नवारस्ता/प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संकुलासाठी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून विशेष बाब म्हणून १० कोटी रुपये लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मंत्री देसाई म्हणाले,पाटण तालुका हा डोंगराळ व दुर्गम दऱ्याखोऱ्यात वसला असून यामध्ये प्रामुख्याने धनगर समाज डोंगर कपारीत राहुन दुधाच्या व्यवसायावर आपली उपजिवीका करत आलेला आहे. त्यामुळे हा समाज शैक्षणिक आणि सामाजिक सोई-सुविधांपासून अद्यापही वंचित आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करीता समाजातील सुशिक्षित तरुण वर्ग संघटित होऊन सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी समाजातील तरुणवर्गाने पाटण, जि. सातारा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संकुल उभारण्याची मागणी आपणाकडे वारंवार केली होती.
त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण पाटण तालुक्यातील सकल धनगर समाजासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी १० कोटी निधी MSRDC किंवा सिडको कडून उपलब्ध करुन देणेविषयी विनंती केली होती.त्यानुसार मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून आपल्या विनंतीची तातडीने दखल घेतली असल्याने पाटण तालुक्यातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय संकुलनासाठी आता लवकरच १० कोटींचा निधी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment