Friday, 3 July 2026

सभागृहाच्या प्रतिष्ठेसाठी शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य; मंत्री शंभूराज देसाई यांचा आग्रह

                                                                                  

मुंबई, दि. ३ जुलै : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहातील शिस्त, संसदीय परंपरा आणि सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाम भूमिका मांडली.

सदस्यांप्रमाणेच अधिकारी व प्रेक्षक गॅलरीतील सर्व संबंधितांनीही सभागृहाच्या नियमांचे आणि शिष्टाचारांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली.

सभागृहातील प्रत्येक घटकाने संसदीय परंपरांचा आदर राखणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. यापूर्वीही गॅलरीतील शिस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र अद्याप काही व्यक्ती गॅलरीत मोबाईलचा वापर करत किंवा बेशिस्तपणे बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारचे वर्तन सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे असल्याने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

सभागृहात प्रवेश करणाऱ्या अधिकारी व इतर संबंधितांना शिस्तीचे नियम स्पष्टपणे समजावून सांगावेत, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. देसाई यांनी केली. सभागृहातील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा घटनांवर लक्ष ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सूचनेची दखल घेत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात येतील आणि शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

सभागृहाची प्रतिष्ठा, संसदीय शिष्टाचार आणि लोकशाही संस्थांचा गौरव कायम राखण्यासाठी शिस्तीचे पालन अत्यावश्यक असल्याचा ठाम संदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी या हस्तक्षेपातून दिला.



No comments:

Post a Comment