Friday, 17 April 2020

घाबरु नका, प्रशासन तुमची काळजी घेण्यास सतर्क आहे,स्वत:ची काळजी घ्या, ना.शंभूराज देसाईंचे डेरवण,वाघजाईवाडी,माथणेवाडी गावाच्या पहाणी दरम्यान जनतेला आवाहन.


           दौलतनगर दि.१७ : पाटण विधानसभा मतदारसंघातील चाफळ विभागातील डेरवण गांवामध्ये १० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने या विभागात खळबळ माजली असून आज मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी चाफळ विभागात येवून येथील पोलीस औटपोस्टच्या प्रांगणात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करुन विभागातील डेरवण,वाघजाईवाडी व माथणेवाडी या गांवाची सर्व अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पहाणी केली.यावेळी त्यांनी या गांवातील तसेच या गांवाच्या परिसरातील नाकाबंदी करण्यात आलेल्या एकूण ९ वाडयावस्त्यांतील जनतेला घाबरुन जावू नका,ही परिस्थिती आटोक्यात येईल,तुमची काळजी घेण्याकरीता मी स्वत: तसेच तालुका प्रशासन सतर्क आहे, तुम्ही गावकऱ्यांनी घराच्या बाहेर पडू नका,जीवनावश्यक वस्तू तुमच्यापर्यंत पोहचविण्याची तसेच तुमच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत तुम्ही सर्वजण तुमची स्वत:ची काळजी घ्या असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जनतेला या पहाणी दरम्यान केले.
          चाफळ विभागातील डेरवण गांवामध्ये १० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण झाली असून या मुलाच्या तसेच त्याच्या कुटुंबिंयाच्या संपर्कात आलेल्या एकूण ४५ लोकांना तपासणीकरीता कृष्णा रुग्णालय येथे काल दाखल करण्यात आले असून यापार्श्वभूमिवर मतदारसंघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी आज चाफळ येथे येवून सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्याबरोबर चर्चा केली व त्यानंतर त्यांनी या विभागातील डेरवण, वाघजाईवाडी, माथणेवाडी या गांवाची प्रत्यक्ष पहाणी देखील केली यावेळी त्यांच्यासमवेत प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,उंब्रजचे सहा.पोलिस निरिक्षक अजय गोरड यांची उपस्थिती होती.
           प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांनी डेरवण गावाच्या आसपासच्या ०३ किमी व ०७ किमी अंतरातील एकूण ०९ वाडयावस्त्यांमध्ये नाकाबंदी करण्यात आल्या आहेत.या वाडयांमध्ये एकूण १०२७ व्यक्ती असून डेरवण, जाळगेवाडी, चोरजवाडी,चाफळ उंब्रज, इंदोली येथील कोरोनाच्या हायरिस्कमध्ये एकूण ३१ व्यक्ती तसेच लो रिस्कमध्ये १४ असे एकूण ४५ व्यक्तींना तपासणीकरीता कृष्णा रुग्णालय येथे काल दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तपासण्यांचा रिपोर्ट आज येणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाकडून १२ लोकांमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत असून याठिकाणी महसूल, ग्रामविकास, आरोग्य विभागाचे एकूण २१ लोकांना कार्यरत करण्यात आले आहे. आमची सर्व शासकीय यंत्रणा सतर्क असून यापुढील काळामध्ये यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या असल्याचे सांगितले.
              यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले,१० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण होणे ही चिंतेची बाब आहे परंतू ही परिस्थिती आटोक्यात येईल,या विभागातील जनतेला सतर्क राहण्याबरोबर नाकाबंदीच्या काळात त्यांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांच्या पर्यंत पोहचविणे तसेच त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. या गांवात २४ तास वीजपुरवठा होईल, तसेच रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट सुरु राहतील,पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी तसेच या काळात या विभागातील ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,तलाठी मंडलाधिकारी यांचे हेडकॉर्टर चाफळ करावे कधीही यांची गरज भासू शकते त्यामुळे महसूल आणि ग्रामविकास विभागाने या कर्मचाऱ्यांना आदेशित करावे.शासनामार्फत देण्यात येणारे स्वस्त धान्य तसेच मोफतचे तांदुळ या विभागात वाटप झाले नसल्यास तातडीने याचे वाटप गांवामध्ये जावून करण्याच्या सुचना धान्य दुकानदारांना तहसलिदारांनी कराव्यात. आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण करताना कोणा व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला जाणवू लागला तरी त्या व्यक्तींनी न घाबरता प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ कळवावे म्हणजे आवश्यक त्या उपाययोजना करणे शक्य होईल, आरोग्य विभागातील एक वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत या ०९ गांवातील लोकांची एकदिवसाआड आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी करावे असे ना.देसाईंनी यावेळी सुचित केले.
            या गांवाच्या पहाणीदरम्यान ना.शंभूराज देसाईंनी या वाडयावस्त्यांमधील जनतेला दिलासा देत कुणीही घाबरुन जावू नका,१० महिन्यांच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह येतील व आपल्यावर आलेले संकट दुर होईल अशी मला खात्री आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेणेकरीता आम्ही सर्वजण सतर्क आहोत तुम्ही घराबाहेर न पडता स्वत:ची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

