Monday, 6 July 2026

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २४ तास सतर्क राहावे; शंभूराज देसाई यांचे निर्देश -सातारा जिल्हा प्रशासनान सतर्क


मुंबई, दि. ६ जुलै : संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, आरोग्य सेवक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी यांनी २४ तास क्षेत्रात उपस्थित राहून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थान येथून सातारा जिल्ह्याची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासनाला सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.


या बैठकीस सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अधीक्षक अभियंता (सातारा सिंचन मंडळ) अभय काटकर, प्रांताधिकारी (पाटण) सोपान टोणपे, तहसीलदार (पाटण) अनंत गुरव, प्रांताधिकारी (वाई) योगेश खरमाटे, प्रांताधिकारी (सातारा) आशिष बारकूल, महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हरनुल तसेच सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा (कोयना बांधकाम मंडळ), महावितरण आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणतीही जोखीम न पत्करण्याचे आवाहन केले आहे. आपले जीवन अमूल्य आहे. पर्यटनाचा आनंद पुन्हा घेता येईल; मात्र सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी आहे, असेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.


साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढविणे, अतिधोकादायक धबधब्यांजवळील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवणे, नदी-नाल्यांच्या परिसरात नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी निर्देशही त्यांनी दिले.


तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच स्थलांतरित नागरिकांसाठी सुरक्षित निवास, अन्न, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि आवश्यक औषधसाठ्याची तत्काळ उपलब्धता सुनिश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील परिस्थितीचा वेळोवेळी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment