Monday 24 January 2022

पाटणमधील शिवसेना पक्षाला वाढलेल्या मताधिक्याने सत्यजितसिंहाचा थयथयाट. मंत्री ना. देसाई यांचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर हल्लाबोल.

 

दौलतनगर दि.24(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- आपल्या हक्काच्या पाटण गावातच शिवसेनेचे मताधिक्य वाढू लागल्यामुळे पाटणकरांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.त्यामुळेच ते बेताल आरोप करीत सुटले आहेत.आम्हाला सेवानिष्ठा शिकविणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही पाटण नगरपंचायतीवर ज्या पक्षाची सत्ता आली आहे म्हणून टिमकी वाजवताय त्या पक्षाच्या चिन्हावर एक तरी सदस्य तुमचा निवडून आला आहे का? ज्या पक्षाच्या नावावर मोठे झाला त्या पक्षाचे नावच गायब करणारे आपले निष्क्रिय कर्तृत्व आता पाटण शहरातीलच नव्हे तर आता संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये पाटणमध्ये शिवसेना पक्षाला वाढलेल्या मताधिक्याने सत्यजितसिंहाचा थयथयाट सुरु आहे.असा हल्लाबोल राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर पत्रकाद्वारे केला आहे. 

             मंत्री देसाई म्हणाले,पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही कुठेही राजकीय सभा कार्यक्रम घेतले नाही.मात्र आम्हाला या निवडणुकीत सत्तेचा राजकीय वापरच करायचा असता, तर तो आम्हाला बँकेत अथवा कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी बसून करायची गरज भासली नसती. तर तो आम्ही थेट आणि करेक्टच केला असता,  हे तुमच्यासहित तुमच्या बगलबच्च्यांनाही ही माहीत आहे.सत्यजितसिंहाचं अस झाले आहे की स्वत:च ठेवायच झाकून दूसऱ्याच बघायच वाकून अशीच अवस्था झाली आहे. कारण निवडणूक कोणतीही असो मग पाटणमध्ये मतदान मिळविण्यासाठी आपल्या बगलबच्च्यांमार्फत सामान्य जनतेला मतदान करण्याकरीता वेठीस धरण्यासाठी खालच्या पातळीचे कशा पध्दतीने राजकारण करण्यात येते ते पाटणवासियांनी यापुर्वी अनुभवले आहे.ते वेगळ सांगायची गरज नाही.

            सत्यजित पाटणकर तुम्ही आमच्या मरळी गावाची काळजी अजिबातच करू नका ते लोकनेत्यांचे आणि त्यांच्याच विचारांचे गाव आहे आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे मात्र ज्या पाटण च्या भक्कम बालेकिल्ल्याची भाषा करणाऱ्या निष्क्रिय विरोधकांनी आपल्या बालेकिल्याचे बुरुज पहिल्यांदा तपासून पाहावेत कारण जे आपले उमेदवार निवडूण आले आहेत ते किती मतांच्या फरकाने निवडूण आले आहेत याचा गवगवा का करत नाही. त्यामुळे नेमके कुणाला मतदारांनी नाकारले आहे हे लवकरच जनतेलाही कळेल असा सूचक इशारा ही मंत्री देसाई यांनी दिला.

                 तुमच्या  केवळ निष्क्रिय नेतृत्वामुळे पाटण शहरातील सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे.ज्या अठरा नागरी सुविधा पाटण वासियांना आपण देऊ शकत नाही.यामध्ये प्राधान्याने पाटण शहर वासियांना साधे स्वच्छ पाणी देऊ शकत नाही.पहावे तेव्हा प्रत्येकाच्या घरापुढे टँकर उभा तोही सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चाट लावून.हे आपल निष्क्रिय कर्तृत्व सर्वजण पाहत आहेत. राहिला विषय उमेदवारांचा ज्यांना समाजात स्थान नाही, ज्यांनी तमाम महिला वर्गाला लाजेने मान खाली लावायला अशा गावगुंडांना सोबत घेऊन नगर पंचायतीच्या सत्तेत पुन्हा बसविले जात आहे, त्यांच्याकडून नंगरपंचायतीमध्ये नेमक्या कोणत्या कामाची अपेक्षा पाटण शहारातील सर्वसामान्य महिला मतदार यांनी करायची हे एकदा स्पष्ट करा. कारण असा हा प्रकार पाटण शहराचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे दुर्दैव आहे,असा घणाघात करून मंत्री देसाई म्हणाले, आमचे दोन जरी सदस्य असले तरी ते सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठीच झटत राहतील.पाटण नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये गल्लीबोळात उमेदारांचा प्रचार करुनही शिवसेना पक्षासह इतर अपक्ष उमेदवार यांची व तुमच्या नेतृत्वाखालील उमेदवारांना पडलेली मते यांची टक्केवारी काढली तर पाटणमधील जनतेने नेमके कोणाला नाकारले आहे हेही आपणच तपासून घ्या.पाटण शहरातील काही अंशी  मतदार हे आता जरी तुमच्या दहशतीखाली असले तरी भविष्यात कुणाचा कार्यक्रम करेक्ट करायचा हे ही जनतेने  आत्ताच ठरवले आहे, असा सूचक इशारा मंत्री देसाई यांनी विरोधकांना केला.

              दरम्यान विरोधक काय टिमक्या वाजवातायत यांकडे दुर्लक्ष करून या निवडणुकीत  लोकांनी दिलेला कौल आम्ही  लोकशाही मार्गाने स्वीकारलेला असून आमची वाटचाल नेहमीच मते वाढवण्याच्या दृष्टीने आहे आणि जरी सत्ता आली नसली तरी आणि आमचे बहुमत पाटण नगरपंचायतीत नसले किंवा दोनच नगरसेवक निवडून आले असले तरी निवडणुकीमध्ये पाटण नगरपंचायतीच्या विकासासाठी जो शब्द दिला होता तो शब्द शिवसेना आणि तिथला स्थानिक आमदार म्हणून आणि राज्याचा राज्यमंत्री म्हणून आम्ही आणि लोकांच्या विकासासाठी आम्ही सतत कटिबद्ध राहणारच आणि तशी अपेक्षा ही शहरातील जनतेची आहे याची आपणाला निश्चित खात्री आहे असा पुनरोच्चार ही मंत्री देसाई यांनी शेवटी केला.

चौकट : सामान्य जनता म्हणजे तुमची काय खाजगी मालमत्ता वाटली काय?

माझ्या राजकीय जीवनात मी कधीही  विकासनिधी देताना राजकीय गट म्हणून दिला नाही. आडात नाही तर पोहऱ्यांत कोठून येणार ज्यांना साधा एक दमडीचा निधी वाटपाचा अधिकार नाही त्यांनी आम्हाला निधी कुठे वापरायचा आणि कुठे वापरायचा नाही हे वेगळ सांगण्याची गरजच नाही.मात्र तुम्हाला जनतेची एवढीच काळजी असती तर पाटण सारख्या शहराची अशी परवड झालीच नसती.असा हल्लाबोल करून जनता म्हणजे तुमची काय खाजगी मालमत्ता वाटली काय ? ज्यांनी तुम्हाला पोत्याने मतदान केले त्यांना विकासापासून वंचित ठेवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे.तुमच्या केवळ तुमच्या निष्क्रियतेमुळे, नाकर्तेपणामुळे आणि  फाजील आत्मविश्वासमुळेच शहरातील जनता मूलभूत विकासापासून दुर्दैवाने लांब राहिली आहे. त्यामुळे जनतेचा विकासनिधी नाकारण्याची भाषा करु नये असा टोला  मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर लगावला.

No comments:

Post a Comment