Thursday, 16 April 2020

सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सातारा जिल्हयातील अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना.


          
           सातारा दि.१७ :  सातारा जिल्हयामध्ये एकूण ११ लोकांचे रिर्पोट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून एका रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.काल एका दिवसात चार लोकांचे रिर्पोट पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये पाटण तालुक्यातील १० महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. संचारबंदी,जमावबंदी असतानाही लपूनछपून लोक जिल्हयामध्ये येत आहेत.त्यामुळे हा धोका निर्माण होत आहे.या परिस्थितीवर बंधन आणणे गरजेचे असून सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने संचारबंदीची व जमावबंदीची प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करावी तसेच २० एप्रिल नंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथीलता मिळण्याची शक्यता असली तरी याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करावी अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
             जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजना व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. याप्रसंगी  जिल्हाधिकारी शेखर सिंह,अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठ्ठल्ये  आदी जिल्हास्तरीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
              प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी उपस्थित अधिकारी यांच्याकडून सातारा जिल्हयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.यामध्ये सातारा जिल्हयात बाहेरुन आलेल्या ३८० व्यक्तींना सातारा जिल्हयातील १० ठिकाणच्या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.दि.१० एप्रिलपर्यंत केवळ १२२ व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते आजतारखेला ३८० व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे एकूण ११ लोकांचे रिर्पोट पॉझिटिव्ह आले आहेत त्यातील दोन मयत व एका व्यक्तीस घरी सोडून त्यास होम कॉरटाईंन करण्यात आले आहे.काल नव्याने चार व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.या चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून सुमारे ५०० गुन्हे या काळात नोंद झाले आहेत एकावेळी एका गुन्हयामध्ये १०० ते १२५ व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.
            यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,बाहेरुन आलेल्या ३८० व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे ही बाब चिंता वाढवणारी आहे.संचारबंदी,जमावबंदी असतानाही लोक जिल्हयात येत आहेत ही बाब गंभीर आहे यावर कडक प्रतिबंध आणणे आवश्यक आहे.जिल्हयात एकूण दोन लाखाच्या वर लोक बाहेरगांवाहून आल्याची नोंद आहे आमच्या पाटण मतदारसंघात तर ६० ते ६३ हजार लोक बाहेर गांवाहून आले आहेत. पाटण तालुक्यातील १० महिन्याच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ही बाब अतिशय गंभीर असून याबाबत आपण सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल,यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथील प्रकल्पाचे रुग्णालय असून या रुग्णालयात दिवसाकाठी २०० ते २५० लोक उपचाराकरीता येत असतात याठिकाणी आवश्यक तो औषध साठा देणे आवश्यक आहे त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी याच्याकडून आवश्यक असणाऱ्या औषधांची मागणी मागवून घेवून तो औषधसाठा दयावा अशा सुचना देवून सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने संचारबंदीची व जमावबंदीची प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करावी अशा सक्त सुचना केल्या.
              चौकट:- २० एप्रिल नंतरच्या लॉकडाऊनसंदर्भातील जिल्ह्यातील लोकांना माहिती द्यावी. ना.देसाई.
             २० एप्रिल नंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथीलता मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. परंतू याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती जिल्ह्यातील लोकांना द्यावी. अनावश्यक गर्दी होणार नाही,याची दक्षता घ्यावी तसेच जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पाणी पुरवठा योजनांची कामे याबाबत सुद्धा नियोजन करावे असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यातील उपाययोजनांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा. लॉकडाऊन काळात जनतेच्या हिताकरीता प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचना.



          सातारा दि.१६ : राज्याचे गृहराज्यमंत्री व वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लॉकडाऊन काळातील वाशिम जिल्हयातील उपाययोजनां संदर्भात सर्व शासकीय जिल्हास्तरीय अधिकारी यांचा आढावा घेतला.केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल,यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच रास्तभाव दुकानांमधून वितरीत होणाऱ्या अन्नधान्य वितरणाची कार्यवाही अधिक गतीने करून प्रत्येक पात्र व्यक्तीला धान्य मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी आढावा बैठकीत दिल्या.
          लॉकडाऊन परिस्थितीत वाशिमला जाणे शक्य नसल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर,जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार आदी सहभागी झाले होते.
           यावेळी वाशिम जिल्ह्यात आपल्या वेळोवेळीच्या सुचनानुसार कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ५० बेडचा आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींवर उपचारासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कोविद केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या ६ सेंटरची एकूण क्षमता ५०० बेड ठेवण्यात येणार आहे. आपले आदेशानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या १ कोटी रुपयांमधून पीपीई कीट,मास्क, व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यावेळी सांगत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.
             तसेच जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.तसेच चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांची वाहने सुद्धा जप्त केली जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना चेहऱ्यावर मास्क,रुमाल,गमछा न बांधणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी दिली.
              यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने जिल्ह्यात यापुढे सुद्धा संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी.जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना परवानगीशिवाय प्रवेश देवू नये, मुंबई, पुणे शहरातून वाशिमकडे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून त्यांची अडवणूक करण्याकरीता औरंगाबाद, जालना, बुलढाणा जिल्हयाच्या हद्दीवर चेकपोस्ट करण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे त्यानुसार त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगून त्यांनी विविध योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाची कार्यवाही अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याच्या हिस्स्याचे धान्य मिळेल,यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करुन त्याबाबतचा वेळोवेळी आढावा घ्यावा.धान्य वाटपाबाबत तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी,त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवून लोकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन दयावा अशा सुचनाही ना.देसाईंनी यावेळी दिल्या.
चौकट:-  जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. -- ना.देसाई.
              कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना जिल्हयामध्ये राबविताना जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनी जनतेच्या काळजीबरोबर स्वत:च्याही आरोग्याची काळजी घेवून काम करावे. वाशिम जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांचे काम उत्कृष्ट असून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली टीमवर्क करुन चांगल्या प्रकारे कोरोनावर वाशिम जिल्हयाने प्रतिबंध केला आहे ही कौतुकास्पद बाब आहे. असेही ना.देसाई म्हणाले.

Wednesday, 15 April 2020

कोरोनाच्या संकटामुळे दौलतनगरचा यंदाचा पारायण सोहळा होणार साध्यापध्दतीने. खंड पडू नये म्हणून गणेश मंदीरात पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडणार. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.



                   दौलतनगर दि.१४:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो.यंदा या पारायण सोहळयाचे अकरावे वर्ष असून कोरोनाच्या संकटामुळे या पारायणामध्ये खंड पडू नये याकरीता दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीरात साध्या पध्दतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडण्यात येणार असल्याची माहिती श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे संकल्पक राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
                     महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल रोजी ३७ वी पुण्यतिथी असून प्रतिवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी कारखाना कार्यस्थळावरील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात  दि. २० एप्रिल ते दि. २३ एप्रिल या कालावधीत तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते. गत दहा वर्षापासून हा श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंडीतपणे याठिकाणी सुरु असून यंदाच्या वर्षी या पारायणाचे अकरावे वर्ष आहे.कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री.गणेश मंदीरामध्ये सोमवार दि. २० एप्रिल ते गुरुवार दि. २३ एप्रिल, २०२० या कालावधीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावा असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी पत्रकामध्ये केले आहे.

Tuesday, 14 April 2020

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन. पाटण तहसिल कार्यालयात प्रशासनाच्या वतीने १२९ वी जयंती साजरी.


दौलतनगर 14 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण येथील तहसिल कार्यालयात त्यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन विन्रम अभिवादन करण्यात आले.
         यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात हे शासकीय अधिकारी व माजी पंचायत समिती सदस्य प्रकाशराव जाधव, बबनराव भिसे यांची उपस्थिती होती.
        फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुध्दीला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे,शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण ही शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी शिकवण दिली आहे.आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी होत असून कोरोनाच्या संकटामुळे जयंतीचा कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले असून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे १२९ व्या जयंतीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या वतीने मी विन्रम अभिवादन करतो असे ना. शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Sunday, 12 April 2020

रात्रीच्या पावणे अकरालाही वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री वाशिमसाठी अलर्ट. वाशिम जिल्हयातील जनता अनुभवतेय गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा सतर्कपणा.




