Friday, 18 July 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 


दौलतनगरदि.18:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्येचांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2025-26 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.

                दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाणृपांडूरंग नलवडे,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे,प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,लक्ष्मण बोर्गे, सर्जेराव जाधव,शशिकांत निकम,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,दिपाली पाटील,जयश्री कवर सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

               यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा) पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे. सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचवणे हे लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 चे गळीत हंगामामध्ये 205000 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.71% साखर उताऱ्याने 2,40,040 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिल मधील रोलरचे आज पूजन होत आहे. प्रतिवर्षी कारखाना गळीत हंगामामध्ये आलेल्या अडचणींवर मात करीत, यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम करावे. आपला हा कारखाना सभादांचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊसदर देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, ऊस तोडणी मजूर, कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्नातून येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबध्द काम करावे.तसेच आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला गळीतास देऊन येणार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कर्तृत्व पाहण्यासाठी मरळीच्या माळावर या...! शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार.

 


           लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्याचे काम शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांनी हयातभर केले. शिवाजीराव देसाई यांचे कार्य समजून घेण्यासाठी पाटण मतदारसंघातील डोंगर कपारीत राहणाऱ्या गोरगरिब वयोवृध्द नागरिकांची भेट घ्या तसेच त्यांनी अविरत कष्टाने फुलविलेल्या मरळीच्या माळावर या म्हणजे तुम्हाला शिवाजीराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा अंदाज येईल, असे आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी  केले आहे. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने खा. संजय राऊत यांनी केलेल्या बेताल व अर्थहीन वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.

             स्व.शिवाजीराव देसाई यांच्यावर आपल्या वडिलांचा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता.मुंबईमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्येच व्यवसायास सुरूवात केली. व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले असतानाच लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी शिवाजीराव देसाई यांना पाटण मतदारसंघाची जबाबदारी देऊन तेथील गोरगरिब जनतेची सेवा करण्यास सांगितले. आपल्या पिताश्रींचा आदेश शिरसावंद्य मानून शिवाजीराव देसाई यांनी आपल्या व्यवसायाचा त्याग करून पाटणच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. पाटणमध्ये आल्यावर त्यांनी पाटण तालुक्यातील लोकांच्या हाती काम मिळावे, शेतमालाला हमीभाव मिळावा, ऊसासारखे शेतात पीक घेवून त्यांच्या हाती पैसा यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवाजीराव देसाई यांनी मरळीच्या माळरानावर जिथं कुसळ उगवत नाहीत अशा ठिकाणी साखर कारखाना काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व ‘केल्याने होत आहे रे.. आधि केलेची पाहिजे ...’ हा दूर दृष्टीकोन ठेवून त्यांनी लोकांच्या घरी जावून शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करून १९७१-७२ साली पाटण तालुक्यात पहिला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना उभारला व अल्पावधीतच तो साखर कारखाना कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा केला.

               पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरिब कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे व त्यांचे मागासलेपण दूर व्हावे म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना शिक्षण संस्थेची स्थापना केली परंतु त्यामध्ये राजकारण येताच शिवाजीराव देसाई यांनी सोनवडे या ठिकाणी १९८३ साली मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाची गंगा मोरणा शिक्षण संस्थेच्या रूपाने पाटण तालुक्यात सुरू केल्यानंतर स्व.शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्यातील मुलांना व्यवसायिक शिक्षण मिळावे तसेच दर्जेदार कारागीर निर्माण व्हावेत यासाठी मरळीच्या माळरानावर दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना १९८६ साली केली. आज मोरणा शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला असून हजारो मुलांचे भवितव्य या ठिकाणी घडत आहे. अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्याचा कायापालट करीत तालुक्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले.

                   स्व.शिवाजीराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी मरळीच्या माळावर या व स्वतःच्या डोळ्याने शिवाजीराव देसाई यांचे कार्यकर्तृत्व पहा असे आवाहन जयवंराव शेलार यांनी पत्रकाव्दारे करत फक्त मुंबईत बसून आपल्या नेत्याला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न बंद करा नाहीतर पाटणची जनता तेथे येऊन तुमच्या बुडाला आग लावल्याशिवाय शांत बसणार नाही, हे मात्र नक्की ! असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.

Tuesday, 20 May 2025

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनींनी चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे.-ना.शंभूराज देसाई दौलतनगर,ता. पाटण येथे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा 66 वा पुण्यतिथी सोहळा संपन्न. स्व.ताईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वितरण.

 



दौलतनगर दि.20:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकनेते साहेबांना मोलाची साथ दिली.पडत्या काळामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा परिवार सांभाळण्याचे काम केले. आज जे वैभव दिसत आहे ते ते कै.सौ.ताईसाहेब यांचे आशिर्वादामुळेच असून त्यांचे कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी त्यांचे पुण्यतिथी दिनाचे औचित्यसाधून कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांच्या नावाने पाटण तालुक्यातील गोर-गरीबा कुटुंबातील विद्यार्थीनींना पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी या संकल्पनेतून शिष्यवृत्ती देण्याचा चांगला निर्णय घेतला असून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनींनी या पुढील काळामध्ये चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील रहावे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

 ते दौलतनगर ता.पाटण येथे कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांचे 66 व्या पुण्यतिथी सोहळा व या सोहळयाच्या निमित्ताने आयोजित गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्‌रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),अशोकराव पाटील,विजय पवार,प्रदिप पाटील,मिलिंद पाटील, सभापती बाळासो पाटील,सुरेश पानस्कर,संजय देशमुख,सुनिल पानस्कर,मनोज मोहिते,जालंदर पाटील,सोमनाथ खामकर, सुनील पवार यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी  कर्मचारी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी व पालक मोठया संख्येने उपस्थिती होते. तत्पुर्वी ना.शंभूराज देसाई यांनी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

  याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हंटले की, थोर व्यक्तींचे योगदान नव्या पिढीला माहिती होण्यासाठी आपण लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांचे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आपण विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतो.या थोरव्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला होऊन त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवत विद्यार्थ्यांनी आपली पुढील वाटचाल केली पाहिजे. स्व.ताईसाहेब यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून आपण पाटण तालुक्यातील गोर-गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना इयत्ता 10 वी नंतरच्या पुढील पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या उद्देशाने आपण गेल्या 13 वर्षापासून कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नावाने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 228 गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना या शिष्यवृत्तीचा लाभ झाला असून आपल्या उद्योग समुहाकडून हा छोटासा पण चांगला उपक्रम सुरु केला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांना शिक्षणाची मोठी जिद्द होती. आपण शिकलो तरच काही करु शकतो, शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी बोडींगला राहून वकीलीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. लोकनेते साहेब राजकारणात,समाजकारणात आल्यानंतर त्यांना कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांनी अत्यंत खडतर व गरीबीच्या परिस्थितीमध्ये मोलाची साथ दिली, त्यांचा संपूर्ण परिवार सांभाळत मुलांना चांगले संस्कार देत वाढवलं, कौटुंबिक मोठा आधार देण्याचे काम त्यांनी केले असल्याने आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतिंना नतमस्तक होणे, त्यांचे विचार पुढे नेणं खूप गरजेचे आहे.त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढील वाटचाल सुरु ठेवली आहे.या थोर व्यक्तींच्या त्यागातूनच हे वैभव प्राप्त झाले आहे.अशा थोर व्यक्तींचा आदर्श डोळयासमोर ठेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनींनी या शिष्यवृत्तीचा वापर हा शैक्षणिक कामासाठी चांगला वापर करावा.आपल्या आई वडीलांचे कष्ट डोळयासमोर ठेऊन मोठया जिद्दीने इयत्ता दहावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यावे. चांगले शिक्षण घेऊन स्वता:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी  होण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असून खऱ्या अर्थाने या शिष्यवृत्तीचा उद्देश सफल होईल.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक समुहातील विद्यालयांनी चांगली यशाची पंरपरा राखली असून या शिक्षण समुहाचा नावलौकीक वाढविण्यासाठी  यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षक यांचा मोलाचा हातभार लागत असल्याचे सांगत पाटण तालुक्यात, सातारा जिल्हयात तसेच महाराष्ट्रभर या थोर व्यक्तींना साजेस काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी शेवटी  स्पष्ट केले.

Saturday, 17 May 2025

दौलतनगर,ता. पाटण येथे दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६6 वा पुण्यतिथी सोहळा. स्व.ताईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम.

 


दौलतनगर दि. १7:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६6 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम मंगळवार दि.२० मे, २०२5 रोजी सकाळी १०.3० वा.“महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री  मा. ना. श्री. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम होणारअसल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो. राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाटण विधानसभा मतदार संघातील  दोनशे अठ्ठावीस पेक्षा अधिक विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील विद्यार्थीनींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्ती बरोबर वहया,शालेय साहित्याचे वितरणही करण्यात येते. सध्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींना वार्षिक रू.6050/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) पुण्यतिथी सोहळा, गरीब व गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम मंगळवार दि.२० मे, २०२5 रोजी सकाळी १०.3० वा.“महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री  मा. ना. श्री. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई (दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थित होणार असून या कार्यक्रमास पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे,असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.