Monday 31 August 2020

ढेबेवाडीला ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करावयाच्या कामांची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली प्रत्यक्ष पहाणी. आठ दिवसात कोवीड रुग्णालयातून सुविधा देण्यास सुरुवात करण्याच्या केल्या सुचना.

           


दौलतनगर दि.३१ :- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने कराड तसेच सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे आठ दिवसापुर्वीच बैठक घेवून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा करुन तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या त्यानुसार या कोवीड रुग्णालयाच्या सुरुवात करावयाच्या प्रत्यक्ष कामांची पहाणी आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सर्व संबधित अधिकाऱ्यांना सोबत घेत ढेबेवाडी येथे केली.

            यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्यासमवेत पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दत्तात्रय डोंगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,ढेबेवाडीचे  सपोनी उत्तम भजनावळे सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता विद्याधर शिंदे यांची उपस्थिती होती.

             ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भातील पहाणी दौऱ्यात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.ज्याप्रमाणे पाटण तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत त्याचप्रमाणे सातारा आणि कराड येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कराड अथवा सातारा येथे कोरोना रुग्णांवर उपचार करावयाच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून आठच दिवसापुर्वी पाटण तालुक्यात ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात मी सातारा जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा केली होती. त्याअनुषगांची पुर्वतयारी करुन हे कोवीड रुग्णालय लवकर सुरु करण्याच्या सुचनाही तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करण्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात या कोवीड रुग्णालयाचे काम पुर्ण करुन या रुग्ण्यालयात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील सर्व संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसात पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील उपचाराच्या सुविधा प्राप्त होतील अशी मला आशा आहे असे शेवठी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले.

कै.शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या १०७ व्या जयतींनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक समुहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविराज देसाई यांचे हस्ते सत्कार.

 


  दौलतनगर दि.३१:- महाराष्ट्र राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री ना. शंभुराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेंचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे आजोबा कै. शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या १०७ व्या जयतीं निमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समुहातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता. पाटण या शैक्षणिक संस्थेंतील तीन माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षा फेब्रु./ मार्च  २०२० मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्याचां रोख रक्कम व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला.         प्रारंभी मोरणा शिक्षण सस्थेंचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी कै. शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या १०७ व्या जयंती दिनानिमित्त प्रतिमेला पुष्प अर्पण करुन  विनम्र अभिवादन केले.

           महाराष्ट्र राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री ना. शभुंराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेंचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचेवतीने आपले दिवंगत वडील कै. शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या दि. २९ ऑगस्ट रोजीचे जयंतीनिमित्त प्रतिवर्षी मोरणा शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी कै. शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या १०७ व्या जयंती निमित्त मोरणा शिक्षण सस्थेंतंर्गत शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,न्यु इंग्लिश स्कुल  गोकुळ—धावडे, तसेच न्यु इंग्लिश स्कुल नाटोशी या तीन माध्यमिक विद्यालयाबरोबरच कै. वत्सलादेवी देसाई इग्लिश मिडीयम स्कुल दौलतनगर मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च  २०२० व दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेजमधील उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा  फेब्रुवारी २०२० मध्ये विशेष  प्राविण्यासह प्रथम,व्दितीय व तृतिय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याचां प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी  रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून मोरणा शिक्षण सस्थेंचे अध्यक्ष रविराज देसाई याचें हस्ते सत्कार करण्यात आला.

               सध्या कोविड १९ या रोगाचे संसर्गाचे कालावधीमध्ये सोशल डिस्टन्स ठेवुन व प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन अत्यंत साध्या पध्दतीने संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये शिवाजीराव देसाई विद्यालय,सोनवडे या विद्यालयात प्रथम क्रमांक अश्विनी संजय वर्पे,व्दितीय क्रमांक प्रतिक्षा प्रकाश टोपले, तृतीय क्रमांक शोभा शांताराम सुर्वे, न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ धावडे येथील प्रथम क्रमांक राहुल आनंदा जाधव, व्दितीय क्रमाकंक संतोष नारायण कोळेकर, तृतीय क्रमांक शुभांगी भरत यादव, न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी येथील प्रथम क्रमांक लक्ष्मी भरत डांगळ, व्दितीय अंकीता रामचंद्र गायकवाड,तृतिय क्रमांक हर्षला जगन्नाथ भिसे, श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर कॉलेज दौलतनगर येथील शास्त्र विभागात प्रथम क्रमांक अक्षता शंकर देसाई, व्दितीय क्रमांक प्राजक्ता सर्जेराव देसाई,तृतिय क्रमांक अंकीता बाळासो बादल, वाणिज्‍य शाखेमध्ये प्रथम क्रमांक काजल हणमंत बोत्रे, व्दितीय क्रमांक पूनम बाळाराम पाटील,तृतीय क्रमांक रविना भरत पवार व वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर येथील प्रथम क्रमांक श्वेता श्रीमंत भाकरे,व्दितीय क्रमांक साक्षी सुनिल चव्हाण,तृतिय क्रमांक रुपेश श्रीमंत शेजवळ या माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षा फेब्रु./ मार्च  २०२० मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी तर आभार प्रविण उदुगडे यांनी मानले.

 

कोयना धरणातील १०० टीएमसी शिवसागर जलाशयाचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते ओटी भरण व जलपुजन.

 


दौलतनगर दि.:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 100 टीएमसीहून अधिक पाणीपातळी ओलंडल्यानंतर सोमवार दि.31,ऑगस्ट,2020 रोजी सकाळी १०.५७ टीएमसी पाणीसाठा असताना कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते आज सकाळी ११.०० वा करण्यात आले. कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून पुर्णत: कमी करण्यात आला आहे. आजअखेर कोयना धरणातून सहा वक्र दरवाज्यातून पुरपरिस्थितीत १९.६५ टीएमसी तर पायथा विद्यूतगृहातून १.८६ टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग यंदा केला आहे.

           यावेळी कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयनानगरचे सपोनी महेश बावीकट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी सरपंच शैलेंद्र शेलार, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणात दि. 31 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी १०.५७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

              प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने यंदा दि.31 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलंडला. 100 टी.एम.सी.ने धरण भरल्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची ओटी भरुन पूजन करण्यात येते.आज गृहराज्यमंत्री  ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते याठिकाणी विधीवत पुजा करुन कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन करण्यात आले. दरम्यान दि.०१ जुनपासून आजअखेर कोयना धरणाच्या टप्पा क्रं.१ व २ मधून २७२.५ मेगॉवॅट, टप्पा क्रं.३ मधून १४४.५ मेगॉवॅट, टप्पा क्रं. ४ मधून १६५.८ मेगॉवॅट, व पायथा विद्युतगृहातून ३७.९ मेगॉवॅट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

          याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडे  संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर या भागाचा तसेच शेजारच्या कर्नाटक आंधप्रदेश या दोन राज्यांतील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयना धरणामुळे मोठया प्रमाणांत सुटतो. सातारा जिल्हयाला विशेषत: वरदान असणारं हे कोयनेचे धरण स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कल्पनेने त्यांच्या प्रेरणेने याठिकाणी पुर्ण झाले. सुमारे 2000 मेगावॅट विजेची निर्मिती याच जलाशयातल्या पाण्यावरती करण्यात येते.आज जलपूजनच्या निमित्ताने मी कोयना माईची आराधना केलेली आहे आणि कोयनामाईकडे गारऱ्हाने मांडलं आहे की असचं या संपूर्ण महाराष्ट्रावरती पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्यासाठी लागणारी जी तहान आहे ती कोयनामाईनं अशाचप्रकारे पुर्ण करावी.कोयना धरणामुळे जी हरीत क्रांती झालेली आहे त्याची अशीच भरभराटी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

         पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गत सात,आठ वर्षापासून मिळत आहे.मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणाऱ्या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो.कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली सर्वच तालुका प्रशासन कार्यरत आहे. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

 

Saturday 29 August 2020

पणन संचालनालयाच्या संलग्न संस्थांचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना दया. गृह,पणन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या राज्य कृषि पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 


दौलतनगर दि. 29:- पणन संचालनालयाच्या संलग्न संस्था व प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, वखार महामंडळ, सहकारी पणन महासंघ,सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ,सहकारी ग्राहक महासंघ, स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प,कृषी व्यापारविषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक कार्यक्रम व समन्वीत कृषी विकास प्रकल्प इतक्या संस्था येतात,राज्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पणन संचालनालयाच्या संलग्न संस्थांचे कार्य पोहचविणे आणि त्यातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे आपले संचालनालयाचे काम आहे.शासनाने कृषि पणन संचालनालयाची निर्मितीच याकरीता केली आहे. शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा व आदर्श बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे काम कृषि पणन संचालनालयाने करावे अशा सक्त सुचना राज्याचे गृह,पणन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केल्या.
         राज्याचे गृह,पणन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली आज गुलटेकडी, पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या कार्यालयात कृषि पणन संचालनालयाच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.यावेळी कृषि पणन संचालनालयाचे सर्व वरीष्ठ अधिकारी याप्रसंगी बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने ना.शंभूराज देसाईंचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
      प्रारंभी पणन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर पणन  विभागामार्फत कोणकोणती कार्यवाही करण्यात आली याची सविस्तर माहिती कृषि पणन संचालनालयाच्या सर्व अधिकाऱ्याकडून घेतली व कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन खरेदी विक्री व्यवहार चालू ठेवून जीवनावश्यक वस्तू पुरवठा साखळीत अडथळे येणार नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी व त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी कृषि पणन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
     तसेच शासनाने ज्या दृष्टीकोनातून पणन संचालनालयाची निर्मीती केली आहे व उददेश ठरवून दिले आहेत त्यादृष्टीने कामकाज व्हावे. शेतमालावर घेण्यात येणाऱ्या अडत, हमाली, तोलाईबाबत जे धोरण ठरविण्यात आले आहे त्या धोरणानुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज चालते का? हेही पहाणे तितकेच गरजेचे आहे.बाजार समित्यांच्या कामकाजावर आपले कायदेशीर नियंत्रण असणे आवश्यक आहे. शेतमाल उत्पादकांना त्यांचा माल योग्य रितीने विकला जावा, त्यांची फसवणुक होऊ नये, तसेच राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यामध्ये चांगल्या दर्जाच्या शेतीमालाचे उत्पादन होण्यास उत्तेजन देण्याचेही काम करण्यात यावे. शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा व आदर्श बाजारपेठ उपलब्ध करुन देणेसाठी थेट पणन धारकांना परवाने देण्याची महाराष्ट़ कृ‍‍‍षि उत्पन खरेदी विक्री तरतुद आहे.त्यानुसार शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा व आदर्श बाजारपेठ उपलब्ध करुन दयाव्यात.
     दरम्यान कोविड-19 च्या संक्रमानानंतर शासनाने केलेल्या लॉकडाऊनचे काळात शेतकऱ्यांना कापुस विक्री करता आली नाही. शेतकऱ्यांकडे बराच कापुस अविक्रीत असल्याने कापुस विक्री करण्यास मान्यता देण्याची मागणी आम्ही कृषी विभागाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली होती. शासनाचे परवानगीने चौथ्या महिन्यापासून परत कापुस खरेदी करण्यास सुरुवातही करण्यात आली आहे.असे सांगत त्यांनी कोविड -19 च्या कालावधीमध्ये शासनाने परवानगी दिल्यानंतर किती क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली याचीही माहिती पणनराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत घेतली.
चौकट:- पणनराज्यमंत्र्यांनी सुमारे अडीच तास घेतली पणन मंडळाची बैठक.
           पणन संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संलग्न संस्था व प्रकल्प याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या लाभाच्या कोणकोणत्या योजना राबविल्या जातात याची बहूतांशी माहिती राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही ती माहिती तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याकरीता करावयाच्या उपाययोजनासंदर्भात पणन राज्यमंत्र्यांनी आजची बैठक तब्बल अडीच तास घेतली.

Thursday 27 August 2020

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे खजिनदार(कोषाध्यक्ष)पदी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची पुनश्च: निवड

 


 

दौलतनगर दि.:- दि.११ डिसेंबर,१९६७ रोजी कोयना परिसरात झालेल्या भूकंपामुळे पीडीत व्यक्तींचे / कुटुंबांचे व तेथील दुर्गम भागांचे पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची स्थापना करण्यात आली होती.या समितीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष आहेत.राज्यात नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यामुळे या समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना करण्यात आली असून विद्यमान मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अध्यक्षतेखालील या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची पुनश्च: फेरनिवड करण्यात आली आहे. समितीच्या पुर्नरचनेचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दि.२७.०८.२०२० रोजी पारित केला आहे.

दि.११ डिसेंबर,१९६७ रोजी कोयना परिसरात झालेल्या भूकंपामुळे पीडीत व्यक्तींचे/ कुटुंबांचे व तेथील दुर्गम भागांचे पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची स्थापना करावी ही मुळ कल्पना राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री व राज्याचे कर्तबगार गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडली. भूकंपामुळे पीडीत व्यक्तींना/ कुटुंबांना या मोठया दुर्घटनेतून सावरण्याकरीता केंद्राकडून, राज्यातून तसेच इतर राज्यातून जी मोठया प्रमाणात मदत आली होती या मदतीमधून राहिलेली रक्कम राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवण्याचे आणि त्या रक्कमेच्या व्याजातून या परिसरातील भागाचा विकास करण्याचे धोरण यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही समिती कार्यरत आहे.

            त्याप्रमाणे राज्यात सध्या नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यामुळे या समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष असून मुख्य सचिव हे पदसिध्द विश्वस्त तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हे विश्वस्त व सचिव आहेत.उपरोक्त समितीचे नियम व विनियमातील तरतूदीनुसार समितीच्या एकूण ०९ विश्वस्तांपैकी ०३ पदसिध्द विश्वस्त वगळता उर्वरीत ०६ निवडून आलेल्या सदस्यांची निवड कोयना भूकंपग्रस्त तालुक्यातील विधानसभा सदस्यांमधून करण्यात येते.या सहा सदस्यांमधूनच खजिनदार (कोषाध्यक्ष) निवडण्यात येतात. सन २००४ ते २००९ या कालावधीत आमदार असताना शंभूराज देसाई हे समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.सन २०१४ ला पुनश्च: पाटण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य झालेनंतर तत्कालीन भाजप-सेना युतीच्या कार्यकालात कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी त्यांची प्रथमत: निवड करण्यात आली होती. आता नव्याने पुर्नरचना झालेल्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी या समितीच्या  खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनाच महाविकास आघाडीच्या वतीने कायम ठेवण्यात आले आहे.

            दरम्यान सन २०१४ ला विधानसभा सदस्य झालेनंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ना.शंभूराज देसाईंची कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या कोषाध्यक्ष पदी निवड केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यांचेकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन राज्य शासनाकडून कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासाला कोयना भूकंपग्रस्त तालुक्यातील विविध विकासकामे करण्याकरीता देण्यात येणारी ०५ कोटी रुपये ही रक्कम अल्प असून यामध्ये ०५ कोटी रुपयांची वाढ करुन एकूण १० कोटींचा निधी या समितीमार्फत भूकंपप्रवण तालुक्यांना देण्यात यावा अशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांनीही त्यांची मागणी तात्काळ मान्य केल्याने समितीमार्फत आता प्रतिवर्षी १० कोटी रुपयांचा निधी हा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासाला देण्यात येतो. एकूण निधीच्या ३५ टक्के वाटा हा पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना भूकंपप्रवण विभागाच्या विकासाकरीता देण्यात येतो. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामधील ना.शंभूराज देसाईंचे कार्य उल्लेखनीय असल्यामुळेच त्यांची या समितीच्या  खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी फेरनियुक्ती झाली आहे.त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ना.शंभूराज देसाईंचे अभिनंदन केले आहे.

राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी साताऱ्यात केले पर्यावरणपुरक पारंपारिक गणेश विसर्जन.

 


दौलतनगर दि.२७:- राज्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे घरातील श्री.गणरायाचे प्रथेप्रमाणे गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करण्यात येत असते.आज गौरी विसर्जनादिवशी गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सातारा नगरपालिकेने हुतात्मा स्मारक परिसरात उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक असे पारंपारिक श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करुन राज्यातील जनतेनेही यंदा व यापुढेही कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक श्री. गणेशमुर्तींचे विर्सजन करावे असा संदेश दिला आहे.यावेळी युवा नेते यशराज देसाई(दादा) हे उपस्थित होते.

              सातारा येथे सातारा नगरपालिकेने हुतात्मा स्मारक परिसरात उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक असे पारंपारिक श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करताना राज्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, आमचे घरातल्या गणरायाचं प्रथेप्रमाणे गौरी ज्या दिवशी जातात त्या दिवशी विसर्जन होत असते त्याप्रमाणे घरगुती पध्दतीने मी माझ्या घरातल्या गणरायाचे आज माझे परीवारासह उपस्थित राहून याठिकाणी सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या गणेश विसर्जनाच्या कृत्रीम हौदामध्ये श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन केलेले आहे. या सात दिवसामध्ये गणेश चतुर्थी पासून घरातले सर्व धार्मिक सोपस्कार आम्ही सर्व परिवाराने मिळून एकत्र पार पाडले.कोरेानाचा संसर्ग असल्यामुळे खुप मोठे कार्यक्रम कुणालाच यावर्षी करता आले नाहीत.परंतु तरी सुध्दा विधी मार्ग शास्त्रपरंपरेप्रमाणे आपण सगळयांनी आपआपल्या घरी हा गणेशोत्सव साजरा केला आहे. मी सातारा नगरपालिकेने श्री.गणेशमुर्ती विर्सजनाकरीता हुतात्मा स्मारक परिसरात जे कृत्रिम तळयाच नियोजन केले आहे त्याठिकाणी माझे घरचे श्री.गणेशमुर्तीचे पर्यावरणपुरक असे विर्सजन केले आहे. सातारा नगरपालिकेने अतिशय चांगल नियोजन केलेले आहे. पर्यावरणाच रक्षण करण्यासाठी अशा पध्दतीने तयार केलेल्या कृत्रिम तळयामध्ये श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करणं योग्य आहे. श्री.गणरायाला आज सातव्या दिवशी मानानं अनेकांनी निरोप दिलेला आहे.अकराव्या दिवशीही पर्यावरण पुरक असेच श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन राज्यातील जनतेने करावे. असे मी सर्वांना आवाहन करतो.

                   श्री.गणेशमुर्तीचे विर्सजन करताना मी श्री.गणरायापुढे एवढीच मागणी केली आहे की, गणपती बाप्पा राज्यावर आलेलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर करा आणि पुढच्या वर्षी लवकर या यावर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे श्री.गणेशोत्सवानिमित्त जे उत्सव करणे बाकी राहीले आहेत तो उत्सव याच्यापेक्षा दुप्पट आनंदात पुढच्या वर्षी साजरा करण्याची संधी श्री.गणरायाने आम्हा सर्वांना दयावी. व महाराष्ट्र राज्यात राज्याचे लोकप्रिय मुख्मयंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला श्री.गणरायाचा आशिर्वाद कायम रहावा अशी मी गणराया चरणी प्रार्थना केली असल्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.

शहीद जवान कै.गजानन मोरे यांचे २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन.

 

              

दौलतनगर दि.२७:-सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे आज दि. २७ ऑगस्ट रोजीचे २१ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षीचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उंब्रजचे सपोनी अजय गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती.

                  प्रारंभी गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद जवान कै.गजाजन मोरे यांचे भूडकेवाडी ता.पाटण येथील शहीद स्मारकातील अर्धाकृती पुतळयाला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण केले. अभिवादनानंतर गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद स्मारक पुढील ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस बँन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन अभिवादन केले. भुडकेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनीनी ध्वजगीत सादर केले.              

                           देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्हयातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे.योगदान,बलीदान दिले आहे.त्यांचे स्मरण करणे त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होणे, अभिवादन करणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे हे त्यातीलच एक. शहिद जवान कै.गजानन मोरे यांनी आपल्या गावाचे,तालुक्याचे,जिल्हयाचे,महाराष्ट्राचे  नाव देशामध्ये अजरामर केले आहे.त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाने त्यावेळी जो प्रसंग ओढावला त्यातून हे कुटुंब सावरत आहे त्यांना साथ करणे, पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी प्रतिवर्षी कुठेही असलो तरी आजच्या दिवशी शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे स्मृतीदिनी भूडकेवाडी येथे उपस्थित असतो. मी महाराष्ट्र राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून शहिद जवान कै. गजानन मोरे यांच्या स्मृतिला उजाळा देत त्यांना राज्य शासनाच्या  व राज्यातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. असे यावेळी बोलताना गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.

              कार्यक्रमास याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर,बबनराव भिसे,माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, शिवदौलत सहकारी  बँकेचे संचालक अभिजित पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध गावचे सरपंच,सदस्य कै.गजानन मोरे यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे आणि त्यांचे कुटुंबिय यांची  प्रमुख उपस्थिती होती.

 

Tuesday 25 August 2020

ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ३५ बेडचे ऑक्सीजनसह कोवीड रुग्णालय लवकर सुरु करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 

          

दौलतनगर दि.२५:- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड तसेच सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे पाटण तालुक्यात ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्णालय सुरु करणेस सुविधा आहेत त्याठिकाणी ३५ बेडचे ऑक्सीजनसह कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा झाली असून त्याअनुषगांची पुर्वतयारी करुन हे कोवीड रुग्णालय लवकर सुरु करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तहसिल कार्यालयात तालुका प्रशासनाच्या कोवीड संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांना केल्या. 

              पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली आज तहसिल कार्यालय पाटण याठिकाणी तालुक्यातील कोरोना उपाययोजना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,नायब तहसिलदार प्रशांत थोरात,कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.

           याप्रसंगी प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी संपुर्ण पाटण तालुक्यातील गाववाईज कोरोना बाधितांची माहिती तालुका प्रशासनाकडून घेतली. तालुक्यातील प्रमुख गांवामध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे.कोरोना रुग्णांचा तालुक्याने ५०० च्या वर टप्पा ओलंडला आहे.एकूण ५७६ कोरोना बाधित रुग्ण आढळले त्यापैकी ३६७ रुग्ण बरे झाले आणि १७९ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांच्या ३० रुग्ण मयत झाले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कराड असो वा सातारा असो याठिकाणीही रुग्ण असल्याने आपल्या पाटण तालुक्यातील रुग्णांना कराड, सातारा याठिकाणी उपचाराकरीता बेड उपलब्ध होत नाहीत त्यामुळे पाटण तालुक्यात ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्णालय सुरु करणेस सुविधा आहेत त्याठिकाणी ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर माझी चर्चा आहे या कोवीड रुग्णालयाकरीता एमबीबीएस वैद्यकीय अधिकारीही उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.आपल्या तालुका प्रशासनाच्या यंत्रणांनी हे कोवीड रुग्णालय लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने आपणांकडून ज्या उपाययोजना या ग्रामीण रुग्णालयात करण्याची आवश्यकता आहे त्या उपाययोजना तात्काळ पुर्ण करुन घ्याव्यात जेणेकरुन लवकर हे कोवीड रुग्णालय सुरु करुन कोरोना बाधित रुग्णांची होणारी गैरसोय दुर करण्यास आपल्याला मदत होईल.असे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बैठकीत सुचित केले.

              दरम्यान १७९ जे कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत त्यांची तपशिलवार माहिती ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत घेतली. कोरोनाची साखळी वाढू न देता ज्या उपाययोजना तालुका प्रशासनाच्या वतीने करणे आवश्यक आहेत त्या उपाययोजना तालुका प्रशासनाने कराव्यात असे सांगत तालुक्यातील नागरिकांनीही आपल्या तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पहाता स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणेकरीता आवश्यक ती काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे तसेच तपासणी करण्याचे प्रमाणही जास्त वाढल्याने रुग्णांचे संख्येत वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत असून प्रशासनाच्या सहकार्याने नागरिकांनीही आपली काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले.

चौकट:-नागरिकांची मागणी असेल तर त्या गांवामध्ये लॉकडाऊन करावे.

                                                                           -ना.शंभूराज देसाई.

             तालुक्यातील अनेक मोठया गांवामध्ये कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू लागला असल्यामुळे आमच्या गावामध्ये लॉकडाऊन करा अशी मागणी गावकऱ्यांकडून वाढू लागली आहे. यावर प्रशासनाने ठोस पावले उचलून नागरिकांची मागणी असेल तर त्या गांवामध्ये लॉकडाऊन करुन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा मी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना सुचित करतो असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.

Friday 21 August 2020

कराड संगमनगर रस्ता तात्काळ खड्डेमुक्त करा.गणेशोत्सवात गणेशभक्तांची गैरसोय नको. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना व यंत्रणेला गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या बैठकीत सुचना.

 

          दौलतनगर दि.२१ :- कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते संगमनगर धक्का या ४८ किलोमीटरच्या भागातील केवळ ३० किलोमीटरचे काम पुर्ण झाले आहे.कंपनीच्या दिरंगाईमुळेच या रस्त्याचे काम रखडले आहे.उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत आहे.१८ किलोमीटर काम न झालेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.दिरंगाई करणाऱ्या कंपनीला पाठीशी न घालता त्या कंपनीवर कारवाई करा अशा सक्त सुचना शासनाच्या आहेत.आता तुम्हाला अनेकदा सांगून झाले आहे. तरीही संबधित कंपनी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी यांनी ज्याप्रमाणे तेथील कंपनीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तसाच या कंपनीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करा.कंपनीला सोमवार पर्यंतचा कालावधी देतो जिथे जिथे मोठे खड्डे पडले आहेत ते सोमवारपर्यंत भरुन घ्या गणेशोत्सव कालावधीत गणेशभक्तांची मला गैरसोय नको.अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.

         आज पाटण तहसिल कार्यालयात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते संगमनगर धक्का रस्त्याच्या अपुऱ्या कामांसंदर्भात व मोठया प्रमाणात पडलेल्या खड्डयांच्या संदर्भात आढावा बैठक झाली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीस पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समिर यादव,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.सागांवकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रविंद्र भोईटे,सार्व.बांध विभागाचे उपअभियंता अजित पाटील,पाटणचे प्रभारी सपोनि एम.एस.भावीकट्टी यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,कराड चिपळूण रस्त्याच्या अपुऱ्या कामांसंदर्भात मागे दोनदा बैठका झाल्या आहेत.वेगवेगळी कारणे सांगून संबधित कंपनीने अनेकदा या रस्त्याचे काम पुर्ण करण्यास जाणिवपुर्वक दिरंगाई केली आहे.रस्त्याचे काम पुर्ण करण्याचा कालावधी उलटून गेला आहे.वेळ होता तेव्हा काही केले नाही आणि आता पावसाचे कारण मला नको आहे.आता जी मुदत दिली आहे त्या मुदतीत उर्वरीत राहिलेल्या रस्त्याच्या कामाला गती द्या आणि मुदतीत काम पुर्ण करुन घ्या.विनाकारण कंपनीवर कारवाई करण्याची वेळ आमच्यावर आणू नका असे सांगून ते म्हणाले १८ किमी चा जो भाग पुर्ण करणे बाकी आहे त्या भागामध्ये पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.उद्यापासून गणेशोत्सवर सुरु होत आहे.या कालावधीत लोकांची वर्दळ या रस्त्यावरुन वाढणार आहे.या कालावधीत गणेशभक्तांची वाहतूकीच्या दृष्टीने गैरसोय झालेली मला चालणार नाही. सोमवारपर्यंत खड्डेमुक्त भाग झालेला मला दिसला पाहिजे.तालुका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तसेच एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सहकार्यच केले आहे त्यामुळे आता सर्वस्वी जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्गाची व एल.ॲन्ड टी कंपनीची आहे.यापुढे कंपनीचे कोणतेही म्हणणे एैकून घेतले जाणार नाही.असे ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना  सांगितले.

        तसेच संगमनगर धक्का ते घाटमाथा हा रस्ता तांत्रिकदृष्टया रत्नागिरी विभागाकडे कामाकरीता असला तरी हा भाग आपल्या तालुक्यात येतो. रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या रत्नागिरी विभागाकडे केवळ कामाकरीता हस्तातंरीत केला असला तरी अजुनही या कामांची निविदा निघाली नाही त्यामुळे सार्वजनीक बांधकाम विभागाकडे पुर्वी असणाऱ्या या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे सार्वजनीक बांधकाम विभागानेच भरावयाचे आहे या कामांस लवकरात लवकर सुरुवात करुन या भागातील खड्डेमुक्त रस्ता करा असेही सार्व.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

चौकट:- मी या रस्त्यांसंदर्भात खुप सिरीयस आहे.-ना.शंभूराज देसाई.

             कराड संगमनगर धक्का या रस्त्याच्या कामांचा कालावधी संपुन गेला आहे.कंपनीच्या केवळ जाणिवपुर्वक दिरंगाईमुळे कराड आणि पाटण तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तोंडी अनेकदा सांगून झाले आता कागदावर घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मी स्वत: या रस्त्यासंदर्भात खुप सिरीयस आहे त्यामुळे कारवाईतून वाचायचे असेल तर वाढवून दिलेल्या मुदतीत रस्त्याचे काम पुर्ण करा असे ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

       

Wednesday 19 August 2020

पुरपरिस्थितीवर मी स्वत: लक्ष ठेवून, तालुक्यातील शासकीय यंत्रणा सतर्क. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केली पुरपरिस्थितीची पहाणी.

 


दौलतनगर दि.१९:-आजमितीला कोयना धरणामध्ये ९२.१७ टीएमसी पाणीसाठा असल्याने सध्या कोयना धरणातून ५५,४८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सलगपणे सुरु आहे.त्यामुळे तालुक्यातील नेरळे व मुळगांव येथील पुल पाण्याखाली गेले आहेत.५५,४८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असूनही पुरपरिस्थिती अटोक्यात आहे. पावसाचा जोर हळू हळू कमी होवू लागला आहे.कोयना धरणातील पाणी सोडणेसंदर्भातील योग्य नियोजन कोयना धरण व्यवस्थापनाने केले आहे त्यामुळे मागीलप्रमाणे यंदा पुराची परिस्थिती निर्माण होणार नाही तरीही मी स्वत: पुरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे तसेच तालुक्यातील शासकीय यंत्रणाही सतर्क असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

             गेली चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचे पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज मुळगाव व नेरळे येथील पाण्याखाली गेलेल्या कोयना नदीवरील पुलांची शासकीय अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक घेण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.

             यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,नायब तहसिलदार प्रशांत थोरात, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए.व्ही.राख,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,जि.प.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,पाणी पुरवठा विभागाचे ए.वाय. खाबडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील, कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी यांची उपस्थिती होती.

          याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाईंनी सांगितले,पुरपरिस्थिती संदर्भात यापुर्वी तालुका प्रशासनाच्या दोन तीन बैठका घेवून योग्य नियोजन केले आहे. आपत्ती काळात योग्य व्यवस्थापन व नियोजन करुन तालुका प्रशासनाने सतर्क रहावे यामध्ये हलगर्जीपणा करु नका,जागृत रहा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील प्रशासन सतर्क असून कोयना धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात वडनेरी समितीने ज्या काही गाईडलाईन दिल्या आहेत त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाकडून त्याचे पालन केले जात आहे. गत चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये ९२.१७ टीएमसी पाणीसाठा  झाला आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांनी उघडून धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पुरपरिस्थिती अटोक्यात आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदा पुरपरिस्थिती निर्माण होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही.तसेच पावसाचे प्रमाण पाहून कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करणेसंदर्भातील नियोजनही करण्याच्या सुचना कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे सांगत त्यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाने कुठे दरड पडली असेल तेथील वाहतूक सुरुळीत करणेसंदर्भातही सुचना केल्या.कृष्णा खोरेच्या वांग मराठवाडी,उत्तरमांड,तारळी व मोरणा गुरेघर धरणातील पाणीसाठयासंदर्भात बैठकीत माहिती घेतली तसेच आरोग्य विभागाचाही या बैठकीत त्यांनी आढावा घेतला.

                चौकट:- तर... मला डायरेक्ट फोन करा- ना.शंभूराज देसाई.

               उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालयात २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन उभारले आहे.आपत्ती काळात काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये प्रथमत: माहिती दया. प्रशासन सतर्क आहेच परंतू कसलीही अडचण भासल्यास डायरेक्ट मला फोन करा असेही आवाहन ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत केले.

Wednesday 12 August 2020

धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याची वेळ आली तर दिवसाचे सोडावे. रात्री धरणातील पाणी न सोडण्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अधिकाऱ्यांना आदेश.

 

 

दौलतनगर दि. १२:- आजमितीला कोयना धरणामध्ये ७७.१८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे तुर्तास तरी कोयना धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही त्याचबरोबर कोयना धरणासह पाटण तालुक्यातील कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठाही मुबलक झाला आहे.पाटण तालुक्यातील कोयना धरण असो वा मध्यम धरण प्रकल्पे असोत या धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर याची पुर्वकल्पना देवून धरण व्यवस्थापनाने धरणातील पाणी दिवसाचे सोडावे,रात्री नागरिक बेसावध असताना कोणत्याही धरणातील पाणी सोडू नये असे सक्त आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील सर्व धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला दिले आहेत.  

            आज ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयामध्ये पाटण तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पात झालेला पाणीसाठयासंदर्भात व पुढील करावयाच्या नियोजनाच्या अनुषंगाने बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,कोयना धरण तसेच कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पाच्या व्यवस्थापनचे संबधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

            याप्रसंगी प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कोयना धरणात होणाऱ्या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोयना धरणातही पाणीसाठा मर्यादित झाला आहे.गतवर्षी आज तारखेला जेवढा पाणीसाठा हवा होता तो यावेळी नाही. आज धरणात ७७.१८ इतका पाणीसाठा आहे. महाबळेश्वर असो किंवा नवजा असो येथे मोठया प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याची चांगली आवक होते. मात्र याचठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आजरोजी कोयना धरण परिसरातील नवजाला ७५ मिलीमीटर तर आजअखेर एकूण ३१२५ मिलीमीटर आणि महाबळेश्वरला ६६ मिलीमीटर तर आजअखेर एकूण ३०३८ मिलीमीटर इतकाच पाऊस झाला असल्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी प्रमाणात होत आहे.प्रतिवर्षी सरासरी १५ ऑगस्टपर्यंत कोयना धरणामध्ये पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होतो मात्र यावेळी १५ ऑगस्टला पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्याची शक्यता कमी आहे.मागील वर्षी सर्वत्रच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोयना धरणातून असो वा इतर मध्यम धरण प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मोठया प्रमाणातील पाण्यामुळे आणि ओढयानाल्यानांही पावसाचे जादा पाणी आल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. सुर्दैवाने यंदा ही परिस्थिती नाही.

            आता पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही धरणातून पाणी सोडण्याचे तुर्तास तरी नियोजन नाही तरीही कोयना धरणासह इतर मध्यम धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर पाणी सोडण्याची पुर्वकल्पना या धरणाच्या तसेच तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांना दयावी आणि धरणातील पाणी हे रात्रीचे न सोडता ते दिवसाचे सोडावे.रात्री नागरिक बेसावध असतात त्यामुळे पुढील नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. दिवसाचे पाणी सोडले तर किती प्रमाणात पाणी नदीला येणार आहे याचा अंदाज येतो व दळणवळण असो किंवा नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भाने इतर उपाययोजना असोत यासंदर्भात प्रशासनालाही योग्य नियोजन करता येते असे ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.