Saturday 29 September 2018

बरेच वर्षे रखडलेल्या उरुल ल.पा तलावातील खातेदारांना ४.५० कोटी रुपयांची भूसंपादनाची रक्कम मंजुर. आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश.



दौलतनगर दि.२९:- उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत असलेल्या उरुल लघू पाटबंधारे तलावाकरीता भूसंपादन केलेल्या खातेदारांना त्यांच्या भूसंपादनाची रक्कम मंजुर झाली नसल्याने ल.पा तलावाचे काम ब-याच वर्षापासून रखडले आहे.तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी यामध्ये पुढाकार घेवून आपली राजकीय ताकद राज्याचे जलसंधारणमंत्री यांचेकडे वापरुन गतवर्षी जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये बैठक घेतल्याने खातेदारांच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लागला असून आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे उरुल ल.पा तलावातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील खातेदारांना एकूण ४ कोटी ५० लाख ८५ हजार ३०१ रुपयांची भूसंपादनाची रक्कम मंजुर झाली आहे.त्यामुळे लवकरच उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामालाही गती मिळणार आहे.
                                 पाटण तालुक्यातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत उरुल लघू पाटबंधारे तलाव असून या तलावाचे काम हे या तीन गावातील बाधित खातेदारांना भूसंपादनाची रक्कम न दिल्यामुळे अनेक वर्षापासून बंद होते व आजही बंद आहे.या गावातील खातेदारांनी त्यांच्या भूसंपादनाची रक्कम लवकरात लवकर मिळावी याकरीता अनेक वर्षे प्रयत्न केले मात्र सदरची रक्कम मिळू शकली नाही. प्रयत्न करुनही भूसंपादनाची रक्कम मिळत नसल्याने या खातेदारांनी तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. आमदार शंभूराज देसाईंनी येथील खातेदारांना बरोबर घेवून राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी या कामांसंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये दि.०८.०८.२०१७ रोजी बैठक घेतली व या बैठकीत उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गावातील खातेदारांच्या भूसंपादनाचा विषय मांडला.यामध्ये उरुलचे एकूण १७.९५ हेक्टर आर क्षेत्र असून ठोमसे ४.५१ हेक्टर आर व बोडकेवाडी १२.२२ हेक्टर आर क्षेत्र आहे.यासंदर्भात अंतिम निवाडा ३०.११.२०१५ रोजी झाला आहे. उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाकरीता अनुक्रमे २ कोटी ९२ लाख १० हजार ६६२ रुपये, ९४ लाख ७५ हजार ६४६ रुपये व ६३ लाख ९८ हजार ९९३ रुपये असे एकूण ४ कोटी ५० लाख ८५ हजार ३०१ रुपये भूसंपादनाची रक्कम होत आहे.ती ४ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे केल्यानंतर मंत्री ना.शिंदे यांनी यास तात्काळ मान्यता देवून जलसंधारण विभागाच्या मंत्रालयीन अधिकारी यांना लवकरात लवकर उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम तात्काळ मंजुर करुन वाटप करावी असे आदेश दिले होते.
                          त्यानुसार उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम ही संपादन मंडळाने दि.१२.०९.२०१८ रोजी भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेकडे वर्ग केली आहे.बरेच वर्षे रखडलेली भूसंपादनाची रक्कम मंजुर करुन घेतलेबद्दल उरुल,ठोमसे व बोडकेवाडी येथील संपादित क्षेत्रातील बाधित खातेदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.भूसंपादनाच्या रक्कमेचे वाटप झालेनंतर लवकरच उरुल ल.पा.तलावाच्या कामांस सुरुवात करण्याकरीता आपण कटीबध्द असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.उरुल लघू पाटबंधारे तलावाची उंची २०.६० मीटर असून लांबी ६६० मीटर आहे. या तलावामध्ये १९०० स.घ.मी. इतका पाणीसाठा अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे २४३ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. भूसंपादनाच्या रक्कमेचे वाटप झालेनंतर लवकरच उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामाला गती देण्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी दिली असल्यामुळे या विभागातील शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर (कॅम्प) घेवून भूसंपादनाच्या रक्कमेचे वाटप.
             संपादित क्षेत्रातील बाधित खातेदारांची कागदपत्रे, बँक खात्याच्या तपशिलाची पुर्तता करुन ही रक्कम मंजुर करुन आणणेकरीता सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत तलावाच्या ठिकाणी एकत्रित शिबीर (कॅम्प) घेवून भूसंपादनाची रक्कम ही ऑनलाईन खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेमार्फत देण्यात आली आहे.


पिंपळोशी ग्रामपंचायतीच्या सरपंच व कार्यकर्ते यांचा देसाई गटामध्ये प्रवेश. आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते सरपंच, कार्यकर्त्यांचा सत्कार.



दौलतनगर दि.२९:- राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे नेतृत्व मानणा-या पिंपळोशी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.विमल ज्ञानदेव निकम यांनी राष्ट्रवादी पक्षाला जाहिरपणे रामराम ठोकून पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मान्य करीत देसाई गटामध्ये जाहिर प्रवेश केला आहे. प्रवेश करणा-या सरपंच सौ.विमल ज्ञानदेव निकम व कार्यकर्ते यांचा आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येवून देसाई गटामध्ये स्वागत करण्यात आले.
                  पिंपळोशी ता.पाटण येथील गावातील स्थानिक राष्ट्रवादी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभाला कंटाळून ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.निकम यांनी तालुक्याचे दमदार आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचा आम्ही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांसमवेत आम्ही देसाई गटामध्ये प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सरपंच सौ. विमल निकम, ज्ञानदेव निकम, विशाल जगन्नाथ निकम,अस्लम गणी सय्यद यांनी जाहिरपणे आमदार देसाई गटामध्ये प्रवेश केला. पिंपळोशी गावच्या सरपंच व ग्रामस्थ यांचे देसाई गटामध्ये सहर्ष स्वागत असून यापुढे पिंपळोशी गावाच्या विकासासाठी आमदार म्हणून माझे सर्वोत्परी सहकार्य राहील असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी पिंपळोशीच्या सरपंच व ग्रामस्थांना दिले.

Friday 28 September 2018

आमदार शंभूराज देसाईंचा रस्त्यातच जनता दरबार.जिथे आमदारसाहेब भेटतील तिथे केलेल्या विकासकामांचीच चर्चा,अन कामांचीच मागणी.




दौलतनगर दि.२:- महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची पाटण विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून ओळख संपुर्ण महाराष्ट्रभर आहे.दांडगा जनसंपर्क,लोकांचा गोतावळा आणि मतदारसंघातील जनतेच्या सुखदु:खात कायम सहभागी असणारे आमदार म्हणून त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.विविध कार्यक्रमाच्या,शासकीय बैठकांच्या,लग्नसोहळयांच्या निमित्ताने अनेकदा रस्त्याने येता-जाताना आमदारसाहेब दिसले की,मतदारसंघातील जनता त्यांना हात करतात आणि वेगवेगळया कैफियत त्यांच्या पुढे मांडतात.ज्या जनतेमुळे आपण निवडून आलो आहे त्यांच्या कैफियत सोडवयाला कार्यालयच पाहिजे असे काही नाही तर रस्त्यावर उभे राहूनही त्यांचे प्रश्न एैकुन घेता येतात आणि ते सोडविताही येतात ही भूमिका आमदार शंभूराज देसाईंची असल्याने जिथे आमदारसाहेब भेटतील मग ते कोणतेही कार्यालय असो वा रस्ता तिथेच त्यांचा जनता दरबार सुरु झाल्याचे अनेकदा पहावयास मिळते आहे.
              २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत १८८२४ इतक्या प्रचंड मतांनी संपुर्ण सातारा जिल्हयात एक नंबरची मते घेवून निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आलेनंतर निवडणूकीच्या विजयी सभेत त्यांनी उपस्थित जनसमुदायापुढे नतमस्तक होवून आज आमदार म्हणून मी तुमच्यापुढे उभा आहे तो या मतदारसंघातील जनतेमुळे.या सभेच्या माध्यमातून मी मतदारसंघातील जनतेपुढे नतमस्तक होवून नमन करतो.असे सांगून मतदारसंघातील जनतेची मने त्यांनी जिंकली होती.आमदार म्हणून त्यांनी जिकंलेली मने आजही कायम आहेत. गत चार वर्षात यामध्ये दिवसेदिवसे त्यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांच्यामुळे भरच पडत आहे.सातारा जिल्हयात सर्वाधिक विकासकामे पाटण विधानसभा मतदारसंघात सुरु आहेत याचे दाखले शासकीय दरबारी पहावयास मिळत आहे.मतदारसंघातील प्रलंबीत विविध विकासकामांकरीता शासनाच्या तिजोरीतून हवा असणारा निधी मंजुर करुन आणण्याकरीता आमदार देसाईंचे सातत्याचे प्रयत्न आणि पाठपुरावा मदतीस आहे.अहोरात्र मतदारसंघातील विविध विकासकामांचाच ध्यास मनी बाळगून २४ बाय ७ याप्रमाणे मतदारसंघाचे आमदार म्हणून ते मतदारसंघातील जनतेकरीता उपलब्ध आहेत.माझे कामाच्या रुपाने विकासकामरुपी शिल्पावरील एखादया पायरीवर इतिहासातील हिरोजी इंदलकरांसारखे नाव मतदारसंघातील जनतेने नोदंवावे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे हे त्यांनी जाहीरपणे जनतेपुढे मांडले आहे.जनतेला दिलेला शब्द पाळण्याकरीता कितीही शिकस्त करायला लागली तरी ते तयारी दाखवितात आणि दिलेला शब्द पाळतात हे त्यांचे गुणवैशिष्ट असल्यामुळे जनतेला त्यांना कामे सांगून ती सोडवून घेणेकरीता अधिकच प्रेरणा मिळते.आमदार श्ंभूराज देसाई यांचेपुढे एखादा विषय सोडवून घेणेसाठी मांडला तर तो विषय शितापीने ते सोडविताच हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.गाव तिथे रस्ता,गाव तिथे पिण्याच्या पाण्याची योजना,मोठी पुले,छोटी पुले,शाळा खोल्या,ग्रामपंचायतींची कार्यालये,कोयना नदीकाठच्या गांवाना संरक्षण देणेकरीता पुरसंरक्षक भिंती, धरणांची रखडलेली कांमे तसेच पुनर्वसने,कोयना प्रकल्पग्रस्तांची कामे,जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गांवाना पाणी मिळवून देणे,डोंगरी भागात अनेक ठिकाणी गंजलेले पोल बदलणे,वाढीव पोल मंजुर करणे,गांवा गांवामध्ये वाडीवस्तीवर पथदीप उर्जीकरण करणे,स्मशानभूमिच्या सुधारणा,स्मशानभूमिंना जोडणारे रस्ते,गावे वाडया स्वच्छ राहणेकरीता स्वच्छता अभियान राबवणे,वृक्षलागवड करणेकरीता प्रेरणा देणे यासारखे जनतेच्या मुलभूत गरजा प्राधान्याने पुर्ण करण्याचे उदीष्टच मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी ठेवले असून आपल्या उदीष्टाप्रमाणे त्यांचे कामकाज सुरु आहे.या मुलभूत गरजांच्या कामाबरोबर मतदारसंघातील अनेकजण आपली वैयक्तीक कामे घेवूनही आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेतात आणि आपली कैफियत मांडून ती कैफियत आमदार देसाई यांच्याकडून सोडवून घेतात.आपल्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याचे काम झाले म्हणून समाधानानेच गेला पाहिजे याकरीता ते स्वत: लक्ष घालतात. त्यांच्या निवासस्थानावर तर रोजच जनता दरबार भरलेला असतो परंतू भेटेल तिथे मग ते एखादयाचे लग्नात असो वा, शासकीय कार्यालयात कोणत्याही बैठकीत असो किंवा मतदारसंघात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरत असताना असो प्रश्न घेवून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे एैकुन घेवून त्यावर ते तोडगा काढतात.
चौकट:- असाच एक रस्त्यावरचा जनता दरबार पहावयास मिळाला त्यानिमित्ताने...
       धडामवाडी व लोहारवस्ती केरळ येथील जनता त्यांची झालेली कामे व करावयाची कामे सांगण्याकरीता आमदार शंभूराज देसाईंकडे येत असताना त्यांनी आमदार देसाई यांची नवारस्ता येथे रस्त्यावरच भेट घेतली व झालेली कामे व करावयाच्या कामांचा पाढा वाचत करावयाच्या कामांचा शब्द त्यांचेकडून घेतला आणि केलेल्या कामांबाबत त्यांचा सत्कारही केला.आमदार शंभूराज देसाईंचे असे जनता दरबार नित्याने पाटण मतदारसंघात पहावयास मिळतात.

Wednesday 26 September 2018

जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांची कुटुंबियांसमवेत आमदार शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.



दौलतनगर दि.२:- राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन हे गेली दोन दिवस सातारा,कोल्हापुर जिल्हयाच्या दौ-यावर होते.त्यांनी विधानसभेतील त्यांचे सहकारी सातारा जिल्हयातील युतीतील पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील कोयना दौलत या निवासस्थानी आपल्या कुटुंबिंयासमवेत सदिच्छा भेट दिली. देसाई कुटुंबिंया कडून ना.महाजन व त्यांचे कुटुंबियांचे यथोचित असे स्वागत यावेळी करण्यात आले.
              बुधवारी रात्री सातारा जिल्हयातील विविध कार्यक्रम उरकुन पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील पहाणी करुन कोल्हापुर महालक्ष्मीचे दर्शन घेतलेनंतर कास पठारावरील फुलांची पहाणी करणेकरीता सातारा याठिकाणी गुरुवारी दुपारी ना.गिरीश महाजन हे त्यांचे कुटुंबियांसमवेत आले होते यावेळी त्यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.भेटीकरीता आलेले ना.गिरीश महाजन व त्यांच्या कुटुंबियांचा प्रारंभी यथोचित असा सत्कार आमदार शंभूराज देसाईंचे चिरंजीव,युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार सौ.स्मितादेवी देसाई यांच्या हस्ते मानाची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.यावेळी आमदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच राज्य उत्पादन शुल्क च्या आयुक्त श्रीमती अश्विनी जोशी यांचीही उपस्थिती होती.
             राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन व आमदार शंभूराज देसाई यांची सन २००४ पासून मैत्री असून २००४ ते २००९ या कालावधीत महाराष्ट्र विधानमंडळातील लोकलेखा समितीतील विधानसभा सदस्यांचा जम्मूकाश्मीरचा दौरा आयोजीत केला होता त्यावेळी ना.गिरीश महाजन व आमदार शंभूराज देसाई या दोघांचे कुटुंबिंयही दौ-यामध्ये सहभागी होवून ते दौ-यावर एकत्रित होते.त्यापासून त्यांचे कौटुंबिक संबध आहेत. सातारा येथील आमदार शंभूराज देसाई यांचे निवासस्थानी भेट देण्याचा ना.गिरीश महाजन यांचा दौरा पुर्वनियोजीत होता.यावेळी दोन्ही कुटुंबियांकडून जम्मूकाश्मीर दौ-याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.देसाई यांच्या निवासस्थानी यथोचित मानसन्मान झालेनंतर ना.गिरीश महाजन व आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कुटुंबिंयासमवेत कास पठाराची पहाणी केली.

केळेवाडी ग्रामस्थ,युवकांनी मानले आमदार शंभूराज देसाईंचे आभार. वाडीच्या रस्त्याकरीता ५ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजुर केलेबद्दल घेतली सदिच्छा भेट.



दौलतनगर दि.२७:- पाटण आणि सातारा तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या पाटण तालुक्यातील वरची केळेवाडी या वाडीस गत अनेक वर्षापासून बारमाही रस्ताच नसल्याने येथील ग्रामस्थ,महिला आणि युवकांची मोठया प्रमाणात होणारी गैरसोय लक्षात घेवून पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी युती शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये कडवे खुर्द ते खालची केळेवाडी ते वरची केळेवाडी असा ५ किलोमीटरच्या रस्त्याकरीता सुमारे ५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिलेबद्दल केळेवाडी येथील वयोवृध्द ग्रामस्थ व युवकांनी आमदार शंभूराज देसाईंची सदिच्छा भेट घेवून त्यांचे आभार व्यक्त करीत त्यांचा यथोचित सत्कारही केला. 
               पाटण तालुक्यातील तालुक्याचे शेवटचे टोकावर डोंगरावर वरची केळेवाडी ही वाडी वसलेली असून कडवे खुर्द ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ही वाडी येते या वाडीला जाणारा कडवे खुर्द ते खालची केळेवाडी ते वरची केळेवाडी असा डोंगरातून रस्ता असून तो रस्ता पक्का नसल्याने येथील ग्रामस्थ,महिला आणि युवकांची मोठया प्रमाणात होणारी गैरसोय या गांवातील रहिवाशी तसेच मुंबई रहिवाशी यांनी लक्षात घेवून गटातटाचे राजकारण केल्यास आपला रस्ता कधीच होणार नाही याकरीता गटातटाचे राजकारण बाजूला ठेवत एकी साधली व आपल्या आजूबाजूचे मोठमोठे रस्ते तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी केले तेच आपला रस्ता करु शकतात आपल्या गावाचा रस्ता कोणत्याही परिस्थितीत करायचाच या ध्येयाने प्रेरित होऊन या वाडीतील युवकांनी तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचेकडे आपली कैफियत मांडून पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या व युवकांच्या एक ते दोन भेटीतच आमदार शंभूराज देसाईंनी आपले आद्य कर्तव्य समजून रस्त्याची लांबी जास्त आहे सदरचा रस्ता करणेकरीता जादा निधीची गरज भासणार आहे परंतू काळजी करु नका तुमचा रस्ता कुठल्याही परिस्थितीत यंदाच्या वर्षीच करुन देणार असा शब्द देवून सदरच्या कडवे खुर्द ते खालची केळेवाडी ते वरची केळेवाडी या रस्त्याचा समावेश युती शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये सन २०१८-१९ मधील आराखडयात केला व या रस्त्याच्या कामांस मंजुरी घेतली. या रस्त्याच्या कामांस आमदार शंभूराज देसाईंनी या योजनेतंर्गत सुमारे ५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. वरची केळेवाडी ही वाडी ७० घरांची असून वाडीची ४५० इतकी लोकसंख्या आहे. ४५० लोकसंख्येकरीता सुमारे ५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी देणारे आमदार शंभूराज देसाई हे पहिलेच आमदार असून पाच कोटी रुपयांचा निधी म्हणजे आमदारांचा अडीच वर्षाचा आमदार निधी एवढा मोठा निधी एका वाढीकरीता देवून आमची रस्त्याची कैफियत दुर केलीत आमदारसाहेब आमी काय, आमच्या पुढच्या पिढयाही तुमच्याच सोबत राहणार असून आपले आद्य कर्तव्य असले तरी आमच्यावर आपले न फिटणारे ऋृण आहे असा शब्दच उपस्थित वयोवृध्दांनी आमदार शंभूराज देसाईंना देत रस्त्याच्या कामांचा निधी मंजुरीचा शासन निर्णय आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते स्विकारत वयोवृध्द ग्रामस्थ व युवकांनी आमदार शंभूराज देसाईंची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. 
चौकट:- पाटणकरांकडे बांधकाम मंत्री असताना ४० ते ५० वेळा हेलपाटे मारुनही रस्ता नाही,
तुम्ही नुसते आमदार आहात तर आमचा रस्ता दिला. वयोवृध्दांनी केले कौतुक.
       आमच्या वरची केळेवाडी या वाडीस बारमाही रस्ता करा याकरीता वाडीतील आम्ही वयोवृध्द नागरिक बायका पोरांसह माजी आमदारांकडे ते राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना चाळीस ते पन्नास वेळा कैफियत मांडायला गेलो होतो.माजी बांधकाम मंत्र्याकडे चाळीस ते पन्नास वेळा हेलपाटे घालून,पाठपुरावा करुनही आमचे रस्त्याचे काम माजी बांधकाम मंत्र्यांच्याकडून झाले नाही.आमदारसाहेब,तुम्ही नुसते आमदार आहात आमची कैफियत तुम्ही एैकली आणि दुस-याच भेटीत आमच्या रस्त्याला निधी मंजुर केल्याचे पत्र आपण आम्हाला दिले. आम्ही वयोवृध्द नागरिक भरुन पावलो.वयोवृध्द नागरिकांनी असे सांगून आमदार शंभूराज देसाईंच्या कामांचे कौतुक केले.

Saturday 22 September 2018

तारळे विभागातील १२ गांवातील २७ गणेश मंडळांना युवा नेते यशराज देसाईंच्या सदिच्छा भेटी. गणेश मंडळातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण.




दौलतनगर दि.२२:- सर्वत्र गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा होत असून पाटण तालुक्याचे युवा नेते यशराज देसाई यांनी शुक्रवारी पाटण तालुक्यातील तारळे विभागातील दुटाळवाडी, लोरेवाडी, जाधववाडी, नुने, कोंडवडे, घोट, करमाळे, चिंचेवाडी, वजरोशी, पांढरवाडी, वेखंडवाडी व तारळे या १२ गांवातील एकूण २७ गणेश मंडळाना सदिच्छा भेटी देत श्री.गणेशाचे दर्शन घेतले. व पाटण तालुक्याच्या प्रत्येक भागात सुखसमृध्दी लाभावी याकरीता प्रार्थना केली.यशराज देसाईंच्या गणेश मंडळाच्या भेटीच्या कार्यक्रमामुळे युवकांमध्ये मोठया प्रमाणात उत्साहाचे वातावरण पसरले होते. श्री.गणेश मंडळाच्या भेटीदरम्यान गावातील महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी औक्षंण केले.
                तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई हे शुक्रवारी तारळे विभागातील २३ गावांतील गणेश मंडळाना सदिच्छा भेटी देणार होते परंतू काही अपरिहार्य कारणास्तव ते तारळे विभागात येवू शकले नसल्यामुळे यशराज देसाईंनी चार तासात १२ गावातील २७ गणेश मंडळाना भेटी दिल्या.१२ गांवातील गणेश मंडळाना भेटी देत असताना यशराज देसाईंनी प्रत्येक गणेश मंडळातील युवा कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्याशी संवाद साधला व प्रत्येक गणेश मंडळाच्या विविध उपक्रमाबाबत कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यामुळे युवकांमध्ये मोठया प्रमाणात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.वडील आमदार शंभूराज देसाई यांच्याप्रमाणे प्रत्येक युवा कार्यकर्त्यांस त्यांनी नाव घेवून हाक मारल्यामुळे गणेश भेटीदरम्यान युवकांनी मोठा आनंद साजरा केला.या भेटीदरम्यान जाधववाडी नुने येथील श्री गणेश मंडळाचे गणेश स्थापनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे जाधववाडी नुने ग्रामस्थांनी गावामध्ये रौप्यमहोत्सावाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमात यशराज देसाईंनी जाधववाडी ग्रामस्थांचे व युवक वर्गाचे रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजीत केलेल्या विविध उपक्रमांचे तोंडभरुन कौतुक करुन या मंडळास व मंडळाच्या पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी यशराज देसाई यांच्याबरोबर माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर,बबनराव भिसे,शिवदौलत संचालक अभिजीत पाटील,गौरव परदेशी,युवराज नलवडे,विकास जाधव, माणिक पवार,रवीद्र सावंत,रामचंद्र देशमुख,अशोक जगदणी,विश्वास खांडके,विश्वास निकम,बाबाजी चौधरी,बाजीराव रांजणे,मनोज सावंत,पोपट साळुंखे, प्रल्हाद पवार,दिनेश भांर्गिदे,बाळू माळी यांच्यासह शंभूराज युवा संघटनेतील तारळे विभागातील प्रत्येक गांवातील युवा कार्यकर्ता हा गणेश मंडळाच्या भेटीच्या कार्यक्रमास उपस्थित होता.
चौकट:- सेल्फीसाठी युवकांची घाईगडबड आणि तारांबळ.
        युवा नेते यशराज देसाईंची वडील आमदार शंभूराज देसाई यांच्याप्रमाणे युवकांच्यामध्ये मोठयाप्रमाणात क्रेझ असून गणेश मंडळाच्या भेटीदरम्यान यशराज देसाईंच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी युवकांची मोठी घाईगडबड आणि तारांबळ यावेळी पहावयास मिळाली. १२ गांवातील प्रत्येक मंडळातील युवकांनी त्यांच्याबरोबर सेल्फीचा मनमुराद आनंद लुटला.

Friday 21 September 2018

कोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार. आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला जलसंपदा मंत्री यांचा ग्रीनसिग्नल.



दौलतनगर दि.२१:- महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी राज्यातील धरणांच्या जलाशयात बोटींग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाटण तालुक्यातील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील बोटींग सुरु करणेकरीता गृहविभागाने सुचित केलेप्रमाणे त्यांचे विभागाकडील अहवालानंतर कोयना धरणापासून ७ किमी अंतरावर लवकरच परवानगी देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले असून जलसंपदामंत्री यांचे आश्वासना मुळे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रस्तावाला ग्रीनसिग्नल मिळाला आहे.
              राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे बुधवारी कोयनानगर येथे सहकुटुंब आले होते. यावेळी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने पाटण तालुक्याच्या दौ-यावर पहिल्यांदाच आलेले मंत्री महाजन यांचे आमदार शंभूराज देसाई यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.यावेळी कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता टी.एन.मुंडे,सातारा पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता विजयराव घोगरे,कोयना बांधकाम मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,अभय काटकर,संजय बोडके,शिवसेना नेते जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,विभागप्रमुख किसनराव कदम,माजी सरंपच शैलेंद्र शेलार आदींची उपस्थिती होती.
               मंत्री महाजन यांची भेट घेताना आमदार शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील बोटींग सुरु करणेसंदर्भातील विषय मंत्री महाजन यांचेपुढे मांडला. यावेळी आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पर्यटनवाढीसाठी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये बोटींग करण्यास काहीही हरकत नाही पंरतू धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाकडून सदरचे बोटींग हे कोयना धरणाच्या भिंतीपासून सुमारे ७ ते ८ किलोमीटरपासून पुढे करावे असे जाहीर केल्याने कोयना जलाशयातील बोटींग बंद करण्यात आले होते. यासंदर्भात मागील वर्षी राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर हे पाटण दौ-यावर आलेनंतर आम्ही कोयना धरणाच्या भिंतीपासून सुमारे ७ ते ८ किलोमीटरपासून बोटींगचे ठिकाण निश्चीत करण्याकरीता याठिकाणची हवाई पहाणी तसेच प्रत्यक्ष पहाणीदेखील केली होती.कोयना धरणाच्या भिंतीपासून सुमारे ७ किमी अंतरावर बोटींग ठिकाण विकसीत करुन बोंटीग सुरु करणेकरीता परवानगी देणेसंदर्भात गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनीही हिरवा कंदील दिला असून त्यांचे सुचनेवरुन सातारा पोलीस विभागामार्फत सदरचा अहवाल शासनाच्या गृहविभागाकडे सादर करण्यात आला आहे.जलसंपदा विभागाचा नकाशाही यावेळी मंत्री महाजन यांना दाखविण्यात आला.जलसंपदा विभागानेही लवकरात लवकर यास परवानगी दयावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंपदा मंत्री यांचेकडे केल्यानंतर गृहविभागाने सुचित केलेप्रमाणे लवकरच यास मान्यता देण्यात येईल असे मंत्री महाजन यांनी सांगितले.त्यांनंतर आमदार शंभूराज देसाईंनी कोयना नदीकाठच्या एकूण १० पुरसंरक्षक भिंतीपैकी ७ पुरसंरक्षक भिंतीच्या कामांना शासनाने मान्यता दिली आहे उर्वरीत सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या तीन प्रस्तावांना मान्यता मिळाली नसल्याची बाबही मंत्री महाजन यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर लवकरच यासही मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी या दोन निर्णयासंदर्भात मंत्री महाजन यांचे आभार व्यक्त केले.
            यावेळी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, कोयना प्रकल्प हा महाराष्ट्र राज्याचा फायदेशीर प्रकल्प आहे.या प्रकल्पातून दरवर्षी १७०० कोटी रुपयांची वीज तयार केली जात असल्याने कोयना धरणाच्या डाव्या पायथ्याजवळ ८० मेगावॅट क्षमतेचा बंद पडलेल्या प्रकल्पाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.कोयना प्रकल्पाच्या ४०० मेगावॅट क्षमतेच्या सहाव्या टप्प्याच्या कामासाठी अन्वेषण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या टप्प्याचे काम लवकरच सुरु होईल.या टप्प्यामध्ये वन्यजीव विभागाची जमीन जात नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Tuesday 18 September 2018

इंग्लंड, नेदरलँड व फ्रांसचा शासकीय दौरा फलदायी. आमदार शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. दौ-यात खुप शिकण्यास मिळाल्याने समाधान व्यक्त.


दौलतनगर दि.१८:- राष्ट्रकुल संसदीय मंडळ,महाराष्ट्र राज्य यांचेवतीने आयोजित लोकलेखा समितीचा इंग्लंड, नेदरलँड व फ्रान्सचा शासकीय दौरा फलदायी झाला.या दौ-यामध्ये या तिन्ही देशांच्या संसदीय प्रणालीचा अभ्यास करता आला.आपली संसदीय प्रणाली आणि या तिन्ही देशांची संसदीय प्रणाली याची तुलनात्मक माहिती घेत असताना या दौ-यात खुप काही शिकण्यास मिळाले असल्याने आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया लोकलेखा समितीचे अभ्यासू सदस्य उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली असून ब्रिटीश पार्लमेंट मध्ये ब्रिटनच्या महिला पंतप्रधान यांचे भाषण ऐकण्याचा,पार्लमेंटमधील त्यांचे कामकाज पाहण्याची संधी मिळाली यातून खुप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे.आपली संसदीय प्रणाली यामध्ये सरस आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
                इंग्लंड,नेदरलँड व फ्रान्स या शासकीय दौ-याहून आलेनंतर आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या प्रतिक्रयेत म्हंटले आहे,राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र राज्य यांचेवतीने महाराष्ट्र विधानसभेतील नऊ विधानसभा सदस्यांची इंग्लंड,नेंदरलँड व फ्रान्स या तीन देशांच्या अभ्यास दौ-याकरीता निवड केली होती.एकूण नऊ दिवसांच्या  दौ-यामध्ये तीन देशामध्ये ब्रिटीश पार्लमेंटसह एकूण सात ठिकाणी येथील शिष्टमंडळाबरोबर महाराष्ट्र लोकलेखा समितीच्या बैठका झाल्या.या तिन्ही देशांच्या लोकलेखा तसेच वित्त समितीच्या सदस्याबरोबर झालेल्या बैठकामधून आपली व या देशांच्या संसदीय कामकाजाची तुलनात्मक अशी माहिती आम्हा नऊ सदस्यांना घेता आली.सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रिटनच्या महिला पंतप्रधान यांचे पार्लमेंटमधील भाषण ऐकण्याची तसेच ब्रिटीश पार्लमेंटचे कामकाज कशाप्रकारे चालते हे पाहण्याची आम्हांस संधी मिळाली.संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास करणे हा या तीन देशाच्या   दौ-याचा मुख्य हेतु होता.या तिन्ही देशांचे सरकार या देशामध्ये कशाप्रकारे विकासात्मक योजना राबविते.तसेच पार्लमेंटमध्ये कशाप्रकारे देशाच्या हिताचे ठराव संमत करुन याची अंमलबजावणी करते याचे सुक्ष्म निरीक्षण या     दौ-यामध्ये करता आले या तिन्ही देशाच्या अभ्यास दौ-यामध्ये विविध बैठकांच्या माध्यमातून येथील लोकलेखा,वित्त समितीच्या सदस्याकडून महाराष्ट्र लोकलेखा अभ्यास समितीच्या सर्व सदस्यांचे यथोचित असे आपुलकीने स्वागत करण्यात आले.
                भारतीय संसदेची रचना ज्या धर्तीवर करण्यात आली आहे त्या ब्रिटीश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स(लोकसभा)मध्ये आम्हा सदस्यांची ब्रिटीश लोकसभा अध्यक्ष व ब्रिटीश खासदारांसोबत लंडनमधील संसदेची इमारत असणा-या वेन्टमिन्स्‍टर या ठिकाणी पहिली बैठक झाली.त्यांनतर नेदरलँड (हेज) संसदेस तसेच नॅशनल असेम्बली ऑफ फ्रांन्स येथे भेट दिली.लंडन,नेदरलँड व फ्रांन्स येथील पार्लमेंट,असेम्बली भेटीबरोबर या तिन्ही देशात झालेल्या लोकलेखा व वित्त समितीच्या एकूण सात बैठकामध्ये ब्रिटीश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनचे लोकसभा अध्यक्ष आर.टी.ढोलकिया,स्टेव्ह पॉऊंड,रुट कॅडबरी,युनी फॉरुज,फिलीप हेलोबिनी हे ब्रिटीश खासदार. समितीप्रमुख मेग हिलर,लोकलेखा सचिव रिचर्ड कुकी,नेदरलँड संसदेचे उपसिचव लुक वॅनल्युईक,फ्रांन्स वित्त समितीचे सिनेट सिनेटर युवॉन कोलीण तसेच प्रेसिडेन्स ऑफ द फेंन्डशीप ग्रुप अँड व्हाईस चेअर ऑफ सिनेट कमिटी त्याचबरोबर नॅशनल ॲसेम्बली ऑफ फ्रांन्सचे फ्रेन्डशिप ग्रुप्स ऑफ वित्त सेलिन कलावेज यांची प्रमुख उपस्थिती होती.ब्रिटीश खासदार,सिनेट सदस्य यांच्याबरोबर आमचे समितीने या तिन्ही देशाचे भारतीय राजदूत वाय.के.सिन्हा,वेणू राजामोनी, भारताचे उपाआयुक्त अकन बॅनर्जी यांचीही भेट घेऊन त्याच्याबरोबर चर्चा केली. अभ्यास दौ-याबरोबर समिती सदस्यांनी या तिन्ही देशातील महत्वाच्या अनेक प्रेक्षणीय स्थळांनाही सदिच्छा भेट दिली व येथील प्रेक्षणिय स्थळांचा मनमुराद आनंद लुटला.
            लंडन,नेदरलँड व फ्रांन्स हा तीन देशाचा लोकलेखा समिती सदस्यांकरीता राष्ट्रकुल संसदीय मंडळाने आयोजित केलेला दौरा अभ्यासपुर्ण आणि फलदायी झाला असून या दौ-याबाबत आपण खुप समाधानी असल्याचेही आमदार शंभूराज देसाई यांनी शेवटी म्हंटले आहे.

Thursday 6 September 2018

लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या स्मारकाला आमदार शंभूराज देसाईंची भेट व अभिवादन.




दौलतनगर दि.०६ :-पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत महाराष्ट्र विधिमंडळातील लोकलेखा समितीच्या लंडन,नेदरलँन्ड व फ्रान्स या तीन देशांच्या परदेश दौ-यावर गेले असून दौ-याच्या दुसरे दिवशी त्यांनी लोकलेखा समितीचे शिष्टमंडळाबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेल्या स्मारकाला भेट दिली व संपुर्ण स्मारकाची व येथील संस्मरणीय वस्तूंची पाहणी केली. प्रथमत: त्यांनी स्मारकामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.
                 संसदीय कार्यपद्धती अभ्यासासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत महाराष्ट्र विधिमंडळातील लोकलेखा समितीचे १० सदस्य हे लंडन,नेदरलँन्ड व फ्रान्स या तीन देशांच्या परदेश दौ-यावर गेले आहेत.परदेश दौ-याच्या दुसरे दिवशी दि.०५ सप्टेबंर रोजी लोकलेखा समितीचे शिष्टमंडळातील या १० सदस्यांनी लंडनमध्ये सन 1921-1922 असे दोन वर्षे वास्तव्य केलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रसिद्ध असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संग्रहालयाला भेट दिली.यावेळी लोकलेखा समितीचे शिष्टमंडळातील १० सदस्यांसोबत पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनीही स्मारकाला भेट देत या स्मारकाची व संग्रहालयाची पाहणी केली. प्रथमत: त्यांनी स्मारकामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण पूर्ण केले होतं.लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डी.एस.सी पदवी संपादन केली.लंडनमध्येच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बॅरिस्टर पदवीही मिळाली होती.या काळात लंडनमधील किंग हेनरी रोड येथील या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत महाराष्ट्र विधिमंडळातील लोकलेखा समितीचे १० सदस्यांनी आर्वजुन लंडनमधील  प्रसिद्ध अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संग्रहालयाला भेट दिली. शिष्टमंडळातील सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करीत त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्रे व अन्य संस्मरणीय वस्तूंची माहितीही करुन घेतली. समता आणि सामाजीक न्यायाचा संदेश जगाला देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले लंडनमधील त्यांचे वास्तव्य असणारी ही एैतिहासिक वास्तू जगासाठी प्रेरणा देणारी आहे. अतिशय उत्कृष्ट स्मारक व संग्रहालय एवढया मोठया शहरात आहे हे पाहून अत्यानंद झाल्याच्या प्रतिक्रिया लोकलेखा समितीचे शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Sunday 2 September 2018

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या तीन देशांच्या परदेश दौ-यातील शिष्टमंडळात आमदार शंभूराज देसाईंची निवड. परदेश दौ-याकरीता पदाधिका-यांनी दिल्या आमदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा.




दौलतनगर दि.०२ :- राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत महाराष्ट्र विधिमंडळातील लोकलेखा समितीचा लंडन, नेदरलँन्ड व फ्रान्स या तीन देशांचा परदेश दौरा राष्ट्रकुल संसदीय मंडळाने दि.४ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर, २०१८ पर्यंत आयोजीत केला असून या तीन देशाच्या परदेश दौ-यातील शिष्टमंडळात पाटणचे विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांची निवड झाली आहे.लंडन,नेदरलँन्ड व फ्रान्स या तीन देशांच्या परदेश दौ-यातील शिष्टमंडळात निवड झालेबद्दल पाटण मतदारसंघातील विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार शंभूराज देसाईंची भेट घेवून त्यांना या दौ-याकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
               पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार ठरले असून संसदीय कामकाजाचा त्यांना गाढा अभ्यास आहे. त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातील अत्यंत महत्वाच्या लोकलेखा समितीवर सलग पाच वर्षे काम करण्याची संधी मिळाली होती.त्यांनतर २०१४ ला परत आमदार झालेनंतर गेली चार वर्षे ते लोकलेखा समितीवर अत्यंत उत्कृष्टपणे काम करीत आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत महाराष्ट्र विधिमंडळातील अभ्यासू आमदार यांचा विविध देशांचा अभ्यास दौरा आयोजीत करण्यात येतो.या दौ-यात विविध देशांच्या विधानमंडळाना तसेच संसदभवनांना (पार्लमेंट) भेटीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत लंडन,नेदरलँन्ड व फ्रान्स या तीन देशांचा परदेश दौरा आयोजीत करण्यात आला आहे. या दौ-याकरीता महाराष्ट्र विधिमंडळातील विविध पक्षाचे १० आमदार यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्हयातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली आहे.हा परदेश दौरा दि.४ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर,२०१८ पर्यंत आयोजीत करण्यात आला असून महाराष्ट्र विधिमंडळातील लोकलेखा समितीचे हे सदस्य दि.०५ सप्टेंबर रोजी बिट्रीश संसदमंडळाचे  (पार्लमेंटचे) अध्यक्ष यांची भेट घेवून त्यांचेसोबत बैठक आयोजीत करण्यात आली आहे तसेच बिट्रीश संसदमंडळाचे (पार्लमेंटचे) लोकलेखा समितीबरोबरही त्यांची बैठक आयोजीत करण्यात आली आहे.तर दि.०७ सप्टेंबर रोजी नेदरलॅन्ड पार्लमेंटंचे सिनेट व हाऊस ऑफ रिपेझेनटेटिव्ह यांचेबरोबरही बैठक आयोजीत केली आहे.त्यानंतर दि.१० सप्टेंबर रोजी नॅशनल असेंबली फ्रान्सचे अध्यक्ष व सिनेट यांचेबरोबरही महाराष्ट्र विधिमंडळातील या सदस्यांच्या बैठका आयोजीत आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत महाराष्ट्र विधिमंडळातील हे १० अभ्यासू आमदार तीन देशांच्या संसदमंडळाचे (पार्लमेंटचे) अध्यक्ष यांचेबरोबर तीन ते चार अधिकृत बैठका करणार असून बिट्रीश संसदमंडळाचे (पार्लमेंटचे) संसदीय कामकाज प्रत्यक्ष पाहणार आहेत.या बैठकांमधून महाराष्ट्र विधिमंडळाचे तसेच या तीन देशांच्या संसदमंडळाचे (पार्लमेंटचे) संसदीय कामकाज कोणत्या पध्दतीने आणि कशाप्रकारे चालविले जाते या संसदीय कामकाजाची देवाण घेवाणही करण्यात येणार असून संसदीय कामकाजांच्या संदर्भात विविध चर्चाही करण्यात येणार आहे.परदेश दौ-यातील शिष्टमंडळाकडून या तीन देशांच्या विविध भागांची पहाणीही करण्यात येणार आहे.
               सदर दौरा दि.४ सप्टेंबरपासून आयोजीत असून दि.०३ रोजी हे सर्व शिष्टमंडळ लंडन,नेदरलँन्ड व फ्रान्स या तीन देशांच्या दौ-यावर रवाना होणार आहे. सातारा जिल्हयातून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची या परदेश दौ-याकरीता निवड झालेमुळे त्यांना या दौ-याकरीता शुभेच्छा देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांची आज दौलतनगर ता.पाटण येथे सदिच्छा भेट घेवून त्यांना परदेश  दौ-याकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.             
चौकट:- राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या दौ-याकरीता आमदार शंभूराज देसाईंची दुस-यांदा निवड.
             पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासू आमदार म्हणून ओळख असून सन २००४ ते २००९ या पहिल्या आमदारकीच्या काळात त्यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत ऑस्ट्रेलिया,न्युझिलंड व सिंगापुर या तीन देशांच्या परदेश दौ-यावर महाराष्ट्र विधानमंडळामार्फत निवड करण्यात आली होती.आता दुस-यांदा ते लंडन,नेदरलँन्ड व फ्रान्स या तीन देशांच्या परदेश दौ-यावर जात आहेत.संसदीय कामकाजाचा आमदार शंभूराज देसाईंना गाढा अभ्यास असून परदेश दौ-यातील शिष्टमंडळातील चर्चेकरीता त्यांची करण्यात आलेली निवड ही विशेष मानली जात असून पाटण मतदारसंघातील जनतेकरीता ही अभिमानाची गोष्ट असल्याचेही मानले जात आहे.