Sunday 9 August 2020

आपत्ती काळात तालुका प्रशासनाने अगोदरच जागृत रहावे, हलगर्जीपणा नको. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या तालुका प्रशासनाला सुचना.

                                     

दौलतनगर दि. 10:  आजमितीला कोयना धरणामध्ये ७२ टीएमसी पाणीसाठा आहे.गतवर्षीच्या प्रमाणात ०८ टीएमसी ने पाणीसाठा कमी आहे त्यामुळे तुर्तास तर कोयना धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही त्यातच पावसाचा जोरही कमी झाला आहे. तरीही आपत्ती काळात योग्य व्यवस्थापन व नियोजन करुन तालुका प्रशासनाने सतर्क रहावे यामध्ये हलगर्जीपणा करु नका,जागृत रहा व कोयना धरण व्यवस्थापनने वडनेरी समितीने ज्या काही गाईडलाईन दिल्या आहेत त्याचे पालन करा अशा सक्त सुचना गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाला दिल्या.

            आज ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारत लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव,कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. राख,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,जि.प.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,पाणी पुरवठा विभागाचे ए.वाय. खाबडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,तालुका कृषी अधिकारी बी.एस.बुधावले,उंब्रजचे सपोनी अजय गोरड, कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,ढेबेवाडी सपोनी यू.डी.भजनावळे यांची उपस्थिती होती.

             याप्रसंगी प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कोयना धरणात होणाऱ्या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालय याठिकाणी २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती काळात तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये माहिती देण्याचे काम अधिकारी यांनी करावयाचे असून यावर तात्काळ तोडगा काढून आपतकालीन परिस्थिती दुर करावयाची आहे.आपले विभागाकडील अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये संबधित अधिकारी वर्गाने करावयाची असून संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे देवून आपण काय काय व्यवस्था केली आहे याची माहिती सादर करावयाची आहे.

              आपतकालीन व्यवस्थापन कक्षामध्ये एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी असे सांगून त्यांनी तहसिलदार यांनी मंडलाधिकारी,तलाठी यांचेमार्फत कोयना नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहण्याच्या सुचना कराव्यात तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांना त्या त्या विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून मान्सुन काळात साथीचे रोग पसरणार नाहीत याकरीताच्या उपाययोजना कराव्यात.प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषधसाठा आताच करुन ठेवावा.असे सांगत ना.शंभूराज देसाई यांनी वीज वितरण विभागाचा आढावा घेतला. हा आढावा घेताना या विभागाने प्रामुख्याने दक्ष आणि जागृत रहावे अशा सुचना त्यांनी दिल्या ते म्हणाले,पाऊस येणार असे वातावरण होण्याअगोदरच वीज वितरण विभागाचे अधिकारी काम लागेल म्हणून वीज बंद करीत आहेत या अगोदर उभ्या पावसात कधी वीज गेली नव्हती जिथे खरोखर अडचण जाणवत आहे त्याठिकाणी वीज बंद करण्यास हरकत नाही परंतू पाऊस पडायच्या आतच वीज बंद करणे चुकीचे आहे यासंदर्भात अनेक ठिकाणच्या तक्रारीदेखील आल्या आहेत त्यात वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुधारणा करावी.आपत्ती काळात तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी योग्य ते नियोजन करावे विनाकारण कारवाई करण्याची वेळ कुणी आणू नये असे सांगत गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पुरपरिस्थिती येणार नाही असा विश्वासही त्यांनी शेवठी बोलताना व्यक्त केला.

                चौकट:-  तालुक्यातील धरणातील पाणी सोडण्यापुर्वी प्रशासनाने पुर्वकल्पना दयावी.

पाटण तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठा किती आहे कोणत्या धरणातून कधी पाणी सोडणार आहे याचा सविस्तर आढावा ना.शंभूराज देसाईंनी घेत धरणातून पाणी सोडताना प्रशासनाने याची पुर्वकल्पना तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जनतेला दयावी असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment