दौलतनगर दि.06:-
लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखाना हा जिल्हयातील इतर कारखान्यांपेक्षा कमी क्षमतेचा कारखाना असला तरी आपण प्रत्येक गळीत हंगामामध्ये
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी गाळपास दिलेल्या ऊसापोटी एफ.आर.पी.प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या
बँक खाती जमा करत आलो आहोत.लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई(आबा) यांचे
विचारांचा वारसा जोपासत लोकनेते बाळासाहेब उद्योग समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे
राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने
नेहमीच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांचे हिताला प्राधान्य देण्याचे धोरण राबविले आहे.त्यानुसार
गत वर्षीच्या गळीत हंगामाध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी.ची उर्वरित
रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी केले.
ते दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचे विजया दशमी दसऱ्याचे शुभमुहुर्तावर आयोजित बॉयलर अग्निप्रदिपन
कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),अशोकराव
पाटील, डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालिका सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,ॲङमिलिंद पाटील,डी.पी.जाधव,प्रकाशराव
जाधव,बबनराव भिसे, विजयराव मोरे, शंकरराव पाटील,जालंदर पाटील, टी.डी.जाधव,कार्यकारी
संचालक सुहास देसाई,फायनान्स मॅनेजर विनायक देसाई यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी
व कर्मचारी यांची उपस्थिती होती.तत्पुर्वी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे
संचालक सुनिल पानस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंगल सुनिल पानस्कर यांचे हस्ते
सत्यनारायण महापुजा आयेाजित केली होती.
याप्रसंगी बोलताना चेअरमन यशराज देसाई
पुढे म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊसाची उपलब्धता जास्त आहे. त्यामुळे गळीत
हंगाम लवकर सुरु करावा लागणार आहे.सध्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे
काम अंतिम टप्प्यात आले असून गळीत हंगाम सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.आपल्या जिल्हयातील इतर साखर
कारखान्यांचा विचार करता जिल्हयामध्ये जास्त क्षमतेचे कारखाने असून सध्या स्पर्धेच्या
युगात टिकणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी
साखरेसह इथेनॉलचे उत्पादन करण्याबाबत केंद्र सरकारने धोरण आणले आहे. त्यामुळे आगामी
दोन तीन वर्षामध्ये सहप्रकल्प उभारणे गरजेचे असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, गत
गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची 90 टक्के रक्कम ही यापूर्वीच शेतकऱ्यांना दिली आहे.उर्वरित
एफ.आर.पी.ची रक्कम देण्याची तयारी केली असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली जाणार आहे. गत
गळीत हंगामामध्ये जिल्हयातील सर्वच कारखान्यांना ऊस तोडणी मजूरांची कमतरता भासली परंतु
यंदा ऊस तोडणी मजूर यंत्रणा कमी पडणार नाही
याची काळजी कारखाना व्यवस्थापनाने घेतली आहे.आगामी काळात कारखाना कार्यक्षेत्रामध्ये
यंत्राणे ऊस तोडणीचे नियोजनाबरोबर स्थानिक ऊस तोडणी यंत्रणा सुरु होण्याची गरज असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने
साखर निर्यातीचे धोरणांमध्ये काही बदल करण्याची गरज असून गत तीन वर्षामध्ये गळीत हंगाम
सुरु असताना केंद्र सरकारने एफ.आर.पी.च्या रक्कमेत वाढ केली परंतु सन 2019 साली साखरेचा जो किमान विक्री दर आहे तो
आजही तसाच असून साखरेचा किमान विक्री दर 36 रुपये होणे गरजेचे आहे. ना.शंभूराज
देसाई यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने अडचणीचा काळ असूनही विस्तारीकरणा शिवाय
पर्याय नसल्याने कारखान्याच्या विस्तारीकरणाचा धाडसी निर्णय घेतला.तसेच सध्या विस्तारीकरणाच्या
पहिल्याचे काम अंतिम टप्प्यात येण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे.यंदाचा
गळीत हंगाम हा महत्त्वाचा असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यामध्ये काम करता
असताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काटेकोरपणाने पार पाडावी.तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील
ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस हा कारखान्यास गळीतास घालून
हा गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे
स्वागत व प्रास्ताविक डॉ.दिलीपराव चव्हाण तर आभार अशोकराव पाटील यांनी मानले.
चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना
11 टक्के बोनस जाहिर.
गत दोन वर्षामध्ये कोविडचे संकट असतानाही
ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने आर्थिक धोरणा चांगले राबविले.
सध्या कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून गळीत हंगामाची संपूर्ण
तयारी झाली असताना लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे परंपरेप्रमाणे
कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीसाठी यंदा 11 टक्के बोनस देत असल्याचे
चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी जाहिर करताच
फटाक्यांची आतिष बाजी केली.तसेच कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने चेअमन
मा.यशराज देसाई (दादा) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
No comments:
Post a Comment