Tuesday 28 April 2020

प्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका, प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा. ना.शंभूराज देसाईंचे पाटण मतदारसंघातील जनतेला आवाहन.


           दौलतनगर दि.28 :  चाफळ विभागातील डेरवण येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे मात्र शेजारील कराड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे सातारा जिल्हयात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण कराड तालुक्यात आढळून आले आहेत.आपला मतदारसंघ कराड तालुक्याला लागून असल्याने काळजी घेणेकरीता पाटण मतदारसंघातील पाटण,ढेबेवाडी,तळमावले,तारळे,मल्हारपेठ व नाडे या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी प्रतिबंध वाढविण्यात आला आहे.प्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका,प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला आवश्यक ते सगळे सहकार्य करा असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले आहे.
          पाटण तहसिल कार्यालयात ना.शंभूराज देसाईंनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पाटण मतदारसंघातील सद्यपरिस्थितीचा तालुका प्रशासनातील अधिकारी यांचेकडून आढावा घेतला त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे मतदारसंघातील जनतेला आवाहन केले. यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटणच्या सहा.पोलिस निरिक्षक तृप्ती सोनावणे, पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.
           याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी चाफळ विभागातील डेरवण गांवातील १० महिन्यांच्या मुलगा याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्याअनुषगांने या मुलाच्या आरोग्यात सुधारणा झाली का? १४ दिवसाचा कालावधी पुर्ण होताना दुसऱ्यांदा या मुलाचे नमुने तपासणीकरीता सादर केले का? मतदारसंघात इतर ठिकाणी कोरोना सदृष्य परिस्थिती जाणवून येत नाही ना?  याकरीता आढावा बैठक घेतली यावेळी पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्ण १० महिन्यांच्या मुलाचे नुमने तपासणी करण्याकरीता घेणेत आले असून ते तपासणीकरीता सादर करीत आहोत. डेरवण त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे.आता काळजी करण्याचे कोणतेही कारण नसले तरी कराड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्या मुळे खबरदारी म्हणून पाटण मतदारसंघातील पाटण,ढेबेवाडी,तळमावले,तारळे,मल्हारपेठ व नाडे या मुख्य बाजारपेठ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यापासून या मुख्य बाजारपेठामध्ये मोठया प्रमाणात जनतेची गर्दी कमी झाली आहे. मतदारसंघातील जनतेला केंद्र शासनाकडून आलेले मोफतचे धान्य ९५ टक्के लोकांपर्यंत पोहचविले आहे आता केशरी कार्डधारकांना मे महिन्याचे धान्य वाटप करण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व तहसिलदार यांचेकडून सुरु करण्यात आली आहे.ज्यांची केशरी रंगाची रेशनिगंची कार्ड आहेत त्याच कार्डधारकांना रेशनिगंचे धान्य देण्यात येणार आहे. तसेच रेग्लूलर कार्डधारकांनाही माहे मे महिन्याचे धान्य देण्यात येणार असल्याचे प्रातांधिकारी तांबे यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी जीवनावश्यक वस्तू जनतेपर्यंत वेळेत पोहचविण्याची कार्यवाही प्रशासनाने लवकरात लवकर पुर्ण करावी यामध्ये कुणाच्या तक्रारी येणार नाहीत याचीही खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सुचित करुन छुप्या मार्गाने कोणी मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून मतदारसंघात येत नाही ना यावर गृह विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी लक्ष ठेवून रहावे  तसेच  आरोग्य विभागाने यापुर्वी कॉरन्टाईन केलेल्यांच्या आरोग्य तपासण्या करुन घ्याव्यात. मी मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांना भेटी देवून सतर्क राहण्याच्या सुचना यापुर्वीच केल्या आहेत मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनीही लक्ष ठेवून रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील प्रशासन सतर्क आहे, जनतेने या प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.

Sunday 26 April 2020

बांधकाममंत्री व गृहराज्यमंत्री यांच्यावतीने पाटण विधानसभा मतदारसंघातील ९५०० गरीब कुंटुबांना धान्याच्या वाटपास प्रारंभ.


सातारा दि.26:  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यभर संचारबंदी करण्यात आली असून संचारबंदीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ९५०० ग्रामीण आणि डोंगरी भागातील रोजगार बंद झालेल्या गोरगरीब कुटुंबाना तसेच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वतीने १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन धान्याचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली असून हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना संचारबंदीच्या काळात  बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईनी मायेचा आधार दिला आहे.
          संचारबंदीच्या काळात सर्वत्र ग्रामीण भागातील जनता रोजगार बंद झाल्याने तसेच हातावर पोट असणाऱी कुटुंबे ही गेली महिनाभर घरीच बसून आहेत पाटण या ग्रामीण व डोंगरी मतदारसंघातही तीच परिस्थिती असून पाटण मतदारसंघातील रोजगार बंद झालेल्यांना तसेच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना शासनामार्फत स्वस्त अन्नधान्य देणेची व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली आहे. महिन्याचे स्वस्त धान्यही संपत आले असल्याने शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री व विधानसभेतील पक्षाचे गटनेते ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील सुमारे ९५०० कुटुबांना आधार मिळणेकरीता १०-१० किलोचे अन्नधान्याचे एक पॅकेट तयार करुन ते वाटपाचे काम सुरु करण्यात आले आहे.
            या पॅकेटमध्ये गहू,तांदूळ,डाळ, तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला असून  पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून या धान्याच्या पॅकेटच्या वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.मतदारसंघातील प्रत्येक विभागात टप्प्याटप्प्याने हे धान्य वाटप करण्यात येणार आहे. मंगळवार दि.२८ एप्रिल पर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील गरीब कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.
           अडचणीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत. मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या संकटात पाटण विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी व महापुरात अडकून पडलेल्या जनतेला त्यांनी चांगल्या प्रकारे सर्वच प्रकारची मदत करुन दिलासा देण्याबरोबर आपले कर्तव्य जपण्याचे काम केले होते.  त्या संकटात विविध सेवाभावी संस्थाकडून तसेच दानशुर व्यक्तीकडून आवश्यक असणारे धान्य, कपडे यासारख्या जीवनावश्यक वस्तू एकत्रित करुन नुकसान झालेल्या जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले होते. त्यानुसार आताही कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याबरोबर ज्या व्यकतींचे रोजगार बंद झाले आहेत ज्या कुटुबांचे हातावर पोट आहे अशा कुटुंबाना आधार देणेकरीता त्यांनी पक्षाच्या वतीने तसेच राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून या दोघांच्या प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ९५०० गरीब कुटुंबापर्यंत जीवनावश्यक अशा धान्याचे पॅकेट पोहचणार आहे.

