दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- मारुल तर्फ पाटण ता.पाटण गांवामध्ये गॅस्ट्रोची लागण होवून सुमारे
85 ग्रामस्थांना याचा त्रास झाला असून ही बाब अतिशय गंभीर आहे. ही साथ आटोक्यात आणणेकरीता
तातडीने सर्वोत्तरी प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत सुरु करावेत अशा सक्त सुचना राज्याचे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रातांधिकारी व आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना
दिल्या आहेत. गावांतील पाईपलाईन अत्यंत जुनी असल्याने दुषीत पाण्यामुळे ही परिस्थिती
उद्भवली आहे.या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ना.शंभूराज देसाईंनी तातडीने त्यांचे आमदार
फंडातून 15 लक्ष रुपयांचा निधी देत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला बोलवून या गावच्या
योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचा व मंजुरी घेवून तात्काळ या योजनेच्या पाईपलाईनच्या
दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
मारुल तर्फ पाटण या गांवातील
नळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन अत्यंत जुनी असल्याने या पाईपलाईनमधून दुषीत पाणीपुरवठा
गावांतील ग्रामस्थांना झाल्यामुळे गांवामध्ये गॅस्ट्रोची लागण होवून सुमारे 85 ग्रामस्थांना
उलटया व जुलाब याचा त्रास झाला आहे. जुन्या पाईपलाईनमधून दुषीत पाणी पुरवठा झाल्यानेच
गावकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला हे समजताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी तातडीने महसूल,ग्रामविकास व आरोग्य विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची
पाटण शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली व वरीलप्रमाणे सुचना देत या गांवाच्या योजनेच्या
व पाईपलाईन दुरुस्तीच्या कामांस तात्काळ निधी देणेकरीता त्याचदिवशी त्यांनी जिल्हाधिकारी
सातारा यांना लेखी पत्र देत त्यांचे आमदार फंडातून 15 लक्ष रुपयांचा निधी देण्याचे
आदेश दिले.
एवढया मोठया प्रमाणात अतिसाराची लागण गांवामध्ये होणे हे अतिशय गंभीर आहे. उलटया
व जुलाब झालेल्या सुमारे 85 ग्रामस्थांना त्यांचे घरामध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र
व ग्रामीण रुग्णालय पाटण येथे उपचार देणे सुरु केले आहेत. ही साथ लवकरात लवकर कशी आटोक्यात
येईल याकरीता महसूल विभागाच्या प्रातांधिकारी,
ग्रामविकास विभागाच्या गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी
व्यक्तीश: लक्ष घालून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवाव्यात.अशा सुचना करुन गटविकास
अधिकारी यांना तातडीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांला बोलवा माझे आमदार
फंडातून आजच मी या पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरीता आवश्यक असणारा 15 लाख रुपयांचा
निधी मंजुर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना देतो या योजनेचा
प्रस्ताव दोन दिवसात जिल्हाधिकारी यांचेकडे मान्यतेकरीता पाठवा आणि या योजनेचे काम
लवकरात लवकर सुरु करुन या गांवातील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी कसे लवकर देता येईल हे
पहा असे सांगत गांवातील जीर्ण झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेतील दुषीत पाण्यामुळे ही
अतिसाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या पाण्याचा वापर न करण्याच्या
सुचना मंडलाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत गांवामध्ये
दयाव्यात. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच ग्रामीण रुग्णालय पाटण येथील आरोग्य
विभागाचे एक पथक या गांवामध्ये ही अतिसाराची साथ आटोक्यात येईपर्यंत तैनात ठेवावे अशाही
सुचना यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना केल्या.
No comments:
Post a Comment