरीता पंचनामे करण्याबाबत दिलेल्या आदेशावरुन पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने पाटण तहसिल कार्यालय येथे महसूल,कृषी विभागासह सर्व तालुकास्तरीय सर्व विभागांची  बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी वरील आदेशाप्रमाणे तात्काळ पाटण विधानसभा मतदारसंघात ऑक्टोंबर,२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणेकरीताचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रविंद्र माने,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय थोरात,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका कृषी अधिकारी अविनाश मोरे यांच्या सह सार्वजनीक बांधकाम, पाणी पुरवठा,जलसंधारण,वीज वितरण कंपनी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                      पाटणचे आमदार शंभूराज देसाई तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेनंतर विधानसभा सदस्यांचे निवडून आलेले प्रमाणपत्र घेणेकरीता पाटण तहसिल कार्यालयात गेले असताना त्यांनी आमदारकीचे प्रमाणपत्र हाती घेताच आमदारकीच्या तिसऱ्या टर्ममधील कामांस सुरुवात करीत ऑक्टोंबर, २०१९ मध्ये पाटण मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांबरोबर इतरही सार्वजनीक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या आढाव्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ऑक्टोंबर, २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे बरोबर सार्वजनीक मालमत्तेचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शेतीपिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे प्राधान्याने शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुनच मुख्यमंत्री यांनी वरीलप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी तात्काळ मदत देणेकरीताचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
                दरम्यान आमदार शंभूराज देसाईंनी आज तहसिल कार्यालयात सविस्तरपणे घेतलेल्या बैठकीत शेतीपिकांचे कृषी व महसूल विभागाने संयुक्तीकरित्या पंचनामे करुन याचा अहवाल नुकसानीच्या पुराव्यासह शासनाच्या संबधित विभागाकडे सादर करण्यात यावा अशा सुचना केल्यानंतर सार्वजनीक बांधकाम तसेच जिल्हा परीषद बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाकडील सार्वजनीक मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत जेणेकरुन या नुकसान झालेल्या कामांची पुर्नंबांधणी करणेकरीता शासनाकडे आवश्यक असणारी मदत आपल्याला मागता येईल.बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागानी आपला अहवाल आपल्या वरीष्ठांमार्फत शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा.असे सुचित करुन ऑक्टोंबर, २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीकरीता लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळणेकरीता मी आजच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेवून मदतीची मागणी करणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.

Wednesday 30 October 2019

राज्यातील साखर उद्योग वाचविण्याकरीता राज्य शासनाने साखर उद्योगाचे स्वतंत्र्य धोरण ठरविणे गरजेचे. साखर उद्योगामध्ये असणाऱ्या आघाडी शासनाने हे धोरण आदीच ठरविणे गरजेचे होते. आमदार शंभूराज देसाईंचा घणाघात. देसाई कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.


.
                      
दौलतनगर दि.३० :-  मागील वर्षीच्या साखर दरावर केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी देण्याची रक्कम ठरवित आहेत. मागील वर्षी साखरेचा दर ३४०० रुपये होता त्यावरुन एफआरपी ठरविण्यात आली मात्र यंदाच्या गळीत हंगामात तोच साखरेचा दर २९०० रुपयांवर आला त्यामुळे साखर कारखानदारांना सुमारे ५०० रुपयांचा तोटा सहन करुन शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणे भाग पडले.आमची शासनाकडे एकच मागणी आहे एफआरपीची रक्कम ठरविताना साखर कारखान्यांनी निर्माण केलेली सर्व साखर केंद्र व राज्‍य शासनाने खरेदी करावी व खरेदी केलेल्या साखरेच्या भावातून शेतकऱ्यांना एफआरपी निश्चीत करावी. दर तीन वर्षानी साखर उद्योगामध्ये चढउतार होत असतात आपले महाराष्ट्र राज्य सुमारे ३२ टक्के साखर उत्पादन करते त्यामुळे निदान आपल्या राज्य शासनाने तरी राज्यातील साखर उद्योग वाचविण्याकरीता स्वतंत्र्य साखर धोरण ठरविणे गरजेचे असून यासंदर्भात युतीच्या शासनाकडे आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी करीत साखर उद्योगामध्ये कार्यरत असणारे आघाडी सरकार हे सलग १५ वर्षे सत्तेत होते त्यांनी हे धोरण आदीच ठरविणे गरजेचे होते मात्र त्यांना ते जमले नाही असा घणाघात आमदार शंभूराज देसाईंनी केला.
                          दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण आयोजीत करण्यात आली होती यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना आमदार शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
                          यावेळी बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्यामध्ये आजही परतीचा पाऊस सुरु असून दि.20 ऑक्टोंबर 2019 रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये अतोनात नुकसान झाले. राज्यातील सर्व कारखाने 15 नोव्हेंबर नंतर सुरु होणार. यापुर्वी नेहमी दिवाळी अगोदर मंत्री समितीची बैठक होत होती या बैठकीमध्ये राज्यातील साखर कारखान्यांनी कारखाने सुरु करण्याचे धोरण ठरत होते. मात्र अजूनही मंत्री समितीची बैठक झाली नसल्याने कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे साखरेचे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने साखरेच्या उत्पन्नामध्ये सुमारे 35 टक्के घट होणार आहे. दर तीन वर्षांनी साखर उद्योगावर संकट येत आहेत. या वेळचा गळीत हंगाम सुरु होताना 1.25 लाख साखर पोती शिल्लक आहेत. साखर उद्योगावर राज्य सरकारच नियंत्रण कमी आणि केंद्र सरकारचं नियंत्रण अधिक आहे. राज्य शासनाने वेळीच या साखर उद्योगाकडे लक्ष दयावे याकरीता युतीच्या शासनाकडे आमचा साखर उद्योगातील लोकप्रतिनिधींचा आग्रह राहणार आहे.  झालेला तोटा कसा भरुन काढायचा हा अनेक साखर कारखान्यांपुढे प्रश्न आहे. सर्व कारखान्यांना एफ.आर.पी.प्रमाणे दर देणे बंधनकारक केले आहे.मात्र साखरेला भाव देताना जबाबदारी सरकार घेत नाही.गेली 15 वर्ष राज्य केलेल्या सरकारमधील अनेक लोकप्रतिनिधी हे साखर उद्योगाशी निगडीत होते,मात्र स्वतंत्र साखरेचे धोरण राबविण्यामध्ये हे शासन अपयशी ठरले.शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेला सहकारी साखर उदयोग टिकणे गरजेचे असल्याने राज्यासह केंद्र सरकारने हातभार लावणं, मदत करणं गरजेचे आहे. असे सांगून ते म्हणाले आपल्या कारखान्याला नेहमीच अडचणीत आणण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो यामधूनच उपलब्ध ऊसापैकी गतवर्षी 30 टक्के ऊस अन्यत्र गेला आहे. असे अनेक गळीत हंगामामध्ये यापुर्वी झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत विरोधकांनी कारखान्यावर नको ते आरोप केले याचे उत्तर कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांना आपण नक्कीच देवू मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफ.आर.पी.देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे.साखर उद्योग अडचणीमधून काढण्यासाठी साखर उद्योगाशी निगडीत असलेल्या विधीमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान यांच्याकडे नेण्याचा प्रयत्न करणार असून साखर उद्योग या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.देसाई कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
चौकट :- देसाई कारखान्यांच्या सभेत आमदार शंभूराज देसाईंच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने मंजुर.
               पाटणचे आमदार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेबद्दल लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याच्या सभासंदानी-शेतकऱ्यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने मंजुर केला. कारखान्याचे चेअरमन यांनी कारखान्याच्या वतीने आमदार शंभूराज देसाईंचे शाल,श्रीफळ व मानाचा फेटा देवून सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक‍ शुभेच्छा दिल्या.



Friday 25 October 2019

आमदारकीचे प्रमाणपत्र घेताच आमदार शंभूराज देसाईंनी केली आमदारकीच्या कामाला सुरुवात. दि.20 रोजी मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीचा घेतला आढावा.





दौलतनगर दि.२५ :-  २०१९ च्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आमदारकीची हॅट्रीक करणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेनंतर विधानसभा सदस्यांचे निवडून आलेले प्रमाणपत्र घेणेकरीता पाटण तहसिल कार्यालयात आलेले आमदार शंभूराज देसाईंनी आमदारकीचे प्रमाणपत्र हाती घेताच आमदारकीच्या तिसऱ्या टर्ममधील कामांस सुरुवात केली. प्रमाणपत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी दि.२० रोजी पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीचा तातडीने महसूल,कृषी व बांधकाम ग्रामीण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तहसिल कार्यालयात आढावा घेतला.
                          विधानसभा निवडणूकीच्या आदल्या दिवशी दि.२० रोजी मोठया प्रमाणात पाटण तालुक्यात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती, रस्ते, पुल याचा आढावा घेणेकरीता आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय,पाटण येथे बैठक घेण्यात आली होती.यावेळी बैठकीत दि.२० रोजीच्या अतिवृष्टीमध्ये पाटण तालुक्यातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेत यावेत अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी प्रांरभी तालुका कृषी अधिकाऱ्यांना केल्या त्यानंतर तालुक्यातील पवारवाडी व गारवडे येथील पुलावरुन अतिवृष्टीचे पाणी गेल्यामुळे पवारवाडी येथील पुलाच्या दोन्ही बाजू खचल्या असल्याने कसणी,निवी,निगडे या गांवाकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद झाली असून या पुलाच्या भरावाच्या कामांना तात्काळ सुरुवात करावी असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांनी सांगितले त्याचबरोबर गारवडे येथील पुलाचे काम संबधित ठेकेदाराकडून तातडीने परत करुन घ्यावे याविषयी कोणतीही तक्रार येवू देवू नये अशाही सुचना त्यांनी यावेळी जिल्हा परीषदेच्या बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या तर दि.२१ ऑक्टोंबर रोजी दिवशी बु// याठिकाणी आपल्या आजोबाबरोबर शेतात गेलेला ॠषीकेश संदीप थोरात हा ५ वर्षाचा मुलगा ओढयाला मोठया प्रमाणात पाणी आल्याने हात निसटून वाहून गेल्यांने मृत झाल्याने त्याचे कुटुबिंयाना तातडीची मदत करण्याचे व शासनाकडून या कुटुंबाला मदत होणेकरीताचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सुचना आमदार शंभूराज देसाई महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बैठकीस महसूल, कृषी, ग्रामीण विकास, जिल्हा परीषद व सार्वजनीक बांधकाम विभागाचे तालुकास्तरीय सर्व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट :- आमदार देसाईंबरोबर आमदारकीचे प्रमाणपत्र घेण्याकरीता शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित.
               पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले असून काल झालेल्या विधानसभा निकालानंतर आमदार म्हणून निवड झालेले प्रमाणपत्र घेण्याकरीता तहसिल कार्यालय, पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंबरोबर शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पाटण शहरात आमदार शंभूराज देसाईंचे ठिकठिकाणी जल्लोषात आतिषबाजी करुन स्वागत करण्यात आले.तर आमदार शंभूराज देसाईंनी आमदारकीचे प्रमाणपत्र हाती घेतल्यानंतर उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तहसिल कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष साजरा केला.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंना प्रांताधिकारी यांनी दिले आमदारकीचे प्रमाणपत्र.
             काल निकालाला वेळ झाल्यामुळे आमदार शंभूराज देसाईंना २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेचे प्रमाणपत्र आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी तहसिल कार्यालय,पाटण याठिकाणी दिले.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रवींद्र माने, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका कृषी अधिकारी अविनाश मोरे यांची उपस्थिती होती.यावेळी विधानसभा निवडणूक सुस्थितीत पार पडल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Sunday 13 October 2019

केवळ मतासाठी दारात येणाऱ्यां युवा नेत्यांना आमच्यासाठी काय केले याचा जाब विचारा. आमदार शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन.




दौलतनगर दि.१४:- ही निवडणूक ते ती निवडणूक केवळ मते मागायला जनतेच्या दारात येणाऱ्या विरोधक युवा नेत्यांनी गत पाच वर्षात आमचेसाठी नेमके काय केले म्हणून आम्ही तुम्हाला मते दयायची असा जाब मतदारांनी युवा नेते गांवात मते मागायला आल्यानंतर विचारावा व आपण निवडणूका या विकासाच्या मुद्दयावर आतापर्यंत लढत आलो आहोत आताही आपण विकासकामांच्या मुद्दयावरच निवडणूक लढवित आहोत येणाऱ्या निवडणूकीत विकासकामांच्या माध्यमातून गाव समृध्द करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
                     तारळे विभागातील पाबळवाडी,बांधवाट,दुसाळे,वजरोशी,खडकवाडी,बामणेवाडी,जिमनवाडी,बागलेवाडी, भोकरवाडी,जळव,मरळोशी,ढोरोशी,घोट,जुगाईवाडी,आंबळे,वेखंडवाडी,तारळे या गावांमध्ये आमदार शंभूराज देसाईंच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या या प्रचारसभेत ते बोलत होते.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर,शिवदौलत बँकेचे व्हाईस चेअरमन संजय देशमुख,संचालक अभिजित पाटील,अशोकराव शिंदे,रणजित शिंदे,नामदेवराव साळूंखे,माणिक पवार,विजय पवार फौजी,गजानन पाटील,भाऊसो जाधव, एस.के.वाघडोळे,श्रीकांत सोनावले,रामचंद्र लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्याला कोणत्या गांवात किती मते पडली याचा विचार न करता जे जनतेच्या निकडीचे आहे ते ते विकासकाम देण्याची गरज आहे.मी माझ्या आमदारकीच्या काळात मला गावात, वाडीवस्तीवर किती मतदान पडले याचा विचार न करता गत साडेचार वर्षात आणि मागील आमदारकीच्या काळात विविध विकासकामे देण्याचा प्रयत्न केला.विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नाही आज मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये आपण पाच वर्षात कामे दिली आहेत आपण दिलेली कांमे मतदारांना डोळयाने दिसत आहेत परंतू ती विरोधकांना दिसत नाहीत गत पाच वर्षात काहीही न करता केवळ आपल्या विकासकामांची मापे काढण्याचा उद्योग विरोधकांचा सुरु आहे आता मते मागायला गावागावात फिरत आहेत त्यांना गावात आलेनंतर आमच्यासाठी आपण काय केले असा जाब विरोधकांना विचारावा व आपण केलेली विकासकामे त्यांना दाखवावित.केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक मते मागायला जनतेच्या दारात जायचे आणि मते मागून गेल्यानंतर मते दिलेल्या जनतेला काय हवे, काय नको याकडे ढुंकुनही पहायचे नाही. मग अशा नेतृत्वाच्या मागे आपले उभे आयुष्य घालविण्यात काय अर्थ आहे याचा विचार जनता कधी करणार आहे का नाही? का कामे करायला आमदार आणि मते घ्यायला माजी आमदार आणि त्यांचे निष्क्रीय सुपुत्र अशी परिस्थिती होवू नये. मागेल त्याचे काम करण्याचे ध्येय आपण बाळगल्यामुळेच गत पाच वर्षात पाटण मतदारसंघात कोटयावधी रुपयांचा विकासनिधी आपण मंजुर करुन आणू शकलो.तालुक्याचे माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र केवळ पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत. निवडणूक विधानसभेची आणि माजी आमदार पुत्र प्रचार करतायत कारखान्याचा. त्यांच्या भूलथापाना बळी पडू नका. मतदारसंघातील जनतेने विकासकामांनाच कौल देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आज या विभागात विरोधकांचा दौरा होता त्या दौऱ्यात त्यांना मतदारांनी किती प्रतिसाद दिला आहे याची आपण माहिती घ्यावी. आज मतदार त्यांचेपुढे येण्यास तयार नाहीत कारण त्यांनी पाच वर्षात जनतेला काहीही दिले नाही. विकासाच्या कामांकरीता यापुढेही भरघोस असा निधी या विभागाला दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मागील निवडणूकीपेक्षा जादाचे मताधिक्य देवून पाटण विधानसभा मतदारसंघाचा विकास आणखीन गतीने करण्याकरीता मला पाठबळ दयावे तसेच महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही माझेबरोबरीने मतदान करावे अशी विनंती आमदार शंभूराज देसाई शेवठी बोलताना केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन जाधव व उपस्थितांचे आभार  एस.के.वाघडोळे यांनी मानले.
चौकट:- मंडप आमचा, सभा आमची आणि भाषण ठोकून गेले युवा नेते.
            बामणेवाडी याठिकाणी आपल्या विचारांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रचार सभेकरीता मंडप उभारला होता मी या गांवात येण्यापुर्वी युवा नेते गांवात आले सभा कुठे आहे हे ही त्यांना ठाऊक नसल्याने आमच्याच मंडपात आमच्याच स्पीकरवर युवा नेते भाषण ठोकून गेले यावरुनच युवा नेते किती कतृत्ववान आहेत याचा प्रत्यय येतो. त्यामुळे अशा नेतृत्वाच्या मागे जायचे का याचा विचार जनतेने करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.