Monday 18 January 2021

कोयनानगरला प्रस्तावित पोलीस विशेष प्रशिक्षण उपकेंद्राच्या जागेची. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली अधिकाऱ्यासमवेत प्रत्यक्ष पहाणी.


दौलतनगर दि.18 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या परिसरात  कोयनानगर येथे निसर्गरम्य ठिकाणी पोलीस भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणेकरीता राज्याचे महाराष्ट्र पोलीस विशेष प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्यासाठी पाटण मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे मान्यतेने कोयनानगरला महाराष्ट्र पोलीस विशेष प्रशिक्षण उपकेंद्र उभारणे प्रस्तावित असून या प्रस्तावित प्रशिक्षण उपकेंद्रास आवश्यक असणाऱ्या जागेची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रत्यक्ष कोयनानगर येथे येवून संबधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली.

             मागील महिन्यात दि.10 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे कोयनानगरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी निसर्गाने नटलेल्या या परिसरात पोलीस भरती  होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीनंतरचे प्रशिक्षण देणेकरीता राज्य पोलीस दलाचे विशेष प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्यास मान्यता दयावी अशी मागणी मुख्यमंत्री यांचेकडे केली होती. तसेच त्यानंतर मुंबई येथे मुख्यमंत्री यांची भेट घेवून त्यांना लेखी पत्र देतही याची मागणी केली असता मुख्यमंत्री यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना गृह विभागाला दिल्या आहेत.तात्काळ या प्रस्तावित  विशेष प्रशिक्षण उपकेंद्राचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांचेकडे मान्यतेकरीता सादर करावयाचा असून याचे सादरीकरण स्वत: गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री यांचेकडे करणार आहेत.

                त्यामुळे कोयनानगरला प्रस्तावित असणारे हे विशेष प्रशिक्षण उपकेंद्र  लवकरात लवकर व्हावे  याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हे प्रयत्न सुरु असून हे विशेष प्रशिक्षण उपकेंद्र कोयनानगरच्या वैभवात भर टाकणार आहे. या भेटीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रथमत: कोयनानगर येथे सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये या विशेष प्रशिक्षण उपकेंद्राकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व बांबीचा त्यांनी प्राथमिक स्वरुपात आढावा घेतला. विशेष प्रशिक्षण उपकेंद्राकरीता आवश्यक जागा, प्रशिक्षणार्थींना राहण्याकरीता आवश्यक निवासस्थाने, वीज, पाणी, रस्ता याच्या सुविधा, प्रशिक्षण केंद्राकरीता प्रशिक्षण हॉल या सर्व बांबीचा त्यांनी या बैठकीत आढावा घेतला .या विभागात कोयना धरण व्यवस्थापनच्या  प्रशिक्षणार्थींना राहणेकरीता किती खोल्या उपलब्ध आहेत, तसेच विशेष प्रशिक्षण उपकेंद्राची उभारणी करण्याकरीता महसूल विभागाची किती जागा उपलब्ध आहे याचा सर्व आढावा घेत त्यांनी प्रस्तावित असणाऱ्या या विशेष प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीकरीता प्रत्यक्ष जावून जागेवर पहाणी केली. लवकरात लवकर महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विशेष प्रशिक्षण उपकेंद्राचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो मुख्यमंत्री यांचेकडे सादरीकरणाकरीता व मान्यतेकरीता सादर करावा अशा सुचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

                मुख्यमंत्री यांना या प्रस्तावित विशेष प्रशिक्षण उपकेंद्राचे सादरीकरण करुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची विनंती मुख्यमंत्री यांचेकडे करणार असल्याचेही यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

               यावेळी पहाणी दौऱ्यास व बैठकीस जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, कोयना धरण कार्यकारी अभियंता वैभव फाळके, उपविभागीय अभियंता आशिष जाधव,सहाय्यक वनसंरक्षक साळुंख हे अधिकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment