Monday 28 September 2020

कोरोनापासून बचावात्मक सर्व उपाययोजना राबवा. 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबवूया. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 


 

दौलतनगर दि.२९:- राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्याकरीता जाहीर केलेली 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' ही राज्य शासनाची सार्वत्रिक मोहीम आपण आपले पाटण विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवूया. या मोहिमेतंर्गत कोरेानापासून बचावात्मक अशा सर्व उपाययोजना राबवा. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'  या मोहिमेतंर्गत आपले ग्रामीण स्तरावर गावपातळीवरील सर्वपक्षीय पदाधिकारी,गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच शासकीय यंत्रणेचे गावस्तरावरील कर्मचारी यांच्या मार्फत गावोगावी तसेच वाडयावस्त्यावर या मोहिमेचे प्रबोधन करण्याची मोहिम हाती घेण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

              दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता व राज्य शासनाची 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याकरीता पाटण तालुक्यातील कोरोना उपाययोजना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,पाटणचे सपोनी सी.एस.माळी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.

            याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' हे अभियान कोरोनाचा फैलाव रोखण्याकरीता संपुर्ण राज्यभर राबविण्यास सुरुवात केली आहे. आपणही या योजनेचा शुभारंभ केला. शुभारंभादिवशी मी स्वत: गावागावात जावून या मोहिमेचे महत्व ग्रामीण भागातील नागरिकांना,महिलांना पटवून दिले. या अभियानात आपण प्रत्येकजण सहभागी होऊ या.स्वतःला आणि कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहिम अतिशय उपयुक्त आहे.या योजनेतंर्गत तपासणी करणेकरीता घरोघरी येणाऱ्या शासकीय कर्मचारी यांना सहकार्य करुन नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेतल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे.याकरीता ग्रामीणस्तरावर प्रबोधनाची गरज आहे. हे प्रबोधन मतदारसंघातील प्रत्येक गांवागांवात,वाडीवस्तीवर करण्याकरीता शासकीय कर्मचारी यांच्यासमवेत  गाव पातळीवरील सर्वपक्षीय पदाधिकारी,गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी करणे आवश्यक आहे.या पदाधिकाऱ्यामार्फत हे प्रबोधन करण्याकरीता प्रातांधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी यांनी मतदार संघातील भाग वाटून घ्यावेत व या पदाधिकाऱ्यांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे तसेच ग्रामपंचायती मार्फत स्पीकरवरुन दिवसातून तीनदा तसेच मोठया ग्रामपंचायतीमार्फत फिरत्या वाहनातून या मोहिमेचा प्रसार करावा.असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले व अधिकारी यांना घरोघरी जावून तपासणी करण्याच्या प्रमाणात वाढ करावी अशा सुचना देवून पाटण मतदारसंघातील सर्वांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.

चौकट:- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पुढाकाराने पाटण मतदारसंघातील शिक्षक संघटना  होणार 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानात सहभागी.

              'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या  शासनाच्या अभियानात प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला पाटण मतदारसंघातील विविध शिक्षक संघटनांनी चांगला प्रतिसाद देत ना.शंभूराज देसाईंची दौलतनगरला भेट घेऊन या अभियानात आम्ही उद्यापासूनच सहभागी होत असल्याचे यावेळी उपस्थित विविध शिक्षक संघटनांतील पदाधिकारी यांनी सांगितले.

Thursday 24 September 2020

देसाई कारखान्याची व कारखान्याचे प्रमुख राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची वृत्तपत्रातून बदनामी करणाऱ्या वार्ताहर गणेश पिसाळ यास दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालय कराडकडून शिक्षा.

 

दौलतनगर दि.२५:- दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या व कारखान्याचे प्रमुख राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्याविषयी जाणिवपुर्वक वृत्तपत्रात खोटया,तथ्यहीन व चुकीच्या बातम्या प्रसिध्द करवून आणलेबद्दल व हेतूपुरस्कर कारखान्याची आणि ना.शंभूराज देसाईंची बदनामी केलेबद्दल एका वृत्तपत्राचा पाटणचा वार्ताहर गणेश पिसाळ यास दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालय,कराड यांनी रुपये 10,000 दंडाची शिक्षा सुनावली आहे.सुनावलेला दंड मुदतीत न भरल्यास दोन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षाही आरोपी वार्ताहर गणेश पिसाळ यास जिल्हा सत्र न्यायालय कराड यांनी सुनावली आहे.

              कारखान्याचे वकील ॲड.एम.टी.यादव,कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.20.11.2007 रोजीच्या सातारा आवृत्तीमध्ये एका वृत्तपत्राने त्या वृत्तपत्राचा पाटणचा वार्ताहर गणेश पिसाळ याने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या व कारखान्याचे प्रमुख गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्याविषयी जाणिवपुर्वक बदनामी करण्याच्या हेतूने बदनामीकारक,चुकीची,तथ्यहीन व खोटी बातमी प्रसिध्द करवून घेतली होती.याविरुध्द देसाई कारखान्याने वार्ताहर गणेश पिसाळ व कराड उपविभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक याचेविरुध्द पाटण येथील तालुका न्यायालयामध्ये फौ.ख.नं.11/08 या क्रंमाकांने फौजदारी खटला दाखल केला होता.पाटण येथील तालुका न्यायालयामध्ये सदरच्या खटल्याचा निकाल दि.09.05.2011 रोजी लागून तालुका न्यायालयाने वार्ताहर गणेश पिसाळ व व्यवस्थापक या दोघां दोषी आरोपींना प्रत्येकी एक महिना साधी कैद व रु.10,000/- दंड अशी शिक्षा सुनावली होती.

             दरम्यान या शिक्षेविरोधात सबंधित आरोपी वार्ताहर गणेश पिसाळ याने जिल्हा सत्र न्यायालय, कराड यांचे न्यायालयात दि.01.06.2011 ला फौजदारी अपिल नं.36/2011 दाखल केले होते.जिल्हा सत्र न्यायालय कराड यांनी या अपिलाचा निकाल दि.24.08.2020 रोजी दिला.या निकालामध्ये आरोपी वार्ताहर गणेश पिसाळ व विभागीय कार्यालयाचा व्यवस्थापक या दोघांना वृत्तपत्रात देसाई कारखान्यांच्या व कारखान्याचे प्रमुख ना.शंभूराज देसाईंच्याविषयी प्रसिध्द करवून आणलेल्या चुकीच्या व खोटया बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्यामुळे व जाणिवपुर्वक कारखान्यांची व ना.शंभूराज देसाईंची बदनामी करण्याचा हा खोडसळपणा केल्यामुळे या दोघांनाही दोषी ठरविण्यात आले आहे.

             या अपीलाच्या सुनावणी दरम्यान आरोपी वार्ताहर गणेश पिसाळ याच्या वकीलांनी जिल्हा सत्र न्यायालय,कराडपुढे या खोडसळपणा संदर्भात बिनशर्त माफी मागितल्यामुळे वरील वार्ताहर गणेश पिसाळ व व्यवस्थापक या दोघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने रुपये 10,000 दंडाची शिक्षा सुनावली आहे. मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास या दोन्ही आरोपींना दोन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षाही यावेळी सुनावण्यात आली आहे.

             पत्रकारीता करताना संबधित पत्रकारांनी भान ठेवून व जबाबदारी ओळखून व्यवस्थीतपणे पत्रकारीता करावी, तथ्य नसताना कुणाची विनाकारण बदनामी करण्याच्या हेतूने खोटया,तथ्यहीन व चुकीच्या बातम्या देवू नयेत आणि वृत्तपत्रांनीही वार्ताहरांकडून आलेल्या बातम्यांची शहानिशा केल्याशिवाय या बातम्या प्रसिध्द करु नयेत असे आरोपींना सुनावत वार्ताहर गणेश पिसाळ यास सुधारण्याची ही संधी देत असलेबाबत जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावले असल्याचेही कारखान्याचे वकील ॲड.एम.टी. यादव, कराड यांनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.



Sunday 20 September 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते देसाई कारखाना कार्यस्थळावरील कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण. :- 50 ऑक्सिजन बेड- 25 नॉन ऑक्सिजन बेड- एकूण 75 बेडची सुविधा-




 
                          

पाटण दि.20 :- सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.कराड, सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवू लागली आहे.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून कोवीड केअर सेंटर उभे करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधितांना उपचार देणेकरीता आम्ही पुढाकार घेतला केवळ पाच ते सहा दिवसात हे कोरोना कोवीड सेंटर उभे करण्याचे काम केले असून येथे 50 ऑक्सिजन बेड,25 नॉन ऑक्सिजन बेड अशी एकूण 75 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.आवश्यक असणारे 18 वैद्यकीय अधिकारी,17 कर्मचारी, औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. आजपासूनच हे सेंटर कोरोना रुग्णांना उपचाराकरीता खुले करण्यात आले आहे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

             दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराकरीता एकूण 75 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले असून या कोरोना केअर सेंटरचा तसेच सेंटरकरीता आवश्यक अद्यावत ॲम्ब्यूलन्सचा लोकार्पण सोहळा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी युवा नेते यशराज देसाई,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रघूनाथ पाटील,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीस अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,नोडल अधिकारी डॉ.शिकलगार,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,मल्हारपेठचे सपोनी अजित पाटील,देसाई कारखान्याचे संचालक मंडळातील संचालक,जि.प.व पं.स सदस्य तसेच कोरोना केअर सेंटर उभारणारे संबधित ठेकेदार,कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

           गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,गेल्या सहा महिन्यात सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संखेत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.अलीकडच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ ही चिंताजनक आहे.सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामध्ये कराड असो किंवा सातारा येथे ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काहींचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न होत आहे.याकरीता आपण ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात 35 ऑक्सीजन बेडचे केअर सेंटर सुरु केले, पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात 25 ऑक्सीजन बेडचे सेंटर सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे तसेच कारखाना कार्यस्थळावर 50 ऑक्सीजन बेडचे आणि 25 नॉन ऑक्सीजन बेडचे केअर सेंटर सुरु करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आता ढेबेवाडीचे 35 आणि कारखाना कार्यस्थळावरील 50 याप्रमाणे कोरोना बाधितांच्या उपचाराकरीता बेड उपलब्ध झाले आहेत आवश्यकता भासल्यास 25 नॉन ऑक्सीजन बेड आम्ही ऑक्सीजनसह तयार ठेवले आहेत.पाटणचे 25 ऑक्सीजन बेड येत्या 4 ते 5 दिवसात उपलब्ध होतील. 

            दौलतनगच्या कोरोना केअर सेंटरमध्ये एक नोडल अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्राचे 02 वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी,खाजगी सराव करणारे 16 डॉक्टर, 08 नर्स, 03 फार्मासिस्ट, 04 वॉर्ड बॉय, ॲम्बूलन्सकरीता स्वतंत्र्य ड्रायव्हर, डेटा ऑपरेटर 01 अशाप्रकारे वैद्यकीय पथक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.सेंटरमध्ये तीन रुममध्ये 50 ऑक्सीजनचे बेड तर मोठया हॉलमध्ये 25 नॉन ऑक्सीजन बेड ठेवण्यात आले आहेत. गिझर, 100 लिटर शुद्ध पाणी,नवीन टॉयलेट तसेच येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था, कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करणेकरीता संगणक, प्रींटर, इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात जनतेला ज्याप्रकारे अन्नधान्यांची मदत करण्यात आली. त्याच पद्धतीने कोरोना बाधित व्यक्तींसाठी कोरोना सेंटर उभे करण्याचा आम्ही निर्णय घेतला.या केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना व्यक्तीश: गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून नाष्ता, जेवण देण्यात येणार आहे.

चौकट:- नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे कोरोना केअर सेंटरला मोलाचे सहकार्य.

            दौलतनगर ता.पाटण येथील कोरोना केअर सेंटर सुरु करणेकरीता तसेच या सेंटरकरीता आवश्यक असणारी अद्यावत ॲम्ब्यूलन्स उपलब्ध करुन देणेकरीता शिवसेना पक्षाचे गटनेते व राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो असेही  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यावेळी बोलताना म्हणाले.

Monday 14 September 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावर उभारतोय ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर. युवानेते यशराज देसाई (दादा) यांची माहिती.


     

दौलतनगर दि.१४:- देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या हाकेला ओ देत राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर उभारण्यात येणार असून तातडीने या कामांला सुरुवात करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केल्या असून येत्या पाच ते सहा दिवसात देसाई कारखाना कार्यस्थळावर ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर सुरु होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने युवानेते यशराज देसाई (दादा) यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

         प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड व सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नातून ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय प्रत्यक्षात सुरु झाले आहे तर पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये ऑक्सीजनसह २५ बेडचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सुचनाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्यानुसार पाटण येथील वसतीगृहामध्ये २५ बेडच्या कामांला तालुका प्रशासनाच्या वतीने सुरुवात देखील केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हे सेंटर कोरोना बाधितांच्या उपचाराकरीता सेवेत आणण्यात येणार आहे. सातारा येथील शिवाजी संग्रहालयात ३०० बेडचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करणेसंदर्भात राज्याचे माननीय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचेकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मागणी करताच त्यांनी तात्काळ यास मान्यता दिली असून सातारा येथील शिवाजी संग्रहालयात ३०० बेडचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे.

              पाटण तालुक्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या व कराड तसेच सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना मिळत नसलेले बेड लक्षात घेता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावर तातडीने ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेत दौलतनगरला कारखाना कार्यस्थळावर तातडीने हे कोरोना सेंटर सुरु करण्याच्या सुचना केल्या आहेत.जागेची निश्चीती कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली असून येत्या पाच ते सहा दिवसात ऑक्सीजनसह ५० बेडचे हे कोरोना सेंटर सुरु करण्यात येणार असून पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची होणारी गैरसोय या सेंटरमुळे दुर होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

चौकट:- राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे हे करणार या सेंटरला आवश्यक ती मदत.

            लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सुरु करण्यात येणाऱ्या कोरोना सेंटरकरीता तांत्रिक तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता तसेच आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणार असल्याचे शिवसेना गटनेते,राज्याचे नगरविकास व सार्वजनींक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना सांगितले आहे.

 

 

 

  

Sunday 13 September 2020

तारळी प्रकल्पातील 50 मीटरच्या वरील योजनांची कामे टारगेट ठेवून पुर्ण करा. :- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 


                          

पाटण दि.13 :- कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील शेतकऱ्यांच्या 50 मीटरच्या वरील जमीन क्षेत्राला मिळवून देणेकरीता मागील पंचवार्षिकमध्ये सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन मी याकरीता आवश्यक असणारी सुधारित प्रशासकीय मान्यता घेवून आवश्यक निधीही मंजुर करुन आणला आहे.शासनाकडून आवश्यक सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली, पाहिजे असलेला निधी उपलब्ध झाला मग या योजनांची कामे सुरु करण्यास अडचण काय आहे? असा सवाल करुन तारळी प्रकल्पातील 50 मीटर हेडच्या वरील धुमकवाडी, कोजंवडे, आवर्डे, बांबवडे व तारळे या पाचही योजनांची कामे टारगेट ठेवून पुर्ण करा.मी यासंदर्भात कोणतेही कारण एैकणार नाही या योजनांच्या कामांसंदर्भात मी खुप गंभीर आहे अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

           पाटण जि.सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी 50 मीटर हेडच्या वरील जमीन क्षेत्राला देणेकरीता मंजुर असणाऱ्या उपसा सिंचन योजनांच्या कामांचा आढावा घेणेकरीता आढावा बैठक आयोजीत केली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बैठकीस सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कण्हेर कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड,कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अं.का. जाधव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,उपअभियंता विजय पाटील,सहाय्यक अभियंता संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

            ना.शंभूराज देसाईंनी प्रारंभी तारळी धरण प्रकल्पातील 50 मीटरच्या आतील पाच उपसा जलसिंचन योजनांच्या कामांची अधीक्षक अभियंता यांचेकडून माहिती घेतली.50 मीटरच्या आतील सर्वच्या सर्व योजना सुस्थितीत नाहीत. तारळे आणि बांबवडे योजनांच्या कामांचे टेंस्टीग करुन किमान महिनाभर या योजना सुरळित चालत आहेत का?  याची तपासणी करण्याच्या सुचना यापुर्वीच्या बैठकीत दिल्या होत्या. योजनांच्या कामांत लिकेजचे प्रमाण जास्त आहे लिकेज काढणेसंदर्भात संबधित यंत्रणेने कोणत्या उपाययोजना केल्या याचा सविस्तर अहवाल आठ दिवसात मला दयावा असे सांगत त्यांनी 50 मीटर हेडच्या वरील धुमकवाडी,कोजंवडे,आवर्डे,बांबवडे व तारळे या पाचही योजनांच्या कामांचा योजनानिहाय आढावा बैठकीत घेतला.आजमितीला कोणत्याच योजनेचे काम सुरु नाही.तुम्हाला कामे सुरु करायला अडचणी काय आहेत ? एवढया महतप्रयत्नातून या योजनांच्या कामांना राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आवश्यक असणारा निधीही त्याचवर्षी मंजुर करुन दिला तरीही योजनांच्या कामांना सुरुवात नाही. कधीपर्यंत या पाचही योजनांच्या माध्यमातून 50 मीटर हेडच्या वरील जमिनींना पाणी काढून देणार? काही अडचणी असतील तर सांगा, त्या शासनाच्या माध्यमातून सोडविल्या जातील. या कामांना तात्काळ सुरुवात करा आणि टारगेट ठेवून या योजनांची कामे करण्याचे नियोजन विभागामार्फत करा.नुकत्याच झालेल्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये जलसंपदा विभागाला सुमारे 200 कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. या पाच योजनांच्या कामांकरीता यातील आवश्यकतेनुसार काही निधीची गरज भासल्यास तसा प्रस्ताव तयार करा मी स्वत: राज्याचे जलसंपदा मंत्री यांचेकडे हा प्रस्ताव घेवून जातो आणि आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता प्रयत्न करतो असे ना.देसाईंनी यावेळी बैठकीत सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी 50 मीटरच्या वरील धुमकवाडी व कोजंवडे या दोन योजनांच्या माध्यमातून माहे एप्रिल 2021 पर्यंत तर आवर्डे योजनेतून ऑक्टोंबर,2021 पर्यंत आणि बांबवडे व तारळे येथील योजनेतून माहे डिसेंबर 2021 पर्यंत 50 मीटरच्या हेडवरील जमिन क्षेत्राला पाणी काढून देण्याचे बैठकीत मान्य करीत आम्ही सर्व यंत्रणांनी अशाप्रकारे या पाचही योजनांच्या कामांचे नियोजन केले असून त्याप्रमाणे कामाला सुरुवात करीत असल्याचे बैठकीत ना.शंभूराज देसाईंना सांगितले.

            चौकट: पाच योजनांच्या कामांचा बारचार्ट तयार करा- ना.शंभूराज देसाई

            धुमकवाडी, कोजंवडे, आवर्डे, बांबवडे व तारळे या पाचही योजनांची कामे करण्याचे नियोजन जे सातारा पाटबंधारे मंडळाने केले आहे आणि कधीपर्यंत ही कामे पुर्ण करुन शेतकऱ्यांच्या 100 टक्के शेतीला पाणी देण्याचे अधीक्षक अभियंता यांनी मान्य केले आहे त्यानुसार अधिक्षक अभियंत्यांनी या पाचही योजनांच्या कामांचा बारचार्ट तयार करा दर दोन महिन्यांनी याचा आढावा घ्या आणि बारचार्टनुसार या योजनांची कामे लवकरात लवकर पुर्ण करुन घ्या असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.

 

गर्दी टाळण्याकरीता आवश्यक उपाययोजना राबवा:- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना आदेश. कोरोना संसर्ग होवू नये याकरीता जनतेने काळजी घेण्याचे केले आवाहन.

 


                                     

कराड दि.13 :-कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलमधील अनेक मोठया गांवामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची संख्या वाढली आहे.परंतू तसे पाहिले तर या गांवातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही 80 टक्के व त्याहून जास्त आहे.तरीही कोरोना रुग्ण सापडणाऱ्या गांवामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यामार्फत जनजागृती करण्याच्या सुचना महसूल,ग्रामविकास विभागांना दिल्या आहेत.तसेच गर्दी टाळण्या करीता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना पोलीस यंत्रणांना दिल्या असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज कराडमध्ये सांगितले.कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता गर्दी टाळणे,अनावश्यक घराबाहेर पडणे, सातत्याने मास्कचा वापर करणे हे जे उपाय जनतेच्या हातात आहेत ते जनतेने काटेकोरपणे करावेत असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी जनतेला यावेळी केले आहे.

             आज कराड येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षते खाली कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलमधील कोरोना रुग्णांचा आढावा घेणेकरीता तसेच कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता करावयाच्या उपाययोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजीत केली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बैठकीस कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसिलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता देशमुख,कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील,कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,कराड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती खैरमोडे व डॉ.धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            याप्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार देणेकरीता,उपचाराकरीता बेड उपलब्ध करुन देणेसंदर्भात तसेच लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता पाटण येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सत्र सुरुच आहे. आमचे सुपने मंडल कराड तालुक्यात असले तरी या विभागातील जनतेची तसेच सापडलेल्या कोरोना रुग्णांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे.त्यानुसार कराड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या यापुर्वी चार ते पाच वेळा बैठका घेवून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.अजुनही काही उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या उपाययोजना तातडीने कराड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी कराव्यात.आता लॉकडाऊन उठल्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे.कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याचे काम आता जनतेचे आहे. जनतेनेच आता स्वयंस्फुर्तीने कोरोनाचा सामना करावयाचा आहे. याकरीता जनतेमध्ये मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले पाहिजे,गर्दी होण्याचा धोका आहे त्याठिकाणी जाणे टाळले पाहिजे,अनावश्यक घराबाहेर येणे टाळले पाहिजे या ज्या गोष्टी जनतेच्या हातात आहेत त्या त्यांनी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये याकरीता जनजागृतीची गरज असून ही जनजागृती करण्याकरीता गांवामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांना प्रशासनाने सुचना कराव्यात अशाही सुचना बैठकीत दिल्या असल्याचे सांगत त्यांनी कराडमध्ये ऑक्सीजनचे बेड आहेत त्याचे नियंत्रण प्रातांधिकारी यांनी करावे बहूतांशी पाटण तालुक्यामधून येणारे कोरोना रुग्ण आहेत त्यांना कराडमधील रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत नाहीत तसे पाहिले तर सगळयाच रुग्णालयात कोरोना रुग्णांची गर्दी झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण या रुग्णालयात आहेत तरीसुध्दा पाटण तालुक्यातील अतिशय अत्यव्यस्त रुग्णांना कराड येथील रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रातांधिकारी यांना बैठकीत दिले. व सगळयांची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी बैठकीत केले.

चौकट: साताऱ्याचे जम्बो कोरोना सेंटर लवकर सुरु होणेकरीता प्रयत्नशील- ना.शंभूराज देसाई

       सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आमचे विनंतीवरुन राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी साताऱ्याला तातडीने कोरोनाचे जंम्बो सेटंर सुरु करण्यास मंजुरी दिली. साताराचे जम्बो हॉस्पीटल लवकरात लवकर सुरु करण्याचा माझा व्यक्तीश: तसेच जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचा प्रयत्न सुरु आहे. तसे आमचे नियोजन सुरु आहे.बेडवाचून उपचार मिळत नाहीत असे होवू नये याकरीता आम्ही प्रयत्नशील असून कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता निधी कमी पडू देणार नाही असे मुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितले असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

Saturday 12 September 2020

कोरोनाचा समुहसंसर्ग होऊ नये याकरीता दक्ष व सतर्क रहा. विशेष पोलिस महानिरीक्षक व परिक्षेत्रातील सर्व पोलिस अधीक्षकांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सुचना.

 


          

दौलतनगर दि.१२:- कोरोनाच्या संकटामुळे गत सहा महिन्यापासून सुरु असलेले राज्यामधील लॉकडाऊन बहूतांशी प्रमाणात उठल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.मोठमोठया शहरात लॉकडाऊन उठल्यामुळे गर्दी वाढू लागली असून आता लॉकडाऊन नाही तर आपल्याला कोण विचारणार? अशी भावना जनमानसात निर्माण झाली असून कोरोनाचा समुहसंसर्ग होऊ नये याकरीता पोलीस यंत्रणेलाच दक्ष आणि सतर्क रहावे लागणार असल्याने त्याप्रमाणे आपले विभागाचे नियोजन करावे अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व त्यांच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर,सोलापुर,पुणे,सांगली,सातारा येथील पोलिस अधीक्षकांना केल्या व पोलीस विभागातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

              आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली सातारा पोलीस मुख्यालय येथून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोल्हापुर परिक्षेत्रातंर्गत कायदा व सुव्यवस्था राखणेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक आयोजीत करण्यात आली होती. कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया,कोल्हापुरचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,सोलापुर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,पुणे प्रभारी पोलीस अधीक्षक मोहिते, सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दुभाले हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सहभागी झाले होते तर सातारा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील हे सातारा पोलीस मुख्यालय याठिकाणी उपस्थित होते.

           याप्रसंगी प्रांरभी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यामध्ये बहूतांशी प्रमाणात लॉकडाऊन उठल्यानंतर कोल्हापुर परिक्षेत्रातंर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर,सोलापुर,पुणे,सांगली व सातारा येथील कायदा व सुव्यवस्थासंदर्भात कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचेकडून माहिती घेतली. कोरोना काळात किती गुन्हे घडले,गंभीर स्वरुपाच्या गुन्हयावर कोणती कार्यवाही केली अशी विचारणा करीत लॉकडाऊन उठल्यानंतर मोठमोठया शहरात गर्दी वाढू लागली आहे. यावर नियंत्रण आणणे हे पोलीस यंत्रणेचेच काम आहे. लॉकडाऊन उठले असले तरी कोरोनाचा समुहसंसर्ग वाढू नये याकरीता पोलीस यंत्रणेने दक्ष व सतर्क रहाणे आवश्यक आहे त्यानुसार आपल्या पोलिस यंत्रणेकडून नियोजन करावे.असे सांगत ते म्हणाले कोरोना काळात पोलीस बंदोबस्तांत असणाऱ्या आपल्या विभागाच्या काही पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण होवून त्यांचा मृत्यू झाला आहे ही दुर्देवी बाब आहे.आपण सेवा बजावित असताना आपली काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव अजुनही कमी झाला नाही त्यामुळे लॉकडाऊन नसले तरी पोलीस बंदोबस्तात असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबिंयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहून सेवा बजावावी याकरीता प्रत्येकाला सुचित करण्यात यावे असे ना.शंभूराज देसाईंनी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना सांगितले.

          कोरोनाचा मुकाबला करण्याकरीता जिल्हा नियोजन विभागाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजनचा निधी वापरण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत.आपल्या पोलिस विभागाला यातील काही निधीची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव या पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांनी संबधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना दयावा मी स्वत: या पाचही जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करुन आपले विभागाला आवश्यक निधी मिळवून देण्याकरीता प्रयत्नशील असल्याचेही ना.देसाईंनी योवळी बैठकीत सांगितले.यावेळी सातारा पोलिस विभागामार्फत पोलीस यंत्रणेकरीता उभारण्यात येणाऱ्या कोरोना सेंटरच्या कामांचाही त्यांनी यावेळी बैठकीत आढावा घेतला. या सेटंरमध्ये ६० टक्के पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यास उपचार करण्यात येणार आहेत तर ४० टक्के सर्वसामान्य नागरिकांना कोरोना सेंटरमध्ये उपचार देण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी ना.देसाईंना दिली.

चौकट:- कोरोना योध्दा म्हणून कार्यरत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप.

              गत सहा महिन्यांपासून राज्यातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरुन कोरोनाचा जनमानसात प्रार्दुभाव वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व यंत्रणांचा वापर करीत कोरोना योध्दा म्हणून स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता कार्यरत आहे. ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोना काळातील पोलीसांच्या कार्याचे कौतुक केले व पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली.         

 

 

 

पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये ऑक्सीजनसह २५ बेडचे काम तात्काळ सुरु करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

          


दौलतनगर दि.१२:- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड व सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ज्याप्रमाणे आपण ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु केले आहे त्याचप्रमाणे पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये आपण लोरिस्कमधील कोरोना बाधित रुग्णांना दाखल करुन घेत आहोत त्याठिकाणी ऑक्सीजनसह २५ बेडचे काम तात्काळ सुरु करा. त्याठिकाणी लागणारे २५ बेड दोनच दिवसात उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. लागणारे २५ ऑक्सीजन सिलेंडर हे स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत बुधवारपर्यत उपलब्ध करुन दिले जातील त्यामुळे या कामांस लवकर सुरुवात करा आणि येत्या बुधवारपर्यंत काम पुर्ण करा अशा सुचना आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या कोवीड संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांना केल्या. 

              आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली पाटणच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता तालुक्यातील कोरोना उपाययोजना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,कोयनानगरचे सपोनी एम. एस. भावीकट्टी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.

           याप्रसंगी प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी संपुर्ण पाटण तालुक्यातील गाववाईज कोरोना बाधितांची माहिती तालुका प्रशासनाकडून घेतली.तालुक्यातील प्रमुख गांवामध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे.कोरोना रुग्णांचा तालुक्याने ९०० च्या वर टप्पा ओलंडला आहे.एकूण ९४३ कोरोना बाधित रुग्ण आढळले त्यापैकी ६५६ रुग्ण बरे झाले आणि २४१ रुग्ण उपचार घेत आहेत.एकूण रुग्णांच्या ४६ रुग्ण मयत झाले आहेत.तसेच गृह विलगीकरणात ११० रुग्ण आहेत.रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कराड असो वा सातारा असो याठिकाणीही रुग्ण असल्याने आपल्या पाटण तालुक्यातील रुग्णांना कराड,सातारा याठिकाणी उपचारा करीता बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून आपण दोन ते तीन दिवसापुर्वी ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु केले.रुग्णांची संख्या जास्त होवू लागल्याने पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये ऑक्सीजनसह २५ बेड उपलब्ध करुन देवून त्याठिकाणी रुग्णांच्यावर उपचार करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर माझी सकाळीच चर्चा झाली आहे.दोन दिवसात २५ बेड उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. त्याठिकाणी ऑक्सीजन देणेकरीता लागणारे सिलेंडर आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. दोन दिवसात तेथील स्वच्छता करुन पाईपींगचे काम तात्काळ सुरु करा. तसेच ढेबेवाडीच्या कोरोना रुग्णालयाकरीता लागणारे २५ ऑक्सीजनचे सिलेंडर आज किंवा उद्या देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये उपचार देणेकरीता आवश्यक वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची उपलब्धता करावी वेळप्रसंगी खाजगी डॉक्टरांना पाचारण करावे असे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

              दरम्यान ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु आहेच पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये ऑक्सीजनसह २५ बेडचे बुधवारपर्यंत काम पुर्ण झालेनंतर सुमारे ६० ऑक्सीजनसह बेड कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता आपल्याला पाटण मतदारसंघात उपलब्ध होतील व वेळेत कोरोना रुग्णांच्यावर उपचार करता येतील असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.

चौकट:- स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ऑक्सीजनचे ४० जम्बो सिलेंडर देणार.

                                                                                     ना.शंभूराज देसाई.                                                     

             कोरेाना बाधित रुग्णांना मोठया प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासू लागली आहे.त्यामुळे स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ऑक्सीजनचे ४० जम्बो सिलेंडर घेवून पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये व ढेबेवाडी कोरोना रुग्णालयात देण्याचा निर्णय ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत घेत बुधवारपर्यंत हे ४० जम्बो सिलेंडर प्रांताधिकारी तांबे यांचेकडे उपलब्ध करुन देण्यात येतील असे ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.

Monday 7 September 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने अदा केली 100 टक्के एफआरपी. एफआरपीची उर्वरीत 327 रु.प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.

 



दौलतनगर दि.07 :- दौलतनगर मरळी ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने नेहमीच कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने हंगाम 2019-20 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन रु.2657.54/- प्रमाणे उर्वरीत राहिलेली 327 रुपये ही रक्कम दि.07.09.2020 रोजी वर्ग केली असून कारखान्याने एफआरपीनुसार सर्वच्या सर्व 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खाती अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांव्दारे दिली आहे.

             पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 चे गळीत हंगामात एकूण 02 लाख 02 हजार 414 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 12.10% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन 2019-20 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्र.मे.टन रुपये 2657.54/- इतकी आहे.एफआरपीप्रमाणे एकूण गळीताच्या ऊसबिलाची रक्कम रुपये 5379.24 लाख इतकी होत असून कारखान्याने आतापर्यंत रुपये 4716.25 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली होती व उर्वरित एफआरपीप्रमाणे शिल्लक असणारी 327 रुपये प्रमाणे होणारी रक्कम रुपये 662.99 लाख कारखान्याने आज रोजी दि. 07.09.2020 रोजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती वर्ग केलेली आहे. दरम्यान केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडून दि.31 मार्च,2020 अखेर रुपये 511.91 लाख विविध अनुदानाची रक्कम आपले कारखान्याला येणे आहे. तसेच सन 2020-21 मध्ये निर्यात साखर व बफर स्टॉक अनुदानाची 528.11 लाख अशी एकूण रुपये 1040.02 लाख इतकी अनुदानाची रक्कम आपले कारखान्यास येणे बाकी आहे. सदर रक्कम प्राप्त होण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. सन 2019-20 चा गळीत हंगाम संपलेपासून गेले 5 महिन्यात कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर संपूर्ण टाळेबंदीच्या काळामध्ये बाजारपेठा बंद असल्याने साखरेची बाजारातील कमी झालेली मागणी तसेच वेळोवेळी विक्री दरामध्ये झालेला बदल,कामगारांची देणी,वाहतुक खर्च वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत एफआरपीची उर्वरित रक्कम सभासदांना देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवानेते यशराज देसाई व कारखाना व्यवस्थापनाने निधीची उपलब्धता करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. तसेच सन 2020-21 चे गळीत हंगामाकरीता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाची नोंद करुन ऊस हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी पत्रकांत करण्यात आले आहे.

                   

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ढेबेवाडीला ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सज्ज.

 


 

दौलतनगर दि.०७ :-पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने कराड तसेच सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात आठ दिवसापुर्वी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा यांना सुचित केले होते.आज ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सज्ज झाले आहे.

             गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात पुढाकार घेत त्यांनी स्वत: तालुका प्रशासनातील यासंदर्भातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच या कोवीड रुग्णालयाच्या सुरुवात करावयाच्या कामांची प्रत्यक्ष पहाणीही त्यांनी केली. त्यानतंर पुन्हा एकदा या कामाला गती देणेसंदर्भात अधिवेशनाला जाणेपुर्वी तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि येत्या दोन दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेत आणा असे आदेशित केले होते.त्यानुसार या कोवीड रुग्णालया करीता लागणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता करण्याचेही त्यांनी सुचित केले होते.

          आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात सुरु होत असलेल्या ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय कोरोना रुग्णांवर उपचाराकरीता सज्ज झाले असून ना.शंभूराज देसाईंच्या सुचनेवरुन या कोवीड रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धताही याठिकाणी करण्यात आली आहे.या कोवीड रुग्णालयाचे सर्व नियंत्रण ना.शंभूराज देसाईंनी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडे दिले आहे. कोरोना रुग्णांकरीता आवश्यक असणारे ३५ बेड ऑक्सीजनसह रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करणेकरीता दोन नोडल वैद्यकीय अधिकारी, दोन वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील ०७ वैद्यकीय अधिकारी, १० अधिपरिचारीका, दोन औषनिर्माता, ०४ लॅब टेकनिशअन, एक कक्षसेवक व दोन सफाई कामगार याप्रमाणे ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्णालयाकरीता एकूण ३१ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

          या रुग्ण्यालयात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील सर्व संबधित अधिकाऱ्यांना ना.शंभूराज देसाईंनी दिल्या आहेत.आठ दिवसापुर्वी पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील उपचाराच्या सुविधा प्राप्त होतील अशी आशा ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केली होती त्यानुसार त्यांनी हे रुग्णालय तालुका प्रशासनाच्या सहकार्यातून कोरोना बाधितांसाठी आजपासून सज्ज केले आहे.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण मतदारसंघातील 325 गावांगावात,वाडयावस्त्यांवर पोहचल्या टेंम्प्रेजर मशीन,आर्सेनिक अल्बम गोळया.डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पी.पी.ई. किट.

 

       

दौलतनगर दि.०७ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून पाटण मतदारसंघातील सुमारे 325 गांवागांवात तसेच वाडयावस्त्यांवर 500 टेंम्प्रेजर मशीन,आर्सेनिक अल्बम गोळयांच्या 4000 हजार डब्या तसेच मतदारसंघातील सर्व ग्रामीण रुग्णालये,13 प्राथमिक आरोग्य केंद्रे व ढेबेवाडी कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांना तसेच कोरोना बाधित रुग्णांची उपचाराकरीता ने-आण करणारे कर्मचारी यांना 1200 पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत.

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुरुवातीपासूनच पाटण मतदारसंघात सतर्क राहून गेली 06 महिन्यापासून कार्यरत आहेत.मतदारसंघात कोरोनाचा प्रार्दुभाव ज्या-ज्या ठिकाणी झाला त्या गांवाना,वाडयावस्त्यांना भेटी देण्याची तसेच तेथील नागरिकांच्या लॉकडाऊन काळातील समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणेला बरोबर ठेवत प्राधान्याने मोहिम हातात घेतली. मतदारसंघाबरोबर सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यांतील प्रमुख ठिकाणांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेटी देत तेथील कोरोनाच्या अनुषंगानेच्या समस्या सोडविण्यासंदर्भातही त्यांनी मागील 06 महिन्यांच्या काळात भर दिला. पहिल्या टप्प्याचे लॉकडाऊन सुरु होताच पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 21 हजार कुटुंबांना एक-एक महिना पुरेल एवढे धान्य, संसारपयोगी साहित्य त्यांनी शिवसेना पक्षाच्या तसेच नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने मतदारसंघात वाटप केले.

            दोनच दिवसापुर्वी ना.शंभूराज देसाईंनी शिवसेना पक्षाच्या तसेच नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 325 गावे व वाडयावस्त्यांमध्ये ग्रामीण जनते पर्यंत तापाची तपासणी करणेकरीता 500 टेंम्प्रेजर मशीन,रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळयांच्या 4000 हजार डब्या, च्यवनप्राश डबे त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व ग्रामीण रुग्णालये,13 प्राथमिक आरोग्य केंद्रे व ढेबेवाडी कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांना तसेच कर्मचारी यांना 1200 पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत.कोरोनाच्या संकटात जनतेला आधार देण्याबरोबर मतदारसंघातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही दिलासा देण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई करीत आहेत.

