Monday 28 September 2020

कोरोनापासून बचावात्मक सर्व उपाययोजना राबवा. 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबवूया. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 


 

दौलतनगर दि.२९:- राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्याकरीता जाहीर केलेली 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' ही राज्य शासनाची सार्वत्रिक मोहीम आपण आपले पाटण विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवूया. या मोहिमेतंर्गत कोरेानापासून बचावात्मक अशा सर्व उपाययोजना राबवा. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'  या मोहिमेतंर्गत आपले ग्रामीण स्तरावर गावपातळीवरील सर्वपक्षीय पदाधिकारी,गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच शासकीय यंत्रणेचे गावस्तरावरील कर्मचारी यांच्या मार्फत गावोगावी तसेच वाडयावस्त्यावर या मोहिमेचे प्रबोधन करण्याची मोहिम हाती घेण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

              दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता व राज्य शासनाची 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याकरीता पाटण तालुक्यातील कोरोना उपाययोजना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,पाटणचे सपोनी सी.एस.माळी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.

            याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' हे अभियान कोरोनाचा फैलाव रोखण्याकरीता संपुर्ण राज्यभर राबविण्यास सुरुवात केली आहे. आपणही या योजनेचा शुभारंभ केला. शुभारंभादिवशी मी स्वत: गावागावात जावून या मोहिमेचे महत्व ग्रामीण भागातील नागरिकांना,महिलांना पटवून दिले. या अभियानात आपण प्रत्येकजण सहभागी होऊ या.स्वतःला आणि कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहिम अतिशय उपयुक्त आहे.या योजनेतंर्गत तपासणी करणेकरीता घरोघरी येणाऱ्या शासकीय कर्मचारी यांना सहकार्य करुन नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेतल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे.याकरीता ग्रामीणस्तरावर प्रबोधनाची गरज आहे. हे प्रबोधन मतदारसंघातील प्रत्येक गांवागांवात,वाडीवस्तीवर करण्याकरीता शासकीय कर्मचारी यांच्यासमवेत  गाव पातळीवरील सर्वपक्षीय पदाधिकारी,गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी करणे आवश्यक आहे.या पदाधिकाऱ्यामार्फत हे प्रबोधन करण्याकरीता प्रातांधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी यांनी मतदार संघातील भाग वाटून घ्यावेत व या पदाधिकाऱ्यांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे तसेच ग्रामपंचायती मार्फत स्पीकरवरुन दिवसातून तीनदा तसेच मोठया ग्रामपंचायतीमार्फत फिरत्या वाहनातून या मोहिमेचा प्रसार करावा.असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले व अधिकारी यांना घरोघरी जावून तपासणी करण्याच्या प्रमाणात वाढ करावी अशा सुचना देवून पाटण मतदारसंघातील सर्वांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.

चौकट:- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पुढाकाराने पाटण मतदारसंघातील शिक्षक संघटना  होणार 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानात सहभागी.

              'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या  शासनाच्या अभियानात प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला पाटण मतदारसंघातील विविध शिक्षक संघटनांनी चांगला प्रतिसाद देत ना.शंभूराज देसाईंची दौलतनगरला भेट घेऊन या अभियानात आम्ही उद्यापासूनच सहभागी होत असल्याचे यावेळी उपस्थित विविध शिक्षक संघटनांतील पदाधिकारी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment