वाशिम दि.२५ : वाशिम
जिल्ह्यात गतवर्षी
झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे आगामी हंगामात
पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे घरगुती बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
त्यामुळे कृषि विभागाने योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दर्जेदार
पुरेसे बियाणे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी आज दिल्या.गृहराज्यमंत्री व वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
आढावा बैठकीचे आज,२५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी
वरीलप्रमाणे सुचना केल्या.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई,केंद्रीय मनुष्यबळ विकास,माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे हे
अकोला येथून तसेच खासदार भावना गवळी,आमदार अमित झनक,जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,जिल्हा
परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक
कुमार मीना हे वाशिम येथून व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई म्हणाले,वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र,गतवर्षी
झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या
दर्जाचे घरगुती बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे याबाबतची
माहिती संकलित करुन आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे.
तसेच सध्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या घरगुती बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी
कृषि विभागाने विशेष मोहीम राबवावी.जेणेकरुन आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे
नुकसान होणार नाही. तसेच खरीप हंगामात बोगस बियाणे,खते व कीटकनाशकांची विक्री होवू
नये,यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात
भरारी पथके नेमावीत. अशाप्रकारे बोगस बियाणे, कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्यांवर
कडक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.खरीप हंगामात १६०० कोटी
रुपये पिककर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रत्येक पात्र
शेतकऱ्याला पिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. सर्व बँकांना
देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन जिल्हा उपनिबंधक
सहकारी संस्था व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांनी नियमितपणे पाठपुरावा करावा, अशा
सूचनाही पालकमंत्री ना. देसाई यांनी यावेळी दिल्या.
यावेळी केंद्रीय
राज्यमंत्री ना.धोत्रे म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य वेळी कर्ज उपलब्ध
होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे नियोजन करुन त्यानुसार
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज मिळेल, याची खबरदारी घ्यावी.जेणेकरुन पिक
कर्ज वाटपाबाबत कोणत्याही शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत. तसेच
वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात असेही
त्यांनी सांगितले तसेच खासदार गवळी म्हणाल्या, जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच पालकमंत्री पांणद रस्ते योजनेतून पांणद रस्त्यांची
कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची
वाहतूक करण्यासाठी मदत होईल. यावरुन पांणद रस्त्यांची कामे अधिक गतीने व मोठ्या
प्रमाणात करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणार
असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले
शेतकऱ्यांना यंदा
चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे.बियाणे व खते विक्री करतांना
होणाऱ्या लिंकिंगसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा.त्याचबरोबर
मुंगळा येथील काही शेतकऱ्यांचा संत्रा गुजरात व तेलंगाना राज्यात अडकला असल्याचे आमदार
झनक यांनी सांगितले.त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री ना.देसाई यांनी गुजरात व
तेलंगाना राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न
करणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यात राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत झालेल्या
सामुहिक शेततळ्यांमध्ये अस्तरीकरण साठी वापरलेली ताडपत्री जुनी होवून ती खराब झाली
आहे.त्यामुळे शेततळ्यातून पाण्याचा अपव्यय होत आहे.कृषि विभागाच्या माध्यमातून
जुन्या सामुहिक शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी ताडपत्री उपलब्ध करून देण्याबाबत जि.प. अध्यक्ष
ठाकरे यांनी विनंती केली.
यावेळी खरीप हंगाम
पूर्व तयारीची माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तोटावार यांनी जिल्ह्यात
४ लक्ष १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित असून याकरिता २ लक्ष १२ हजार
७२८ क्विंटल बियाणाची आवश्यकता भासणार आहे. सार्वजनिक,खासगी व शेतकरी उत्पादक
कंपन्यांच्या माध्यमातून २ लक्ष २१ हजार ३७४ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध
होईल. यापैकी प्रमुख पिके असलेल्या सोयाबीनची पेरणी २ लक्ष ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर
प्रस्तावित असून याकरिता ७७ हजार ७१६ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे.जिल्ह्यात
सोयाबीनचे ८३ हजार ३६२ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. तुरीचे ५३ हजार ९०० हेक्टर
क्षेत्र प्रस्तावित असून याकरिता ३ हजार ६३८ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्याचे
नियोजन करण्यात आले. तसेच खरीप हंगामासाठी ५० हजार मेट्रिक टन रासायनिक खताची
मागणी नोंदविण्यात आली असून ५६ हजार २९० मेट्रिक टन रासायनिक खताला मंजुरी मिळाली
असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमरावती येथून कृषि सहसंचालक सुभाष नागरे हे
सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. वाशिम येथून महावितरणचे
अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, पाटबंधारे विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता
प्रशांत बोरसे,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, प्रभारी जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment