Wednesday 6 July 2022

आमदार शंभूराज देसाई यांचे पाटण मतदारसंघात जल्लोषी स्वागत आम्ही शिवसेनेतच अन आम्ही शिवसैनिकच..! आमदार शंभूराज देसाई

 

 

  दौलतनगर दि.06 :-राज्यातील नव्या राजकीय घडामोडीनंतर या घडामोडीत प्रमुख असणारे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई तब्बल १५ दिवसानंतर आपल्या मतदारसंघात आगमन होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आमदार शंभूराज देसाई यांचे स्वागत केले.दरम्यान आम्ही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक असून शिवसेना पक्षातच आहे मात्र आघाडी शासनात तोंड दाबून बुक्क्यांचा मार आजपर्यंत आम्ही सहन करीत होतो त्यातून सुटका करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.

                 गेल्या दोन ते तीन आठवडयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठया घडामोडी घडल्यानंतर प्रथमच ते मतदारसंघामध्ये आल्यानंतर ते दौलतनगर,ता.पाटण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,अशोकराव पाटील,विजय पवार,संतोष गिरी,सुरेश पानस्कर,विजय शिंदे,विजय जंबुरे,बबनराव भिसे,प्रकाश जाधव,भागुजी शेळके,नथूराम सावंत,प्रदिप पाटील,बबनराव शिंदे,राजाराम पाटील,माणिक पवार,विजय पवार,भरत साळूंखे, अभिजित पाटील,पांडूरंग नलवडे,गणेश भिसे,बशीर खेांदू,नथूराम कुंभार,शशिकांत निकम,शिवाजीराव शेवाळे,मनोज मोहिते,नाना साबळे, नारायण कारंडे,पंजाबराव देसाई यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाटण मतदारसंघामध्ये त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून काशिळपासून मतदारसंघात ठिक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येऊन त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थ करण्यात आले.

              आमदार देसाई पुढे म्हणाले,आम्ही शिवसेना कधीही सोडणार नाही आणि सोडली नाही.मात्र अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात जो अनुभव आला तो न सांगण्यासारखा आहे.आम्ही शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते,मंत्रिमंडळातील महत्वाच्या पाच खात्यांचा राज्यमंत्री असून ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या समस्या,प्रश्न व्यथा आम्हाला सोडविता आल्या नाहीत. शिवसेना आमदारांचे प्रश्न नेमक्या कुणाकडे मांडायचे?या  असा प्रश्न निर्माण होत राहिला.आम्ही मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे उदघाटन घटकपक्षाचे पदाधिकारी करू लागले,यासंदर्भात वेळोवेळी पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडली तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.काँग्रेस राष्ट्रवादी ला दुखवू नका असे सांगण्यात आले त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेवून राष्ट्रवादीच सरकार चालवित असल्याचे निदर्शनास आले. परिणामी  सत्ताधारी पक्षात असून ही तोंड धरून बुक्क्यांचा मार सहन करीत केवळ कव्हरिंग लेटर जोडून पोस्टमन चे काम करावे लागले. मात्र यामधून कार्यवाही काही झाली नाही,असे स्पष्ट करून आमदार देसाई म्हणाले, कोणताही आमदार,मंत्री  सत्ताधारी पक्ष सोडून विरोधी पक्षात कधी जात नाही. मात्र या सर्व बाबीला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेतून उठाव करण्यासाठी स्वतःच्या आमदारकी,मंत्रिपदे बाजूला ठेवून तब्बल ४०आमदारांना हे धाडस केवळ  शिवसेना पक्ष वाचविण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी करावे लागले.त्यामुळे ही बंडखोरी नाही,गद्दारी नाही,बंड नाही हा तर शिवसेना पक्षांतर्गत झालेला ऐतिहासिक उठाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत  भाजप शिवसेनेच्या महायुतीच्या माध्यमातूनच आपण निवडून आलो होतो त्यामुळे सध्या झालेले सरकार ही भाजप शिवसेना या महायुतीचेच असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्याला निश्चितपणाने न्याय देईल,तसेच पाटण मतदार संघात यापूर्वी जेवढा विकास निधी आणला त्यापेक्षा दुप्पट विकासनिधी आणून पाटण मतदार संघ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आदर्श मतदारसंघ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही ही आमदार देसाई यांनी शेवटी दिली. तत्पुर्वी दौलतनगर,ता.पाटण येथील त्यांचे निवासस्थानी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते हितचिंतक यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी करत आमदार शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे जाहिर समर्थन केले.

चौकट : संजय राऊताना टोला..!

             लांब लचक बोलणारे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी टीव्हीवर येणाऱ्या आमच्या नेत्यांमुळेच  शिवसेना पक्ष कुणाच्या तरी दावणीला बांधला जातोय हे वारंवार निदर्शनास आणून देऊन ही त्यांकडे दुर्लक्ष केल्याने आमच्यासारख्या शिवसैनिकांना सहन झाले नाही तेव्हा हा ऐतिहासिक उठाव केला असे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना आमदार शंभूराज देसाई यांनी टोला लगावला.

चौकट:देसाई घराणे इनाम विकणारे नाही..!

                   बंडखोर आमदारांनी पैशासाठी इनाम विकले असल्याच्या चर्चा व्हायरल झाल्याचे
काही माध्यमांतून निदर्शनास आले. मात्र कोणत्याही बंडखोर आमदाराने कुणाकडून ही एक पैसा ही घेतला नाही. हा पक्षांतर्गत उठाव होता .देसाई घराणे हे तर गेल्या तीन पिढ्यापासून आपण पाहत आहात.देसाई घराण्याने सामाजिक बांधिलकीतून खूप काही कमवले आहे. त्यामुळे देसाई घराणे कदापी आपले इनाम विकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त करताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा एकच गजर केला.

No comments:

Post a Comment