Sunday 5 April 2020

सुदैव चांगले ५४ जण निगेटिव्ह आले, तरीही काळजी घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना आदेश.




               
              दौलतनगर दि.०५ :- कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात असणारे तांबवे गांवामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली असून कराड शहरासह संपुर्ण तालुक्यावर तसेच पाटण मतदारसंघातील सुपने विभागात यामुळे भितीची छाया पसरली आहे. आपले सुदैव चांगले म्हणून ५४ संशयित रुग्णांच्या तपासण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. तरीही तालुका प्रशासनाने सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे.जनतेमध्ये भितीचे कोणतेही वातावरण राहणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घ्यावी असे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना दिले व कराड तालुक्यातील व सुपने विभागातील नागरिकांनी घाबरु नका,सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
                 तांबवे ता.कराड येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमिवर या विभागाची व कराड तालुक्याची परिस्थिती जाणून घेणेकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांची कराड विश्रामगृह याठिकाणी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना आदेश व तालुक्यातील नागरिकांना काळजी घेण्याची विनंती केली यावेळी बैठकीस कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसिलदार अमरदीप वाकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव,गटविकास अधिकारी आबासाहेब पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता देशमुख,पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, किशोर धुमाळ, उब्रंज सपोनि अजय गोरड,तळबीड सपोनि श्रीमती पाटील,सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा हुंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
              कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने कराड तालुक्यात काय काय उपाययोजना तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती ना.शंभूराज देसाईंनी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे व उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांच्याकडून प्रथमत: घेतली. यावेळी कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, तांबवे गावातील मुंबई रहिवाशी रुग्णाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या गावांबरोबर आसपासच्या गांवामध्ये भितीचे वातावरण निर्माण होवून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.बाधित व्यक्तीच्या त्याच्या कुटुंबियासह संपर्कात आलेल्या अन्य काहीजणांची आरोग्य विभागाने तपासणी केल्यानंतर संपर्कातील व्यक्ती या निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे.तालुका प्रशासनाने यासंदर्भातील विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे असून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण राहणार नाही.अचानक तांबवे गावातील बाधित व्यक्तीची बातमी बाहेर आल्यामुळे हे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने नाकाबंदी,जमावबंदी तसेच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला जात असल्याचे दिसून येत आहे.ही चांगलीच बाब आहे. 
                संचारबंदीच्या काळात विनाकारण कोणी फिरताना दिसले किंवा संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना पुर्वीच दिल्या आहेत परंतू कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांमध्येही संचारबंदीचे नियम पाळले जात आहेत का? याची तपासणी पोलीस यंत्रणेने करावी यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर करावी यात हयगय करु नये. कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरीता जसे प्रशासन सज्ज आहे तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व त्यांच्या कुटुंबिंयांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. संचारबंदीमध्ये तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरुच ठेवून नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनानेही ठेवावी. अडचणीच्या काळात जशी जनतेकडून आपण सहकार्याची अपेक्षा ठेवतो तशी जनतेचीही आपल्या प्रशासनाकडून अपेक्षा असते.सर्वांच्या सहकार्यातुन कोरोनाविरुध्दचा सुरु असलेला लढा यशस्वी होणार आहे त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची काळजी घेण्याची गरज आहे तशीच जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे. ती काळजी जनतेने घ्यावी अशी विनंती ना.शंभूराज देसाईंनी करुन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कराड तालुक्यातील तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना तसेच जनतेला काही अडचणी असतील तर त्या त्यांनी जरुर सांगाव्यात शासनाच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगून अधिकारीवर्ग खरोखरच चांगले काम करीत आहे या कामांबरोबर त्यांनी अजुनही सतर्क राहून काळजी  घ्यावी असे ते शेवठी बोलताना म्हणाले.

No comments:

Post a Comment