Wednesday, 17 June 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना एफआरपीचा दुसरा हप्ता जुलैचे पहिल्या आठवडयात शेतकऱ्यांच्या बँकखाती वर्ग करणार. चेअरमन अशोकराव पाटील यांची माहिती.



                   

             दौलतनगर दि.17:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2019-20 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन 2130 रुपयांप्रमाणे एफआरपीची 80 टक्के रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून एफआरपीचा दुसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवडयात शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने मागील सन 2019-20 च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला एकूण एफआरपीच्या 80 टक्केप्रमाणे होणारा पहिला हप्ता प्रतिटन रुपये 2130 नुसार होणारे बिल ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे.
            दरम्यान माहे मार्च महिन्यापासून देशासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारी रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सन 2019-20 च्या गळीत हंगामाध्ये उत्पादित झालेल्या साखर विक्रीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सन 219-20 च्या गळीत हंगामात उत्पादित साखरेचा उठाव न झाल्याने व साखरेच्या दरात झालेली घसरण यामुळे कोराना महामारीचे काळात साखर उद्योगावर कोसळलेल्या संकटामध्ये सर्वच साखर कारखान्यांसमोर एफआरपीनुसार उर्वरित होणारी ऊसबिलाचे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसे अदा करायचे ? हा प्रश्न आवासून उभा आहे. दरम्यान केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडून दि. 31 मार्च 2020 अखेर रुपये 511.91 लाख विविध अनुदानाची रक्कम आपले कारखान्याला येणे आहे. तसेच सन 2020-21 मध्ये निर्यात साखर व बफर स्टॉक अनुदानाची 528.11 लाख अशी एकूण रुपये 1040.02 लाख इतकी अनुदानाची रक्कम आपले कारखान्यास येणे बाकी आहे. सदर रक्कम प्राप्त होण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे गृहग्रामीण राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये आमचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने मात्र शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा योग्य नियोजनातून सामना करत केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार एफआरपीचा रक्कमेपोटी दुसरा हप्ता माहे जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवडयात केंद्र व राज्य शासनाकडील 10 कोटींचे थकीत अनुदान मिळण्याच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती चेअरमन अशोकराव पाटील यांनी पत्रकांत दिली आहे.

Thursday, 11 June 2020

आपत्तीच्या व्यवस्थापनेकरीता सुपने मंडलातील शासकिय यंत्रणनेने तयार रहावे. नामदार शंभूराज देसाईंच्या कराड येथील आढावा बैठकित अधिकाऱ्यांना सुचना.


     



दौलतनगर दि.11: गतवर्षीपेक्षा यंदा कोयना धरणामध्ये दुप्पट पाणी साठा असल्याने अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये धरणाचे पाणीसाठयामध्ये वाढ झाल्यास कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोयना नदीकाठी असलेल्या सुपने मंडलातील गावांमध्ये पुरपरिस्थतीचा संभाव्य धोका ओळखून पावसाळयातील अतिवृष्टीच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाकरीता सुपने मंडलातील सर्व शासकीय यंत्रणेने तयार रहावे, अशा सुचना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
            नामदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह,कराड या ठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सुपने मंडलातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, प्रातांधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव,तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी आपपसाहेब पवार,कराड शहरचे पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील,ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ,उंब्रज सपोनी अजय गोरड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आडके,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक पाटील,महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभिमन्यू राख,पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय पवार,लघुसिंचन उपअभियंता पद्माळे,वनक्षेत्रपाल काळे,आगारव्यवस्थापक जे. डी. पाटील,तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला,सह.आयुक्त पशुसंवर्धन डी.बी.बोर्डे, जि. प. बांधकाम विभागाचे आर. एस. भंडारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम.के.पाटील यांची उपस्थिती होती.
             याप्रसंगी नामदार शंभूराज देसाई म्हणाले, लवकरच पावसाळा सुरु होणार असून यंदा सरासरी इतका पाऊस  पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणातील पाणीसाठा हा दुप्पट असल्याने पावसाळयामध्ये धरण पाणलोट क्षेत्रातून जादा पाण्याची आवक झाल्यास कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोयना नदीकाठी अतिवृष्टीच्या काळात मुसळधार पाऊस तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकरीता सुपने मंडलातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी तयार रहावे,अशा सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. याकरीता सुपने मंडलामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोकादायक पुलाचा सर्व्हे तात्काळ करुन त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा.जेणेकरुन धोकादायक पुलांच्या बाजूने पर्यायी वाहतूक सुरु ठेवता येईल. आपत्तीच्या कालावधीमध्ये वाहतुक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करण्याकरीता बांधकाम विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवावी.दरम्यान तांबवे येथील पुलाचे ठिकाणी पाणी साचून त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या पुलाची पाहणी करुन त्याचा अहवालही सादर करावा. तसेच सुपने मंडलांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी पाण्याचे निर्जंतुकीकरण करुन गावामध्ये नालेसफाईची व नळ पाणी पुरवठा योजनांच्या ठिक-ठिकाणी असलेल्या पाण्याच्या गळतीच्या दुरुस्तीची कामे करावित. त्यामुळे पावसाळयात साथींच्या रोगाचा प्रसार होणार नाही.सर्व नळ पाणी पुरवठा योजनांमधून गावांना सुरळीत पाणी पुरवठा होण्याचेपदृष्टीने नळ पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती पाणी पुरवठा विभागाकडून करावी. तसेच पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाचा वेग वाढवून 100 टक्के लसीकरण करावे. आपत्तीच्या कालावधीमध्ये जून महिन्याबरोबर जुलै महिन्यातील धान्य पुरवठयाची मागणी असेल तर पुरवठा विभागाकडून धान्य पुरवठा करण्यात येऊन खरीप पेरणीच्या अनुषंगाने आवश्यक बी बियाणे,खते याची उपलब्धता करण्यात यावी,अशा सुचना देऊन त्यांनी पुढे म्हंटले आहे की, अतिवृष्टीच्या काळात तसेच कोयना धरणातून सोडण्या येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीज पुरवठा खंडीत केला जातो. अशावेळी किमान रात्रीच्यावेळी विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. पावसाळयातील साथीचे आजारांवर तातडीने औषधोपचार होण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा, तसेच आपत्तीच्या काळात महसूल व पंचायत समितीचा आरोग्य विभाग यांचा संयुक्त कॅम्प संबंधित गावामध्ये ठेवावा अशा सूचना आरोग्य व महसूल विभागाला देऊन आपत्तीच्या काळात सुपने मंडलातील सर्वच शासकीय यंत्रणेने तातडीने उपाय येाजना करण्यासाठी तयार राहून प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना नामदार शंभूराज देसाई यांनी या बैठकीत दिल्या.

Wednesday, 10 June 2020

कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील घाटमाथा पाटण ते कराडमधील रस्त्याचे उर्वरित काम तातडीने करा. नामदार शंभूराज देसाईंच्या अधिका-यांना बैठकीत सुचना.



          दौलतनगर दि.10 :- कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते पाटणच्या पुढील भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु करण्यात आले असून लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहण्याचेदृष्टीने कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महागार्वावरील घाटमाथा,पाटण ते कराड दरम्यानच्या रस्त्याचे काम एल.ॲन्ड टी कंपनीने आणि काम करुन घेणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी तातडीने करा,अशा सुचना गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या आहेत.
          पाटण येथील तहसिल कार्यालयात कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील घाटमाथा पाटण ते कराड या दरम्यानच्या रस्त्याचे कामासंदर्भात नामदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समिर यादव,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. सागांवकर, कनिष्ठ अभियंता एम. एम. फडतरे,गटविकास अधिकारी मिना साळूंखे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,उपवनसंरक्षक विलास काळे,भूमिअभिलेखचे ग.रा.त्रिभुणे,जोंधळेकर,पाटण नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अभिषेख परदेशी,एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर घोष, विठ्ठल सावंत, एस.एस.पोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
        कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नामदार शंभूराज देसाई म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजुर करण्यात आले असून अडीच वर्षापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने घाटमाथा पाटण ते कराड रस्त्यावर ठिक-ठिकाणी रस्त्याची पुर्णत: खुदाई केली असून रस्त्याचे काम अजूनही संथगतीने सुरु आहे. रस्त्याची खुदाई करण्यात आल्याने मोठया प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या असून त्या-त्या वेळी कराड ते पाटण दरम्याच्या रस्त्याचे काम पुर्ण करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. पाटण मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता दिलेल्या मुदतीत या रस्त्याचे  काम पुर्ण झाले नसल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पुढे म्हंटले आहे की, लवकरच पावसाळा सुरु होत असल्याने दोन दिवसात रस्त्याचे काम सुरु केले नाही तर राष्ट्रीय महार्गाचे काम पाहणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देत त्यांनी पुढे म्हंटले की, सदर रस्त्याच्या कामाकरीता तातडीने आवश्यक ते कामगार यंत्रणा उपलब्ध करावी.तसेच अतिवृष्टीच्या काळात रस्त्यावर ठिक-ठिकाणी मोठया प्रमाणांत पाणी साठणे तसेच खुदाई केलेल्या रस्त्यावर चिखल झाल्यास लहान मोठे अपघात घडण्याची शक्यता असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून एल अँड टी कंपनीकडून घाटमाथा,पाटण ते कराड रस्त्यावर खुदाई केलेल्या ठिकाणी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची पर्यायी यंत्रणा सतर्क ठेवावी जेणेकरुन रस्त्यावर पाणी साठणार नाही तसेच चिखल होणार नाही, याची काळजी घ्यावी. माहे जुन अखेर या रस्त्यावरील उर्वरित गावांचा 3 डी पुर्ण करुन घ्यावा.जेणेकरुन 3 डी  पुर्ण झाल्यानंतर तातडीने उर्वरित रस्त्याचे काम पुर्ण करता येईल असे सांगून या रस्त्यावरील खड्डयांचीही दुरुस्ती तातडीने करण्याच्या सुचना राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या असल्याचेही त्यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Monday, 8 June 2020

कोरोना रुग्ण सापडल्याने जांभेकरवाडी ग्रामस्थांनी घाबरु नये. जांभेकरवाडी गावाची नामदार शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांसह केली पहाणी.


        
दौलतनगर दि.08 :-गत आठवडयात पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असून जांभेकरवाडीत कोरोना रुग्ण सापडल्याने गावांत सर्वत्र काळजीचे सावट निर्माण झाले आहे. परंतु प्रशासनाला बरोबर घेऊन आम्ही कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याने जांभेकरवाडी ग्रामस्थांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून शासकीय यंत्रणेला ग्रामस्थांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन नामदार शंभूराज देसाई यांनी जांभेकरवाडी ग्रामस्थांना केले.
       कोरोना रुग्ण सापडलेल्या जांभेकरवाडी गावांस त्यांनी काल अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. पाटण तालुक्यात नवसरी व जांभेकरवाडी या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले असून नवसरी गावाला भेट दिल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी जांभेकरवाडी येथे गावातील जनतेला घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आवाहन करण्याकरीता तसेच प्रशासनाने केलेल्या उपाय योजना पाहणेकरीता शासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन तेथील सर्व परिस्थितीची पाहणी केली.
               यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, गावामध्ये कुणीही भिऊन जावू नका असे आवाहन करीत त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता आम्ही सर्वजण कार्यरत आहोत असे जांभेकरवाडी गावातील जनतेला सांगितले. तसेच गावकऱ्यांना जीवनावश्यक साहित्य मिळणेसंदर्भात प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत.याचीही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली व दोन दिवसांत धान्य पुरवठा करण्याच्या सुचना पुरवठा विभागाला केल्या.तसेच गावामध्ये दररोज आरोग्य विभागाने गावातील ग्रामस्थांचा सर्वे करुन ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गावकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी गावांमध्ये पिण्याचे पाणी तसेच वीजपुरवठा सुरळीत राहील याची प्रशासनाने व्यवस्था करा.गावात नाकाबंदी करण्यात आलीच आहे परंतू बाहेरचे कोणी गांवात येत नाही ना? आणि गावातील कोण बाहेर जात नाही ना?  याची तपासणी गावकऱ्यांनीच करावी जेणेकरुन संकट वाढणार नाही. सापडलेला रुग्णावर उपचार सुरुच आहे परंतू त्या व्यक्तीच्या कोण संपर्कात आले असतील तर त्यांनी माहिती न लपविता प्रशासनाला सांगावी. प्रशासनाचे सहकार्य आहेच गावकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करुन लवकरात लवकर हे गांव कोरोनामुक्त होईल याची काळजी गावकऱ्यांनीच घ्यावी असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गावांत कसल्या प्रकारची अडचण तर नाही ना? अशा प्रकारे विचारणा करुन अडचणी असतील तर प्रशासनाला सांगा असेही ना.शंभूराज देसाईंनी गावचे सरपंच तानाजी घाडगे, उपसरपंच सत्यवान कदम, गणपत कदम व पोलिस पाटीलविजय कदम यांना सांगितले.
               यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,मंडल अधिकारी ब्रम्हे, ग्रामसेवक धाराशिवकर, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, उंब्रज पोलिस स्टेशनचे सपोनि अजय गोरड, विशाल पाटील, यांची उपस्थिती होती.

Saturday, 6 June 2020

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र प्रकल्प अशा नामविस्तारासाठी शिफारस करण्याचा बैठकीत निर्णय- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं यांची माहिती


सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे सहयाद्री  व्याघ्र प्रकल्प  अशा नामविस्तारासाठी  शिफारस करण्याचा बैठकीत निर्णय- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं यांची माहिती
           
दौलतनगर दि.07 :- केंद्र व राज्य शासनाकडून पश्चिम घाटामध्ये  सहयाद्री  व्याघ्र प्रकल्प  असून  केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून साकारत असलेल्या या सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र प्रकल्प असा नामविस्तार करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाचे  बैठकीमध्ये झाला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी दिली.
            सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  महाराष्ट्र राज्यातील सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची सन 2020-21 ची सभा व्हिडीओ कॉन्फरंस व्दारे  पार पडली. या बैठकीत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,नागपूर येथून नियामक मंडळाचे अध्यक्ष वनमंत्री ना.संजय राठोड, आमदार आशिष जैसवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) सुरेश गैरोला, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकुडकर,मुंबई येथून प्रधानसचिव वने मनुकुमार श्रीवास्तव,अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, वनसंरक्षक तथा वनक्षेत्रपाल सत्यजित गुजर,उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा,उपसंचालक महादेव मोहिते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे,सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजिव) सुरेश साळूंखे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
             यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, सहयाद्री व्याघ्र प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून वनविभागामध्ये वाघाचे संवर्धन करण्याचा महत्तवाचा हेतु असल्याने राज्य शासनाकडून यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करुन प्रतिवर्षी विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी असलेल्या सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र प्रकल्प असे नामविस्तार करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय आजच्या सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी या शिफारसीला मान्यता देऊन तसा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेमार्फत कॅबिनेटमध्ये मंजूरीकरीता सादर करण्याचे एकमताने ठरले.  सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र प्रकल्प असे नामकरण करण्याकरीता गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जास्तीत जास्त विकास कामे करण्यात यावीत असे निर्देश असून सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये विविध विकास कामे करताना संबंधित लोकप्रतिनिधींना विचारात घेऊनच हि विकास कामे करण्यात यावीत अशी मागणी केली.तसेच सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या आराखडयात पाटण मतदारसंघातील पर्यटन आराखडयाचा समावेश करुन जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी.तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली प्राण्याची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पाणी साठे व जलस्त्रोतांचे संवर्धन करणे तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाला राज्यातून येणाऱ्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकरीता जागो-जागी वॉकिंग ट्रॅकची निर्मिती व पर्यटनाचे पॉईंट विकसित करुन पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याच्या सुचना मंत्री देसाई  यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री देसाई यांनी सुचविलेल्या पर्यटन आराखड्याचा समावेश प्राधान्याने करा-वनमंत्री ना संजय राठोड

         गृहराज्य मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी सुचविलेल्या सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटन वाढीकरीता आवश्यक असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन आराखडयाचा सहयाद्री व्याघ्र नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या आराखडयात प्राधान्याने समावेश करावा अशा सुचना वनमंत्री नामदार संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये  पर्यटन विकासाला चालना मिळणार असून यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.


आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेकरीता शासकिय यंत्रणनेने सतर्क रहावे. - नामदार शंभूराज देसाईंच्या आढावा बैठकित अधिकाऱ्यांना सुचना.





दौलतनगर दि. 06:  सातारा जिल्हयात सर्वात जास्त महाबळेश्वरबरोबर पाटण तालुक्याला प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो.आपले तालुका प्रशासनाला तालुक्यातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे.आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो.आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता आपत्ती व्यवस्थापनेकरीता सर्व शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सुचना गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
            नामदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारतीत लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे,शशिकांत गायकवाड,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,सपोनि तृप्ती सोनावणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, एस.व्ही.पाटील, जि.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,पशुवैद्यकीय अधिकारी जाधव,महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे आदमाने, जाधव, ढेबेवाडीचे सपोनि उत्तम भजनावळे, कोयनानगरचे सपोनि एम.एस.बावीकट्टी,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,गट शिक्षणाधिकारी नितीन जगताप,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.
             याप्रसंगी नामदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात गतवर्षी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे पुरपरिस्थती निर्माण झाली होती. तशी यावर्षी पुरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्ध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी नुकतीच मंत्रालयीन स्तरावर तातडीची बैठक घेऊन राज्यातील विभागीय आयुक्तांना सुधारित उपाय-योजना करण्याकरीता शासनस्तरावर योग्य त्या सुचना दिल्या आहेत. कोयना धरणात गतवर्षीपेक्षा आजच्या दिवशी दुप्पटीपेक्षा जास्त पाणी साठा असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने धरणपाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक आणि धरणातून करण्यात येणारा विसर्ग याची सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच वडनेर समितीच्या अहवालानुसार कोयना धरणाला आर.ओ.एस.मान्यता दिली असल्याने धरणाच्या दरवाजापर्यंत पाणी साठा झाल्यास धरणातून 5 टी.एम.सी.पाणी सोडण्याची मुभा आहे. परिणामी आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. दरम्यान तालुक्यातील इतर धरणांतील पाणी साठयांची माहिती घेऊन मंत्री देसाई यांनी तारळी धरणाची गतवर्षीची पुररेषेची नव्याने आखणी करण्यात यावी अशा सुचना संबंधित विभागाला दिल्या.
                    खरीपाच्या आढावावेळी प्रशासनाने चालू वर्षातील 100 टक्के पावसाचा अंदाज धरुन आपली वायरलेस यंत्रणा व सॅटेलाईट फोन यंत्रणा सुसज्ज ठेवावी. तसेच गतवर्षीच्या पुररेषेतील कुटुंबाचा मास्टर प्लॅन तयार करुन रेड लाईन व ब्ल्यू लाईनमधील कुटुंबांना सुरिक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची स्थळे सुसज्ज करा.तसेच ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी टी.सी.एल. व पावसाळयातील साथीचे आजारांवर तातडीने औषधोपचार होण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.पावसळयात तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांमधून पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व विज वितरण कंपनीने सतर्क रहावे.तसेच विज वितरण कंपनीने अतिवृष्टीमध्ये विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी दुरुस्ती यंत्रणा विभागवार कार्यरत ठेवावी.तालुका पुरवठा विभागाकडून पावसाळयात दोन महिन्याचा धान्याचा पुरवठा वितरीत करण्यात यावा,अशा सूचना देऊन बांधकाम विभागाने तालुक्यातील पुल व रस्त्यांची कामे पुर्ण झाली असल्यास ती वाहतुकीकरीता तातडीने खुली करण्याची कार्यवाही करावी.अतिवृष्टीच्या दृष्टीने गरज असलेल्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी.तसेच अतिवृष्टीच्या काळात वाहतूक ठप्प होणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाय-योजना करण्याच्यादृष्टीने सतर्क रहावे.शिक्षण विभागाने धोकादायक शाळा इमारतीमध्ये शालेय वर्ग भरवू नयेत.शाळा माहे जुलै महिन्यात सुरु झाल्यास कोरोना रोगाचे प्रादुर्भाव रोखण्याकरीता शाळांना हॅण्ड सॅनिटायझर व मास्क याचा पुरवठा करावा.तसेच डोंगर पठारावरील जनावरांचे आठ दिवसात लसीकरण पुर्ण करावे अशा सूचना देऊन अतिवृष्टीच्या काळात तालुक्यातील सर्वच विभागातील प्रशासनाने सतर्क राहून तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना नामदार शंभूराज देसाई यांनी या बैठकीत दिल्या.

Wednesday, 3 June 2020

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात पाटण तालुक्यात शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.


           
दौलतनगर दि.03 :- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची एकूण संख्या 61 झाली असल्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन महिने कसलाही कोरोनाचा संसर्ग पाटण तालुक्यात नसताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून काही व्यक्ती तालुक्यात आल्यानंतर काही दिवसांमध्ये पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने तसेच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात आली असल्याने बाजारपेठांच्या ठिकाणी वाढती गर्दी व कोरोना संसर्गाच्या काळात धोका आणि काळजी दोन्ही वाढले असल्याने आता खऱ्या अर्थाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याकरीता पाटण तालुक्यातील शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या.
              पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तहसिल कार्यालय पाटण या ठिकाणी तातडीची बैठक घेतली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसिलदार थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,सपोनि तृप्ती सोनावणे, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
                      याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये बाहेरगांवाहून आलेल्यांनी घरात राहणेच तालुक्याच्या आणि गावांच्या हिताचे होणार आहे हे मी वारंवार आवाहन बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना करीत आहे.कोरोनाचा धोका दिवसेदिवस वाढत आहे.गेली दोन महिने पाटण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नव्हता पंरतू आता तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 झाली असून कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसात पाटण तालुक्यातील नवसरी,जांभेकरवाडी,तामिणे या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता जे लोक बाहेरगांवाहून तालुक्यात आले आहेत ज्या गांवात बाहेरगांवाहून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी पोलीस आणि महसूल विभागाने गावभेटी देवून हे लोक घरातच कसे राहतील यावर प्रशासनाने जादा लक्ष दयावे जेणेकरुन कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवडयामध्ये पावसाचे आगमन होणार असल्याने पुरवठा विभागाने दोन महिन्याचे धान्य वाटपाचे नियोजन करावे व आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक तो औषधांची उपलब्धता करावी,अशा सुचना केल्या. तसेच नव्याने आढळूल आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या गावांत पोलीस यंत्रणेकडून आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यात याव्यात. परंतू आता कुठलाही निष्काळजीपणा करु नका. सध्या शासनाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी शिथीलता दिली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करुन शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे सांगून ते म्हणाले नवसरी, जांभेकरवाडी व तामिणे या गांवात आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या आहेत अशांची यादी तयार करुन तात्काळ त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या करुन घ्या त्यांचे नमुने तपासणीकरीता सादर करा अशा सुचना ना.शंभूराज देसाईंनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
चौकट: मंत्री ना.शंभूराज देसाईंची नवसरी गावांस अधिकाऱ्यांना घेवून भेट.
            पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 61 गेली असून अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे पाटण तालुक्यात काळजीचे सावट निर्माण झाले आहे. नुकतेच तालुक्यातील नवसरी,जांभेकरवाडी व तामिणे या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले होते. दरम्यान नवसरी येथे कोरोना बाधित चार रुग्ण सापडल्याने नामदार शंभूराज देसाई यांनी काल शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवून नवसरी या गांवासही भेट देवून पहाणी केली. नवसरी गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून कोण-कोणत्या उपाय योजना राबविल्या गेल्या आहेत याचा आढावा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना घेतला. तसेच गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावातील ग्रामस्थांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन करीत त्यांनी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत असेही सांगितले.