Thursday 27 August 2020

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे खजिनदार(कोषाध्यक्ष)पदी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची पुनश्च: निवड

 


 

दौलतनगर दि.:- दि.११ डिसेंबर,१९६७ रोजी कोयना परिसरात झालेल्या भूकंपामुळे पीडीत व्यक्तींचे / कुटुंबांचे व तेथील दुर्गम भागांचे पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची स्थापना करण्यात आली होती.या समितीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष आहेत.राज्यात नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यामुळे या समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना करण्यात आली असून विद्यमान मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अध्यक्षतेखालील या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची पुनश्च: फेरनिवड करण्यात आली आहे. समितीच्या पुर्नरचनेचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दि.२७.०८.२०२० रोजी पारित केला आहे.

दि.११ डिसेंबर,१९६७ रोजी कोयना परिसरात झालेल्या भूकंपामुळे पीडीत व्यक्तींचे/ कुटुंबांचे व तेथील दुर्गम भागांचे पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची स्थापना करावी ही मुळ कल्पना राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री व राज्याचे कर्तबगार गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडली. भूकंपामुळे पीडीत व्यक्तींना/ कुटुंबांना या मोठया दुर्घटनेतून सावरण्याकरीता केंद्राकडून, राज्यातून तसेच इतर राज्यातून जी मोठया प्रमाणात मदत आली होती या मदतीमधून राहिलेली रक्कम राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवण्याचे आणि त्या रक्कमेच्या व्याजातून या परिसरातील भागाचा विकास करण्याचे धोरण यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही समिती कार्यरत आहे.

            त्याप्रमाणे राज्यात सध्या नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यामुळे या समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष असून मुख्य सचिव हे पदसिध्द विश्वस्त तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हे विश्वस्त व सचिव आहेत.उपरोक्त समितीचे नियम व विनियमातील तरतूदीनुसार समितीच्या एकूण ०९ विश्वस्तांपैकी ०३ पदसिध्द विश्वस्त वगळता उर्वरीत ०६ निवडून आलेल्या सदस्यांची निवड कोयना भूकंपग्रस्त तालुक्यातील विधानसभा सदस्यांमधून करण्यात येते.या सहा सदस्यांमधूनच खजिनदार (कोषाध्यक्ष) निवडण्यात येतात. सन २००४ ते २००९ या कालावधीत आमदार असताना शंभूराज देसाई हे समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.सन २०१४ ला पुनश्च: पाटण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य झालेनंतर तत्कालीन भाजप-सेना युतीच्या कार्यकालात कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी त्यांची प्रथमत: निवड करण्यात आली होती. आता नव्याने पुर्नरचना झालेल्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी या समितीच्या  खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनाच महाविकास आघाडीच्या वतीने कायम ठेवण्यात आले आहे.

            दरम्यान सन २०१४ ला विधानसभा सदस्य झालेनंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ना.शंभूराज देसाईंची कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या कोषाध्यक्ष पदी निवड केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यांचेकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन राज्य शासनाकडून कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासाला कोयना भूकंपग्रस्त तालुक्यातील विविध विकासकामे करण्याकरीता देण्यात येणारी ०५ कोटी रुपये ही रक्कम अल्प असून यामध्ये ०५ कोटी रुपयांची वाढ करुन एकूण १० कोटींचा निधी या समितीमार्फत भूकंपप्रवण तालुक्यांना देण्यात यावा अशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांनीही त्यांची मागणी तात्काळ मान्य केल्याने समितीमार्फत आता प्रतिवर्षी १० कोटी रुपयांचा निधी हा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासाला देण्यात येतो. एकूण निधीच्या ३५ टक्के वाटा हा पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना भूकंपप्रवण विभागाच्या विकासाकरीता देण्यात येतो. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामधील ना.शंभूराज देसाईंचे कार्य उल्लेखनीय असल्यामुळेच त्यांची या समितीच्या  खजिनदार (कोषाध्यक्ष) पदी फेरनियुक्ती झाली आहे.त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ना.शंभूराज देसाईंचे अभिनंदन केले आहे.

2 comments: