Thursday 7 June 2018

आपत्ती काळात व्यवस्थापनेकरीता तालुका प्रशासनाने अगोदरच जागृत रहावे. हलगर्जीपणा करु नये. - आमदार शंभूराज देसाईंच्या तालुका प्रशासनाला सुचना.




दौलतनगर दि. 07:  सातारा जिल्हयात सर्वात जास्त महाबळेश्वरबरोबर पाटण तालुक्याला प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो.आपले तालुका प्रशासनाला तालुक्यातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे.आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो.आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये,जागृत रहावे अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
        आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारतीत लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पाटणचे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी,पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,कोयना धरण व्यवस्थापनाचे अभियंता मोरे,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश अहिरे,वसंत खाडे,जिल्हा बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीकांत माने,पाटणचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे,उंब्रज पोलीस निरीक्षक गुजंवटे,तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे, गटशिक्षणाधिकारी निकम,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुक्ल तसेच तालुकास्तरीय सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिका-यांकडून मान्सुन काळात पडणा-या पावसामुळे कोयना धरणात होणा-या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून धरणातील जलसाठयाच्या निर्णयात आम्हाला कोणाला हस्तक्षेप करावयाचा नाही परंतू कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालय याठिकाणी २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.आपत्ती काळात तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये माहिती देण्याचे काम अधिकारी यांनी करावयाचे असून यावर तात्काळ तोडगा काढून आपतकालीन परिस्थिती दुर करावयाची आहे.आपले विभागाकडील अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये संबधित अधिकारी वर्गाने करावयाची असून संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे देवून आपण काय काय व्यवस्था केली आहे याची माहिती सादर करावयाची आहे.आपतकालीन व्यवस्थापन कक्षामध्ये एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचा-याची नेमणूक करण्यात यावी असे सांगून त्यांनी तहसिलदार यांनी मंडलाधिकारी,तलाठी यांचेमार्फत कोयना नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहण्याच्या सुचना कराव्यात तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांना त्या त्या विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून मान्सुन काळात साथीचे रोग पसरणार नाहीत याकरीताच्या उपाययोजना कराव्यात,पावसाळयामध्ये ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये साथीच्या रोगाबरोबर सर्पदंशाचे प्रमाण मोठया प्रमाणात पहावयास मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषधसाठा आताच करुन ठेवावा.प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी डोंगरी भागात याकाळात आरोग्य शिबीराचे नियोजन करावे असे सांगत आमदार शंभूराज देसाई यांनी वीज वितरण विभागाचा आढावा घेतला. हा आढावा घेताना या विभागाने प्रामुख्याने दक्ष आणि जागृत रहावे अशा सुचना त्यांनी दिल्या ते म्हणाले,पाऊस येणार असे वातावरण होण्याअगोदरच वीज वितरण विभागाचे अधिकारी काम लागेल म्हणून वीज बंद करीत आहेत या अगोदर उभ्या पावसात कधी वीज गेली नव्हती जिथे खरोखर अडचण जाणवत आहे त्याठिकाणी वीज बंद करण्यास हरकत नाही परंतू पाऊस पडायच्या आतच वीज बंद करणे चुकीचे आहे यासंदर्भात अनेक ठिकाणच्या तक्रारीदेखील आल्या आहेत त्यात वीज विभागाच्या अधिका-यांनी सुधारणा करावी. असे सांगून ते म्हणाले सध्या कराड चिपळुण या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सुरु आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील मोठमोठया पुलांची कामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून याकरीता रस्त्याचा मार्ग वळविण्यात आला आहे. त्याठिकाणी दक्षता म्हणून दक्षता फलक लावण्याचे काम करण्याच्या तसेच या मार्गावर पावसाळयात पश्चिमेच्या बाजूस झाडे पडण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात त्यामुळे पडणारी झाडे तात्काळ दुर करुन वाहतूक सुरळीत राहणेकरीता या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना देणारा पत्रव्यवहार तात्काळ करावा असेही आमदार शंभूराज देसाई यांनी सांगून आपत्ती काळात तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी योग्य ते नियोजन करावे विनाकारण कारवाई करण्याची वेळ कुणी आणू नये असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट:- पाटण शहरातील स्वच्छता पहिल्यांदा करुन घ्या.
  पाटण हे तालुक्याचे ठिकाण आहे. पाटणमध्ये ठिकठिकाणी कच-यांचे ढिग असून या ढिगांमुळे दुर्गंधी, दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरत असून पाटणच्या अस्वच्छतेच्या संदर्भात वृत्तपत्रात रोज रखाणेच्या रखाणे भरुन येत आहेत.पाटण नगरपंचायत  झाली आहे. शासनाच्या नगरोत्थानमधून भरघोस निधी येत आहे. त्यातुन ही स्वच्छता पहिल्यांदा करुन घ्या. नगरपंचायतीकडे दोनच घंटागाडया असतील तर अजुन मागवून घ्या आमची काय मदत लागली तरीही सांगा असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.


No comments:

Post a Comment