Sunday, 26 November 2023

पाटण मतदारसंघ राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपाला येण्यासाठी प्रयत्नशील-ना.शंभूराज देसाई पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

 दौलतनगर दि.26: पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठबळावर नेहमीच प्रयत्नशील असून ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी आगामी पाच वर्षाचा विकास आराखडा तयार करुन या आराखडयामधील विकास कामांना निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असून गावामध्ये विकासाची कामे राबविताना गटा-तटाचे राजकारण न करता गावाचा सर्वांगणी  विकास डोळयासमोर ठेऊन ग्रामपंचायतीमधून कामकाज करावे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारसंघातील जनतेने विकास कामांना पाठबळ देऊन विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनता असल्याचे सिध्द झाले असून आपला पाटण विधानसभा मतदारसंघ हा राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपाला येण्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठबळावर नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

          गत महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीमध्ये निवडूण आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते दौलतनगर ता.पाटण येथे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,माजी चेअरमन अशोकराव पाटील,विजय पवार,संतोष गिरी,सुरेश पानस्कर, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील,उपसभापती  विलास गोडांबे,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,आर.बी.पवार,सुनील पानस्कर,गजानन जाधव,बबनराव शिंदे,भरत साळूंखे,चंद्रकांत पाटील,राजकुमार कदम,विकास गिरी गोसावी,अशोक डिगे,लक्ष्मण बोर्गे,बबनराव भिसे,जालंदर पाटील,श्वेता वाघमारे,विश्वनाथ पानस्कर,विजय जंबुरे,बशीर खोंदू यांचेसह पदाधिकारी व कार्यकते यांची  उपस्थिती  होती.

             यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांची कामे करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत असून नवनिर्वाचित सरपंच यांनीही गावामध्ये विकासाची कामे करताना राजकारण बाजूला ठेऊन कामे करावीत.कारण ग्रामपंचायतीच्या निकालावरुन  असे दिसते की, सध्या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने  आपण करत असलेल्या विकास कामांना पाठबळ दिले आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचे वर्चस्व मिळविण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश आले असून.त्यामुळे आपल्या पक्षाची संघटना बळकट होत आहे. आपली ही संघटना भविष्यात आणखी बळकट करण्याची जबाबदारी ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. तर नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी पुढील पाच वर्षांत आपापल्या गावात कोणती विकासकामे करायची याचा आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे सांगत ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आश्वासन दिल्याप्रमाणे २५ लक्ष रुपये निधी विकास कामांसाठी देण्यात येईल, तर उर्वरित महत्त्वाच्या कामांनाही निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कटीबध्द असल्याचे सांगत ग्रामपंचायत ही विकासाचा पाया असून ग्रामपंचायतींमधील परिवर्तन हे मतदारसंघातील गावा-गावांमध्ये झालेल्या विकास कामे बघून लोकांच्यामध्ये जनजागृती झाल्याने गावच्या गावे विकासाच्या मागे उभी राहिली असल्याने तीन टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकींमध्ये आपल्याला चांगले यश मिळाले. नव्याने निवडूण आलेल्या पदाधिकारी यांना विकास कामांसाठी नेहमीच पाठबळ राहणार असून काही ठिकाणी अल्पमताने पराभव झालेल्या गावांध्ये कार्यकर्त्यांनी खचून न जाता त्या गावांमध्ये आवश्यक असलेल्या विकास कामांसाठी माझेकडे पाठपुरावा करावा,निश्चितच त्यांच्याही कामांना निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी शेवटी दिले. दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विजय शिंदे तर आभार विजय पवार यांनी मानले.

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पाटण तालुका अशी ओळख मुंबईमध्ये निर्माण करुया.-ना.शंभूराज देसाई.

          महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यामुळे आपल्या पाटण तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यावेळी  मुंबईमध्ये पाटणचे नाव सांगीतले तर लगेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच नाव घेतलं जायच.त्याच पध्दतीने आता मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी  आपल्या पक्षाची संघटना आणखी मजबूत करुन अस काम करुया की यापुढे मुंबईमध्ये पाटण असे नाव घेतले तर आदराने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाचा उल्लेख झाला पाहिजे.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पाटण तालुका अशी ओळख मुंबईमध्ये निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले.

Friday, 24 November 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते रविवार दि.26 रोजी पाटण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन.

 

 

दौलतनगर दि.24: पाटण विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिदे , राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत पाटण विधानसभा मतदर संघातील जनतेने शिवसेनेनेला ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान करुन घवघवीत यश संपादन करुन दिले. या निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ व शिवशाही सरपंच संघ पाटण यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथे आयोजित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील 26 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम माहे 05 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडत या ग्रामपंचातींचा निकाल सोमवार दि. 06 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिर करण्यात आला. निवडणूक लागलेल्या 26 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध झालेल्या सर्व 09 ग्रामपंचायतीं व निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमधील 11 ग्रामपंचायतींमध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकत विजय संपादित केला. शिवसेनेचे बिनविरोध व निवडूण आलेल्या 20 ग्रामपंचायतीचे सरपंच व नवनिर्वाचित सदस्य तसेच उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये निवडूण आलेल्या सदस्यांचा शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ व शिवशाही सरपंच संघ पाटण यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर(मरळी) ता.पाटण येथे आयोजित केला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे जाहिर सत्कार समारंभास नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.


Monday, 20 November 2023

स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- नामदार शंभूराज देसाई. दौलतनगर,ता.पाटण येथे 80 वा जयंती सोहळयात प्रतिपादन.

 

दौलतनगर दि.20:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले.

                ते दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजित स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 80 व्या जयंती सोहळया प्रसंगी बोलत होते.यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),मा.जयराज देसाई यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,सुनील पानस्कर, विजय सरगडे,संचालिका सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,बशीर खोंदू,विजय शिंदे,आनंदराव चव्हाण,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई, शिवदौलत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

                 याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले,मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा करणे शक्य नव्हते,त्या काळात एक लाख टनही ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता परंतू आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्व.आबासाहेब यांनी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन अनेक संकटांचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेले.स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा करण्यात त्यांनी खुप कष्ट सोसले,भागभांडवल उभा करण्यात मोठया अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली,अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन दिला.स्व.आबासाहेब यांनी अगदी कमी कालावधीमध्ये विविध संस्थांची उभारणी करण्याचे मोठे काम केले.स्व. आबासाहेबांनी सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे आहे.देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.आबासाहेब यांचे पुण्याईनेच आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम करत असून सहकारात काम करताना राजकारण बाजूला ठेऊन काम करणे गरजेचे आहे.त्यांच्याच आशिर्वादने आज कॅबिनेट मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री म्हणून पाटण तालुक्यासह सातारा जिल्हयाचे विकासासाठी प्रयत्नशिल आहोत.पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यासाठी स्वतंत्र डोंगरी विकास निधी देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे विनंती केल्यांनतर तो निधी  मंजूर करण्याचे मुख्यमंत्री यांनी मान्य केले असून या निधीतून डोंगरी भागाचा विकास होऊन कायापालट होण्यास मदत होणार आहे.तर कोयना भूकंप निधी हा वाढवून मिळण्यात यश आल्याने आता जादाचा निधी पाटण विधानसभा मतदारसंघाचे विकासासाठी मिळणार असून राज्य शासनाकडून मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जादाचा निधी मंजूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.


Saturday, 18 November 2023

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे 11 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते गोरगरीब महिलांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप.


 

दौलतनगर दि.18:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ नोव्हेंबर,रोजी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे 11 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते संसारोपयोगी साहित्याचे  ब्लँकेटचे तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वहया वाटप करण्यात आले.

दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रतिवर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी शिवसेनाप्रमुख यांचे 11 व्या पुण्यस्मरण दिनाचे व यानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वहया वाटपाचा कार्यक्रम दि.१७ नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आला होता.या दिनानिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमत: शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात येवून त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने या पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील महिलांना त्यांचे शुभहस्ते ब्लँकेट तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वहयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,पाटण मतदारसंघातील शिवसेना,युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी हे मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना  नामदार शंभूराज देसाई म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले होते हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगचित्रातून टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला.आपल्या लेखणीतून,व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखू लागला.आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची व संघटनेची वाटचाल सुरु आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आदर्श विचारांचा वारसा जोपासत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 11व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघाचेवतीने व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र अभिवादन करतो,असे ते शेवठी म्हणाले.

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा सोमवार दि.20 रोजी 80 वा जयंती सोहळा. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची राहणार प्रमुख उपस्थिती.

 

दौलतनगर दि.18:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचेवतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 80 वा जयंती सोहळा सोमवार दि. 20 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 10.00 वा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणार असून हा  जयंती सोहळा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी दिली आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमाला कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी, हितचिंत, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पत्रकांत करण्यात आले आहे.


Tuesday, 14 November 2023

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दुर्गम गावात नेत्र रोग तपासणी शिबीर संपन्न. बाळासाहेब देसाई फौंडेशन व गांधी फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने तब्बल 6 हजार रुग्णांची तपासणी. नेत्र रोग शिबीरामध्ये 2330 रुग्णांना मोफत चष्मे वाटप तर 936 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.


 दौलतनगर दि.4:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे दि. 17 नोव्हेंबर रोजीचे वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब देसाई फौंडेशन, दौलतनगर व गांधी फौंडेशन कराड यांचे संयुक्त विद्यमाने तसेच एच.व्ही.देसाई आय.सेंटर कराड यांचे सहकार्यातून पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये विनामूल्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त डोंगरी व दुर्गम भागातील 10 गावांत घेण्यात आलेल्या नेत्र रोग तपासणीमध्ये तब्बल 6137 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन या नेत्र तपासणी शिबीरामध्ये 2330 रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले तर 936 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित नेत्र रोग तपासणी  शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला.

                प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे दि. 17 नोव्हेंबर रोजीचे वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब देसाई फौंडेशन, दौलतनगर व गांधी फौंडेशन कराड यांचे संयुक्त विद्यमाने तसेच एच.व्ही.देसाई आय.सेंटर कराड यांचे सहकार्यातून पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये दि. 01 ते 10 नोव्हेंबर अखेर 10 दिवसांमध्ये दिवशी खुर्द, काठीटेक, काढोली, कोयनानगर,मुरुड,मरळोशी,कडववाडी नाणेगाव,कातवडी,मोरगिरी व मारुल तर्फ पाटण या गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केली होती.या नेत्र तपासण शिबीरामध्ये  तज्ञ डॉक्टारांकडून 6137 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन या नेत्र तपासणी शिबीरामध्ये 2330 रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले तर 936 रुग्णांना मोती बिंदूचे निदान झाले असल्याने या सर्व रुग्णांवर गांधी फौंडेशन,कराड यांचे मार्फत पुणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगत पुढे म्हंटले आहे की,पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त बाळासाहेब देसाई फौंडेशन, दौलतनगर व गांधी फौंडेशन कराड यांचे संयुक्त विद्यमाने तसेच एच.व्ही.देसाई आय.सेंटर कराड यांचे सहकार्यातून मतदारसंघातील 10 गावांमध्ये घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला असून या तपासणी शिबीरामध्ये रुग्णांना चांगली सुविधा देत मोफत चष्मा वाटप तर मोती बिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर गांधी फौंडेशन यांचेवतीने पुणे येथे मोफत मोती बिंदूची शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांना समाधान व्यक्त केले.तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेसह बाळासाहेब देसाई फौंडेशन,गांधी फौंडेशन व एच.व्ही.देसाई आय सेंटर,कराड यांचे धन्यवाद मानले.

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 57 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा.


 दौलतनगर दि.4:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 57 वा वाढदिवस शुक्रवार दि.17 नोव्हेंबर,2023 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची  माहिती पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त नामदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात, सायंकाळी 06.00 वा दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी मराठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2023’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला असून, पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी सर्व रोग निदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही  वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

               पत्रकांत म्हंटले आहे की, नामदार शंभूराज देसाई यांचा 57वा वाढदिवस शुक्रवार दि.17 नोव्हेंबर,2023 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे. 57 व्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन केल्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करुन पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट व चटईचे वाटप करण्यात येणार आहे.दौलतनगर येथील शिवदैालत बँकेच्या शाखेच्या 20 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन करुन त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर स.11.00 पासून दुपारी 04.00 वाजेपर्यंत नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत.सायंकाळी 06.00 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2023’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दरम्यान मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नियोजन समितीने केले आहे. दरम्यान नामदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहनही पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

चौकट: शालेय साहित्य भेट देत जास्तीत जास्त वहीतूला करण्याचे वाढदिवस नियोजन समितीचे आवाहन.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून हार,पुष्पहार व पुष्पगुच्छ न आणता शालेय साहित्य भेट स्वरुपात आणावे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांनी  जास्तीत जास्त संख्येने वहितूला करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असून या वहयांचा उपयोग हा  शालेय विद्यार्थ्यांना होणार असल्याने भेट स्वरुपामध्ये जास्तीत जास्त वहीतूला करण्याचे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.