Friday 22 March 2024

पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे कामाला 29 कोटी 83 लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता.

 


दौलतनगर दि.22:- पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी 14 कोटी 87 लक्ष रुपयांचा निधी या पूर्वी मंजूर होऊन या इमारतीचे कामालाही सुरुवात झाली आहे.तर या प्रशासकीय इमारतीचे वाढीवचे बांधकामासाठी जादा निधीची आवश्यकता असल्याने वाढीवचा निधी मंजूर होणेबाबतचा  सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी  मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना केल्या होत्या. त्यानुसार पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे कामाला 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

                पाटण येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सुमारे 14 कोटी 87 लक्ष रुपयांची भरघोस अशी तरतुद सन 2020-21 च्या राज्य शासनाचे अर्थसंकल्पामध्ये करुन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पाटण तालुकावाशियांची बहुप्रतिक्षित असलेली मागणी मुर्त स्वरुपात आणली होती. सदर कामांस प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी पारित केला होता. त्यानुसार  पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.दरम्यान प्रत्यक्ष उपलब्ध जागेमुळे संकलप चित्रात बदल होऊन बांधकाम क्षेत्रफळामध्ये 621 चौ.मी. ची वाढ झाली. वस्तू व सेवा करामध्ये 12 टक्क्यावरुन 18 टक्के वाढ तसेच बांधकामाच्या किंमतीतमध्ये वाढ झाल्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावास दि.12.03.2024 रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत प्राप्त मान्यतेस अनुसरुन 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची  सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामंजूर रक्कमेत तळ मजल्यासह पाच मजले बांधकाम, इलेक्ट्रीकचे काम, अग्निरोधक यंत्रणा, फर्निचर, रेन रुप वॅाटर हारवेस्टींग, सोलार रुप टॅाप,बायो गिजस्टर, या बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

                पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुख्‍य बाजारपेठेच्या ठिकाणी  शासकीय कार्यालय हे वेग-वेगळया ठिकाणी असल्याने तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातून आपल्या दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांना या वेगवेगळया ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते.त्याचा नाहक त्रास हा येथील सर्वसामान्य जनतेला होत होता. वेळेत कामं होत नसल्याने नागरीकांमध्ये नाराजी निर्माण होत होती. तालुक्याच्या ठिकाणची असणारी सर्व शासकीय कार्यालये ही एका छताखाली यावी या संकल्पनेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे  सततच्या प्रयत्नामुळे पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे कामला 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली  येणार आहेत.यामध्ये उपविभागीय कार्यालय,तहसिल कार्यालय,लोक अदालत कार्यालय,सेतू कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय,वनक्षेत्रपाल कार्यालय,तालुका कृषी कार्यालय व ट्रेझरी ऑफीस हि सर्व कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने एकाच ठिकाणी सर्व प्रकारची लोकोपयोगी कामे कमी कालावधीमध्ये होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे तालुक्यातील समाधानाचे वातावरण असून लवकरच या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पुर्ण झाल्यानंतर या नवीन वास्तुमुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे.       

1 comment:

  1. THIS WILL BE THE PRECIOUS MILESTONE TOWORDS PATAN'S DEVELOPMENT...
    Gr8 1..

    ReplyDelete