Saturday 25 April 2020

खरीप हंगामात पुरेसे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्या - पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे खरीप हंगाम पूर्व तयारीचा घेतला आढावा पीक कर्ज वितरण उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य नियोजनाच्या केल्या सूचना.




वाशिम दि.२५ :  वाशिम जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे आगामी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे घरगुती बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कृषि विभागाने योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दर्जेदार पुरेसे बियाणे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आज दिल्या.गृहराज्यमंत्री व वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठकीचे आज,२५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.
 सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई,केंद्रीय मनुष्यबळ विकास,माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे हे अकोला येथून तसेच खासदार भावना गवळी,आमदार अमित झनक,जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना हे वाशिम येथून व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र,गतवर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे घरगुती बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे याबाबतची माहिती संकलित करुन आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. तसेच सध्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या घरगुती बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी कृषि विभागाने विशेष मोहीम राबवावी.जेणेकरुन आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच खरीप हंगामात बोगस बियाणे,खते व कीटकनाशकांची विक्री होवू नये,यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात भरारी पथके नेमावीत. अशाप्रकारे बोगस बियाणे, कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.खरीप हंगामात १६०० कोटी रुपये पिककर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. सर्व बँकांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांनी नियमितपणे पाठपुरावा करावा, अशा सूचनाही पालकमंत्री ना. देसाई यांनी यावेळी दिल्या.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना.धोत्रे म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य वेळी कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे नियोजन करुन त्यानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज मिळेल, याची खबरदारी घ्यावी.जेणेकरुन पिक कर्ज वाटपाबाबत कोणत्याही शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत. तसेच वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात असेही त्यांनी सांगितले तसेच खासदार गवळी म्हणाल्या, जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच पालकमंत्री पांणद रस्ते योजनेतून पांणद रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मदत होईल. यावरुन पांणद रस्त्यांची कामे अधिक गतीने व मोठ्या प्रमाणात करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले
शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे.बियाणे व खते विक्री करतांना होणाऱ्या लिंकिंगसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा.त्याचबरोबर मुंगळा येथील काही शेतकऱ्यांचा संत्रा गुजरात व तेलंगाना राज्यात अडकला असल्याचे आमदार झनक यांनी सांगितले.त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री ना.देसाई यांनी गुजरात व तेलंगाना राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यात राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत झालेल्या सामुहिक शेततळ्यांमध्ये अस्तरीकरण साठी वापरलेली ताडपत्री जुनी होवून ती खराब झाली आहे.त्यामुळे शेततळ्यातून पाण्याचा अपव्यय होत आहे.कृषि विभागाच्या माध्यमातून जुन्या सामुहिक शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी ताडपत्री उपलब्ध करून देण्याबाबत जि.प. अध्यक्ष ठाकरे यांनी विनंती केली.
यावेळी खरीप हंगाम पूर्व तयारीची माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तोटावार यांनी जिल्ह्यात ४ लक्ष १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित असून याकरिता २ लक्ष १२ हजार ७२८ क्विंटल बियाणाची आवश्यकता भासणार आहे. सार्वजनिक,खासगी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून २ लक्ष २१ हजार ३७४ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध होईल. यापैकी प्रमुख पिके असलेल्या सोयाबीनची पेरणी २ लक्ष ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून याकरिता ७७ हजार ७१६ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे.जिल्ह्यात सोयाबीनचे ८३ हजार ३६२ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. तुरीचे ५३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून याकरिता ३ हजार ६३८ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच खरीप हंगामासाठी ५० हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली असून ५६ हजार २९० मेट्रिक टन रासायनिक खताला मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमरावती येथून कृषि सहसंचालक सुभाष नागरे हे सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. वाशिम येथून महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, पाटबंधारे विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता प्रशांत बोरसे,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, प्रभारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.

Friday 24 April 2020

पुणे- सातारा जिल्हा तपासणी हद्दींना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची सरप्राईज विझीट. संचारबंदी काळातील बंदोबस्ताची पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पहाणी.



  
          
           सातारा दि.२४ :  सातारा जिल्हयामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होवू नये याकरीता जिल्हयाच्या सर्व हद्दी नाकाबंद केल्या असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना जिल्हयामध्ये प्रतिबंध करण्यात आले आहे.पुणे सातारा हायवेवर सातारा जिल्हयाची हद्द असणाऱ्या सारोळा पुलाजवळ संचारबंदी काळात करण्यात आलेल्या तपासणी ठिकाणाला राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज अचानक सरप्राईज विझीट दिली व येथील तपासणी ठिकाणाची व बंदोबस्ताची आणि कार्यरत असणाऱ्या पोलीस यंत्रणेची पोलीस विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत पहाणी केली.तपासणी ठिकाणावर पोलीस यंत्रणा अलर्ट असल्याचा शेराही देत पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी या भेटीत दिला.
           पुणे जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे संपुर्ण पुणे शहर व जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला असून हायरिस्कच्या ठिकाणी पुर्णत: प्रतिबंधात्मक क्षेत्र करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.पुणे,मुंबई येथून कोणी कोरोना बाधित रुग्ण सातारा जिल्हयामध्ये येवू नये याकरीता जिल्हा प्रशासन व सातारा जिल्हा पोलीस यंत्रणा यांनी काळजी घेवून सातारा जिल्हयाला जोडणाऱ्या सर्व हद्दी या नाकाबंदी केल्या आहेत. पुणे कडून महत्वाचा येणारा पुणे सातारा हायवे असून या हायवेवर जिल्हयाच्या हद्दीवर सारोळा पुलाजवळ सातारा पोलीस यंत्रणेकडून तपासणी ठिकाण (चेकपोस्ट) केले असून या तपासणी ठिकाणाची पहाणी करण्याकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे याठिकाणी आले होते त्यावेळी त्यांचेसोबत फलटण,खंडाळा, शिरवळ येथील पोलीस विभागाचे वरीष्ठ अधिकारी त्याचबरोबर सातारा जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील हे ही उपस्थित होते.
          सारोळा पुलाजवळ तपासणी ठिकाणाची पहाणी करताना ना.शंभूराज देसाईंनी याठिकाणी चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत का? तपासणी ठिकाणावर कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून येणाऱ्या वाहनांची कशाप्रकारे तपासणी केली जात आहे याची पहाणी केली तसेच कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना आहेत का ? त्यांच्या राहण्याची योग्य सोय आहे का? याची सविस्तर पहाणी केली. ऑनलाईन परवानगी मिळाल्यानंतर त्या वाहनांची नोंद तपासणी ठिकाणी कशाप्रकारे केली जाते यांचीही पहाणी ना.देसाईंनी यावेळी केली.
            सारोळा पुलाजवळ तपासणी ठिकाणाची पहाणी केल्यानंतर ना.शंभूराज देसाईंनी खंडाळा विश्रामगृह येथे तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांच्याकडून खंडाळा तालुक्यातील कोरोनांच्या संदर्भातील सर्व माहिती घेतली तालुक्यामध्ये पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतर शहरातून किती लोक आले आहेत? कोरोना बाधित लोक आढळून आले का ? आले असतील तर त्यांच्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने काय केले किती लोकांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय करण्यात आली आहे काय? संचारबंदीच्या काळात तालुक्यातील लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास काही अडचण निर्माण होत नाही ना? किती लोकांना स्वस्त धान्य पुरविण्यात आले आहे मोफतचे धान्य वाटप करण्यात आले का? याची सविस्तर माहिती तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतली व कोरोनाच्या परिस्थितीत काम करीत असताना सर्व अधिकाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शिरवळ औद्योगिक वसाहतीमध्ये कोणकोणते उद्योग सुरु आहेत सुरु असलेल्या उद्योगाच्या ठिकाणी कार्यरत असणारे कर्मचारी हे स्थानिक किती आहेत आणि बाहेरगांवचे किती आहेत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे काय? याची प्रत्यक्ष पहाणी खंडाळयाचे तहसिलदार यांनी करुन या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
              यावेळी ना.शंभूराज देसाईंबरोबर फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप,खंडाळा तहसिलदार दशरथ काळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कोरडे, जिल्हा उद्योग अधिकारी संदीप रोकडे,राज्य उत्पादन शुल्कचे सहाय्यक निरीक्षक बबन पाटील, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांची उपस्थिती होती.
              चौकट:- तपासणी हद्दीवरील पोलीस यंत्रणा अलर्ट - ना.देसाई.
             तपासणी हद्दीवर पोलीस यंत्रणा अलर्ट असून याठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या कामाचे ना.शंभूराज देसाईंनी कौतुक करुन अजुन काही दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे लवकरच ही परिस्थिती आटोक्यात येईल अशी आशा आहे तुम्हीही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या असा दिलासाही  ना.शंभूराज देसाईंनी या सरप्राईज विझीटमध्ये सातारा जिल्हयाच्या हद्दीवरील सर्व पोलीस यंत्रणेला दिला.


Thursday 23 April 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले मतदारसंघातील जनतेच्या व राज्यशासनाचेवतीने विनम्र अभिवादन. पुण्यतिथीनिमित्त श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे धार्मिक विधी केले साध्या पध्दतीने.



             दौलतनगर दि.२३:-  महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३७ पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर ता.पाटण येथील कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पवृष्टी व पुष्पचक्र अर्पण करुन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या व राज्यशासनाचेवतीने विनम्र अभिवादन केले.प्रतिवर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर साध्या पध्दतीने धार्मिक विधी याठिकाणी करण्यात आले.
         कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची वी पुण्यतिथी व पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी होणारे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हे अत्यंत साध्या पध्दतीने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले.पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कारखाना कार्यस्थळा वरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पवृष्टी व पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. प्रारंभी ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पादुकांचे पुजन करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते याठिकाणी ध्वजारोहण करुन पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सपोनि तृप्ती सोनवणे या सर्व शासकीय अधिकाऱ्यांनीही दौलतनगर येथे उपस्थित राहून स्वतंत्रपणे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
           प्रतिवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्त श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी या पारायण सोहळयाचे अकरावे वर्ष होते पुढील वर्षी पारायण सोहळयाची तपपुर्ती असून कोरोनाच्या संकटामुळे या पारायणामध्ये खंड पडू नये याकरीता दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीरात साध्या पध्दतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायणाचे धार्मिक सोपस्कर यानिमित्ताने पार पाडण्यात आले.
चौकट:- पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचेवतीनेही करण्यात आले विनम्र अभिवादन.
             लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्हयातील तमाम जनतेच्या वतीने व जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने विनम्र अभिवादन करावे अशी विनंती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी ना.शंभूराज देसाईंना केली त्यानुसार पालकमंत्री यांचेवतीनेही लोकनेतेसाहेब यांचे पुण्यतिथी निमित्त पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

Wednesday 22 April 2020

२१ दिवसात विहीरीची खुदाई करणाऱ्या पकमोडे दामप्त्यांचे पालकमंत्र्यांकडून अभिनंदन. पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले पकमोडे दामप्त्यांला अभिनंदनाचे लेखी पत्र.



            वाशिम दि.२२ :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संकटामुळे संपुर्ण देशामध्ये संचारबंदी करण्यात आली असल्याने सध्या सर्व कामे ठप्प असताना  मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन पत्नीच्या मदतीने २१ दिवसात कोणत्याही यंत्रणांचा वापर न करता घराच्या अंगणात विहीर खुदाई करुन पाण्याची सोय करणाऱ्या वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील कारखेडा गांवातील पकमोडे या दामप्त्यांचे वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लेखी पत्र देवून अभिनंदन केले असून त्यांच्या या कष्टाचे कौतुक केले आहे.
         वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे संचारबंदीच्या काळात वाशिम जिल्हयातील प्रत्येक घडामोडीवर विशेष लक्ष ठेवून आहेत तसेच येथील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता तत्पर आहेत. संचारबंदीच्या काळात सर्व कामे ठप्प असताना वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील कारखेडा गांवातील गवंडी काम करणारे गजानन पकमोडे या  व्यक्तींने सध्या गवंडीकाम बंद असल्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन पत्नीच्या मदतीने  २१ दिवसात कोणत्याही यंत्रणांचा वापर न करता घराच्या अंगणात चक्क विहिर खोदण्याचे काम केले असल्याची बातमी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आलेनंतर त्यांनी तात्काळ पकमोडे या दामप्त्यांच्या या कामांचे कौतुक करण्याकरीता व त्यांचे अभिनंदन करणेकरीता लेखी पत्र दिले असून या पत्रामध्ये त्यांनी श्री. गजानन पकमोडे आपण सपत्नीक आपले कारखेडा, ता.मानोरा जि.वाशिम या गावी राज्यामध्ये सुरु असणाऱ्या संचारबंदीचे काळात दोघांनी मोठया कष्टाने अंगणातच कोणत्याही यंत्रणांचा वापर न करता २१ दिवसात विहिर खुदाई केल्याची बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून मला समजली वारंवार जाणवणाऱ्या पाणी टंचाईला सामोरे जाण्याकरीता आपणांकडून झालेले हे काम कौतुकास्पद असून इतरांसाठी आदर्शवत असे आहे.आपल्यासारख्या सामान्य कुटुंबाने केलेले हे काम, घेतलेले कष्ट निश्चितच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवी दिशा देणारे असून वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून मी आपले मन:पूर्वक अभिनंदन करुन आपल्या सुखी जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा देतो असे म्हंटले असून सदरचे पत्र पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी, वाशिम यांचेमार्फत पकमोडे कुटुंबाकडे देणेबाबतची सुचनाही केली आहे.

Tuesday 21 April 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.


           दौलतनगर दि.२१ : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उभे राहून १४ ते १६ तास आपले कर्तव्य बजाविणाऱ्या कोल्हापुर परिक्षेत्रातील कोल्हापुर,सोलापुर,सांगली,सातारा व पुणे जिल्हयातील सर्व पोलीस विभागांचा आढावा आज राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला.पालघरसारखी घटना घडू नये याची खबरदारी कोल्हापुर परिक्षेत्रातील सर्वांनी घ्यावी.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व लॉकडाऊनच्या काळात सर्व पोलीस यंत्रणेचे उत्कृष्ट काम सुरु असून कोल्हापुर परिक्षेत्रामध्ये  आपल्या सर्वांच्या नियत्रणांखाली काम करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी हे जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अश्या सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांना देवून माझा हा संदेश तळागाळातल्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत पोहचवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व कोल्हापुर,सोलापुर, सांगली, सातारा  व पुणे जिल्हयातील पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजीत केली होती. यावेळी ना.देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे या पाच जिल्हयातील कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
            प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी जिल्हानिहाय संबधित जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांचेकडून पोलीस यंत्रणांचा आढावा घेतला व कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना आतापर्यंत या पाच जिल्हयामध्ये ज्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणेकरीता आपण सर्वांनी खबरदारी घेतली आहे त्याचप्रमाणे पुढील काळातही खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या.पालघरसारखी एखादी घटना कोल्हापुर परिक्षेत्रातील एखादया जिल्हयात घडू नये याचीही विशेष खबरदारी सर्वांनी घ्यावी. असे सांगत कोणत्या जिल्हयामध्ये किती कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत आता जिल्हयामध्ये कोरोना तसेच लॉकडाऊनच्या संदर्भात काय परिस्थिती आहे?कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणणे करीता पोलीस यंत्रणेकडून कोणकोणत्या उपाययोजना तसेच प्रतिबंध करण्यात आले आहेत यामध्ये कोणत्या अडचणी पोलीस विभागाला येत नाहीत ना ? कोणकोणत्या जिल्हयामध्ये किती ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे बंदोबस्ता करीता पुरेसे पोलीस बळ आपल्या सर्वांच्या जवळ आहे काय? होमगार्ड तसेच एसआरपीच्या तुकडया आहेत का? आपल्या जिल्हयामधील पोलीस यंत्रणा किती किती तास आपले कर्तव्य बजावित आहेत त्यांना कोणती अडचण तर येत नाही ना? याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी घेतली व कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणेला कोणत्या अडीअडचणी येत असतील तर त्यांनी तात्काळ मला सांगाव्यात जेणेकरुन त्यावर तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाईल.गृहराज्यमंत्री म्हणून आवश्यक ती सर्व मदत मी करण्यास तयार असून वाढीवच्या मदतीकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेशी संपर्क साधून आपल्या विभागा करीता आवश्यक असणाऱ्या यंत्रणा उभ्या करणेकरीता मी प्रयत्नशील आहे.
            लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणेकरीता उत्कृष्टपणे काम करुन आपले कर्तव्य बजावित आहेत.आजघडीला राज्यातील एक एक पोलीस १४ ते १६ तास आपले कर्तव्य बजावित आहे ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे.कोल्हापुर परिक्षेत्रामध्ये कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच कोल्हापुर, सोलापुर, सांगली, सातारा  व पुणे जिल्हयातील पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट राहून काम करीत आहे.जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावित आहेत. हे आपले कर्तव्यच आहे परंतू आपली जबाबदारीही आहे हे ओळखून पोलीस यंत्रणेचे सुरु असलेले काम उल्लेखनीय आहे असे सांगून ना.शंभूराज देसाईंनी लॉकडाऊनच्या काळात महिला पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना रात्रीची डयुटी लावू नये अशी महत्वाची सुचनाही विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांना केली.
        चौकट:- सर्व पोलीस यंत्रणेला एखादे विशेष पदक देण्याची विनंती मुख्यमंत्र्याकडे करणार- ना.शंभूराज देसाई.
       कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजाविणाऱ्या राज्यातील पोलीस यंत्रणेतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या पोलीस विभागामार्फत एखादे विशेष पदक देवून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा, त्यांच्या कामाचे कौतुक करावे अशी विशेष विनंती राज्याचा गृहराज्यमंत्री या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे करणार असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

Saturday 18 April 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई रिसोडच्या धोटे कुटुबियांकरीता देवदूतासारखे धावून आले. पुणे येथे अडकलेल्या या कुटुंबाला मदत करुन ना.देसाईंनी जपले पालकत्व.




           दौलतनगर दि.१८ : वाशिम जिल्हयातील दैनिक भास्कर वृत्तपत्राचे वार्ताहर दत्ता इंगळेनी वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंना पहाटे पहाटे एक व्हाटसॲप मेसेज केला वाशिम जिल्ह्यातील कारंजा - रिसोड येथील व्यवसाय सुरु करायला गेलेले पती-पत्नी व त्यांचे ०५ सदस्यांचे कुटुंब लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकून पडले आहे पुण्यामध्ये कोणीही त्या कुटुंबाच्या ओळखीचे नाही या ०७ जीवांच्या अन्न खाण्यापिण्याची व्यवस्था झाली तर बरे होईल.सकाळी हा मेसेज वाचताच गृहराज्यमंत्री,वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यांनी तात्काळ फोन केला आणि दुपारपर्यंत शासकीय यंत्रणेमार्फत या ०७ लोकांना १५ दिवस पुरेल एवढे धान्य देवून त्यांच्या अन्न खाण्यापिण्याची व्यवस्था करीत वाशिम जिल्हयाचे पालकत्व जपले.संकटकाळात आमच्या धोटे कुटुंबाकरीता देवदूतासारखे गृहराज्यमंत्री धावून आले त्यांचे आभार मानावे इतके कमीच असल्याची प्रतिक्रिया वाशिमच्या कारंजा -रिसोड येथील विजय धोटे व कुटुंबानी व्यक्त केली आहे.
              गृहराज्यमंत्री,वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज दि.१८ रोजी सकाळी व्हाटसॲप उघडल्या नंतर वाशिम जिल्हा दैनिक भास्कर वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणून काम करणारे दत्ता इंगळे या व्यक्तीचा व्हाटसॲप मेसेज पाहिला त्यात लिहले होते,वाशिम जिल्ह्यातील कारंजा-रिसोड येथील धोटे नावाचे पती-पत्नी कुटुंब पुण्यात धायरी फाटा रोडवर हॉटेलवर कामानिमित्ताने गेलेले कुटुंब आहे काही दिवस कुंटूबप्रमुख विजय धोटे यांनी हॉटेलवर काम केले नंतर त्यांना कामावरुन बंद करण्यात आले आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास सुरुवात करताच राज्यामध्ये लॉकडाऊन झाले.त्यांची पत्नी पदमा धोटे या धुनी भांडी,स्वयंपाक करुन देण्याचे काम करत होत्या पंरतू हे दोन्ही व्यवसाय बंद झाले त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्यांच्या मुळ गांवी येणेही या लॉकडाऊनमुळे अशकय झाले आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या तीन मुली,एक मुलगा व सासुबाई  असे पाच सदस्य आहेत पुण्यामध्ये त्या परिवाराचे कोणीही ओळखीचे नाही,त्यांचेकडे रेशनकार्ड नाही त्यांना आपल्या मदतीची अपेक्षा आहे अन्न हे परब्रह्म म्हणून आपणास पुण्याई सुद्धा लाभेल.
              हा व्हाटसॲप मेसेज वाचताच ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे पुणे येथे असणारे विशेष कार्यासन अधिकारी प्रल्हाद हिरामणी यांना फोन केला आणि मला असा असा एक मेसेज वाशिमवरुन आला आहे ०७ लोकांचे धोटे कुटुंब अडचणीत आहे या ०७ व्यक्तींना १५ दिवस पुरेल एवढे धान्य देण्याची व्यवस्था आपल्याला तात्काळ करायची आहे. तुम्ही स्वत: यासंदर्भात लक्ष दया अशा सुचना दिल्या तसेच त्या कुटुबांला आणखीन काही गरज भासल्यास मला सांगा तीही मदत आपण करु. गृहराज्यमंत्र्यांचा निरोप येताच तात्काळ विशेष कार्यासन अधिकारी हिरामणी कामाला लागले आणि ना.देसाईंनी दिलेल्या मोबाईल क्रंमाकावर त्यांनी धोटे परिवाराशी संपर्क साधला व या परिसरातील खडकवासचे मंडलाधिकारी,तलाठी यांना सुचना करीत या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू तात्काळ पोहोच करणेबाबत सांगितल्यानंतर खडकवासचे मंडलाधिकारी,तलाठी यांनी दुपारपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे एक कीटच धोटे परिवाराला जागेवर नेवून दिले.गृहराज्यमंत्री यांना आपल्या गावाकडून मेसेज आला होता त्यांनी या मेसेजची तात्काळ दखल घेत आम्हाला तुम्हास हे जीवनावश्यक वस्तू देणेस पाठविले असल्याचे या दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले यावेळी विजय धोटे व त्यांच्या कुटुंबाने संकटकाळात आमचे पालकमंत्री आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले ते खरोखरच आमचे पालक आहेत त्यांचे आभार मानावे इतके कमीच आहेत त्यांना आमचे धन्यवाद कळवा आपलेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.
              एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कामाचे कौतुक केले जाते वरीलप्रमाणे एका मेसेजवर अडचणीत सापडलेल्या ०७ जीवांना त्यांनी केलेली मदत ही त्याचेच उदाहरण असून समाजकारणात वावरताना घेतलेली जबाबदारी आणि मिळालेले पालकत्व कसे जपावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचे त्यांच्या प्रत्येक कार्यातून पहावयास मिळत आहे.

Friday 17 April 2020

घाबरु नका, प्रशासन तुमची काळजी घेण्यास सतर्क आहे,स्वत:ची काळजी घ्या, ना.शंभूराज देसाईंचे डेरवण,वाघजाईवाडी,माथणेवाडी गावाच्या पहाणी दरम्यान जनतेला आवाहन.


           दौलतनगर दि.१७ : पाटण विधानसभा मतदारसंघातील चाफळ विभागातील डेरवण गांवामध्ये १० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने या विभागात खळबळ माजली असून आज मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी चाफळ विभागात येवून येथील पोलीस औटपोस्टच्या प्रांगणात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करुन विभागातील डेरवण,वाघजाईवाडी व माथणेवाडी या गांवाची सर्व अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पहाणी केली.यावेळी त्यांनी या गांवातील तसेच या गांवाच्या परिसरातील नाकाबंदी करण्यात आलेल्या एकूण ९ वाडयावस्त्यांतील जनतेला घाबरुन जावू नका,ही परिस्थिती आटोक्यात येईल,तुमची काळजी घेण्याकरीता मी स्वत: तसेच तालुका प्रशासन सतर्क आहे, तुम्ही गावकऱ्यांनी घराच्या बाहेर पडू नका,जीवनावश्यक वस्तू तुमच्यापर्यंत पोहचविण्याची तसेच तुमच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत तुम्ही सर्वजण तुमची स्वत:ची काळजी घ्या असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जनतेला या पहाणी दरम्यान केले.
          चाफळ विभागातील डेरवण गांवामध्ये १० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण झाली असून या मुलाच्या तसेच त्याच्या कुटुंबिंयाच्या संपर्कात आलेल्या एकूण ४५ लोकांना तपासणीकरीता कृष्णा रुग्णालय येथे काल दाखल करण्यात आले असून यापार्श्वभूमिवर मतदारसंघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी आज चाफळ येथे येवून सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्याबरोबर चर्चा केली व त्यानंतर त्यांनी या विभागातील डेरवण, वाघजाईवाडी, माथणेवाडी या गांवाची प्रत्यक्ष पहाणी देखील केली यावेळी त्यांच्यासमवेत प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,उंब्रजचे सहा.पोलिस निरिक्षक अजय गोरड यांची उपस्थिती होती.
           प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांनी डेरवण गावाच्या आसपासच्या ०३ किमी व ०७ किमी अंतरातील एकूण ०९ वाडयावस्त्यांमध्ये नाकाबंदी करण्यात आल्या आहेत.या वाडयांमध्ये एकूण १०२७ व्यक्ती असून डेरवण, जाळगेवाडी, चोरजवाडी,चाफळ उंब्रज, इंदोली येथील कोरोनाच्या हायरिस्कमध्ये एकूण ३१ व्यक्ती तसेच लो रिस्कमध्ये १४ असे एकूण ४५ व्यक्तींना तपासणीकरीता कृष्णा रुग्णालय येथे काल दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तपासण्यांचा रिपोर्ट आज येणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाकडून १२ लोकांमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत असून याठिकाणी महसूल, ग्रामविकास, आरोग्य विभागाचे एकूण २१ लोकांना कार्यरत करण्यात आले आहे. आमची सर्व शासकीय यंत्रणा सतर्क असून यापुढील काळामध्ये यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या असल्याचे सांगितले.
              यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले,१० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण होणे ही चिंतेची बाब आहे परंतू ही परिस्थिती आटोक्यात येईल,या विभागातील जनतेला सतर्क राहण्याबरोबर नाकाबंदीच्या काळात त्यांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांच्या पर्यंत पोहचविणे तसेच त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. या गांवात २४ तास वीजपुरवठा होईल, तसेच रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट सुरु राहतील,पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी तसेच या काळात या विभागातील ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,तलाठी मंडलाधिकारी यांचे हेडकॉर्टर चाफळ करावे कधीही यांची गरज भासू शकते त्यामुळे महसूल आणि ग्रामविकास विभागाने या कर्मचाऱ्यांना आदेशित करावे.शासनामार्फत देण्यात येणारे स्वस्त धान्य तसेच मोफतचे तांदुळ या विभागात वाटप झाले नसल्यास तातडीने याचे वाटप गांवामध्ये जावून करण्याच्या सुचना धान्य दुकानदारांना तहसलिदारांनी कराव्यात. आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण करताना कोणा व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला जाणवू लागला तरी त्या व्यक्तींनी न घाबरता प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ कळवावे म्हणजे आवश्यक त्या उपाययोजना करणे शक्य होईल, आरोग्य विभागातील एक वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत या ०९ गांवातील लोकांची एकदिवसाआड आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी करावे असे ना.देसाईंनी यावेळी सुचित केले.
            या गांवाच्या पहाणीदरम्यान ना.शंभूराज देसाईंनी या वाडयावस्त्यांमधील जनतेला दिलासा देत कुणीही घाबरुन जावू नका,१० महिन्यांच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह येतील व आपल्यावर आलेले संकट दुर होईल अशी मला खात्री आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेणेकरीता आम्ही सर्वजण सतर्क आहोत तुम्ही घराबाहेर न पडता स्वत:ची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

Thursday 16 April 2020

सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सातारा जिल्हयातील अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना.


          
           सातारा दि.१७ :  सातारा जिल्हयामध्ये एकूण ११ लोकांचे रिर्पोट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून एका रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.काल एका दिवसात चार लोकांचे रिर्पोट पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये पाटण तालुक्यातील १० महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. संचारबंदी,जमावबंदी असतानाही लपूनछपून लोक जिल्हयामध्ये येत आहेत.त्यामुळे हा धोका निर्माण होत आहे.या परिस्थितीवर बंधन आणणे गरजेचे असून सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने संचारबंदीची व जमावबंदीची प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करावी तसेच २० एप्रिल नंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथीलता मिळण्याची शक्यता असली तरी याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करावी अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
             जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजना व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. याप्रसंगी  जिल्हाधिकारी शेखर सिंह,अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठ्ठल्ये  आदी जिल्हास्तरीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
              प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी उपस्थित अधिकारी यांच्याकडून सातारा जिल्हयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.यामध्ये सातारा जिल्हयात बाहेरुन आलेल्या ३८० व्यक्तींना सातारा जिल्हयातील १० ठिकाणच्या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.दि.१० एप्रिलपर्यंत केवळ १२२ व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते आजतारखेला ३८० व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे एकूण ११ लोकांचे रिर्पोट पॉझिटिव्ह आले आहेत त्यातील दोन मयत व एका व्यक्तीस घरी सोडून त्यास होम कॉरटाईंन करण्यात आले आहे.काल नव्याने चार व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.या चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून सुमारे ५०० गुन्हे या काळात नोंद झाले आहेत एकावेळी एका गुन्हयामध्ये १०० ते १२५ व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.
            यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,बाहेरुन आलेल्या ३८० व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे ही बाब चिंता वाढवणारी आहे.संचारबंदी,जमावबंदी असतानाही लोक जिल्हयात येत आहेत ही बाब गंभीर आहे यावर कडक प्रतिबंध आणणे आवश्यक आहे.जिल्हयात एकूण दोन लाखाच्या वर लोक बाहेरगांवाहून आल्याची नोंद आहे आमच्या पाटण मतदारसंघात तर ६० ते ६३ हजार लोक बाहेर गांवाहून आले आहेत. पाटण तालुक्यातील १० महिन्याच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ही बाब अतिशय गंभीर असून याबाबत आपण सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल,यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथील प्रकल्पाचे रुग्णालय असून या रुग्णालयात दिवसाकाठी २०० ते २५० लोक उपचाराकरीता येत असतात याठिकाणी आवश्यक तो औषध साठा देणे आवश्यक आहे त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी याच्याकडून आवश्यक असणाऱ्या औषधांची मागणी मागवून घेवून तो औषधसाठा दयावा अशा सुचना देवून सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने संचारबंदीची व जमावबंदीची प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करावी अशा सक्त सुचना केल्या.
              चौकट:- २० एप्रिल नंतरच्या लॉकडाऊनसंदर्भातील जिल्ह्यातील लोकांना माहिती द्यावी. ना.देसाई.
             २० एप्रिल नंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथीलता मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. परंतू याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती जिल्ह्यातील लोकांना द्यावी. अनावश्यक गर्दी होणार नाही,याची दक्षता घ्यावी तसेच जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पाणी पुरवठा योजनांची कामे याबाबत सुद्धा नियोजन करावे असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यातील उपाययोजनांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा. लॉकडाऊन काळात जनतेच्या हिताकरीता प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचना.



          सातारा दि.१६ : राज्याचे गृहराज्यमंत्री व वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लॉकडाऊन काळातील वाशिम जिल्हयातील उपाययोजनां संदर्भात सर्व शासकीय जिल्हास्तरीय अधिकारी यांचा आढावा घेतला.केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल,यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच रास्तभाव दुकानांमधून वितरीत होणाऱ्या अन्नधान्य वितरणाची कार्यवाही अधिक गतीने करून प्रत्येक पात्र व्यक्तीला धान्य मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी आढावा बैठकीत दिल्या.
          लॉकडाऊन परिस्थितीत वाशिमला जाणे शक्य नसल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर,जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार आदी सहभागी झाले होते.
           यावेळी वाशिम जिल्ह्यात आपल्या वेळोवेळीच्या सुचनानुसार कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ५० बेडचा आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींवर उपचारासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कोविद केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या ६ सेंटरची एकूण क्षमता ५०० बेड ठेवण्यात येणार आहे. आपले आदेशानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या १ कोटी रुपयांमधून पीपीई कीट,मास्क, व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यावेळी सांगत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.
             तसेच जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.तसेच चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांची वाहने सुद्धा जप्त केली जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना चेहऱ्यावर मास्क,रुमाल,गमछा न बांधणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी दिली.
              यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने जिल्ह्यात यापुढे सुद्धा संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी.जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना परवानगीशिवाय प्रवेश देवू नये, मुंबई, पुणे शहरातून वाशिमकडे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून त्यांची अडवणूक करण्याकरीता औरंगाबाद, जालना, बुलढाणा जिल्हयाच्या हद्दीवर चेकपोस्ट करण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे त्यानुसार त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगून त्यांनी विविध योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाची कार्यवाही अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याच्या हिस्स्याचे धान्य मिळेल,यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करुन त्याबाबतचा वेळोवेळी आढावा घ्यावा.धान्य वाटपाबाबत तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी,त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवून लोकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन दयावा अशा सुचनाही ना.देसाईंनी यावेळी दिल्या.
चौकट:-  जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. -- ना.देसाई.
              कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना जिल्हयामध्ये राबविताना जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनी जनतेच्या काळजीबरोबर स्वत:च्याही आरोग्याची काळजी घेवून काम करावे. वाशिम जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांचे काम उत्कृष्ट असून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली टीमवर्क करुन चांगल्या प्रकारे कोरोनावर वाशिम जिल्हयाने प्रतिबंध केला आहे ही कौतुकास्पद बाब आहे. असेही ना.देसाई म्हणाले.

Wednesday 15 April 2020

कोरोनाच्या संकटामुळे दौलतनगरचा यंदाचा पारायण सोहळा होणार साध्यापध्दतीने. खंड पडू नये म्हणून गणेश मंदीरात पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडणार. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.



                   दौलतनगर दि.१४:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो.यंदा या पारायण सोहळयाचे अकरावे वर्ष असून कोरोनाच्या संकटामुळे या पारायणामध्ये खंड पडू नये याकरीता दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीरात साध्या पध्दतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडण्यात येणार असल्याची माहिती श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे संकल्पक राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
                     महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल रोजी वी पुण्यतिथी असून प्रतिवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी कारखाना कार्यस्थळावरील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात  दि. २० एप्रिल ते दि. २३ एप्रिल या कालावधीत तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते. गत दहा वर्षापासून हा श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंडीतपणे याठिकाणी सुरु असून यंदाच्या वर्षी या पारायणाचे अकरावे वर्ष आहे.कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री.गणेश मंदीरामध्ये सोमवार दि. २० एप्रिल ते गुरुवार दि. २३ एप्रिल, २०२० या कालावधीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावा असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी पत्रकामध्ये केले आहे.