Wednesday 28 July 2021

७२ तासांत रस्ते पूल वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी खुले करा मंत्री ना.शंभुराज देसाई यांचे प्रशासनाला आदेश.

दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा विस्कळीत  झाला असल्याने तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.मात्र आपण स्वतः तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून ठाण मांडून बसून  प्रशासनाला दुसऱ्याच दिवसांपासून कामे करण्यास सुरुवात केली. मात्र आता कामे पूर्ण होणे गरजेचे असून येत्या ७२ तासांत तालुक्यातील रस्ते पूल वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी खुले करा तसेच आपतग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची तातडीने उभारणी करा, अशा स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री  ना. शंभुराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.

              गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली दौलतनगर,ता.पाटण येथे पाटण तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे झालेले नुकसान व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाबाबत आयोजित आढावा आयोजित केली होती. यावेळी सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता खलाटे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खैरमोडे, वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, कोयना धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता पोतदार,लघुसिंचन जलसंधारण प्रभारी कार्यकारी अभियंता पवार, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,व्ही.डी.शिंदे तसेच विविध खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

           याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की,पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलन यामुळे फार मोठी आपत्ती उद्भवली असल्याने तालुक्यातील रस्ते,पूल,विद्युत पुरवठा,आणि शेतीचे  अतोनात नुकसान झाले आहे.ठिकठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले असून  नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.शेकडो एकर शेतीचे,पीकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे.तर भूस्खलनामुळे तालुक्यातील आंबेघर,मिरगाव ढोकावळे या ठिकाणी घरच्या घरे जमिनीत गाडली गेल्याने मोठ्या प्रमाणात जीवित हानी ही झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्क करून तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत असून मी स्वतः गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात ठाण मांडून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.म्हणूनच गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्या झाल्या तालुक्यातील प्रशासनाला आदेश दिले आहेत.त्यामुळेच दुसऱ्याच दिवसांपासून तालुक्यातील रस्ते,पूल पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा तातडीने दुरुस्त करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. अतिवृष्टी व मुसळधार पावसाने तालुक्यातील गावपोहोच रस्ते,साकव पूल, फरशी पूल यांचे मोठया प्रमाणांत नुकसान होऊन अनेक गावे संपर्कहिन झाली आहेत. संपर्कहिन गावांचे तातडीने दळण-वळण सुरु होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम,प्रधानमंत्री सडक योजना व जलसंपदा विभाग या सर्व विभागांनी समन्वयातून काम करुन संपर्कहिन गावांचे रस्ते,साकव पूल दुरुस्तीचे काम दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना देत ते पुढे म्हणाले अधिकाऱ्यांनी आता फार वेळ न घालविता येत्या ७२ तासांत उरलेली सर्व कामांची दुरुस्ती करून तालुक्यातील रस्ते,पाणीपुरवठा, पूल, वीज तातडीने पूर्ववत करण्यासाठी कामाला  लागावे. तालुक्यातील आंबेघर,मिरगाव ढोकवळे तसेच इतर ठिकाणी स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची उभारणी करा. तसेच मंडल अधिकारी व तलाठी कृषी विभाग,ग्रामसेवक यांचेकडून तालुक्यातील शेत जमिनी, पिकांचे,पडझडीच्या नुकसानीचे तात्काळ पंचानामे करावेत. त्यासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नका.  मात्र प्रशासनाने प्रथम तातडीने कार्यवाही सुरू करा.आरोग्य विभागाकडून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना आवश्यक असणारा औषधसाठा उपलब्ध करुन द्यावा.जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी समन्वयाने तातडीने कोयनानगर येथील वसाहतींची दुरुस्ती करुन दहा दिवसांत बाधित कुटुंबियांना निवासाची व्यवस्था होण्याच्यादृष्टीने उपाययोजना करा. विज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद असलेल्या गावांना पुर्ववत वीज पुरवठा करण्याचे काम सुरु असून उद्यापर्यंत सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत करावेत.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून टँकरने पाणी पुरवठा होणाऱ्या गावांना दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पुरवठा होण्याच्यादृष्टीने सोय करण्यात यावी. अशा सूचना देत दुरुस्तीची कामे करत असताना कोणत्याही प्रकारची आडकाठी झाल्यास पोलीस यंत्रणासोबत घेऊन ती कामे पुर्ण करा असे ना. शंभूराज देसाई यांनी या शेवटी बैठकीत दिले.

 

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या आठवणी पुन्हा जाग्या.

मुंबई येथे बुधवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. मात्र गृहराज्यमंत्री  शंभुराज देसाई यांनी  आपल्या मतदार संघातच तळ ठोकून सर्वसामान्य आपतग्रस्त जनतेला मदत करण्यास प्रथम प्राधान्य देऊन मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती न लावता पाटण मतदार संघातच थांबणे पसंत केले.दरम्यान  लोकनेते बाळासाहेब देसाई गृहमंत्री यांनी सन 1967 च्या कोयना भूकंपाच्या वेळी भूकंपामुळे बाधित कुटुंबियांना मदत करण्यासाठी प्रथम प्राधान्य देऊन कोयनानगर या ठिकाणी ठाण मांडून होते.तर गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई हे सुध्दा पाटण तालुकयामध्ये बाधित कुटुंबियांना मदत करुन त्यांना आधार देण्यासाठी सतत कोयना,मोरणा,तारळे भागात दौरा करत आहेत. तर बाधित कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळण्यासाठी स्वत: बारकाईने लक्ष ठेवून बाधित कुटुंबियांना धीर देण्याचे काम करत आहेत. पाटण तालुक्यामध्येच थांबून मदत कार्य राबविण्याच्या कार्यपद्धतीने खऱ्या अर्थाने लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. 

शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाना संसार उपयोगी साहित्यांचे वाटप. संकटकाळी दिला बाधित कुटुंबियांना आधार.

  

दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघात गत आठवडयात सलग दोन ते तीन पडलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे मोठया प्रमाणांत नुकसान होऊन डोंगरी व दुर्गम भागातील कडा कोसळण्याची शक्यत असलेल्या दरडप्रवण कोयना, मोरणा, ढेबेवाडी, काळगाव व तारळे विभागातील गावांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.अतिवृष्टीमुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या गावांतील कुटुंबांना शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्यामाध्यमातून पहिल्या टप्प्यात तातडीने 4966 धान्यांचे किटचे जागेवर वाटप करुन संकटकाळी बाधित कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले असून अजूनही काही गावांना तातडीने मदत पोहाचविण्याच्यादृष्टीने नियोजन सुरु आहे.

                पाटण तालुक्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे डोंगर कपारीतील गावांवर डोंगराचा भाग कोसळून या गावांमधील कुटुंबे बाधित झाली. दरडप्रवण धोकादायक स्थितीमध्ये असणाऱ्या कोयना, मोरणा, ढेबेवाडी, काळगाव व तारळे विभागातील गावांमधील अनेक कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पाटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने संपुर्ण जनजिवन विस्कळीत होऊन असुरक्षित असलेल्या गावांना विविध ठिकाणी अचानक स्थलांरित करावे लागल्याने या स्थलांतरीत नागरीकांसमोर अन्न धान्यासह, कपडे व इतर जिवनावश्यक वस्तूची तातडीची गरज लक्षात घेऊन स्थलांतरित केलेल्या कुटुंबातील नागरीकांना मदतीचा हात देण्याकरीता तसेच बाधित कुटुंबांना मानसिक आधार देण्याच्या हेतून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यामधील आंबेघर तर्फ मरळी, मिरगाव कामरगाव, ढोकावळे, हुंबरळी, वरसरकून बाजे,चोपडीवाडी डावरी, जितकरवाडी जिंती,भातडेवाडी जिंती,धनावडेवाडी निगडे,बागलेवाडी, जुगाईवाडी, कडयाखालची बोर्गेवाडी, धडामवाडी धजगाव,दिक्षी, शिद्रुकवाडी,जोशेवाडी काळगाव, म्हारवंड, नवजा, मानाईनगर, गोकूळनाला, डिचोली, पळासरी, खुडुपलेवाडी या बाधित गावांतील गरजू कुटुंबांना पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 4966 धान्यांचे किटचे  वाटप जागेवर जाऊन करण्यात आले.दरम्यान तालुक्यामध्ये जस-जसे जनजिवन हळू-हळू पुर्वपदावर येत आहे,तसे नव्याने बाधित गावांची संख्या वाढू लागली असून नव्याने बाधित गावातील कुटुंबांना आवश्यक असणाऱ्या संसार उपयोगी साहित्याची गरज लक्षात घेऊन  ब्लँकेट, चटई, साडया,टॉवेल,पाणी बॉटल, फोम, कागद, आटा,धान्य साहित्याचे किट, तांदुळ, तुरडाळ, चहा पावडर, तेल, इ. संसार उपयोगी साहित्याचे शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तालुक्यातील बाधित कुटुंबापर्यंत मदत पोहचविणार असल्याची ट्रस्टच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.

 

Monday 26 July 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 


दौलतनगर दि.26(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा या गळीत हंगामामध्ये ऊसाचे प्रमाण जास्त आहे. त्यातच साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही अनिश्चित असून सध्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे अनेक कारखान्यांकडे मोठया प्रमाणांत साखरेचे साठे पडून आहेत.त्याचबरोबर तोडणी व वाहतुक खर्चात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील असा कारखाना आहे जो अडचणीच्या काळातही महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगामध्ये व्यवस्थितरित्या सुरु आहे.कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम यापुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला आहे. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त  ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवून नियोजनबध्द काम करुन सन 2021-22 चा गळीत हंगामही प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा,असे आवाहन युवानेते यशराज देसाई यांनी केले.

             दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2021-22 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन युवानेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी रोलरचे पूजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजाची पदाधिकारी यांचेसोबत पाहणी केली.योवळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन  डॉ. दिलीपराव चव्हाण, संचालक आनंदराव चव्हाण, पांडूरंग नलवडे,विकास गिरी गोसावी,शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, वसंत कदम, गजानन जाधव, कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

                 याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी साखर उताऱ्याने 02 लाख 78  हजार क्विंटल साखर उत्पादन केले असून सन 2020-21 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला आतापर्यंत एफआरपीच्याप्रमाणे प्रतिटन रुपये 2330 नुसार होणारे बिल ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यातील गळीत हंगाम पुर्व कामे प्रगतीपथावर असून प्रतिवर्षाप्रमाणे सन 2021-22 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्याचा मनोदय आमचा आहे त्याला यश मिळेल असे सांगून ते म्हणाले,साखर उद्योग अडचणीत असताना देखील आपला देसाई सह.साखर कारखाना चांगल्या प्रकारे सुरु आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या ऊसाला एफआरपीच्या धोरणानुसार ऊसदर देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करीत आलो आहोत. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता चांगली राहणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे आज सातत्याने कमी होणाऱ्या साखरेच्या दरामुळे तसेच कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर शासकीय निर्बंधाचे पालन करीत सर्व उद्योगधंदे व व्यापारी बाजारपेठा ठराविक कालावधीतच सुरु असल्याने आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील यावर मात करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. कारखान्यासमारे आर्थिक अडचणी असतानाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली नुकतेच आपण कारखान्यातील 73 कर्मचाऱ्यांना कायम,हंगामी व कंत्राटी अशा पद्धतीच्या नेमणूकाही दिल्या आहेत. व्यवस्थापनाने ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द काम करावे.कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस आपल्या कारखान्याला देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलताना केले.यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

 

Saturday 24 July 2021

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केला तारळे,चाफळ व मोरणा विभागाचा दौरा.

 



  

दौलतनगर दि.24(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-गेली दोन-तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठया प्रमाणांत नुकसान झाले असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तारळे,चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली.

                यावेळी  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे समवेत माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर, शिवदौलत बँकचे संचालक अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे,विकास जाधव,भरत साळूंखे,चंद्रकांत पाटील,डी.वाय.पाटील,गणेश भिसे,किसन गालवे यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

              गेल्या दोन तीन दिवसांपासून पाटण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणांत ढगफुटीसदृश्य पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह शेत जमीनी, पिके यांचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढयांसह नद्यांना पुराचे पाणी  येऊन पोहोच रस्ते,साकव पूल,शेत जमीनी यांचे मोठे नुकसान झाले असून गावपोहोच रस्त्यांवर मोठया प्रमाणांत दरडी पडण्यांसह साकव पूल वाहून गेल्याने तसेच रस्ते खचल्याने डोंगरी व दुर्गम भागातील गावांचे दळण-वळण ठप्प झाले आहे.त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागामध्ये असलेल्या गावांचे आस-पास भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या असल्याने डोंगराचा भाग व कडा कोसळण्याची  भिती असलेल्या गावांतील ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन त्यांना आवश्यक त्या सुविधा तातडीने पुरविणे गरजेचे असल्याने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज तारळे,चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करुन पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. पाटण तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठया प्रमाणांत पडलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार  पावसामुळे विशेषत: डोंगरी व दुर्गम भागातील गावे,वाडया वस्त्यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झालेले असून काही गावांवर डोंगराचा भाग कोसळयाची शक्यता निर्माण झाली आहे तर काही गावांतील घरे खचण्यास सुरुवात झाली असल्याने धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या गावांमधील नागरिकांना प्रथमत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या नागरीकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.दरम्यान अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने मदत कार्यामध्ये अनेक अडचणी येत असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनींचे,पिकांचे,घरांचे तसेच रस्ते,साकव पूल,नळ पाणी पुरवठा योजना यांसारख्या सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे हे पाऊस कमी आल्यानंतर लगेचच करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना करण्यात आल्या असल्याचे सांगत मुसळधार पावसाने मोठया प्रमाणांत नुकसान झालेल्या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने नागरीकांनी आपला जिव धोक्यात घालून या मार्गावरुन प्रवास करु नये असे आवाहनही ना.शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.

चौकट :- भूस्खलन होऊन बाधित झालेल्या मिरगाव (कामरगावं) येथील ग्रामस्थांना दिली तातडीची मदत.

            पाटण तालुक्यात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या कोयना विभागातील मिरगाव (कामरगाव) येथील बाधित सर्व कुटुंबांना एन.डी.आर.एफ.टिमच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या स्थलांतरित कुटुंबांना एक महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य तसेच अन्नधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घर पडझडीमुळे बाधीत झालेल्या 500 कुटुंबांना सध्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी ,ब्लँकेट,सतरंजी इत्यांदींची व्यवस्था शिवसेना पक्षाचेवतीने करण्यात आली आहे.

Thursday 15 July 2021

राज्य शासनाच्या 3054 रस्ते व पुल दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत पाटण तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर.

  

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या 06 रस्त्यांच्या कामांकरीता राज्य शासनाच्या 3054 रस्ते व पुल परिरक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क मधील कामांना सन 2020-21 या आर्थिक वर्षात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 85 लक्ष मंजूर झाले असून सदर कामांना प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पारित केला असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

         प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांचे दळण वळणाचे दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या ग्रामीण रस्त्यांची मोठया प्रमाणांत दुरावस्था झाली होती.तालुक्यातील दळणवळणाची सुविधा अधिक सुरळीत होणे गरजेचे असून ग्रामीण भागातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचा दळण वळणाचा मार्ग सुख व्हावा याकरीता मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर होणेकरीताचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील 06 रस्त्यांच्या कामांकरीता राज्य शासनाच्या 3054 रस्ते व पुल परिरक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क मधील कामांना सन 2020-21 या आर्थिक वर्षात 85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामांना प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पारित केला आहे.यामध्ये वाडीकोतावडे गाव पोहोच रस्ता ग्रामा 228 सुधारणा  10 लाख, नाव गाव पोहोच रस्ता ग्रामा 193 सुधारणा 15 लाख, रामा 136 ते म्हावशी  पोहोच रस्ता ग्रामा 109 सुधारणा 15 लाख, सडादाढोली गाव पोहोच रस्ता ग्रामा 122 सुधारणा 15 लाख, दुधडेवाडी मरळी पोहोच रस्ता ग्रामा 246 सुधारणा 15 लाख व वरची मोरगिरी रस्ता ग्रामा 179 सुधारणा 15 लाख निधी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मंजूर झाला असून मंजूर झालेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांची तातडीने निविदा कार्यवाही करुन पावसाळया सपंल्यानंतर लगेचच या कामांना सुरुवात करण्याबाबतच्या सुचनाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

Monday 12 July 2021

'शिवशाही' सरपंच संघ विकासकामाच्या बाबतीत राज्यात आदर्श ठरेल. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा स्थापनेची घोषणा.

 


 

 दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- सरपंचानी आपली कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडून शासनाच्या विविध योजना गावांतील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेला शिवशाही सरपंच संघ राज्यात एक आदर्श संघ म्हणून काम करेल अशी ग्वाही देऊन या शिवशाही सरपंच संघाने राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सत्तेचा फायदा आपल्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी घ्यावा तसेच माझ्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या शिवशाही सरपंच संघ विकासकामाच्या बाबतीत राज्यात  आदर्श ठरेल असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.ते दौलतनगर ता पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावच्या सरपंच उपसरपंच यांना मार्गदर्शन करताना आयोजित सरपंच परिषेदेमध्ये बोलत होते.

              यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,जयराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,पंजाबराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

             मंत्री ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, पाटण विधानसभा मतदार नव्याने स्थापन झालेल्या या सरपंच संघामुळे गावाचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे त्यामाध्यमातून  सरपंच संघाने गावाचा कायापालट केला पाहिजे.५ वर्षांनंतर  ग्रामपंचायतीने काय केले अशी विचारणा केल्यानंतर त्यांच्यासमोर आपण केलेल्या कामाचा आदर्श गावांपुढे निर्माण झाला पाहिजे.पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे सरपंच आहेत. त्यांनी त्याचा उपयोग गावामध्ये चांगले कामे करण्यासाठी केला पाहिजे.गावामध्ये शासनाच्या विविध योजना राबविल्या पाहिजेत,मात्र बहुतांशी सरपंचाना शासनाच्या चांगल्या योजनांची माहीती नसल्यामुळे  ग्रामसेवकांनी सांगायचे आणि सरपंचांनी ऐकायचे हा कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. राज्य सरकार शासनाच्या विविध योजनेसाठी निधी खर्च करीत असते.त्यामुळे चांगल्या योजना राबविण्यासाठी सर्व सरपंचांनी  यांनी एका छता खाली येऊन गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.त्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आणि सरपंच संघ एकत्र बसून समोरासमोर बसून चर्चा करून त्यांच्या प्रश्नांची  सोडवणूक करण्यासाठी आणि शिवशाही सरपंच संघाचे नाव संपूर्ण राज्यात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार असून  त्यासाठी शासनाच्या विविध योजनांची ग्रामस्तरावर अंमलबजावणीसाठी नजीकच्या काळात संघाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन ही करणार असल्याचे ही  ना. शंभुराज देसाई यांनी सांगितले.यावेळी शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा मतदार संघ या संघाची तालुका कार्यकारणी स्थापना केल्याचे जाहीर करण्यात येऊन या कार्यकारिणीत  तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणातील एका सरपंचाची सदस्य म्हणून नियुक्ती ही करण्यात आली.कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्य संतोष गिरी यांनी मानले.यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावचे सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती होती.

 

चौकट: शिवशाही सरपंच संघ राज्यात आदर्श ठरेल.

पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी गावांमधील सरपंच आणि उपसरपंच हे शिवसेनेचे नेतृत्व मानणारे असून राज्य शासनाच्या वेग-वेगळया योजना ग्रामीण पातळीवर राबविण्यामध्ये यशस्वी होऊन त्याच उद्देशाने स्थापन केलेला शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा मतदारसंघ हा राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास ही मंत्री ना.शंभुराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याला आघाडी सरकार जास्तीत जास्त मदत करणार. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईं. स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त केले विनम्र अभिवादन.

 

                    

दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रगती साठी पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विध्यार्थी यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारां च्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयतशील आहे.दरम्यान पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला भविष्यात ही जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी राज्य शासन कटीबद्द असल्याचे प्रतिपादन  राज्याचे गृह आणि वित्त राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

              ते लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या ३५ वा पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,यशराज देसाई,जयराज देसाई,देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सुग्रा खोंदू,ॲङ डी.पी.जाधव, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,पंजाबराव देसाई,संजय गांधी निराधार येाजना समितीचे अध्यक्ष भरत साळूंखे, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड. मिलिंद पाटील,अभिजित पाटील,बबनराव शिंदे, माणिक पवार, माजी सदस्य राजेंद्र चव्हाण,बबनराव शिंदे, नामदेवराव साळूंखे,जालिंदर पाटील,कारखान्याचे संचालक सोमनाथ खामकर, बबनराव भिसे, विजय जंबुरे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसीलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

                मंत्री ना.शंभूराज देसाई  पुढे म्हणाले,स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांनी कारखाना चालवीत असताना शिक्षण समूहाचे छोटेसे रोपटे उभे केले आज याच रोपट्याचे वटवृक्षा मध्ये रूपांतर झाल्याने खऱ्या अर्थाने स्व आबासाहेबांचे पाटण तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीचे जपण्याचे पूर्णत्वास जात असल्याचे समाधान मिळत आहे.या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी तालुक्यातील इयता १० वी १२ वी परीक्षेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते मात्र सध्या सलग दुसऱ्या वर्षी ही कोविड संसर्ग परिस्थिती असल्यामुळे तालुक्यातील गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडित सुरू असलेली ही परंपरा खंडित होऊन हा कार्यक्रम सध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.मात्र कोविड परिस्थिती कमी झाल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांना सन्मानित करणारा हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.राज्यातील साखर कारखानदारी ही सध्या अडचणीत असून कोविड काळामुळे केवळ साखर कारखानदारीच नव्हे तर राज्य आणि देश ही अडचणीतुन चालला आहे.राज्याचा महसूल गतवर्षी पेक्षा या वर्षी तब्बल सव्वा लाख कोटी रुपयांनी कमी असून त्यातच भर म्हणून राज्याचे ३२ हजार कोटी एवढी जीएसटी परताव्याची रक्कम ही केंद्रशासनाकडून अद्याप येणे बाकी आहे. त्यामुळे सरकारची परिस्थिती तीच साखर कारखानादारीची आहे.राज्यात साखरेचे प्रचंड साठे शिल्लक असताना  राज्यात २० टक्के उसाची जादा लागण झाली आहे त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यापुढे  मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तरीही युवा नेते यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेऊन अडचणीच्या काळात ही कामगारांना कायम,हंगामी अशा ऑर्डर दिल्या ही कौतुकाची बाब आहे.लोकनेते देसाई कारखान्याची राज्य शासनाकडून येणारी थकबाकी देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून या कारखान्याच्या मदतीसाठी ही राज्यातील आघाडी शासन सदैव तयार असल्याची ग्वाही ही मंत्री देसाई यांनी यावेळी दिली.

चौकट: ७३ कर्मचाऱ्यांना दिल्या ऑर्डर..!

  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील तब्बल ७३ अधिकारी कर्मचारी यांना प्रामाणिक,अखंडित आणि दिर्घकाल सेवा झालेबद्दल स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताच्या पार्श्वभूमीवर  कायम,हंगामी व कंत्राटी करण्यात आल्याची घोषणा युवा नेते यशराज देसाई यांनी कार्यक्रमात जाहीर केले.यामध्ये ३८ कामगारांना हंगामी,९ कामगारांना कायम आणि २१ कामगारांना कंत्राटी म्हणून ऑर्डर देण्यात आल्या.या सर्व कामगारांचे मंत्री शंभुराज देसाई,यशराज देसाई,रविराज देसाई   तसेच कामगार संघटचे अध्यक्ष विजय मोरे यांनी अभिनंदन केले.

 


                     

 

Saturday 10 July 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरणाच्या सुरक्षेकरीता असलेल्या पोलीस चौकींचा केला पाहणी दौरा.

 


दौलतनगर दि.11 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण व येथील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोयनानगर,ता.पाटण हे राज्यातील एक प्रसिध्द पर्यटनाचे ठिकाण असून कोयना धरणाचे पाणी साठयातून तयार करण्यात येणारी वीज ही संपूर्ण महाराष्ट्राला पुरविण्यात येत असल्याने वीज निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन गंभीर असून कोयना धरणाच्या सुरक्षेकामी सध्या अस्तित्वात असलेल्या कोयना धरण परिसरातील आठ पोलीस चौक्यांची प्रत्यक्ष पाहणी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी  सर्व अधिकाऱ्यांसमवेत केली.

           यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या समवेत शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, धोंडीराम भोमकर,अभिजित पाटील, बबनराव भिसे,उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे, कार्यकारी अभियंता कोयना धरणव्यवस्थापन नितीन पोतदार, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी यांची उपस्थिती होती.

पाटण तालुक्यातील कोयनानगर,ता.पाटण हे महाराष्ट्रातील एक प्रमुख्‍ पर्यटन केंद्र म्हणून प्रसिध्द असून महाराष्ट्रासह देशातून तसेच परदेशातून या ठिकाणी मोठया प्रमाणांत पर्यटक हे दैनंदिन भेटी देत असतात. सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या कोयनानगर सह या परिसरातील सुमारे 10 किलोमिटरच्या परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करणेकरीताचा पर्यटन विकास आराखडा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला असून  प्रत्यक्ष या पर्यटन आराखडयांची कामे प्रगतीत असल्याने येथील निसर्ग सौदर्यांमध्ये अधिकची भर पडत असल्याने कोयनानगर या पर्यटन ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन हे गंभीर असून कोयना धरणाची सुरक्षाही महत्त्वाची असल्याने कोयना धरण परिसरामध्ये कोयना धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने ठिक-ठिकाणी आठ पोलीस चौक्यांची प्रत्यक्ष पाहणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केली. सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस चौक्यांच्या इमारती हा जुन्या असून त्या कालबाहय झालेल्या आहेत. कोयनानगर येथे प्रतिवर्षी पावसाळयामध्ये मोठया प्रमाणांत पाऊस पडत असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोयना धरण परिसरातील सुरक्षेच्यादृष्टीने उभारण्यात आलेले लोखंडी टेहाळणी मोर्चे हे जुने आहेत. कोयना धरणासाठी चांगली सुरक्षा पुरविण्याच्यादृष्टीने पोलीस चौक्यांच्या इमारती व टेहाळणी मोर्चे यांची तातडीने पुनर्बांधणी करणे गरजेचे असल्याने कोयना धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेला अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्यासह पोलीस चौक्यांची पुनर्बांधणी करण्याकरीता तातडीने निधी मंजूर होण्याकरीता आवश्यक असलेला प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे सांगून कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याकरीता तसेच पोलीस चौक्यांचे पुनर्बांधणीकरीता राज्यशासनाकडून निधी मंजूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन निधी मंजूर करणार असल्याचे ना.शंभूराज देसाई यांनी सांगीतले.

चौकट :- कोयना धरणाच्या सुरक्षेकरीता गृहराज्यमंत्री अलर्ट.

              कोयना धरणाची  सुरक्षा ही महत्त्वाची असल्याने गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी काल पावसातही सर्व अधिकारी यांच्या समवेत सर्व पोलीस चौक्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून असलेल्या अडचणींची माहिती घेतली. त्यामुळे कोयना धरणाच्या सुरक्षेकरीता गृहराज्यमंत्री हे अलर्ट असल्याची चर्चा परिसरात होती.

पाटण तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना. ­­­

 


दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील मागील काही दिवसात बऱ्यापैकी कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत असताना तालुक्यातील बाजारपेठांच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.गर्दींच्या ठिकाणांमुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबाजवणी करावी.कोरोना बाधित रुग्णांची संख्या पहाता पाटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी असले तरी कोविड 19 चा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

           पाटण तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्याचेदृष्टीने आज दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे, मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार,कोविड सेंटर समन्वयक अमर कदम आदींची उपस्थिती  होती.

                  बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्यात बाधित रुग्णांची माहिती घेऊन तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या व त्यांचेवर करण्यात येणारे औषधोपचार याची सविस्तर माहिती घेतली व कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना करत सध्या जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची सख्या वाढू लागली असल्याने सर्वांना शासकीय निर्बधांचे पालन करावे लागत आहे. असे असतानाही बाजारपेठांच्या ठिकाणी,विविध दुकानांमध्ये खरेदी करण्याकरीता मोठया प्रमाणांत गर्दी होताना दिसत असल्याने कोरोना संसर्ग पुन्हा मोठया प्रमाणांत वाढण्याची  भिती असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून शासनाच्या सर्व निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात यावी. तालुका प्रशासनाने प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करुन कोरोना संसर्गाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे काम करावे.कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घेण्याच्या सुचना मागील बैठकीत केल्या होत्या त्यानुसार ही मोहिम सुरु आहे. या मोहिमेत तालुका प्रशासनाने दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे कार्य केल्यास नक्कीच कोरोना रुग्णांची संख्या अजून कमी होईल. पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर वेळेतच चांगले उपचार मिळत असल्याने विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांचा याचा मोठा फायदा होताना दिसत असून पाटण तालुक्यामध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे सांगत सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणा काम करीत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच रस्त्यावर किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी महत्त्वाचे कारण नसतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी. तसेच हॉटेलमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत आहे का यावरही लक्ष ठेवत गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे अशा सूचना करत पाटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी असले तरी कोविड 19 चा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत केले. 

दि.१२ जुलै रोजी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची ३५ वी पुण्यतिथी साध्यापध्दतीने. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती.

              

  दौलतनगर दि.10:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (स्व.आबासाहेब) यांचा वा पुण्यतिथी कार्यक्रम राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे सोमवार दि.१२ जुलै,२०२१ रोजी सकाळी १०.३० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथे कोविड 19 संसर्गामुळे शासकीय नियमांचे पालन करीत अत्यंत साध्या पध्दतीने आयोजीत करण्यात आला आहे.

               प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षा प्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा वा पुण्यतिथी कार्यक्रम सोमवार दि.१२ जुलै,२०२१ रोजी सकाळी १०.३० वा. दौलतनगर(मरळी), ता.पाटण येथे आयोजीत केला आहे.कोरोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने होणार असून पुण्यतिथीनिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावरील स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुतळयास,समाधीस पुष्पचक्र व स्व.आबासाहेब यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे स्व.आबासाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त भजनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.