Saturday 10 July 2021

पाटण तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना. ­­­

 


दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील मागील काही दिवसात बऱ्यापैकी कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत असताना तालुक्यातील बाजारपेठांच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.गर्दींच्या ठिकाणांमुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबाजवणी करावी.कोरोना बाधित रुग्णांची संख्या पहाता पाटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी असले तरी कोविड 19 चा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

           पाटण तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्याचेदृष्टीने आज दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे, मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार,कोविड सेंटर समन्वयक अमर कदम आदींची उपस्थिती  होती.

                  बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्यात बाधित रुग्णांची माहिती घेऊन तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या व त्यांचेवर करण्यात येणारे औषधोपचार याची सविस्तर माहिती घेतली व कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना करत सध्या जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची सख्या वाढू लागली असल्याने सर्वांना शासकीय निर्बधांचे पालन करावे लागत आहे. असे असतानाही बाजारपेठांच्या ठिकाणी,विविध दुकानांमध्ये खरेदी करण्याकरीता मोठया प्रमाणांत गर्दी होताना दिसत असल्याने कोरोना संसर्ग पुन्हा मोठया प्रमाणांत वाढण्याची  भिती असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून शासनाच्या सर्व निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात यावी. तालुका प्रशासनाने प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करुन कोरोना संसर्गाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे काम करावे.कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घेण्याच्या सुचना मागील बैठकीत केल्या होत्या त्यानुसार ही मोहिम सुरु आहे. या मोहिमेत तालुका प्रशासनाने दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे कार्य केल्यास नक्कीच कोरोना रुग्णांची संख्या अजून कमी होईल. पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर वेळेतच चांगले उपचार मिळत असल्याने विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांचा याचा मोठा फायदा होताना दिसत असून पाटण तालुक्यामध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे सांगत सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणा काम करीत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच रस्त्यावर किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी महत्त्वाचे कारण नसतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी. तसेच हॉटेलमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत आहे का यावरही लक्ष ठेवत गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे अशा सूचना करत पाटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी असले तरी कोविड 19 चा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत केले. 

No comments:

Post a Comment