दौलतनगर,ता.24: - पाटण
तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणाऱ्या
तसेच काही ठिकाणी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा यंत्रणा जीर्ण झाल्याने कमी
दाबाने पाणी पुरवठा होऊन पिण्याच्या पाण्याची कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत
असल्याने मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील नळ पाणी पुरवठा योजनांना
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्याचेच फलीत म्हणून मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नांतून आज आपण पाटण
तालुक्यात १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन करत आहोत.सातारा
जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हयातील
सर्व गावांमध्ये लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी
सातारा जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी
केले.
पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब
देसाई शताब्दी स्मारक सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील १४० गावातील नळ
पाणी योजनांचे ई भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते
व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई
यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीव्दारे संपन्न झाले. या
कार्यक्रमावेळी पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता
विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल,जल जीवन मिशन प्रकल्प संचालक ऋषिकेश यशोद
(दूरदृश्य प्रणालीव्दारे )मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी,
प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे,
उपअभियंता एस. वाय. बसुगडे, गट विकास अधिकारी गोरख शेलार, बाळासाहेबांची शिवसेना
संपर्कप्रमुख शरदराव कणसे, जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, पुरुषोत्तम जाधव, डॉ.दिलीपराव
चव्हाण,अशोकराव पाटील,भरत साळूंखे,विजय शिंदे,बबनराव शिंदे,बशीर खोंदू,जालंदर
पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढे बोलताना ना.पाटील म्हणाले की केंद्र शासन
पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन या जलजिवन
मिशन योजने अंतर्गत सन २०२४ अखेर ग्रामीण भागातील
प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पूर्नजोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई
किमान ५५ लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबध्द आहे. या
योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के
याप्रमाणे निधीची उपलब्धता होणार आहे. राज्य शासन पिण्याच्या पाण्याला महत्त्व देत
असून राज्याच्या वाटयाला येणाऱ्या हिस्स्याची रक्कम अगोदरच वर्ग करत असून या नळ
पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे जलजिवन मिशन
योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांना कसल्याही निधीची कमतरता भासणार
नसल्याचे सांगत मंत्री ना.गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की,‘हर घर जल’ या
संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या
प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. या मिशनच्या माध्यमातून शासन
घरोघरी नळ पाणी जोडणी देत असल्याचे सांगत ते म्हणाले राज्यातील प्रत्येक घरात नळ
पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून काम
करण्यात येत आहे. नळ जोडणी कामे लवकर व्हावीत म्हणून या बाबतचे अधिकार
जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व योजनांना मंजुरी देण्यात
आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही कामे जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामांचा
दरमहा आढावा घ्यावा व त्याची प्रगती एका नोंद वहीत ठेवावी अशा सूचनाही त्यांनी
यावेळी अधिका-यांना दिल्या.तसेच ना.शंभूराज देसाई हे एक काम करणार नेतृत्व असून या
नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
मंत्री ना.शंभूराज देसाई बोलताना
म्हणाले की, जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व
गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा लवकरच होणार आहे.पाटण तालुक्यातील
डोंगरी व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. या भागातील पाणी
पुरवठ्यांच्या योजनांना आम्ही प्राधान्य दिले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ
पाणी पुरवठा
योजनांचा आज शुभारंभ झाला असून या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे.या नळ
पाणीपुरवठा योजनेमुळे डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार आहे.
ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे . अनेक योजनांच्या माध्यमातून
जिल्ह्याच्या विकास कामांसाठी निधी शासनाने दिला. पाटण तालुक्यातील एकूण ८८ कोटी
४२ लाख रुपयांच्या १४० नळ पाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले असून, या माध्यमातून
एकूण १ लाख ५३ हजार ३१० लोकसंख्येला पाणी मिळणार आहे. १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनामधून ३६ हजार
९४१ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात येणार आहे. या शिवाय तालुक्यातील उर्वरीत गावांमधील
नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावरील
योजनांची कामे सुरु करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या आहेत. या योजना मार्गी
लावण्यासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. पाटण
तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा ई भूमिपूजन
कार्यक्रमास शिवशाही सरपंच संघ पाटणचे अध्यक्ष मा. विजय शिंदे यांच्यासह सर्व
गावांतील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :- जनतेचे प्रश्न
सोडविण्यासाठी अविरत झटणारे मंत्री.
आपल्या डोंगरी
व दुर्गम भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून मतदारसंघातील
रस्ते,नळ योजना,साकव अशा मुलभूत सुविधांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन या
कामांना जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याच काम मंत्री ना.शंभूराज देसाई हे करत आले
आहेत. पाणी पुरवठा विभागाच बोलायच झालं तर ना.शंभूराज देसाई यांनी पाटण
तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या सगळ्यां योजनांना 125 कोटी निधी नेणारा हा
एकमेव पट्टा महाराष्ट्रात असेल असे सांगत
जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अवितर झटणारे मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी
सांगीतले.तसेच भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठीही मंत्री गुलाबराव पाटील
यांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment