दौलतनगर दि.16:- महाराष्ट्राच्या
राजकारणामध्ये गत महिन्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. हिंदू हृदयसम्राट वंदनीय
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर हिंदुत्वाचे विचार
पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेसह राज्यातील तब्बल 50 आमदारांनी
उठाव करत राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युती साकाराली.राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे व माजी गृहराज्यमंत्री आणि पाटण तालुकयाचे आमदार शंभूराज देसाई यांचेसह
50आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेला पाटण विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचे नेतृत्वाखाली
असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या 2642 लोकप्रतिनिधीं व पदाधिकारी
यांनी जाहीर समर्थन करुन पाठिंबा व्यक्त केला
आहे.
सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा युतीच्या
माध्यमातून निवडणूकीला सामोरे गेल्यानंतर या विधानसभा निवडणूकीचे निकालामध्ये शिवसेना-भाजपा
युतीला स्पष्ट बहुमत दिले होते.परंतु अचानक काही घटना घडल्याने महाराष्ट्रामध्ये महाविकास
आघाडीची स्थापना होऊन राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच समविचारी पक्षांची
महाविकास आघाडी स्थापन झाली. परंतु या महाविकास आघाडीचे सरकारमध्ये शिवसेना पक्षाचे
मुख्यमंत्री असूनही शिवसेना पक्षाच्या लोकप्रतिनिधी
यांचेसह पदाधिकारी,शिवसैनिक यांची घुसमट होत असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले. पक्षवाढीसाठी
अनेक अडचणी निर्माण होत होत्या तसेच विकास कामांचा श्रेयवादही त्या-त्या मतदारसंघामध्ये
उफाळून येत होता. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेत्वृवाखाली
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, वंदनीय आनंद दिघे यांचे कट्टर हिंदुत्वाचे विचार पुढे
नेण्यासाठी उठाव झाला.या उठावात राज्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व
शिवसैनिक मोठया प्रमाणांत सहभागी झाले.त्यानंतर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री ना.एकनाथ
शिंदे यांच्या नेत्वृवाखाली नवे सरकार साकारले सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातून मोठ्या
प्रमाणात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राज्यातील शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी
आणि शिवसैनिक यांनी पाठीशी ठाम राहून मंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले.
या सर्व राजकीय घडामोडीत महत्वाचे कामगिरी
बजवणारे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे असणारे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री
व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातही मोठा उठाव झाला आहे.
शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्थाचे लोकप्रतिनिधी यामध्ये सरपंच, उपसपंच, चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक,जिल्हा
परिषद,पंचायत समिती,नगरपंचायतीचे नगरसेवक आदी सदस्यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व आमदार शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या
भूमिकेला जाहिर समर्थन देवून पाठिंबा व्यक्त केला आहे. यामध्ये पाटण विधानसभा मतदार संघातील
आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे 3 जिल्हा परिषद सदस्य, 6 पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे 141 सरपंच,
145 उपसरपंच आणि 880 सदस्य, तसेच नगरपंचायतीचे 2
सदस्य असे मिळूण एकूण 1177 स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी
जाहिर पाठिंबा व्यक्त केला आहे, तर सहकारी संस्थामधील विकास सेवा सोसायटी, सहकारी पाणी
पुरवठा संस्था, सहकारी दुध संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंक,आणि सहकारी
साखर कारखान्याचे पदाधिकारी यामधील एकूण
124 चेअरमन, 123 व्हा.चेअरमन,आणि 1218 संचालक असे मिळूण 1465 सहकारी संस्थाचे लोकप्रतिनिधीं
व पदाधिकारी यांनी असे मिळूण पाटण मतदार संघातील
स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी 1117 व सहकारी संस्था प्रतिनिधींनी 1465 असे
एकत्रित 2642 लोकप्रतिनिधीं व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री ना.शिंदे आणि आमदार शंभूराज देसाई यांना जाहीर समर्थन दिले
आहे. दिवसेंदिवस राज्यातील शिवसैनिक पदाधिकारी यांचेकडून मुख्यमंत्री ना.शिंदे यांना मोठया प्रमाणांत मिळत असलेल्या समर्थनानंतर
पाटण विधानसभा मतदार संघातूनही मुख्यमंत्री ना.शिंदे आणि आमदार शंभूराज देसाई स्थानिक स्वराज्य संस्था
व सहकारी संस्थांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी जाहिर समर्थन दिले आहे.