Monday, 13 July 2026

प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभे राहणार असल्याचे समाधान.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई

 

        दौलतनगर दि.12: अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य,स्वाभिमान,राष्ट्रनिष्ठा आणि त्याग याचे सर्वोच्च प्रतिक आहे. या स्वराज्याच्या निर्मितीस आणि संरक्षणासाठी असंख्य मावळयांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यामधील वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्याबाबत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे हे आग्रही होते.तसेच सामाजिक व शिवप्रेमी संघटना यांचे सातत्याच्या मागणीचा विचार करुन प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्याच्या पर्यटन  विभागाकडून सातारा जिल्हयातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभे राहणार  असल्याचे समाधान आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  केले.

       दौलतनगर ता.पाटण येथे वीर जिवजी महाले यांच्या स्मारकासाठी अवघ्या आठ दिवसांत निधीची तरतूद करुन सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल पर्यटन मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा मतदारसंघातील समस्त नाभिक समाजाच्यावतीने आयोजित जाहिर सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई, मा.रविराज देसाई,चि.आदित्यराज देसाई, जयवंतराव शेलार, संजय देशमुख, अशोकराव पाटील, सभापती सौ.सविता विजय पवार,उपसभापती विजय पवार, पंबाजराव देसाई,स्वाभिमानी नाभिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अधिकराव चव्हाण,पाटण तालुका अध्यक्ष विक्रम महिपाल,हरी माने,वल्लभ कदम,अनिल कदम,निलेश कदम,मनोहर सपकाळ,सोमनाथ काशिद,नवनाथ माने,दादा ढवळे,दिलीप पवार,दाजी सुर्वे,संदेश संपकाळ,विष्णू साळूंखे,संतोष यादव,निखिल चव्हाण,राजू कदम,विजय चव्हाण,कमलाकर भांदिर्गे व सतिष सपकाळ यांचे सह पाटण विधानसभा मतदारसंघातील नाभिक समाजातील महिला,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.तत्पुर्वी नाभिक समाजाचेवतीने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

           यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान यांच्या दरम्यान झालेल्या ऐतिहासिक भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलेल्या सय्यद बंडास अचूक वेळी ठार करुन वीर जिवाजी महाले यांनी महाराजांचे प्राण वाचवले होते.महाराजांच्या केसालाही धक्का लागला नाही. वीर जिवाजी महाले यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे आणि समयसुचकतेमुळे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सुरक्षित राहिला. त्या अनुषंगाने होता जिवा म्हणून वाचला शिवा ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अमर पराक्रमाची साक्ष देणारी असून आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देत आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन सोहळा मोठया उत्साहात साजरा केला जातो. या सोहळयासाठी दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक,इतिहास संशोधक,विद्यार्थी आणि शिवप्रेमी किल्ले प्रतापगडावर भेट देत असतात. त्यामुळे किल्ले प्रतापगडाचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्टया महत्तव वाढत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, वीर जिवाजी महाले यांच्या अव्दितीय पराक्रमाला चिरंतन स्वरुप देण्यासाठी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांचे भव्य स्माकर उभारण्याची सातत्याने मागणी होत होती.तसेच उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनीही मानस व्यक्त केला होता.या मागणीनुसार वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचा वारसा अधोरेखित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुन महायुतीच्या शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णयानुसार किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी पर्यटन विभागाच्या जागेत वीर जिवाजी महाले यांचे भव्य व आकर्षक स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत या स्मारकाचे उभारण्याकरीता प्रथम टप्प्यातील कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच लवकरच या स्मारक उभारण्यासंदर्भात जिल्हयातील नाभिक संघटनांच्या पदाधिकारी यांचेशी चर्चा करुन एक जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येईल आणि या स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल.असे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नाभिक समाजाची केवळ एकच संघटना कार्यरत आहे ही बाब चांगली असून आपल्या समाजाची एकजूट खूप महत्तवाची आहे. यापुढील काळामध्ये नाभिक समाजाने आपली एकजूट कायम ठेवून राहिलेले प्रलंबित मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.प्रास्ताविक दौलत कदम यांनी तर आभार सतिश माने यांनी मानले.

No comments:

Post a Comment