Friday, 10 July 2026

वाठोडा येथील पंतप्रधान आवास योजनेतील सर्व कामे मानकांनुसार पूर्ण; कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता नाही - प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. १० : नागपूर येथील वाठोडा परिसरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सर्व कामे मंजूर आराखडा, निविदेतील अटी-शर्ती आणि निर्धारित दर्जानुसार पूर्ण करण्यात आली असून, स्वतंत्र तांत्रिक तपासणीत कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता आढळून आलेली नाही, अशी माहिती प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

नागपूरमधील वाठोडा परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल प्रकल्प आणि तेथील मूलभूत सुविधांबाबत आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, मौजा वाठोडा येथे २६४, नगर पंचायत बीडगाव (तरोडी खुर्द) येथे २,३७४ आणि खसरा क्रमांक ६२ येथे ९४२ अशी एकूण ३,५८० घरकुले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहेत.

या प्रकल्पामध्ये मंजूर आराखड्यानुसार कंपाऊंड वॉल, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तूंची दुकाने, कन्व्हिनियन्स शॉपिंग सेंटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहिन्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग, मीटर रूम तसेच बाह्य विद्युतीकरणासह सर्व आवश्यक सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

एनएमआरडीएच्या १३ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार संबंधित सेवा-सुविधा तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ६ मार्च २०२६ रोजी वृंदावन व एकता सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे विधिवत हस्तांतरित करण्यात आल्याची माहितीही मंत्री देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई म्हणाले की, या प्रकल्पाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. संस्थेने केलेल्या तांत्रिक परीक्षण व लेखापरीक्षणामध्ये प्रकल्पातील सर्व कामे मंजूर आराखड्यानुसार, निविदेतील सर्व अटी-शर्तींचे पालन करून आणि आवश्यक दर्जानुसार पूर्ण करण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच कामांमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता आढळून आलेली नसल्याचेही संस्थेने प्रमाणित केले आहे.

त्यामुळे या प्रकल्पात कोणताही गैरव्यवहार अथवा काम अपूर्ण राहिल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्रयस्थ तांत्रिक संस्थेनेही वाठोडा येथील प्रकल्पातील कामे मानकांनुसार आणि निविदेतील सर्व अटी-शर्तींप्रमाणे पूर्ण झाल्याचे प्रमाणित केले आहे, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भातील सविस्तर माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असेही प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment