Wednesday, 12 August 2020

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासकीय यंत्रणेने आणि जनतेनेही सतर्क रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना सुचना, जनतेला आवाहन.

 

       

दौलतनगर दि.१२:- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आजमितीला ही संख्या ३८१ झाली असून यापैकी २४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ११२ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत २१ रुग्ण मयत झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. तरीही संसर्गाची साखळी अनेक गांवात वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरीता शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे अशा सक्त सुचना शासकीय अधिकाऱ्यांना देत तालुक्यातील जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.  

              पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील कोरोना उपाययोजना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तहसिल कार्यालय पाटण याठिकाणी तातडीची बैठक घेतली. यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,नायब तहसिलदार थोरात, कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील तसेच पाटण नगरपंचायतीचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

           याप्रसंगी प्रारंभी पाटण शहरात करण्यात आलेल्या संपुर्ण लॉकडाऊन संदर्भातील माहिती प्रांताधिकारी तसेच नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याकडून घेतली.कन्टेंनमेंट झोन किती ठिकाणी करण्यात आले आहे. गर्दी टाळण्याकरीता कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याप्रकारची माहिती घेत  ना.शंभूराज देसाई म्हणाले,दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होवू लागल्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक गांवामध्ये कोरोना संसर्ग वाढू लागला असल्याने प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजनांना गती देण्याची गरज आहे.अनेक गांवानी गांवामध्ये कनेंटमेन्ट झोन केले आहेत तरीही संख्या वाढू लागली असल्याने काळजी वाढत आहे.प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी शिथीलता मिळाली असली तरी नागरिकांनीही नियमांचे पालन करुन शासकीय यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे. असे सांगत त्यांनी प्रातांधिकारी यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात जेवढया मर्यादा आहेत तेवढया प्रमाणात हायरिस्कमधील लोकांची सोय करावी. तिथे लोकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी तसेच शासनाने आता हायरिस्कमधील लोकांच्यावर घरच्या घरी उपचार करण्याच्या सुचना केल्या आहेत.परंतू आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करताना आवश्यक ती उपाययोजना त्याठिकाणी आहे का? याची प्रत्यक्ष पहाणी करुन कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.पाटणमधील संस्थात्मक विलगीकरणाकरीता शासकीय वसतीगृह  घेतले आहे त्याठिकाणी जाणारा रस्ता नादुरुस्त असल्याने अनेक अडचणी येत असून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करुन घेण्याच्या सुचना सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ना.शंभूराज देसाईंनी दिल्या व जनतेही प्रशासनाचे तुम्हाला सहकार्य आहेच परंतू आपणही प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

        यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांनी पाटण तालुक्यात रुग्ण आढळलेली ९२ गांवे असून कन्टेंटमेन्ट झोनची संख्या १०८ होती त्यापैकी ४६ गांवामधील कन्टेंटमेन्ट झोन उठविण्यात आले आहेत सध्या ६२ गांवामध्ये कन्टेंटमेन्ट झोन असल्याची माहिती दिली.

चौकट:- जनतेने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये.

             कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू लागला असल्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेने,वयोवृध्द लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये.तसेच लहान मुलेही घराच्या बाहेर पडणार नाहीत याची काळजी जनतेने घ्यावी. विनाकारण गर्दीची ठिकाणे टाळावी असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

No comments:

Post a Comment