Friday, 10 July 2026

नेहरूनगर-टिळकनगर म्हाडा वसाहतीतील मलनिस्सारण उन्नतीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

 


मुंबई, दि. १० : कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर, टिळकनगर, नवीन टिळकनगर, सहकारनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील मलनिस्सारण वाहिन्यांच्या उन्नतीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील नेहरूनगर व टिळकनगर येथील सुमारे ६० वर्षे जुन्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणाबाबत आमदार मंगेश अनंत कुडाळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, के/पूर्व विभागातील नवीन टिळकनगर (चेंबूर), टिळकनगर (चेंबूर), नेहरूनगर (कुर्ला) आणि सहकारनगर (चेंबूर) येथील मलनिस्सारण वाहिन्यांच्या उन्नतीकरणासाठी टप्पा-१ चे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी मुंबई महानगरपालिका आणि ५० टक्के निधी म्हाडामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून, म्हाडाचा हिस्सा सुमारे २८५ कोटी रुपये आहे.

या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील १५ टक्के निधी एका महिन्याच्या आत मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात येईल. उर्वरित निधी कामाच्या प्रगतीनुसार आणि मुंबई महानगरपालिकेच्या मागणीनुसार चार समान हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी आमदार मंगेश कुडाळकर यांनी परिसरातील पुनर्विकासामुळे लोकसंख्या वाढणार असल्याने मलनिस्सारण व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. फेज-१ अंतर्गत रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून उर्वरित कामे सुरू आहेत. तसेच फेज-२ ची कामे तातडीने सुरू करण्यासाठी म्हाडाने आवश्यक निधी मुंबई महानगरपालिकेकडे जमा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पाच्या निधीबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करत कामाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध करून दिला जाईल आणि प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सभागृहाला आश्वस्त केले.

No comments:

Post a Comment