                 
              वाशिम दि.12:- राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाशिम जिल्हयासाठी किती सतर्क व अलर्ट आहेत याचा प्रत्यय रात्री पावणे अकराला आला.काल रात्री 10.45 वा वाशिम जिल्हयातील रिसोड तालुक्यातील चिखली गावातील श्री.रमेश गिऱ्हे या गृहस्थाचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंना दुरध्वनी गेला त्या गृहस्थाने त्यांना सांगितले माझी 13 वर्षाची मुलगी गौरी खुप आजारी आहे तिला दवाखान्यात तातडीने नेणे गरजेचे आहे आमचे गावात दवाखान्याची तसेच कोरोनामुळे सध्या जाम असल्याने वाहनाची कसलीही सोय नाही. गेले दोन तास मी वाहन मिळते का? म्हणून प्रयत्न करतोय पण मला कसेलेही वाहन मिळून नाही राहिले तुम्हीच काहीतरी करा अशी कैफियत या गृहस्थांने पालकमंत्र्यांना सांगितली.पालकमंत्र्यांनी तात्काळ वाशिमचे जिल्हाधिकारी, रिसोडचे तहसिलदार यांना दुरध्वनी केला रिसोड तालुक्यातील चिखली गावातील श्री.रमेश गिऱ्हे या गृहस्थाचा मला फोन आला होता त्याची मुलगी गौरी खुप आजारी आहे त्या गृहस्थाला गावात कसलेही वाहन मिळत नाही तात्काळ ॲम्बूलन्स पाठवून त्यांच्या मुलीला जिल्हा रुग्णालयात आणून उपचार सुरु करायला सांगा. हा त्यांचा नंबर आहे. पालकमंत्री यांच्या फोनमुळे हालचाली गतीमान झाल्या आणि अर्ध्या तासात ॲम्बूलन्स चिखली या दुर्गम गावात पोहचली आणि गौरी गिऱ्हे ही 13 वर्षाची उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पालकमंत्र्याचा हा सतर्कपणा पाहून गिऱ्हे यांचा व त्यांच्या कुटुंबाचा ऊर भरुन आला.जनतेला सर्वोतोपरी मदत करण्याचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंचा हाच सतर्कपणा सध्या वाशिम जिल्हयातील जनता अनुभवत असून आमच्या जिल्हयाचे पालकमंत्री अलर्ट आणि सर्वसामान्य जनतेची कणव असणारे मंत्री असल्याची प्रतिक्रिया वाशिम जिल्हयातील जनतेमधून ना.देसाईंविषयी उमटू लागल्या आहेत.
                 मुळचे सातारा जिल्हयातील गृहराज्यमंत्री ना.शंभूराज  देसाई यांची वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्रीपदी निवड झालेनंतर प्रथमत:च पालकमंत्री म्हणून त्यांचा या जिल्हयाशी संबध आला. पालकमंत्री झाल्या झाल्या त्यांनी वाशिम जिल्हयाचा तीन दिवसांचा दौराही केला या दौऱ्यामध्ये त्यांनी आपल्या कौशल्येतून राजकीय, शासकीय बैठका घेवून वाशिम जिल्हयातील विविध प्रश्न समजावून घेवून त्यावर धोरणात्मक निर्णय घेत वाशिम जिल्हयातील विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला.जिल्हयाच्या त्यांच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये त्यांनी पालकमंत्री सतर्क आहेत म्हणून वाशिम जिल्हयातील जनतेची मनेही जिंकली.जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाची जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी आता माझी आहे ती मी लिलया पेलेन अशी ग्वाही देणारे ना.शंभूराज देसाई हे खरोखरच या संकटाच्या काळात वाशिम जिल्हयातील जनतेच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे दिसून येत आहे.
                  कोरोनाच्या प्रादुभावामुळे राज्यामध्ये असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात वाशिम जिल्हयातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध अडचणीत जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाई हे जनतेच्या मदतीला धावून येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालकमंत्री ना.देसाई यांनी वाशिम जिल्हयातील जनतेला येणाऱ्या अडचणी ते तातडीने कशाप्रकारे सोडवित आहेत याचे अनेक किस्से सध्या वाशिम जिल्हयातील जनतेकडून सांगितले जात आहेत. कोरोनाचे संकट आलेनंतर वाशिम जिल्हयातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 01 कोटी रुपयांचा निधी कोरोनापासून जनतेचा बचाव करण्याकरीता उपयोगात आणण्याच्या सुचना त्यांनी जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना दिल्या.01 कोटी रुपयांचा निधी जनतेच्या आरोग्याकरीता देण्याचा त्यांनी निर्णय घेताच त्यांच्या निर्णयाचे या जिल्हयामध्ये मोठे कौतुक करण्यात आले.गेली तीन,चार आठवडे ते कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पाटण विधानसभा मतदारसंघात, सातारा जिल्हयात कार्यरत असले तरी त्यातूनही वेळ काढून वाशिम जिल्हयातील कोरोनासंदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दिवसातून दोनदा वाशिमचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून लॉकडाऊनच्या काळात जिल्हयामध्ये आरोग्य सुविधा, औषधांची उपलब्धता तसेच स्वस्त धान्याचे वाटप कुठेपर्यंत आले आहे? बाहेर गांवाहून किती लोक आले आहेत त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या का? कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे का? कोरोनासंदर्भात अधिकच्या कोणकोणत्या उपाययोजना करायच्या याविषयी सातत्याने ते आदेश देताना दिसत आहेत.
             कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने संबधित जिल्हयाच्या पालकमंत्र्याच्या दुरध्वनीची यादीच सोशल मिडीयावर प्रसारित केली आहे. त्यामुळे वाशिम जिल्हयातील जनतेला कसलीही अडचण आली की येथील जनता थेट पालकमंत्री ना.शंभूराज देसाई बोलत आहात काय? मला रेशनिंगचे धान्य नाही मिळाले, हा दुकानदार जादा दराने धान्य विकत आहे, मला अशी अशी अडचण येवून राहिली माझी अडचण दुर करा अशा अनेक समस्या येथील लोक पालकमंत्र्यांना दुरध्वनीवरुन सांगत आहेत.ना.शंभूराज देसाईही वाशिम जिल्हयातील कुणाचाही रात्रीअपरात्री दुरध्वनी गेला की तात्काळ त्यांची समस्या जाणून घेवून त्यावर तोडगा काढत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचे काम झाले म्हणून आलेल्या दुरध्वनीवर स्वत: तेच संबधित व्यक्तीला तुमची थोडया वेळात अडचण दुर होईल मी संबधित अधिकारी यास सांगितले आहे असे सांगत आहेत याचे विशेष कौतुक वाशिम जिल्हयातील जनता करीत असून आम्हाला अलर्ट आणि सतर्क पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या रुपाने मिळाले आहेत हे वाशिम जिल्हयातील जनताच अभिमानाने सांगू लागली आहे.
                        


Saturday, 11 April 2020

बाहेरगावाहून आलेल्या सर्वांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करावी. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंचे लेखी पत्राव्दारे जनतेला आवाहन. ना.शंभूराज देसाईंचे लेखी पत्र सोशल मिडीयावर प्रसारित

         

          दौलतनगर दि.11 :- कोरोना आजाराच्या कठीण परिस्थितीत बाहेरगांवाहून पाटण मतदारसंघात एकूण ६० हजारांहून जादा नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत. बाहेर गावाहून आलेल्या बहुतांशी लोकांनी आपण मुळ गावी आलो असल्याच्या नोंदी प्रशासनाकडे केल्या आहेत. परंतू अद्यापही काही लोकांनी आपण मुळ गावी आल्याच्या नोंदी प्रशासनाकडे केल्या नाहीत.नोंदी न केलेल्या लोकांनी लवकरात लवकर या नोंदी तालुका प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांकडे कराव्यात असे जाहीर आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लेखी पत्राव्दारे पाटण मतदारसंघातील बाहेरुन आलेल्या लोकांना केले असून हे पत्र सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झाले असून हा संदेश त्यांनी सातारा जिल्हयात बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांला दिला आहे.
               सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या लेखी पत्रामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सातारा जिल्हयामध्ये तसेच पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरामधून बाहेर गांवाहून आपआपल्या मुळ गांवी आलेल्या लोकांना, नागरिकांना,महिलांना आणि युवकांना केलेल्या जाहीर आवाहनामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपणांस नम्र आवाहन करतो  की, कोरोना विषाणूच्या संकटापासून बचाव करण्याकरीता आपण मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून आप-आपल्या मुळ गावी  आला आहात. त्याबद्दल आपले स्वागतच आहे, या सर्व संकटाच्यादृष्टीने बाहेर गावाहून आलेल्या बहुतांशी लोकांनी आपण मुळ गावी  आलो असल्याच्या नोंदी गाव प्रशासन,तालुका प्रशासनचे संबधित पोलिस पाटील,ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचेकडे केल्या आहेत. परंतू अद्यापही काही लोकांनी आपण मुळ गावी आल्याच्या नोंदी संबंधित वरील प्रशासनाकडे केल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. मी आपणांस या पत्राव्दारे विनंती करतो की, बाहेर गांवाहून आलेल्या लोकांनी आपण ज्या गांवामध्ये आलो आहोत त्याची नोंद संबधित प्रशासनाकडे तात्काळ करुन घ्यावी जेणेकरुन कोरोना संसर्गाच्या संकटाचा सामना करण्याकरीता प्रशासनाला याची मदत होईल कळावे धन्यवाद असे जाहीर आवाहन करुन त्यांनी घरी रहा, सुरक्षित रहा अशीही विनंती केली आहे. ना.शंभूराज देसाईंचे सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झालेले लेखी पत्र हे केवळ पाटण मतदारसंघातील जनतेला आवाहन नसून त्यांनी सातारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील बाहेरगांवाहून आलेल्यांना एक संदेश या पत्राच्या निमित्ताने दिला आहे.