दौलतनगर दि.30.- पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा यशस्वी पणे सांभाळणारे यशराज शंभुराज देसाई यांनी देसाई कारखान्याची जबाबदारी संभाळल्यापासून कारखाना प्रशासन आणि कारखाना मशिनरी यामध्ये आमूलाग्र बदल करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा या कारखान्याच्या माध्यमातून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस पीकाची नोंद पारदर्शकणे होण्याकरीता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन ऑनलाईन पद्धतीने ऊसाची ऑनलाईन नोंदीचा शुभारंभ यशराज देसाई यांनी केला.
दरम्यान यशराज देसाई यांनी नव्यानेच कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकरी यांचे ऊसाची नोंद आँनलाईन ॲपव्दारे करणेकरीता, कारखान्यामार्फत शेती विभागातील कर्मचारी यांचेमार्फत कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकरी यांचे ऊसाची नोंद करण्याचा शुभारंभ, पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील शेतकरी विवेक सूर्यवंशी यांच्या ऊसाचा क्षेत्राला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली.आणि त्यांच्या ऊस क्षेत्राची थेट जागेवरच स्वतः ऑनलाईन नोंद केली.यावेळी यशराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यामध्ये कमी खर्चाचे धोरण ठेवत पारदर्शक कारभार सुरु आहे. कारखान्याने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याच्या हेतूने आज आपण ऑनलाईन पध्दतीने ऊस क्षेत्राची नोंद घेण्याचा शुभारंभ करत आहोत.
कारखान्याने सुरु केलेल्या ऑनलाईन ॲपमुळे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या क्षेत्राची ऑनलाईन नोंद ही कारखाना कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष जागेवर जाऊन घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीमुळे ज्या क्षेत्राची नोंद केली आहे त्याचे क्षेत्रफळ बरोबर येणार आहे, परिणामी त्या क्षेत्राची ऊस तोडणी प्रोग्रॅम राबविताना अचूकता येणार असून शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही.करखान्यालाही कार्यक्षेत्रातील ऊस नोंदीचा आणि अचूक क्षेत्राचा अंदाज येऊन पुढील गळीत हंगामाचे योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे. कारखान्याच्या शेती गट ऑफीसमधील कर्मचारी यांनी ऊस नोंदीकरीता प्रत्येक शेताच्या चारी कोपऱ्यावर जाणे बंधनकारक असून तेथून जीपीएस प्रणालीव्दारे शेतकऱ्याच्या शेताचे क्षेत्रफळ अचूक मोजले जाणार आहे. या ॲपमध्ये नोंद केलेला सर्व डाटा शेतकऱ्याच्या फोटोसह कारखान्यातील संगणक विभागातील सर्व्हरवर अपलोड करण्यात येणार आहे.त्यामुळे तोडणी प्रोग्रॅम अचूक होणार असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येणार नाही. तसेच शेती विभागातील गट ऑफीसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी देखील या जेपीएस प्रणालीव्दारे शेतामध्ये ऊस पीकाची नोंद करण्याकरीता गेल्यानंतरच लागणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
चालू गळीत हंगाम कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास त्यांना यावेळी व्यक्त करीत पुढील गळीत हंगाम यशस्वी करण्याच्यादृष्टीने कारखान्याने नव्याने सुरु केलेल्या ऑनलाईन ऊस क्षेत्राच्या नोंदीकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई,विवेक सूर्यवंशी,दादासो जाधव,संतोष डोंगरे,जालिंदर डोंगरे,बाबुराव सूर्यवंशी,प्रशांत चव्हाण,बाळासो सूर्यवंशी,संदीप पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.