 

Friday 4 September 2020

ढेबेवाडीला ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालय रविवारपासून सेवेत आणा. कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,पाटण,तळमावले व तालुक्यातील प्रा.आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधा देण्याच्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 


 

दौलतनगर दि.०४ :- ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.जे काम शिल्लक राहिले आहे ते दोन दिवसात पुर्ण करुन याठिकाणी रविवारपासून कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार देण्यास सुरुवात करा तसेच या विभागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचारासाठी स्वतंत्रपणे तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पुरेसा औषधसाठयासह सर्व सुविधा उपलब्ध करुन दया.त्याचबरोबर इतर भागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,पाटण तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वरीलप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आरोग्य व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

          गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी ढेबेवाडी येथील ऑकसीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालय रविवार दि. ०६ सप्टेंबरपासून सुरु करणे तसेच या‍विभागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचाराकरीता अद्यावत प्राथमिक आरोग्य केद्रांत सुविधा देणे व पाटण ग्रामीण रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्यासह औषधसाठा उपलब्ध करुन देणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीस जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठ्ठल्ये,पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एल.जगताप,पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, सा.बा.उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांची उपस्थिती होती.

              याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी ढेबेवाडी तसेच पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक हे दोन्हीही कोरोना बाधित आढळल्याने ढेबेवाडी याठिकाणी सुरु करावयाच्या ऑकसीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्यासह पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन देणेसंदर्भात जिल्हा शल्यचिकिस्तक व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना दिल्या. सध्या ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची माहिती घेत कोरोना रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी हे या विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध करुन देणेबाबत सुचित केले. ढेबेवाडी कोरोना ग्रामीण रुग्णालयात सध्या दोन वैद्यकीय अधिकारी असून वाढीवचे दोन वैद्यकीय अधिकारी तसेच एकूण १० परिचारिका, ०२ फार्मासिस्ट, ०२ लॅब टेक्नीशियन, वॉर्ड बॉय, स्वीपर,त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी आणि दोन रुग्णवाहिकांना आवश्यक असणारे दोन चालक उपलब्ध करुन देणेसंदर्भात ना.देसाईंनी सुचना केल्या आहेत.तसेच वाढीवचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या राहण्याची याठिकाणी सोय करुन देण्याच्याही सुचना सा.बा.उपविभागाचे उपअभियंता यांना दिल्या आहेत.

            दरम्यान कोरोना व्यतिरिक्त रुग्णांची गैरसोय होवू नये याकरीता करावयाच्या उपाययोजना संदर्भातही आढावा घेताना ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच तालुक्यातील एकूण १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचार करण्याकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करुन देण्यात यावा.तसेच कोरोना रुग्णालयातील बायोमेडीकल वेस्टची विल्हेवाट लावण्याकरीता आवश्यक असणारी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात याव्यात असे ना.शंभूराज देसाईंनी सुचित केले असून दिलेल्या सुचनानुसार संबधित विभागाने अंमलबजावणी करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

चौकट:- कोरोना,कोरोना म्हणून इतर रुग्णांची गैरसोय नको- ना.शंभूराज देसाई.

             कोरोनाच्या भितीमुळे कोरोना नसलेल्या रुग्णांना उपचाराकरीता अनेक खाजगी रुग्णालयात नाकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना उपचार मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. याकरीता ढेबेवाडीचे कोरेाना रुग्णालय वगळता तालुक्यातील पाटणचे ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्यावर उपचार करण्याच्या सक्त सुचना दया असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

Thursday 3 September 2020

ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेडअभावी गैरसोय होणाऱ्या जिल्हयातील कोरोना रुग्णांना मुंबई/ पुणे महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये व जंबो कोवीड सेटंरमध्ये बेड उपलब्ध करुन दयावेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली मुख्यमंत्र्याकडे आग्रही विनंती.

 


दौलतनगर दि.०३ :- सातारा जिल्हयातील शासकीय रुग्णालये तसेच शासनाने अधिग्रहण केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे मर्यादित बेड आहेत.जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड अभावी अनेक रुग्णांचे मृत्यूदेखील झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई/ पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी व महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये तसेच शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये सातारा जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे आवश्यक बेड उपलब्ध करुन दयावेत अशी आग्रही विनंती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.

                  सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. जिल्हया मध्ये शासकीय रुग्णालये तसेच शासनाने अधिग्रहण केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे मर्यादित बेड आहेत.कोरोना रुग्णांना आवश्यक ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड जिल्हयातील कार्यरत कोरोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड मिळाले नाहीत म्हणून अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना जिल्हयात घडल्या आहेत. कोरोना रुग्णांचे सातारा जिल्हयातील वाढते प्रमाण पहाता विलंब न लावता आपण सातारा जिल्हयाकरीता जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंर सुरु करण्यास तात्काळ मान्यताही दिली आहे. त्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरचे कामांस सुरुवात देखील करण्यात आली मात्र या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरचे काम पुर्ण होण्यास किमान ०१ महिन्याचा कालावधी लागणार आहे.त्यामुळे रुग्णांना मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे. असे ना.शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे निदर्शनास आणून दिले आहे.

                 दरम्यान मुंबई शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळू हळू कमी होत आहे.मुंबई/ पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी व महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये तसेच शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये सातारा जिल्हयात वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध करुन देणेबाबत मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व सार्वजनीक आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी शासनाच्या तसेच मुंबई/ पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास आदेश दयावेत अशी ना.शंभूराज देसाईंनी आग्रहाची नम्र विनंती मुख्यमंत्री व सार्वजनीक आरोग्यमंत्री या दोघांकडे केली आहे.

               ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड अभावी सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांची  होणारी हेळसांड पहाता मी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व  सार्वजनीक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता मुंबई/ पुणे येथे महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये किंवा शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध करुन दयावेत असे लेखी पत्रच दिले आहे.सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे उपचार वेळेत मिळणेकरीता आम्ही प्रयत्नशील आहोतच त्याचबरोबर वरीलप्रमाणे जिल्हयातील कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय करणेकरीता व्यक्तीश: माझा राज्याचे मुख्यमंत्री व सार्वजनीक आरोग्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.